एक
कावळा होता. त्याला आपल्या काळ्या रंगाचे फार वैषम्य वाटायचे. पाण्यात पाहिले की
आपले तोकडे पंख आणि काळा रंग त्याची निराशा वाढवायचे. हंस कसा पांढराशुभ्र आहे.
आपल्याला देवाने असा रंग का दिला नाही म्हणून तो दु:खी कष्टी व्हायचा. एकदा तो
गेला हंसाकडे. त्याचे ऐकून घेतल्यावर हंस म्हणाला, अरे
रंगाचे काय घेऊन बसलास? तो पोपट पहा किती छान, दुरंगी आहे. त्याला निसर्गाने रंग आणि आवाजही बहाल केलाय. आपण जाऊन पोपटाला
विचारू. ते दोघे पोपटाकडे गेले. पोपटाने काही वेगळेच म्हणणे मांडले. माझा रंग काय
फार छान नाही. तो मोर पाहिलात? त्याच्या रंगात अनेक छटा
आहेत. नयन मनोहर अशा रंगांनी, पिसार्यामुळे आणि तुर्यामुळे तो कसा डौलदार वाटतो. ते तिघे
मोराकडे गेले. मोर आपला पिसारा फुलवून उभा होता. पण मनाने दु:खी कष्टी दिसत होता. त्याने
समर्थन केले माझ्या पिसार्यामुळेच मला असे बंधनात अडकवले आहे. माणसांना माझे रूप
पाहायला आवडते, त्यामुळे माझी इथून सुटका नाही, नाहीतर तो कावळा कसा मुक्तपणे हवेत विहार करतोय! ज्या कावळ्याला आपल्या
रंगाचे दु:ख होते त्याला त्याच्या स्वातंत्र्याचे महत्व मोराने दाखवून दिले.
प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्यच असतो. आणि तिथेच त्याने आनंदी आणि सुखीही
राहिले पाहिजे.
सर्वसाधारणपणे
माणसाची प्रवृत्ती असते, एकाची दुसर्याशी तुलना करायची. आपल्याकडे
दुसर्याइतके चांगले काही नाही म्हणून कष्टी व्हायचे. कुणा एकाचे काम हे
स्वतंत्रपणे जोखले जात नाही. तुलना होत रहाते. मोसंबी आणि संत्र्याची तुलना होऊ
शकत नाही, आंबा आणि सफरचंदाचीही तुलना होऊ शकत नाही. ना गुलाब
आणि जुईची तुलना होऊ शकते, ना चाफा आणि मोगर्याची तुलना होऊ
शकते. प्रत्येकजण आपआपल्या जागी एकमेवाद्वीतीय असतो. प्रत्येकाच्या अंगचे गुण
वेगळे तसेच त्याची कौशल्ये वेगळी. एखाद्याला संगीतात गती असेल तर दुसर्याला
शिल्पकलेत रस असेल. कुणी चांगला वक्ता असेल तर कुणाचे लेखन लोकांच्या हृदयाला हात
घालणारे असू शकेल. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, दुसर्याशी
तुलना करताना तुम्ही स्वत:ला कळत नकळत कमी लेखत असता. दुसर्यासारखे व्हायचे
म्हणजे तुम्ही तसे नाही आहात हे मान्य करणे. एखाद्याची करियर ही त्याच्या
परिस्थितीला अनुकूल असेल तीच तुम्हाला अनुकूल असेल असे नाही. एखादा व्यवसाय निवडणे, दहावीच्या परीक्षेनंतर कॉलेजमध्ये शिक्षणाची शाखा निवडणे हे प्रत्येक
व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, बौद्धिक परिस्थितीवर, आर्थिक कुवतीवर अवलंबून असते.
मैत्रीणीने एखादी साईड निवडली म्हणजे तुम्हाला ती योग्य ठरेल असे नाही. त्या
विषयात रस असला पाहिजे, त्याची आवड असली पाहिजे. जगात दुसर्या
व्यक्तीशी तुम्ही स्वत:ची तुलना करणे अपमानास्पद आहे असे बिल गेट्सचे म्हणणे आहे.
विप्रो कंपनीचे सीईओ अजिम प्रेमजी यांनी एकदा एमबीएच्या
विद्यार्थ्यांना दिलेल्या भाषणात अत्यंत चपखल असे उदाहरण दिले होते,
त्यांचे ते भाषण अजूनही चांगले लक्षात आहे. त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिले
होते. सशाला एकदा शाळेत पोहण्याच्या विषयात कमी मार्क्स पडले. झाले त्याचे आईवडील
चिंताक्रांत. मग त्यांनी आपल्या ससुल्याला पोहण्यामधे खूप परिश्रम घ्यायला लावले.
पण वार्षिक परीक्षेत ससा ना पळण्याच्या शर्यतीत पहिला आला. ना पोहण्याच्या
स्पर्धेत. कारण ज्या विषयात कमी मार्क्स पडतात तो विषय घोटवण्याचा आपला शिरस्ता.
त्यामुळे पळण्याच्या विषयाचा त्याने सराव केलाच नाही. त्यामुळे त्याच्या जन्मजात
कलेतही तो मागे पडलाच. पण ज्या विषयात त्याला गम्य नाही त्यातही तो मागे राहिला.
शाळेत चांगला विषय आणखी चांगला करण्यापेक्षा किंवा आपल्यातले अंगभूत कौशल्य
वाढवण्यापेक्षा आपण जोर देतो ते ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो त्यावर. अर्थात तेही
थोडे फार येणे आवश्यक आहेच. पण अधिकतरचे अधिकतम चांगले येण्यापेक्षा आपला भरिभार
असतो तो न येणार्या विषयावर.
जर तुम्ही चांगल्या गुणांच्या व्यक्तीचा
आदर्श समोर ठेवला आणि त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर त्याच्या चांगल्या
गुणांचा मत्सर करण्यापेक्षा ते नक्कीच चांगले. ही थोडी सकारात्मक तुलना झाली. पण
जर नकारात्मक तुलना केली, एखाद्याकडे गाडी, बंगला आहे. देशी परदेशी
दौरे होतात म्हणून तुम्ही स्वत;ला नुसते कोसत बसलात तर ती तुमच्या व्यक्तित्व
विकासाच्या मार्गातली धोंड ठरेल. तुलना करण्यात वेळ, शक्ति विनाकारण वाया
जाते. स्पर्धात्मक तुलना कधीतरी जीवघेणी ठरू शकते. त्यातली अहमहमिका काढली तर
निकोप वृद्धी होते.
तुलना होणे स्वाभाविक आहे,
थोडा हेवा वाटणे हेसुद्धा स्वाभाविकच आहे. पण जेव्हा आपल्यातल्या गुणांचा विकास न
करता, मर्यादांवरच(कमकुवत वैशिष्ट्यांवर) कष्ट घ्यायचे ठरवता,
तेव्हा तो मार्ग चुकीचा असतो. त्यामुळे आपले आत्मभान आणि आत्मगौरव खच्ची होतो.
स्वत:चीच अनुकंपा वाटायला लागते. त्यापेक्षा उद्दीष्ट काय हे ठरवून ते साध्य
करण्याचा ध्यास घेतला तर आपले जीवन एक आदर्श शिल्प होईल.
------------------------सविता नाबर
published in Maharashtra Times Kolhapur edition on 18th May 2016
Kadakk ki
ReplyDelete