Tuesday 3 January 2017

आम्ही सावित्रीच्या लेकी



   माणसाच्या आयुष्यातली ,जन्म आणि मृत्यू ही दोनच ढळढळीत सत्य . जन्माचा सोहळा आनंदाने साजरा होतो . ऐपत नसली तरीही . मृत्युला मात्र गंभीरतेची सजा. उदासीनतेची छटा . किंबहुना मरण कुणालाच न रुचणार .चिता ,प्रेत, तिरडी, स्मशान, सरण, या शब्दांचा सगळ्यानाच तिटकारा. हे शब्दही उच्चारण निषिध्द .या शब्दांकडे कधी जिव्हाळ्यान बघितलय कुणी? जे माणसाच अंतिम सत्य आहे. अटळ आहे. स्त्री तर या बाबतीत अगदीच झटकून असल्यासारखी . पण जग बदलतंय. स्त्रीच्या याही जाणीवा आता प्रगल्भ होताहेत. पुरुषापेक्षाही जास्त .
       गुलाबबाई अमरलाल त्रिपाठी , जन्म साधारणपणे १९१४-१५ चा असावा. जन्म अलाहाबादेतला. सातव्या वर्षी लग्न झालं, त्यानंतर चार वर्षात मुलाला जन्म दिला .त्याच वर्षी तिचे वडील वारले. पण तिने स्मशान पौरोहीत्याच काम दारागंज घाटावर सुरु केलं. त्याला विरोध झाल्यावर , विरोध करणारया समस्त ब्राम्हण वर्गाला तिने प्रश्न केला ,अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही? एवढ करून ती थांबली नाही तर तिनं गंगेच्या किनारी स्वत:चा घाट बांधला. रसुलाबाद घाट ! तिची कहाणी निव्वळ एका स्त्रीची कहाणी नाही तर समाजव्यवस्था आणि समाजमनावरील पगडा यांच्या विरोधात उभ्या राहाणाऱ्या गुलाबची ही कथा आहे. परंपरेला नाकारून सिद्ध केलेलं स्वत:च अस्तित्व , समाजाला ,धर्माला केलेले प्रश्न आणि आपली तत्व समाजाला मान्य करायला लावणार, एक कणखर व्यक्तीमत्व म्हणजे ही आधुनिक गार्गी आहे. आजही तिच्या व्यक्तिमत्वाचा दरारा घाटावर आहे. भलेभले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत. (आज या घटकेला ती जिवंत आहे की नाही माहीत नाही. हा ८ वर्षांपूर्वी मी वाचलेला संदर्भ आहे. अजून जिवंत असण्याची श्यक्यता आहे. कारण नव्वदीतही ठणठणीत होती .) ) एकेकाळी सती जाणारी स्त्री आता अंत्यविधी करते ! समस्त स्त्री जातीच्या दृष्टीने हा केवढा मोठा सकारात्मक बदल आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे स्त्रिया स्मशानात जात नाहीत. जवळची व्यक्ती गेली तरी स्त्रिया अंत्ययात्रेत सहभागी होत नाहीत. मागे घरातच थांबतात. एवढ असताना उत्तर प्रदेशात एक स्त्री स्वत:चा स्मशानघाट बांधते हे आश्चर्यजनकच होते. 
      महाराष्ट्रात हे घडलं १८९० मधे. महात्मा फुले यांच्या मृत्युनंतर, त्यांच्या अंत्ययात्रेत सावित्रीबाईनी हातात मडके धरले होते. फुले वाड्यापासून वैकुंठ स्मशानभूमी पर्यंत त्या चालत गेल्या. ज्यावेळी स्त्रिया शिकायला बाहेर पडू शकत नव्हत्या , अशा काळात त्यानी फक्त पतीच्या अन्त्ययात्रेतच सहभाग घेतला नाही तर आत्यंतिक दु:खातही जोतिबांच्या चितेला त्यांनी स्वत:च अग्नी दिला.त्यावेळी त्यांचा दत्तक पुत्र यशवंत आणि पुतण्याही त्यांच्या बरोबर होते. पण अग्नी सावित्री बाईनीच दिला. निव्वळ स्त्रीशिक्षणासाठीच फुले दाम्पत्यान आयुष्य वेचल नाही तर जीवनातले सगळे आदर्श त्यांनी स्वत:च्या रुपान समाजासमोर ठेवायला बघितले. आज जवळ जवळ शंभर वर्षाने महाराष्टात त्या आदर्शाचा कित्ता गिरवला गेला .

      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्रालाही तेवढाच धक्का बसला , वडिलांच्या जाण्याने कोसळून पडलेली मुलं आईला सांभाळत होती. दोन मुली आणि एक मुलगा , तिघांनी मिळून वडिलांवर अंत्यसंस्कार केला. थोड्याच दिवसात घडलेली आणखी एक दु:खद घटना, कॉम्रेड पानसरे यांची हत्या. पानसरेंच्या मुलाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्यावर त्यांच्या नातवांनी, मुलगी आणि सून यांनी अंत्यसंस्कार केले. गेल्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कन्या पंकजा यांनी अग्निसंस्कार केले. जगरहाटीविरुद्ध जाऊन हे पाउल उचललं जातंय याचं कौतुकाच होतंय. आतापर्यंत , मुलगा हवा कशासाठी तर, यातल प्राधान्य होतं मृत्युनंतर अग्नी देण्यासाठी. तोच खरा वारस असा अलिखित नियम होता. मुळातच मृदू, हळव्या ,नाजूक स्त्रीला हा कठोर, कणखर क्षण कसा पेलवेल हा खरा प्रश्न होता. तो आता स्त्रीने मोडीत काढला आहे. स्त्री प्रसंगी वज्राहुनही कठीण होऊ शकते हे जगाला दाखवून दिले आहे. मृत्युसारख्या  रुक्ष क्षणालाही स्त्री तितक्याच धीरोदात्तपणे सामोरी जात आहे. नश्वर देहावर अग्निसंस्कार करणाऱ्या, या क्रांतीज्योती सावित्रीच्या लेकीच नव्हेत काय?


                               .......................................सविता नाबर
   Published in Lokamat, Kolhapur edition