Friday, 15 July 2016

धरावी परिवर्तनाची वाट

   

     ध्यंतरी एका सेमिनारला हजर रहाण्याचा योग आला. त्यामध्ये त्यांनी कावळेही कसे हुशार झालेत, त्यांच्या मधील बदलाची एक गोष्ट सांगितली. पूर्वीचा तहानलेला कावळा भांड्याच्या तळाशी असलेले पाणी वरपर्यंत म्हणजे त्याच्या चोचीपर्यंत पोहोचण्यासाठी दगड टाकत होता. आणि पाण्याची पातळी वाढवत होता. पण आताचा स्मार्ट कावळा गळक्या नळावर जाऊन त्या नळाला चोच (पक्षी: तोंड) लावतो. आता नुसते हार्ड वर्क नको तर स्मार्ट वर्क पाहिजे ही कामाची नवीन संकल्पना प्रचारात आली. नुसतीच ढोर मेहनत कामाची नाही. आपले काम योग्य दिशेने झाले तरच त्याचे चीज होते हा आजच्या जमान्याचा मूलमंत्र आहे.
      खरं तर माणसाला कोणताही बदल स्वीकारताना खूप जड जात. कारण पहिल्या स्थितीची इतकी सवय झालेली असते की झोपेत उठून करायला सांगितलं तरी नेहमी आपण करत असणारे काम चपखलपणे होत असतं. आणि थोडसं जरी टस की मस झालं तरी आयुष्याची घडी बदलते. त्यामुळे थोडीफार कुरकुर होतेच. स्थितीशीलतेची सवय झाल्याने एका स्थितीतून दुसर्‍या स्थितीत जाताना होणारा बदल त्रास देतोच. रेल्वेचे रूळ बदलताना खडखडाट होणारच.  
        बदलाच सगळ्यात मोठ उदाहरण म्हणजे स्त्री शिक्षण. स्त्रिया दीड शतकापूर्वी शिकत नव्हत्या. त्यावेळी फुले, आगरकराना स्त्री शिक्षणाचं बीज रोवायला बरेच प्रयास पडले. आणि आज आपल्याला त्या शुद्ध बीजापोटी आलेली रसाळ गोमटी फळे बघायला मिळतात. हा बदल घडताना, बर्‍याच जणीना अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासातून जाव लागलं. मानसिकतेत बदल होत असताना, पोशाख, राहणी, विचारसरणी यातही हळूहळू बदल होत गेला. मुलींना फक्त शालेय शिक्षणच नाही तर महाविद्यालयीन शिक्षण मिळत गेल. पुढे नोकरी, करियर करणार्‍या स्त्रिया हा बदल घडत गेला. आज कितीतरी स्त्रियांमुळे त्यांच्या व्यवसायाचे नाव झाले, त्यांच्या कंपन्यांचे नाव देशभरातच नाही तर जगभरात झाले.
       फार मोठी व्याप्ती असलेल्या या विषयाला गवसणी घालणे कठीण आहे. बदल हे सगळ्याच क्षेत्रात होत असतात. रेडिओचा शोध लागला, ग्रामोफोन आला, नंतर दूरदर्शन आले, व्हीसीआर, टेप रेकोर्डरचा जमाना येऊन गेला. डीव्हीडी प्लेअर आले तेही दिसेनासे झाले. पेजर तर आता लोकांना आठवतही नसतील. मोबाइल ही चीज नवीन असताना सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखी नव्हती. पण आता मोबाइल मध्ये झालेल्या क्रांतीने सगळ्यांनीच दुनियेला मुठ्ठीमध्ये बंद केलय. बदल हे जीवंत समाजाचे लक्षण आहे. स्थितीशीलता समाजाला पंगु बनवते. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की “हे जीवन म्हणजे बदल राजा, थांबला तो संपला.” पुढची पिढी छापील माध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमात जास्त रमणारी आहे. अनाथांची माय असणारी सिंधुताई सपकाळ कोणे एके काळी शिक्षणाच्या आवडीपोटी वाण सामानाचा कागदही हपापुन वाचत होती आणि घरच्या शिक्षणाच्या विरोधापायी तो गिळून टाकत होती. आज मुले फक्त वाचनाची आवड न जोपासता संगणकासारख्या प्रांतात मोठी भरारी घेत आहेत.
     आजच्या घडीला जी व्यक्ति चालू स्थितीशी जमवून घेऊ शकत नाही ती मागे पडते हे आपण पाहातोच. तिथे स्वत;चा हेका ठेवून चालत नाही. घरात वीज असताना, कोळसा, रॉकेल, लाकूड यांचाच वापर करणार म्हणून होत नाही. जो बदलत्या जगाशी जमवून घेतो तो पुढे जातो आणि स्मार्ट होतो. त्याच्या अंगी आपोआपच आत्मविश्वास येतो. संगणक हा आजच्या घडीला परवलीचा शब्द झाला आहे. त्याच्याशिवाय जगणारा माणूस अडाणी ठरतोय. आताच्या जगात आवश्यक असणारी सॉफ्ट स्किल्स अंगी बाणवणे अत्यंत आवश्यक असते. परस्पर नातेसंबंध जपावे लागतात. त्यासाठी शिष्टाचार अंगात मुरवणेही तेवढेच आवश्यक असते.  
       बदल हा स्वीकारला पाहिजे. नाहीतर दोन बेडकांच्या कथेसारख होईल. एका पाणीभरल्या भांड्यामधे एक बेडूक सोडला. आणि त्या भांड्यातील पाणी गरम करायला ठेवले. पाण्याच्या तापमानाबरोबर तो शांतपणे डुबक्या मारत राहिला. पाणी एवढे तापले की तो ना बाहेर येऊ शकला ना जीवंत राहू शकला. पण दुसर्‍या भांड्यात उकळते पाणी ठेवले. त्यात दूसरा बेडूक टाकला. त्याने टुणकन भांड्याबाहेर उडी मारली. परिस्थिती ओळखून पहिल्या बेडकाने जर बदल केला असता तर तो जीवास मुकला नसता. परिस्थितीनुरूप आपण स्वत:मधे बदल केला नाही तर “धोबी का कुत्ता, ना घरका ना घाटका” अशी स्थिती होते. आपण परिस्थितीशी जमवून घेऊ शकत नाही आणि परिस्थिती मात्र हाताबाहेर जाते. बदलत्या प्रवाहात स्वत:ला बदलण आपल्याच हातात असतं. भविष्यातील बदलाचा, आपल्या तर्कशास्त्राने वेध घेणारा फ्यूचर शॉक”, “पॉवर शिफ्ट”, आणि “थर्ड वेव्ह” या पुस्तकांचा जन्मदाता ऑल्विन टॉफ्लर याचा 27 जूनला मृत्यू झाला. आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी ज्या सगळ्याच क्षेत्रातील बदलाचा पट त्याने लोकांसमोर ठेवला होता, ते बदल आज आपण अनुभवत आहोत.  
      ................................सविता नाबर 


      Published on 13th July 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition

No comments:

Post a Comment