माणसाच्या आयुष्यात श्रद्धेचे स्थान खूप मोठे आहे.
श्रद्धा मग ती देवावरची असो, गुरुवरची असो, संत महात्म्यावरची असो, ती आपल्याला मानसिक आधार देत
असते. देवाचे रूप अमूर्त. संत भूतकाळात जमा झालेले आहेत, अशा
वेळी मूर्त रूपातील श्रद्धा कुणावर ठेवायची हा मोठा प्रश्न असतो, त्यासाठी आपण गुरूचा आधार घेतो.
जन्माला आल्यानंतर काही
काळ आपल्यासमोर सर्वात मोठा आदर्श असतो. तो म्हणजे आई. आई जे काही करते ते
मुलाच्या दृष्टीने योग्य असते. तीच पूर्व दिशा असते. थोड्याशा कळत्या नकळत्या वयात
मोठी बहीण किंवा भाऊ हे आदर्श असतात. आईवडिलांचे वागणे हीच खरी वागण्या बोलण्याची
रीत हा समज डोक्यात पक्का बसतो. त्याच दरम्यान आयुष्यात खर्या अर्थाने गुरूचा
किंवा शिक्षकाचा प्रवेश होतो. गुरुने काहीही संगितले की ती
काळ्या दगडावरची रेघ असते. गुरु
शिष्य म्हटले की आपल्याला
द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची जोडी आठवते. त्याने
गुरूचा पुतळा उभा करून स्वयंप्रेरित होऊन शिक्षण घेतले. कधी कधी असे स्वयं दीप व्हायला लागते. यासाठी स्वत:ला ओळखता येणे फारच महत्वाचे आहे.
निसर्गाने प्रत्येकात काहीतरी सुप्त गुण
पेरुन ठेवलेले असतात. कधी ते सहजपणे दिसतात तर कधी घासून पुसून घ्यावे लागतात.
प्रत्येकजण एकमेवाद्वीतीय आहे. स्वत:ला एकवार त्रयस्थ नजरेन पाहिलं तर लक्षात येते
की प्रत्येक वेड पिलु राजहंस असतच.
सहा सात वर्षांची माझी एक छोटी मैत्रीण होती. ती
आणि तिच्यापेक्षा पाच वर्षानी मोठी तिची ताई दोघी एकत्रच शाळेत जात. पण काहीवेळा
ताईला आपले प्रश्न सोडवायला या छोटीची ढाल करावी लागे. छोटी मात्र बिनधास्त.
मुद्देसूद उत्तरे देऊन समोरच्याला निरुत्तर करत असे. तार्किक दृष्ट्या अतिशय योग्य
आणि हजरजबाबी बोलणे असल्यामुळे तिच्याशी व्यवस्थितच बोलावे लागायचे. तिची माझी भेट
झाली तेव्हापासून मी तिचा हा गुण उचलायचा प्रयत्न करतेय.
अत्त
दीप भव हा आयुष्याचा कानमंत्र बुद्धांनी मानवजातीला दिला. हा गुरु आहे, त्याच्याकडून योग्य ते शीक म्हणून आपणच आपल्या मनाला बजावायचे असते.
मनासारखा दुसरा गुरु शोधून तरी सापडेल काय? डॉक्टर वि. ना.
श्रीखंडे,
प्रख्यात सर्जन. त्यांच्या बोलण्यामध्ये दोष होता. मग बोलायला जीभ धजावणार तरी कशी? त्या दोषावर त्यांनी मात तर केलीच पण ते इतके मोठे निष्णात सर्जन झाले की
त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. अशा पुस्तकांच्या वाचनाने आपल्याला
वेळोवेळी कळत नकळत मार्गदर्शन होत असते. म्हणून ग्रंथ हे न बोलता बर्याचवेळा
गुरूचे काम करतात.
छोट्या छोट्या गोष्टीत सुबकता आणि सौंदर्य पहाणारी आई. वाचनाचा
व्यासंग वाढवणारे वडील. वडिलांमुळे गाण्याचा कान तयार
झाला. त्यांच्यामुळे मला तबल्याच्या क्षेत्रात यावेसे वाटले. तबला शिकवताना कै.
केशवराव धर्माधिकारी सरांनी विद्या कधीच हातची राखली नाही. पं. विभव नागेशकरांमुळे
तबल्याचा सराव कसा जीव तोडून करावा हे शिकायला मिळाले. गानयोगिनी
धोंडुताई कुलकर्णी यांच्याकडे मी गाण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले नाही पण त्यांचे
माझे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. त्यांचे प्रेमळ पण गाण्याच्या बाबतीत
कुठलाही वावगेपणा खपवून न घेणारे, शेवटपर्यंत कार्यरत
रहाणारे व्यक्तिमत्व फारच विलोभनीय होते. सांताक्रुझच्या योगा इन्स्टिट्यूटचे
सर्वेसर्वा असणारे ऋषितुल्य डॉक्टर जयदेव आणि श्रीमती हंसाजी यांनी तर माझा
आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सम्यक दृष्टीने विचार करायला
प्रवृत्त करणारा माझा नवरा, छोट्या गावातून येऊन स्वत:ला
अत्यंत सुयोग्य रीतीने विकसित करणारी माझी मैत्रीण, अनेक
मुलांना शिकवताना, समुपदेशन करताना त्यातून मिळालेले असंख्य
अनुभव. या सगळ्यामुळे माझे आयुष्य अतिशय समृद्ध झाले.
पूर्वी गुरुगृही राहून शिकले तरच विद्या
मिळायची, त्यासाठी बरेच कष्ट मुलांना काढायला लगायचे. गुरुपत्नी आणि गुरु हे मातापित्यासमान असायचे. त्यामानाने
आज कुठलीही विद्या मिळवणे सोपे झाले आहे. फक्त ती हस्तगत करण्यासाठी शिकण्याची आच
हवी. विद्या मिळाल्यावरही त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी साधना हवी. गुरुकडून जो
गुण घेण्यासारखा आहे तेवढाच उचलायचा. आणि आपल्या अंगी बाणवायचा कसोशीने प्रयत्न
करायचा. आपले मन हे टीप कागदासारखे असते. जे समोर घडेल ते टिपत असते. म्हणून
शक्यतो चांगले पहायचे, चांगले ऐकायचे,
चांगले वाचायचे. विंदांची कविता सगळ्यांनाच
माहीत आहे. देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे,
देता देता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे. देणार्या व्यक्तीचा चांगला गुण घेण
म्हणजे त्याला त्यावेळी गुरुस्थानी मानणे असेच मला वाटते. आपण
आजूबाजूच्या माणसांमधे असणारे गुण बघून नकळत त्यांचे अनुकरण करत असतो. फक्त अनुकरण
करताना ते डोळस असावं. आंधळेपणाने करू नये. त्यावेळेपुरती ती व्यक्ति गुरुच असते. अनुकरणाच्या
दिशेने उचललेले पाऊल हे योग्य की अयोग्य हे मात्र ठरवायला, स्वत:च गुरु व्हावे लागते.
--------------------------सविता
नाबर
Published on 20th July 2016 in Maharashtra Times,Kolhapur edition
No comments:
Post a Comment