Wednesday 25 May 2016

लक्ष्मण रेषा संयमाची

 

        कदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले.  आलटून पालटून प्रत्येकाने थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला. पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलवू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला, क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला.
 जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई. नंतर बलराम जागे झाले, बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलरामही क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. आता पहार्‍याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण त्यांनी शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहिले. पिशाच्च अजून संतापले, मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण शांत होते.   एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसजसा पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. त्यांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते. माणूस बुद्धीचा उपयोग करून संयम पाळू शकतो. एकदा राग आला की तो काहीही करतो. क्रोधामुळे माणसाच्या शरीराचे नुकसान तर होतेच. पण त्याबरोबर मानसिक दुबळेपणा येतो. राग आला की तुम्ही जर तोंड बंद ठेवले तर समोरच्याचे काही चालूच शकत नाही. तुमचा राग वाढणार नाही. आणि दोन हातांनी टाळी वाजत असल्याने, एकाने तोंड बंद ठेवले की दुसर्‍याला आपोआपच गप्प बसावे लागते.
      ही खरेतर अनुभव घेण्याची गोष्ट आहे. विकारांच्या आणि भावनावेगाच्या कचाट्यात न सापडता त्यांना बळी न पडता मन शांत ठेवणे ही तशी सोपी गोष्ट नाही. पण ती प्रयत्नाने शक्य आहे. कारण सर्वसामान्य माणसावर या विकारांचा आणि भावनांचा इतका प्रचंड पगडा असतो की त्यातून सहजासहजी सुटका होत नाही. किंबहुना आपण भावनेच्या विळख्यात सापडलो आहोत हेच मुळी माणसाला समजत नाही.
      बोलणे, खाणे, यासाठी तोंडावर नियंत्रण पाहिजे. या सगळ्या मोहाचे, भावनांचे मूळ आहे मन. एकदा का मनावर काबू ठेवला की बाकी सर्व मग सोपे होऊन जाते. कुठलीही गोष्ट मर्यादेत करणे म्हणजे संयम. कित्येक दोष असे आहेत की माणसाने त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय त्याला यशाच्या पायर्‍या चढता येत नाहीत. त्यातला एक आहे क्रोध. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसची पत्नी खूप कजाग होती. पत्नीचे कठोर बोलणे ऐकताना सॉक्रेटिस आपले ओठ दाताखाली घट्ट दाबून धरत असे. ज्याला संयम पाळता येतो तोच क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतो. जिभेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवला तर बरेच काही शक्य होते.
      एक सामान्य, कापडाचा दुकानदार होता. एकदा त्याच्या दुकानात एका मोठ्या कापड गिरणीचा मालक आला. त्याने त्या दुकानदाराला कापडाचे शंभर दोनशे नमुने दाखवायला लावले. दुकानदार शांतपणे संयम पाळून सर्व नमुने दाखवत राहिला. एवढे सर्व होऊन त्याने फक्त एकाच नमुन्याचे अर्धा मीटर कापड विकत घेतले. पण अशा ग्राहकामुळे दुकानदार नाराज न होता त्याने त्याचे आभार मानले. ती बडी आसामी काही वेळाने पुन्हा त्याच्या दुकानात आली. संयम पाळल्याबद्दल त्याने दुकानदाराची स्तुति केली. त्याने आपल्या कापड गिरणीचा एकमेव विक्रेता म्हणून त्याची निवड केली. लहानशा दुकानाचा मालक असलेला हा दुकानदार बघता बघता कोट्याधीश झाला. त्याच्या यशाचे रहस्य होते त्याच्या शांतपणात आणि संयमात. ज्याच्याकडे आत्मनियंत्रण आहे तो नेहमी कृतिशील असतो. त्याची कल्पनाशक्ति नेहमी ताजी आणि तरल राहते. स्वत:वर नियंत्रण असल्यामुळे मत्सर, सुड या भावना मनात आल्या तरी त्यावर मात करता येते.
     संकटे थोड्याच काळासाठी असतात. एकदा एक गृहस्थ पगार झाल्यावर घरी येत असताना कोणीतरी त्यांचे  पाकीट मारले. आता घरभाडे, किराणा, मुलांची फी, कर्जाचे हफ्ते सगळे भागवायचे कसे? हे विचार त्यांच्या मनात येत होते. घरी येत असतानाच त्यांनी मनाचा निश्चय केला. मौन पाळूनच त्यांनी घरात प्रवेश केला. पत्नीने विचारले केव्हा मिळणार पगार? त्यांनी सांगितले, मिळेल काही दिवसानी. एका मित्राकडून, ऑफिसमधल्या कुणाकडून पैसे घेतले. असे करत किराणा, मुलांची फी, घरभाडे भागवले. चेहर्‍यावर काळजीची रेषही उमटू न देता पुढच्या महिन्याच्या एक तारखेला जेव्हा पगार झाला तेव्हा त्यांनी पाकीट मारले गेल्याची गोष्ट पत्नीला सांगितली. तुम्ही मला संगितले नाही! ती म्हणाली. “संगितले असते तर काळजी करण्याशिवाय तुम्हाला काहीच करता आले नसते. जे झाले त्याचे दु;ख करून काहीच उपयोग नव्हता.” अडचण मनात ठेऊन त्यांनी वेळ मारून नेली होती.
    आजकाल तरुण मुलांना दिसेल ती वस्तु ताबडतोब हवी असते. कुठल्याच मोहावर मात करायची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यासाठी धीर धरण्याची किंवा संयम पाळण्याची त्यांना सवय नाही अशावेळी मनाची समजूत घालणे आवश्यक असते. मन तर आपल्याच ताब्यात असते. हो म्हटले तरी तयार असते. नाही म्हटले तर गप्प बसते. त्याला संयमाचे वळण लावणे जरूरी असते.  
   -------------------सविता नाबर        

  Published in Maharashtra Times on 25th May 2016   
  




Tuesday 24 May 2016

मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार !!

   

          क कावळा होता. त्याला आपल्या काळ्या रंगाचे फार वैषम्य वाटायचे. पाण्यात पाहिले की आपले तोकडे पंख आणि काळा रंग त्याची निराशा वाढवायचे. हंस कसा पांढराशुभ्र आहे. आपल्याला देवाने असा रंग का दिला नाही म्हणून तो दु:खी कष्टी व्हायचा. एकदा तो गेला हंसाकडे. त्याचे ऐकून घेतल्यावर हंस म्हणाला, अरे रंगाचे काय घेऊन बसलास? तो पोपट पहा किती छान, दुरंगी आहे. त्याला निसर्गाने रंग आणि आवाजही बहाल केलाय. आपण जाऊन पोपटाला विचारू. ते दोघे पोपटाकडे गेले. पोपटाने काही वेगळेच म्हणणे मांडले. माझा रंग काय फार छान नाही. तो मोर पाहिलात? त्याच्या रंगात अनेक छटा आहेत. नयन मनोहर अशा रंगांनी, पिसार्‍यामुळे  आणि तुर्‍यामुळे तो कसा डौलदार वाटतो. ते तिघे मोराकडे गेले. मोर आपला पिसारा फुलवून उभा होता. पण मनाने दु:खी कष्टी दिसत होता. त्याने समर्थन केले माझ्या पिसार्‍यामुळेच मला असे बंधनात अडकवले आहे. माणसांना माझे रूप पाहायला आवडते, त्यामुळे माझी इथून सुटका नाही, नाहीतर तो कावळा कसा मुक्तपणे हवेत विहार करतोय! ज्या कावळ्याला आपल्या रंगाचे दु:ख होते त्याला त्याच्या स्वातंत्र्याचे महत्व मोराने दाखवून दिले. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्यच असतो. आणि तिथेच त्याने आनंदी आणि सुखीही राहिले पाहिजे.  
      सर्वसाधारणपणे माणसाची प्रवृत्ती असते, एकाची दुसर्‍याशी तुलना करायची. आपल्याकडे दुसर्‍याइतके चांगले काही नाही म्हणून कष्टी व्हायचे. कुणा एकाचे काम हे स्वतंत्रपणे जोखले जात नाही. तुलना होत रहाते. मोसंबी आणि संत्र्याची तुलना होऊ शकत नाही, आंबा आणि सफरचंदाचीही तुलना होऊ शकत नाही. ना गुलाब आणि जुईची तुलना होऊ शकते, ना चाफा आणि मोगर्‍याची तुलना होऊ शकते. प्रत्येकजण आपआपल्या जागी एकमेवाद्वीतीय असतो. प्रत्येकाच्या अंगचे गुण वेगळे तसेच त्याची कौशल्ये वेगळी. एखाद्याला संगीतात गती असेल तर दुसर्‍याला शिल्पकलेत रस असेल. कुणी चांगला वक्ता असेल तर कुणाचे लेखन लोकांच्या हृदयाला हात घालणारे असू शकेल. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, दुसर्‍याशी तुलना करताना तुम्ही स्वत:ला कळत नकळत कमी लेखत असता. दुसर्‍यासारखे व्हायचे म्हणजे तुम्ही तसे नाही आहात हे मान्य करणे. एखाद्याची करियर ही त्याच्या परिस्थितीला अनुकूल असेल तीच तुम्हाला अनुकूल असेल असे नाही. एखादा व्यवसाय निवडणे, दहावीच्या परीक्षेनंतर कॉलेजमध्ये शिक्षणाची शाखा निवडणे हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, बौद्धिक परिस्थितीवर, आर्थिक कुवतीवर अवलंबून असते. मैत्रीणीने एखादी साईड निवडली म्हणजे तुम्हाला ती योग्य ठरेल असे नाही. त्या विषयात रस असला पाहिजे, त्याची आवड असली पाहिजे. जगात दुसर्‍या व्यक्तीशी तुम्ही स्वत:ची तुलना करणे अपमानास्पद आहे असे बिल गेट्सचे म्हणणे आहे.   
     विप्रो कंपनीचे सीईओ अजिम प्रेमजी यांनी एकदा एमबीएच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या भाषणात अत्यंत चपखल असे उदाहरण दिले होते, त्यांचे ते भाषण अजूनही चांगले लक्षात आहे. त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिले होते. सशाला एकदा शाळेत पोहण्याच्या विषयात कमी मार्क्स पडले. झाले त्याचे आईवडील चिंताक्रांत. मग त्यांनी आपल्या ससुल्याला पोहण्यामधे खूप परिश्रम घ्यायला लावले. पण वार्षिक परीक्षेत ससा ना पळण्याच्या शर्यतीत पहिला आला. ना पोहण्याच्या स्पर्धेत. कारण ज्या विषयात कमी मार्क्स पडतात तो विषय घोटवण्याचा आपला शिरस्ता. त्यामुळे पळण्याच्या विषयाचा त्याने सराव केलाच नाही. त्यामुळे त्याच्या जन्मजात कलेतही तो मागे पडलाच. पण ज्या विषयात त्याला गम्य नाही त्यातही तो मागे राहिला. शाळेत चांगला विषय आणखी चांगला करण्यापेक्षा किंवा आपल्यातले अंगभूत कौशल्य वाढवण्यापेक्षा आपण जोर देतो ते ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो त्यावर. अर्थात तेही थोडे फार येणे आवश्यक आहेच. पण अधिकतरचे अधिकतम चांगले येण्यापेक्षा आपला भरिभार असतो तो न येणार्‍या विषयावर.
       जर तुम्ही चांगल्या गुणांच्या व्यक्तीचा आदर्श समोर ठेवला आणि त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर त्याच्या चांगल्या गुणांचा मत्सर करण्यापेक्षा ते नक्कीच चांगले. ही थोडी सकारात्मक तुलना झाली. पण जर नकारात्मक तुलना केली, एखाद्याकडे गाडी, बंगला आहे. देशी परदेशी दौरे होतात म्हणून तुम्ही स्वत;ला नुसते कोसत बसलात तर ती तुमच्या व्यक्तित्व विकासाच्या मार्गातली धोंड ठरेल. तुलना करण्यात वेळ, शक्ति विनाकारण वाया जाते. स्पर्धात्मक तुलना कधीतरी जीवघेणी ठरू शकते. त्यातली अहमहमिका काढली तर निकोप वृद्धी होते.  
    तुलना होणे स्वाभाविक आहे, थोडा हेवा वाटणे हेसुद्धा स्वाभाविकच आहे. पण जेव्हा आपल्यातल्या गुणांचा विकास न करता, मर्यादांवरच(कमकुवत वैशिष्ट्यांवर) कष्ट घ्यायचे ठरवता, तेव्हा तो मार्ग चुकीचा असतो. त्यामुळे आपले आत्मभान आणि आत्मगौरव खच्ची होतो. स्वत:चीच अनुकंपा वाटायला लागते. त्यापेक्षा उद्दीष्ट काय हे ठरवून ते साध्य करण्याचा ध्यास घेतला तर आपले जीवन एक आदर्श शिल्प होईल.
          ------------------------सविता नाबर  

published in Maharashtra Times Kolhapur edition on 18th May 2016
     

Saturday 7 May 2016

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता......

 

      भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पाने का सडली याचे उत्तर एकच न फिरवल्यामुळे. एखाद्या गोष्टीत सातत्य असणे महत्वाचे असते. सराव, सातत्य, परिश्रम, प्रयत्न सगळ्यांचा अर्थ एकच. शाळेतला अभ्यास, गायनाचा रियाज, तबल्याचा सराव, सतार, सरोदची प्रॅक्टीस, चित्रे काढण्याची तप:श्चर्या या सगळ्याचे एक सूत्र आहे ते म्हणजे प्रयत्नांचे सातत्य. एखादा दिवस जरी सराव केला नाही तरी हात अडतो. खेळाच्या सरावाचेही असेच आहे. मनात खूप इच्छा असूनही प्रयत्न न करता नुसतेच बसून राहिले तर हातून काहीच होऊ शकत नाही. ते शेखचिल्लीचे स्वप्न होईल. स्थितीशीलता काही कामाची नाही. मनाला, शरीराला गती हवी. मला आठवते एका कवितेची ओळ. कुणाची ती नक्की लक्षात नाही. पण माझ्या म्हणण्याला दुजोरा देणारी आहे, अतिशय समर्पक.  
 “एक चिरंतन गती तरीही, रोज नवे आवर्तन घडते, एक झाड अन तीच डहाळी, फूल सकाळी नवेच फुलते.”    
      एखादे कसब, कला शिकणार्‍या व्यक्तीकडून आपण लगेच स्पर्धात्मक परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवतो. त्याचे प्रदर्शन लोकांसमोर करायला हवे, इतरांपेक्षा मी श्रेष्ठ ठरायला पाहिजे अशा जबरदस्त अपेक्षा ठेवतो. जरा मूल गायला लागले की पाहुण्यांसमोर त्याचे प्रयोग सुरू, जरा कुठे कविता लिहिली कि त्याच्या शब्दात महाकवी दिसायला लागतो. जगण्यातल्या काही कलांमध्ये स्पर्धेला महत्व द्यायला हवे. कधी आणि किती ते ठरवायला पाहिजे. परफॉर्मन्सच्या भरात जर कृतीमधले समाधान नष्ट होत असेल तर कालांतराने गुणवत्ता घसरणारच. स्पर्धा हे प्रयत्नांचे अंतिम ध्येय असता कामा नये. जगण्यामधली काही कौशल्ये निखळ आनंदासाठी ठेवायला पाहिजेत. स्पर्धेमुळे माझा सराव टिकतो, मी जिंकतो म्हणून मला खेळावेसे वाटते, म्हणजे स्वत;च्या आनंदासाठी न खेळता फक्त स्पर्धेसाठी खेळले जाते. स्पर्धा संपली, प्रयत्न संपले.
       कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपल्याला ती पटकन यावी असे वाटत असते. पण त्यासाठी सातत्य असल्याशिवाय ती हासिल करता येत नाही. Practise Makes A Man Perfect. कुठलेही वाहन चालवायला शिकायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न हवेत. तनमन अर्पून ध्येय गाठण्यासाठी मार्गाक्रमणा केली पाहिजे. कोळी आपले जाळे विणत असतो. आपण ते जाळे तोडले तरी पुन्हा त्याचा नवीन जाळे विणण्याचा खटाटोप चालूच असतो. घराबाहेर त्याला झटकले तरी कुठेतरी भिंतीच्या कोपर्‍याशी त्याला जाळे विणायला मोक्याची जागा मिळालेलीच असते.  
       आपल्या डोळ्यांसमोर अनेक उदाहरणे या सातत्याची आहेत. पंडित भीमसेन जोशी गाण्याच्या तळमळीने घराबाहेर पडले. सुखवस्तू आयुष्य बाजूला सारून गाणे हेच जीवन मानले. त्यासाठी गुरुसेवा केली. विद्यार्थी दशेत अनेक खस्ता खाल्ल्या. आजच्या पिढीसारखी त्यांना विद्या सहज साध्य झाली नाही. परिश्रम, मेहनतीने गाण्याची तालिम त्यांनी मिळवली. कधी एकदा मला प्रसिद्धी मिळेल याची किंचितही अपेक्षा न बाळगता गाण्यासाठी आयुष्य वेचले. म्हणून किर्ति आणि प्रसिद्धी त्यांच्या मागोमाग आले. एका माथाडी कामगाराची मुलगी, रुपाली रेपाळे, तिची आर्थिक परिस्थिति काय असणार? सगळ्याच बाजूने घोडे लंगडे होते. शारीरिक पातळीवरही ती फार मजबूत नव्हती. पुढच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पाडण्यासाठीचे कुठलेच पाठबळ नसताना ती ते तरुन गेली. जलपरीच होऊन गेली. ध्यास आणि त्यासाठीचे परिश्रम हेच तर तिच्या यशाचे गमक होते.   
      तुमची सगळी करियर म्हणजे एक दोरा असे मानले तर प्रत्येक स्पर्धेतला आपला परफॉर्मन्स म्हणजे एक फूल आहे. फूल म्हणजे माला नव्हे. यशापयश हा प्रवासातला एक टप्पा असतो. शेवटचा मुक्काम नाही. आपण जिंकण्याचे प्रयत्न सोडायचे नाहीत. पण हरणे आणि जिंकणे या दोन्ही शक्यता आहेत हे नजरेआड करायचे नाही. सातत्य कशात शोधायचे? जिंकण्या हरण्यात नाही तर प्रयत्नांच्या पराकाष्ठेमध्ये. प्रयत्नांपुढे यशाला हार मानावीच लागते.
     दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात, रोज सकाळी उठल्यावर आपल्या हातात चोवीस तासांचा एक कोरा चेक मिळतो. त्यावर कुठला आकडा टाकायचा ते आपण ठरवायचे. जोपर्यन्त दिवसाचे चोवीस तास कमी पडतात तोपर्यंत तुम्ही तरुण असता. कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न महत्वाचे असतात. ते आत्मविश्वास वाढवतात. आत्मविश्वास असला की आपोआपच कार्यक्षमता वाढते. माणसाचा आत्मविश्वास एकदा जागृत झाला की त्याचे सामर्थ्य दुप्पट, चौपट होते. दुर्दम्य आत्मविश्वास असणारा माणूस आपल्या ध्येयाकडे न थकता सतत वाटचाल करत असतो.
      योगाभ्यासात तप ही संज्ञा खूप महत्वाची मानली आहे. एखाद्या गोष्टीसाठी न थकता सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे तप. शरीराला शिस्त लावणे म्हणजे कायिक तप. मनाला पटवून देणे हे मानसिक तप. एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. प्रयत्न करत असताना आपल्या चुका आपल्याच लक्षात येतात. त्यातून अडचणी कोणत्या आहेत हे सापडल्यावर आपले सर्व सामर्थ्य वापरुन अडचणींशी लढा देता येतो. दुबळेपणा समजल्यावर त्यावर मात करता येते. अंगात कार्यक्षमता भरपूर असली की कामेही उत्साहात होतात.

       ......................................सविता नाबर 

Published in Maharashtra Times as on 4th May2016