Wednesday, 25 May 2016

लक्ष्मण रेषा संयमाची

 

        कदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले.  आलटून पालटून प्रत्येकाने थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला. पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलवू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला, क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला.
 जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई. नंतर बलराम जागे झाले, बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलरामही क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. आता पहार्‍याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण त्यांनी शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहिले. पिशाच्च अजून संतापले, मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण शांत होते.   एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसजसा पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. त्यांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते. माणूस बुद्धीचा उपयोग करून संयम पाळू शकतो. एकदा राग आला की तो काहीही करतो. क्रोधामुळे माणसाच्या शरीराचे नुकसान तर होतेच. पण त्याबरोबर मानसिक दुबळेपणा येतो. राग आला की तुम्ही जर तोंड बंद ठेवले तर समोरच्याचे काही चालूच शकत नाही. तुमचा राग वाढणार नाही. आणि दोन हातांनी टाळी वाजत असल्याने, एकाने तोंड बंद ठेवले की दुसर्‍याला आपोआपच गप्प बसावे लागते.
      ही खरेतर अनुभव घेण्याची गोष्ट आहे. विकारांच्या आणि भावनावेगाच्या कचाट्यात न सापडता त्यांना बळी न पडता मन शांत ठेवणे ही तशी सोपी गोष्ट नाही. पण ती प्रयत्नाने शक्य आहे. कारण सर्वसामान्य माणसावर या विकारांचा आणि भावनांचा इतका प्रचंड पगडा असतो की त्यातून सहजासहजी सुटका होत नाही. किंबहुना आपण भावनेच्या विळख्यात सापडलो आहोत हेच मुळी माणसाला समजत नाही.
      बोलणे, खाणे, यासाठी तोंडावर नियंत्रण पाहिजे. या सगळ्या मोहाचे, भावनांचे मूळ आहे मन. एकदा का मनावर काबू ठेवला की बाकी सर्व मग सोपे होऊन जाते. कुठलीही गोष्ट मर्यादेत करणे म्हणजे संयम. कित्येक दोष असे आहेत की माणसाने त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय त्याला यशाच्या पायर्‍या चढता येत नाहीत. त्यातला एक आहे क्रोध. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसची पत्नी खूप कजाग होती. पत्नीचे कठोर बोलणे ऐकताना सॉक्रेटिस आपले ओठ दाताखाली घट्ट दाबून धरत असे. ज्याला संयम पाळता येतो तोच क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतो. जिभेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवला तर बरेच काही शक्य होते.
      एक सामान्य, कापडाचा दुकानदार होता. एकदा त्याच्या दुकानात एका मोठ्या कापड गिरणीचा मालक आला. त्याने त्या दुकानदाराला कापडाचे शंभर दोनशे नमुने दाखवायला लावले. दुकानदार शांतपणे संयम पाळून सर्व नमुने दाखवत राहिला. एवढे सर्व होऊन त्याने फक्त एकाच नमुन्याचे अर्धा मीटर कापड विकत घेतले. पण अशा ग्राहकामुळे दुकानदार नाराज न होता त्याने त्याचे आभार मानले. ती बडी आसामी काही वेळाने पुन्हा त्याच्या दुकानात आली. संयम पाळल्याबद्दल त्याने दुकानदाराची स्तुति केली. त्याने आपल्या कापड गिरणीचा एकमेव विक्रेता म्हणून त्याची निवड केली. लहानशा दुकानाचा मालक असलेला हा दुकानदार बघता बघता कोट्याधीश झाला. त्याच्या यशाचे रहस्य होते त्याच्या शांतपणात आणि संयमात. ज्याच्याकडे आत्मनियंत्रण आहे तो नेहमी कृतिशील असतो. त्याची कल्पनाशक्ति नेहमी ताजी आणि तरल राहते. स्वत:वर नियंत्रण असल्यामुळे मत्सर, सुड या भावना मनात आल्या तरी त्यावर मात करता येते.
     संकटे थोड्याच काळासाठी असतात. एकदा एक गृहस्थ पगार झाल्यावर घरी येत असताना कोणीतरी त्यांचे  पाकीट मारले. आता घरभाडे, किराणा, मुलांची फी, कर्जाचे हफ्ते सगळे भागवायचे कसे? हे विचार त्यांच्या मनात येत होते. घरी येत असतानाच त्यांनी मनाचा निश्चय केला. मौन पाळूनच त्यांनी घरात प्रवेश केला. पत्नीने विचारले केव्हा मिळणार पगार? त्यांनी सांगितले, मिळेल काही दिवसानी. एका मित्राकडून, ऑफिसमधल्या कुणाकडून पैसे घेतले. असे करत किराणा, मुलांची फी, घरभाडे भागवले. चेहर्‍यावर काळजीची रेषही उमटू न देता पुढच्या महिन्याच्या एक तारखेला जेव्हा पगार झाला तेव्हा त्यांनी पाकीट मारले गेल्याची गोष्ट पत्नीला सांगितली. तुम्ही मला संगितले नाही! ती म्हणाली. “संगितले असते तर काळजी करण्याशिवाय तुम्हाला काहीच करता आले नसते. जे झाले त्याचे दु;ख करून काहीच उपयोग नव्हता.” अडचण मनात ठेऊन त्यांनी वेळ मारून नेली होती.
    आजकाल तरुण मुलांना दिसेल ती वस्तु ताबडतोब हवी असते. कुठल्याच मोहावर मात करायची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यासाठी धीर धरण्याची किंवा संयम पाळण्याची त्यांना सवय नाही अशावेळी मनाची समजूत घालणे आवश्यक असते. मन तर आपल्याच ताब्यात असते. हो म्हटले तरी तयार असते. नाही म्हटले तर गप्प बसते. त्याला संयमाचे वळण लावणे जरूरी असते.  
   -------------------सविता नाबर        

  Published in Maharashtra Times on 25th May 2016   
  




No comments:

Post a Comment