Friday, 15 July 2016

समाधी साधन.........

   

       दोरीवरून चालणारी डोंबार्‍याची पोर सगळ्यांनीच पाहिली असेल, किंवा आगीच्या वर्तुळाकार ज्वाळेतून आरपार जाताना तिच्या शरीराला त्याचा जरासुद्धा स्पर्श होऊ न देता ती शिताफीने सटकते. केवढे कमालीचे एकाग्रचित्त असते तिचे मन! तिचे चित्त किंचितही विचलित झाले तरी प्राणाशी गाठ असते. वय तर जेमतेम सहा सातच असते. ज्या वयात सुखवस्तू मुलांना एकाच ठिकाणी बराच वेळ बसणे किंवा एकाच कृतीवर मन केन्द्रित करणे अवघड असते. मग हे त्या मुलीलाच कसे जमते? यासाठी मनाला एकाग्र करण्याचा सराव आवश्यक आहे. उद्दिष्टाशी मनाची एकरूपता साधून त्यावर बराच काळपर्यंत स्थिर चित्ताने काम करणे अवघड असते. कारण आपल्या मनाला घडी घडी इकडे तिकडे विनाकारण भटकायची सवय लागलेली असते. त्याला हळूहळू आपल्या नियंत्रणात घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या ध्येयाकडे खेचून आणावे लागते.
      या सदरात लक्ष्यवेध हा विषय याआधी मी हाताळला होता. पण तो होता उद्दीष्ट जाणण्यासाठी आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी. मन एकाग्रचित्त असणे याला आपल्या ध्येयाच्या दृष्टीने फार महत्व आहे. एकदा लक्ष्यवेध झाल्यानंतर उद्दिष्टाशी एकरूप होणे खूपच महत्वाचे असते. चार प्रकारे मन एकाग्रचित्त करता येते. डोळे पूर्णपणे उघडे ठेवून, बाह्य गोष्टीवर लक्ष्य केन्द्रित करून. डोळे बंद ठेवून, अंत:चक्षु उघडे ठेवून म्हणजे मनाने, ज्या गोष्टी आपल्याला आनंददायी वाटतात, त्यावर लक्ष्य केन्द्रित करून, ही प्रतिमा सतत आपल्या नजरेसमोर येते आणि अदृश्य होते. त्या प्रतिमेला आपल्याला पुन्हापुन्हा नजरेसमोर आणावे लागते. या प्रकारच्या एकाग्रतेला मनाचे प्रचंड सामर्थ्य लागते. तिसरा एकाग्रतेचा प्रकार म्हणजे आपल्या श्वासावर मन केन्द्रित करणे. आपण श्वास घेतो कसा आणि सोडतो कसा याचे निरीक्षण करणे. डोळे उघडे अथवा बंद ठेवून, दोन्ही हे प्रकारे करता येते. आणि चौथा प्रकार म्हणजे मनातल्या मनात काही मंत्र किंवा श्लोक म्हणणे. आणि ते म्हणत असताना, ते लक्ष्यपूर्वक आपण स्वत:च ऐकणे. मनाची एकाग्रता विकसित करण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो.   
    कुठल्याही जत्रेत, प्रदर्शनात, समारंभात एक स्टॉल हमखास असतोच. तो म्हणजे डार्टचा. पाच सात फुटावर असणार्‍या चक्राकार तबकडीच्या बरोबर मध्यभागी डार्टने नेम साधायचा असतो. किंवा छोट्या बंदुकीने फुगे फोडायचे असले तरी आपले मन त्यावेळी किती एकाग्र असते! नजर आणि मन जराही इकडे तिकडे बघायला तयार नसते. ही असते एकाग्रता. समजा कुणी तुमचे चित्त विचलित करायचा प्रयत्न केला तरीही आपण टस की मस होत नाही.      तुम्ही एखादा खेळ, सामना, मॅच खेळता आहात. त्यावेळी आजूबाजूच्या प्रेक्षकांचा आरडाओरडा, टाळ्या, शिट्या, जल्लोष हे तर सतत कानावर पडत असतेच. शिवाय समोरचा प्रतिस्पर्धी जर तुल्यबळ असेल तर त्याचेही मनावर दडपण असते. खेळात चांगली कामगिरीही करायची असते. या सगळ्या गोष्टींचा एकाच वेळी सामना करत असताना मन एकाग्रचित्त असावे लागते. त्या गोष्टींचे योग्य ते भान ठेवून खेळावे लागते. तरच आपली खेळी चांगली होऊ शकते. एकाग्रता जितकी जास्त तेवढे त्या प्रसंगाचे, घटनेचे स्वरूप समजायला सोपे जाते. त्या प्रसंगातले बारकावे  समजून घेता येते.
     एकदा काही टारगट मुले शाळेत 3 शेळ्या सोडतात. त्यावर नंबर घालतात 1,2 आणि 4. मुले शाळेत शेळ्या शोधायला येतात. त्यांच्याबरोबर शिक्षक, काही पालकही शेळयांचा शोध घेणे चालू करतात. त्यांना एक, दोन आणि चार नंबर घातलेल्या शेळ्या सापडतात. मग सगळ्यांचा मोर्चा वळतो 3 नंबरच्या शेळीकडे. पण ती तर काही केल्या सापडत नाही. कारण तीन नंबरची शेळीच नसते. ते मात्र तीच शेळी दिवसभर शोधत बसतात. सगळ्यांच्या तक्रारी, नातेसंबंध, कामातले समाधान, करियर, पैसा या सगळ्याच्या बाबतीत जे उपलब्ध नाही तेच मनाला सगळ्यात जास्त खटकते. महत्वाचे असते ते आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामुग्री, वेळ, ऊर्जा. त्यामुळे शेळी नंबर तीन ची काळजी करायची नाही.
      काम करताना मन इतके एकाग्र असावे की आपल्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध असता कामा नये. एकाग्रता टिकवता येत नाही म्हणून इतरांना दोष देण्याचे काम आपण करतो. एकदा न्यूटनच्या पत्नीने त्याच्यासाठी दुपारी जेवण ठेवले आणि ती निघून गेली. संशोधनात गढलेल्या न्यूटनला प्रयोगातून बाहेर येण्याचे जेव्हा भान आले, तेव्हा रात्र झाली होती. हा विसरभोळेपणा नसून कामाशी तद्रूप झाल्याचा परिणाम म्हणता येईल. जेव्हा संगीत साधनेत कोणीही मग्न होते, तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचे किंवा कोलाहलाचे भान त्या व्यक्तिला नसते. एकदा लक्ष्य ठरल्यावर त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते. आणि त्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकताना कामाशी एकजीव झाले की आपल्या कामात शंभर टक्के परिपूर्णता येते. आत्मिक समाधान, अचिव्हमेंट, ईश्वरप्राप्ती अशा अनेक संज्ञानी या तपश्चर्येचे वर्णन करता येईल. याची अनुभूति नक्कीच प्रत्येकाने घ्यायला हवी.

           ...................................सविता नाबर   

 Published as on 13th July 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition
       





No comments:

Post a Comment