भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पाने का सडली याचे उत्तर एकच न
फिरवल्यामुळे. एखाद्या गोष्टीत सातत्य असणे महत्वाचे असते. सराव,
सातत्य, परिश्रम, प्रयत्न सगळ्यांचा अर्थ एकच. शाळेतला अभ्यास,
गायनाचा रियाज, तबल्याचा सराव, सतार,
सरोदची प्रॅक्टीस, चित्रे काढण्याची तप:श्चर्या या सगळ्याचे एक सूत्र
आहे ते म्हणजे प्रयत्नांचे सातत्य. एखादा दिवस जरी सराव केला नाही तरी हात अडतो.
खेळाच्या सरावाचेही असेच आहे. मनात खूप इच्छा असूनही प्रयत्न न करता नुसतेच बसून
राहिले तर हातून काहीच होऊ शकत नाही. ते शेखचिल्लीचे स्वप्न
होईल. स्थितीशीलता काही कामाची नाही. मनाला,
शरीराला गती हवी. मला आठवते एका कवितेची ओळ. कुणाची ती नक्की लक्षात नाही. पण
माझ्या म्हणण्याला दुजोरा देणारी आहे, अतिशय समर्पक.
“एक चिरंतन गती तरीही,
रोज नवे आवर्तन घडते, एक झाड अन तीच डहाळी,
फूल सकाळी नवेच फुलते.”
एखादे
कसब, कला शिकणार्या
व्यक्तीकडून आपण लगेच स्पर्धात्मक परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवतो. त्याचे प्रदर्शन
लोकांसमोर करायला हवे, इतरांपेक्षा मी श्रेष्ठ ठरायला पाहिजे अशा जबरदस्त अपेक्षा ठेवतो.
जरा मूल गायला लागले की पाहुण्यांसमोर त्याचे प्रयोग सुरू, जरा कुठे कविता लिहिली कि त्याच्या शब्दात
महाकवी दिसायला लागतो. जगण्यातल्या काही कलांमध्ये स्पर्धेला महत्व द्यायला हवे.
कधी आणि किती ते ठरवायला पाहिजे. परफॉर्मन्सच्या भरात जर कृतीमधले समाधान नष्ट होत
असेल तर कालांतराने गुणवत्ता घसरणारच. स्पर्धा हे प्रयत्नांचे अंतिम ध्येय असता
कामा नये. जगण्यामधली काही कौशल्ये निखळ आनंदासाठी ठेवायला पाहिजेत. स्पर्धेमुळे
माझा सराव टिकतो, मी जिंकतो म्हणून
मला खेळावेसे वाटते, म्हणजे स्वत;च्या आनंदासाठी न खेळता फक्त स्पर्धेसाठी खेळले
जाते. स्पर्धा संपली, प्रयत्न संपले.
कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपल्याला ती पटकन यावी असे वाटत असते. पण
त्यासाठी सातत्य असल्याशिवाय ती हासिल करता येत नाही. Practise Makes A Man
Perfect. कुठलेही वाहन चालवायला शिकायचे असेल तर त्यासाठी
प्रयत्न हवेत. तनमन अर्पून ध्येय गाठण्यासाठी मार्गाक्रमणा केली पाहिजे. कोळी आपले
जाळे विणत असतो. आपण ते जाळे तोडले तरी पुन्हा त्याचा नवीन जाळे विणण्याचा खटाटोप
चालूच असतो. घराबाहेर त्याला झटकले तरी कुठेतरी भिंतीच्या कोपर्याशी त्याला जाळे
विणायला मोक्याची जागा मिळालेलीच असते.
आपल्या डोळ्यांसमोर अनेक उदाहरणे या सातत्याची आहेत. पंडित भीमसेन जोशी
गाण्याच्या तळमळीने घराबाहेर पडले. सुखवस्तू आयुष्य बाजूला सारून गाणे हेच जीवन
मानले. त्यासाठी गुरुसेवा केली. विद्यार्थी दशेत अनेक खस्ता खाल्ल्या. आजच्या
पिढीसारखी त्यांना विद्या सहज साध्य झाली नाही. परिश्रम, मेहनतीने गाण्याची तालिम त्यांनी मिळवली. कधी
एकदा मला प्रसिद्धी मिळेल याची किंचितही अपेक्षा न बाळगता गाण्यासाठी आयुष्य
वेचले. म्हणून किर्ति आणि प्रसिद्धी त्यांच्या मागोमाग आले. एका माथाडी कामगाराची
मुलगी, रुपाली रेपाळे, तिची आर्थिक परिस्थिति काय असणार? सगळ्याच बाजूने घोडे लंगडे होते. शारीरिक
पातळीवरही ती फार मजबूत नव्हती. पुढच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पाडण्यासाठीचे
कुठलेच पाठबळ नसताना ती ते तरुन गेली. जलपरीच होऊन गेली. ध्यास आणि त्यासाठीचे
परिश्रम हेच तर तिच्या यशाचे गमक होते.
तुमची सगळी
करियर म्हणजे एक दोरा असे मानले तर प्रत्येक स्पर्धेतला आपला परफॉर्मन्स म्हणजे एक
फूल आहे. फूल म्हणजे माला नव्हे. यशापयश हा प्रवासातला एक टप्पा असतो. शेवटचा
मुक्काम नाही. आपण जिंकण्याचे प्रयत्न सोडायचे नाहीत. पण हरणे आणि जिंकणे या
दोन्ही शक्यता आहेत हे नजरेआड करायचे नाही. सातत्य कशात शोधायचे? जिंकण्या हरण्यात नाही तर प्रयत्नांच्या
पराकाष्ठेमध्ये. प्रयत्नांपुढे यशाला हार मानावीच लागते.
दत्तप्रसाद दाभोळकर
म्हणतात, रोज
सकाळी उठल्यावर आपल्या हातात चोवीस तासांचा एक कोरा चेक मिळतो. त्यावर कुठला आकडा
टाकायचा ते आपण ठरवायचे. जोपर्यन्त दिवसाचे चोवीस तास कमी पडतात तोपर्यंत तुम्ही
तरुण असता. कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न महत्वाचे असतात. ते आत्मविश्वास
वाढवतात. आत्मविश्वास असला की आपोआपच कार्यक्षमता वाढते. माणसाचा आत्मविश्वास एकदा
जागृत झाला की त्याचे सामर्थ्य दुप्पट, चौपट होते. दुर्दम्य
आत्मविश्वास असणारा माणूस आपल्या ध्येयाकडे न थकता सतत वाटचाल करत असतो.
योगाभ्यासात तप ही संज्ञा खूप महत्वाची मानली
आहे. एखाद्या गोष्टीसाठी न थकता सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे तप. शरीराला शिस्त
लावणे म्हणजे कायिक तप. मनाला पटवून देणे हे मानसिक तप. एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व
मिळवायचे असेल तर त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. प्रयत्न करत असताना आपल्या चुका
आपल्याच लक्षात येतात. त्यातून अडचणी कोणत्या आहेत हे सापडल्यावर आपले सर्व
सामर्थ्य वापरुन अडचणींशी लढा देता येतो. दुबळेपणा समजल्यावर त्यावर मात करता येते.
अंगात कार्यक्षमता भरपूर असली की कामेही उत्साहात होतात.
......................................सविता
नाबर
Published in Maharashtra Times as on 4th May2016
No comments:
Post a Comment