हरघडी बदल रही है रूप जिंदगी, छॉंव है
कभी, कभी है धूप जिंदगी ........ आयुष्याचे असेच असते. दर
क्षणी ते नवीन नवीन वळण घेत असते. त्याला तोंड द्यायला आपली मानसिक आणि शारीरिक
वृत्ती, क्षमता, प्रवृत्ती मात्र
तरोताजगी ठेवायला लागते. जीवनात काहीतरी करून दाखवायचे असेल,
काही बनायचे असेल तर संघर्ष अटळ आहे. संघर्ष हा आयुष्याचा
स्थायीभाव झाला पाहिजे. लहान बालिकेचे किंवा बालकाचे रूपांतर
तरुण व्यक्तिमद्धे होत असताना, तिला किंवा त्याला जो शारीरिक, मानसिक संघर्ष करावा लागतो तो अटळच असतो. नैसर्गिकही. ती जीवन प्रक्रियाच
आहे. स्थित्यंतर होताना संघर्ष होणारच !
संगीत मार्तंड पंडीत जसराज यांनी आपले
उमेदवारीचे दिवस कसे काढले याबद्दल सांगताना संघर्षाला ते धन्यवाद देतात. वडिलांची सेवा तर करायला मिळाली नाही, आणि आईला कर्करोगाने ग्रासले होते. तिचे औषध शोधत पायी दक्षिण कोलकाता मधून मध्य कोलकाता पर्यंत पोहोचले. ब-याच दुकानात ते
औषध मिळाले नाही. मग एका
दुकानात ते मिळाले तर द्यायला त्यासाठी पैसे नव्हते, जेवढे पैसे होते ते देऊन बाकीचे नंतर देतो म्हणून सांगितले. पण त्याचवेळी कुणीतरी आधार दिला, दुकानदाराला सांगितले ‘जेवढे पैसे आहेत तेवढे घ्या आणि सगळी औषधे द्या, बाकीचे पैसे माझ्या खात्यावर लिहून ठेवा’ ते दुकान मालक होते. औषधांची व्यवस्था तर
झाली, पण डॉक्टरांनी सांगितले
होते की, दिवसातून दोनदा त्यांना इंजेक्शन द्यावे लागणार.
त्याचा खर्च पंधरा रूपये होता.
दिवसाला पंधरा रूपये मिळवणे कठीण काम होते. ज्यावेळी डॉक्टर
जायला निघाले तेव्हा
जसराजजींनी त्यांना सांगितले की आज संध्याकाळी ऑल इंडिया रेडिओत मी गाणार आहे. त्यांनी म्हटले मला गाण्यात रस नाही. पण दुस-या दिवशी डॉक्टर आले तेव्हा ते म्हणाले की तुझे गाणे मी माझ्या भाचीच्या घरी ऐकले . ती म्हणाली की या
गाणा-याकडे पैसे नसतात. त्यांची ती भाची म्हणजे गीता दत्त. डॉक्टरांनी त्या
दिवसानंतर नाममात्र फी घ्यायला सुरवात
केली.
ऑल
इंडियावर गाणारा हा गायक त्यावेळी कफल्लक होता. हे उदाहरण एवढ्यासाठी की जेव्हा
एखादा मोठा कलाकार अशा संघर्षातून जाऊन आपले स्थान जनमानसात निर्माण करतो त्याला
आपण आदर्शवत मानतो.
सुरवंटाचे
फुलपाखरू होताना केवढी प्रचंड संघर्षाची तयारी त्याला करावी लागत असेल! ही
प्रक्रिया फार जीवघेणी असते. एका कुरूप, काटेरी,
लोकांच्या बीभत्स, किळसवाण्या नजरेला पात्र असलेल्या किडयाचे
जेव्हा एका सुंदर, नेत्रसुखद,
रंगबिरंगी फुलपाखरात रूपांतर होते तेव्हा त्याला एका खूप मोठ्या संघर्षाला तोंड
द्यावे लागते. असेच एक फुलपाखरू कोशातून बाहेर यायला धडपडत होते. त्याचा पूर्वीचा
सुरवंटाचा संघर्ष आता संपला होता. त्याने स्वत:भोवती कोष विणून स्वत:लाच घडवण्याची
प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोषातून बाहेर पडण्याची. हळूहळू तो
कोष फाडून बाहेरही आला. काही क्षणातच त्याचे फुलपाखरू बनणार होते. त्याची धडपड एक
संवेदनशील माणूस पहात होता. त्याला त्या फुलपाखराची धडपड बघवेना. त्याच्या बारीकशा
काडीसारख्या पायांना चिकटलेला द्रवरूप पापुद्रा त्याच्या बाहेर पडण्याला अडथळा
होतोय असे त्याला वाटले म्हणून त्याने हलकेच तो पापुद्रा कापला. पण झाले भलतेच, त्याचे पंख मोकळे होण्याऐवजी मिटलेलेच राहिले. त्याचे अंग सुजले. ते
फुलपाखरू कायमचेच अपंग झाले. स्वत:च्या धडपडीतून फुलणारे जीवन त्या संवेदनशील
माणसाने खुडुन टाकले होते. फुलपाखरू स्वत:बरोबरच्या संघर्षातून फुलले असते तो
संघर्षच नाहीसा झाला आणि नैसर्गिक धडपडीतून सुंदर होण्याऐवजी बिचारे पंगु झाले.
आजची तरुण पिढी संघर्ष करायला थोडीशी बिचकते. खरेतर मुलांना यशापयशाच्या
संघर्षाला आपणच तोंड द्यायला शिकवले पाहिजे. तरच मुले मानसिकरित्या बलवान होतील.
मैदानी, शारीरिक खेळांच्या अभावामुळे पडणे झडणे तरुण पिढीला माहीत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी, ती मिळावी म्हणून वाट पाहणे
जमत नाही. यासाठी धीर धरण्याचा धडाही मनाला द्यायला पाहिजे आणि शारीरिक धडपडही
पाहिजे. संवेदनक्षम मनाला झगडण्याचे बाळकडू द्यायला हवे. अकाली जीवाचे मोल देणारी
मुले आयुष्यात अगदी छोट्या छोट्या संकटांना घाबरतात. समस्यांशी दोन हात करण्याची
तयारी ठेवली की मार्ग तर निघतोच शिवाय त्यामुळे आपले मनोबलही वाढते. कधी हा संघर्ष
दृश्य तर कधी अदृश्य स्वरुपात असतो. माणसाच्या
जन्मापासून त्याचा संघर्ष चालू होतो. मातेच्या उदरातून बाहेर येण्यासाठी अर्भकाला
झगडावे लागते. श्वास घेण्यासाठी धडपडावे लागते. यामुळेच त्याला रडू फुटते. तिथून
पुढे आयुष्यात दर क्षणाला संघर्षाला तोंड द्यावे लागते. तो झगडा असतो कधी
व्यक्तीशी, कधी विचाराशी, कधी परिस्थितीशी, कधी तत्वाशी, कधी समाजाशी. या संघर्षाला कधी
डगमगायचे नसते. तो तर जीवनातला एक अविभाज्य भाग असतो. जात्यात घातलेले धान्य
भरडल्याशिवाय त्याचे पीठ पडत नाही. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
-----------------------------सविता नाबर
Published in Maharashtra Times on 27th July 2016, kolhapur edition