Wednesday 26 October 2016

भय इथले संपत नाही

    

      र्‍याच जणांचा हा अनुभव असतो. शाळेत स्टेजवर भाषण करायला उभे राहिले की ऐनवेळी हातापायाला कापरे भरते. आवाज तरी बसतो. जीभ टाळ्याला चिकटते. हाताला दरदरून घाम सुटतो. अनामिक भीती मनाचा ताबा घेते. परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यावर प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंत पोटात गोळा आलेला असतो, छातीत धडधडत असते. मुलाखतीला जाताना आपले नाव पुकारल्यावर उगाचच वेंधळेपणाने दाराला आपटतो. विनाकारण पायात पाय अडकतो. या दडपणामागचे कारण असते मनावर असलेला भयाचा पगडा. नवीन ठिकाणी जाताना आपल्याला ते ठिकाण मिळाले नाही तर...., परक्या प्रांतात जाताना वेळेवर फ्लाइट, रेल्वे मिळाली नाही, पोचली नाही तर ......, या भीतीच्या नकारात्मक विचारांनी मनाचा ताबा घेतला की आपली सारासार बुद्धी काम करेनाशी होते. इतकेच नव्हे तर जेव्हा एखादी वाईट बातमी कानावर पडते, तेव्हा आपल्या मनात त्या घटनेचे पुढचे वाईट चित्रण सुरू होते. म्हणूनच म्हणतात, मन चिंति ते वैरी न चिंति.
     जेव्हा आपला स्वत:वरचा विश्वास ठाम असतो, जास्तीतजास्त काय होईल? हा विचार मनात येऊन आलेल्या प्रसंगाला शांतपणे तोंड दिले तर तो प्रसंग फार संकटाचा रहात नाही. भित्यापाठी ब्रम्हराक्षस. भीतीमुळे कामात अडथळे निर्माण होतात. भीतीने ग्रासलेला माणूस कुठलही काम नीटपणे करू शकत नाही. कामात मन रमत नाही. बंगलोरची एक घटना आठवते. दहावीतला मुलगा. त्याच्या चांगल्या निकालाने घरचे लोक आनंदात होते. त्याची शोधाशोध करत होते. पण रिझल्टच्याच दिवशी त्या मुलाने आपला जीव दिला होता. निव्वळ नापास होऊ या भीतीने!
       जेव्हा परीक्षेच्या निकालाच्या आदल्या दिवशीच पेपरमध्ये बातमी येते, परीक्षेत नापास होणार या भीतीने आत्महत्या. तेव्हा ही भीती जीवाचे मोल तर घेऊन जातेच. पण कित्येक वेळा असे झाले आहे की निकाल लागल्यावर कळते ज्या विद्यार्थ्याने आपला जीव गमवला आहे तो परीक्षेत चांगल्या तर्‍हेने पास झाला आहे. मग या ब्रम्हराक्षसाला घाबरायचे कशाला? त्याक्षणी फक्त एवढाच विचार जर मनात आणला की मी फारतर नापास होईन, मला पुन्हा परीक्षेला बसावे लागेल. त्यासाठी जिवावर उदार व्हायची काही गरज नाही. मुलांना कधी पालक रागावतील ही भीती असते. पण आहे त्या घटनेला तोंड देण्याचा विश्वास आपण स्वत:मध्ये आणला तर भीतीचे नामोनिशाण राहत नाही.
      पाण्याचे भय असेल तर मुलांना पोहायला मज्जाव केला जातो, अपघाताची अनाठायी भीती असेल तर वाहन चालवायला मनाई असते. पालकांच्या अनावश्यक भीतीमुळे एकतर मुले या क्षेत्रापासून वंचित रहातात नाहीतर मुले अति कुतुहलापोटी त्याची चव चाखायला बघतात. हे करत असताना योग्य काळजी घेतली नाही तर अनर्थ ओढवतो.
    जसा प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, तसेच स्वत:वरच्या विश्वासाचा अभाव म्हणजे भीती. मनाला सकारात्मक विचारांची सवय लावली तर हा भीतीचा बागुलबुवा नाहीसा व्हायला वेळ लागत नाही. स्वत:वर आणि परिस्थितिवर या दोन्ही गोष्टींवर विश्वास पाहिजे. अडचणीतून मार्ग निघणार याची आपल्याला खात्री असली की पुढचा रस्ता आपोआप दिसायला लागतो. सकारात्मक विचारांच्या या मांदियाळीत आज मुद्दाम भीती या नकारात्मक भावनेचा उल्लेख करते आहे. कारण या भावनेवर मात करणे तेवढेच आवश्यक असते. दिवसागणिक आपले वय वाढेल तशा भीती वाढत असतात. वेळेवर त्याला पायबंद घातला नाही तर भीतीचा राक्षस कधी खाऊन जाईल काही सांगता येत नाही.   
     मी परीक्षेच्यावेळी आजारी पडीन, माझ्या पोटात दुखेल, स्पर्धेच्या वेळी मी ती व्यवस्थित पार पाडेन ना? मनात संशय आला, त्याची जागा भीतीने व्यापली की मन निराशेने ग्रासते. मनातली असेल नसेल ती आशा लोप पावते आणि पराभवाच्या दिशेने मन वाटचाल करायला लागते. महर्षि पतंजलि यांनी योगासूत्रात सर्प रज्जु न्याय याचे एक अतिशय समर्पक उदाहरण संगितले आहे. संध्याकाळच्या मंद प्रकाशात गुंडाळी करून ठेवलेले दोरखंडाचे  वेटोळे हे सापासारखे भासते. प्रत्यक्षात ती दोरी असून आपल्याला सापाचा आभास होतो. आणि पुढची गंमत म्हणजे आपण त्याला साप समजल्यामुळे शरीराला दरदरून घाम फुटतो. भीतीने गाळण उडते, आपण ओरडतो, किंचाळतो. पण जेव्हा शहाणा माणूस त्यावर ज्ञानाचा उजेड दाखवतो, तेव्हा सत्य परिस्थिति कळते. आपल्या मनाला त्रास देणारी, भीती ही आभासमयी सापामुळे असते. अस्तीत्वात नसलेल्या गोष्टीने घाबरून जातो.
     अगदी बरोब्बर याउलट एक गोष्ट संत तुलसीदासांच्या बाबतीत सांगितली जाते. पत्नी माहेरी असताना तिला रात्री भेटायला गेलेले तुलसीदास वरती चढून जाण्यासाठी दोरीचा आधार घेतात. पत्नीला भेटून निघून जातात. सकाळी त्यांची पत्नी पाहते तो ती दोरी नसून साप असतो. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मार्गात आलेले सापासारखे अडसर सुद्धा इतके क्षुल्लक ठरू शकतात. भीती हे अज्ञानाचे एक रूप आहे. सत्य परिस्थिति कळेपर्यन्त आपण आभासी जगात वावरत असतो. म्हणून ती खरी की खोटी हे परिस्थितीच्या निकषावर घासून पुसून पाहिल्याशिवाय कोणत्याही निर्णयाप्रत येणे बरोबर नाही.

  .................................सविता नाबर

Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 26th Oct2016

Wednesday 19 October 2016

परिपूर्ती

    

     शाळेत असताना समाजसेवा या विषयासाठी आम्हाला रोज केलेल्या पाच चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या हातून घडलेली चांगली कामे लिहायची असत. आठवून आठवून आम्ही लिहीत असू. कागदाचे कपटे गोळा करून कचर्‍याच्या बादलीत टाकले. कपाबशी फुटल्यावर त्याच्या काचा कुणाच्या पायाला लागू नयेत म्हणून केरात टाकल्या. प्रश्न पडायचा रोज रोज काचा केरात टाकायला कपबश्या तरी किती फोडणार? एखाद्या वृद्ध स्त्रीला रस्ता ओलांडायला मदत केली. त्यातला मतीतार्थ त्यावेळी लक्षात यायचा नाही. पण जसे जसे मोठे होत गेलो तसातसा त्यातला अर्थ कळायला लागला.
     ही गोष्ट तर बहुतेक जणांना माहीतच असेल. एक गरीब मुलगा सेल्स बॉयचे काम करत करत शाळा शिकत होता. एक दिवस त्याच्याकडे खायला काहीच नव्हते. खिशात असणार्‍या मोजक्या पैशात तो काहीच खाऊ शकत नव्हता. विक्रीसाठी ज्या दारात तो गेला तिथे त्याने पिण्यासाठी फक्त पाणी मागितले. परंतु त्या घरातल्या स्त्रीने त्याचा भुकेला चेहरा ओळखून त्याला एक पेलाभर दूध आणून दिले. ते प्याल्यावर त्या मुलाने विचारले “ याचे पैसे किती?” ती स्त्री म्हणाली, “ जेव्हा मी एखाद्याला मदत करते तेव्हा त्या बदल्यात पैसे घेणे हे माझ्या तत्वात बसत नाही.” मनापासून तिचे आभार मानून तो मुलगा निघून गेला. काही वर्षानी ती स्त्री असाध्य रोगाने आजारी पडली. स्थानिक डॉक्टरांनी हात टेकले. तिला मोठ्या शहरात नेले. डॉक्टर हॉवर्ड केली यांना तिच्यावर उपचार करायला बोलावले. ती ज्या गावातून आली होती त्या गावाचे नाव ऐकताच डॉक्टर केली यांचे डोळे चमकले. त्यांनी तिला ओळखले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून तिला वाचवले. सरते शेवटी त्या आजारातून डॉक्टर केली यांनी तिला पूर्ण बरे केले. हॉस्पिटलच्या बिलावर त्यांनी काही लिहिले. घाबरतच तिने ते हातात घेतले. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी खर्च होऊन आता काही शिल्लक रहाणार नाही असे तिला मनोमन वाटले. तिने बिलावरून नजर फिरवली. त्यावर लिहिले होते, “ पेड इन फुल विथ वन ग्लास ऑफ मिल्क” खाली डॉक्टर हॉवर्ड केलीची सही होती.
     आपला धर्म हा जातीवर अवलंबून नसून आपल्याला अमूल्य असा मिळालेल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. तो आहे माणुसकीचा. जेव्हा माणुसकी गुण म्हणून आपण विकसित करत असतो, तेव्हा परानुभूतीची गरज (empathy) असते. दुसर्‍याच्या भूमिकेत जाऊन त्याचा विचार करणारी मानसिकता हवी. कधी माणुसकी असते कृतीत तर कधी शब्दात, तर कधी स्पर्शात !
     बर्‍याच वेळेला एखाद्याची हरवलेली पर्स, दागिने, महत्वाच्या कागदपत्रांची बॅग, पैशाची थैली, आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातील व्यक्ति जेव्हा योग्य त्या व्यक्तिला परत करतात, तेव्हा सापडलेल्या वस्तूची, पैशाची गरज असतानाही दाखवलेला प्रामाणिकपणा त्यातून दिसतो आणि आपल्या तोंडून सहज उद्गार येतात, ती व्यक्ति माणुसकीने वागली. एका लेखकाने दिलेला एक प्रसंग आहे, लेखक आणि त्याची पत्नी स्टँडवर उतरून गेले. नंतर त्यांच्या लक्षात आले की पत्नीची पर्स एसटीमधेच विसरली आहे. परत पावली आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही त्यांचीच वाट पहाताहेत. ही घ्या बाई तुमची पर्स म्हणून परत केल्यावर त्यांना आश्चर्य वाटले, ही पर्स आमची हे तुम्ही कशावरून ओळखले असे विचारल्यावर ते म्हणाले, ही पर्स तुमच्या हातात बघितली होती. ती तुम्हाला परत करण्यासाठी म्हणून आम्ही चाललो होतो. पन्नास रुपयांची नोट देऊ केल्यावर ती घ्यायला ड्रायव्हरने नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, “तुम्ही आमच्याशी इतक चांगलं बोलल्यानंतर आम्ही तुमच्याकडून बक्षीस कसे घेणार? लेखक पत्नीने संगितले, “खरे तर मी त्यांच्याशी विशेष काहीच बोलले नव्हते. दिवसभर तुम्ही चांगलं ड्रायव्हिंग केलत. थॅंक यू. एवढच म्हणाले.” ड्रायव्हरने संगितले, “माझ्या अठ्ठावीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये शिव्या देणारे प्रवासी नेहमीच भेटले. थॅंक यू म्हणणार्‍या तुम्ही पाहिल्याच!” मनापासुन कौतुकाचे दोन शब्द इतका आनंद देऊ शकतात. अशी माणुसकी जागवणारे शब्दही कधी कधी खूप काही सांगून जातात.   
        मानवनिर्मित धर्माचा अभिमान बाळगण्यापेक्षा निसर्गनिर्मित धर्माचा धडा गिरवणे चांगले. मानव जात म्हणजे बुद्धीने विचार करणारा प्राणी. सहानुभूती जाणवत असताना परानुभूतीहि तेवढीच संवेदनशीलतेने जपणारा. दुसर्‍याच्या सुखात सुख मानणारा आणि दु:खात दु:खी होणारा माणूस. त्याचा धर्म फक्त माणुसकी आहे. बाकी सारे गुण त्याने स्वत:ला नंतर चिकटवले. स्वत;च्या सुखासाठी धडपडणारा माणूस जेव्हा दुसर्‍यासाठी आऊट ऑफ द वे जाऊन काही करतो, तेव्हा तो त्याचा सहजधर्म बनतो. तीच आयुष्याची परिपूर्ती असते.
     .............................सविता नाबर

Published in Maharashtra Times as on 19th oct.2016

Wednesday 5 October 2016

धन्य आजि दिन



       रोजच्या व्यापात आपल्या आयुष्याचे उद्दीष्ट काय याचा विचार करता करता जीवनाकडून आपल्या अपेक्षा फारच वाढतात. स्वत:बरोबरच बाकीच्याना म्हणजेच कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, सग्यासोयर्‍यांना, आप्त बंधूंना गृहीतच धरायला लागतो. पण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला वेळ मिळत नाही इतकेच नव्हे तर ही गोष्ट डोक्यातही येत नाही. अशा व्यक्ति आपल्यासाठी स्पेशल असतात. ज्या आपल्या आनंदात आणि संकटाच्या काळातही सोबत करतात, धीर देतात त्यांची आठवण करणे, त्यांचे स्मरण करणे आपले एक प्रकारे कर्तव्य असते. जे आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात त्यांच्यावर आपले प्रेम, कौतुक दर्शवण्याचा हा अत्यंत खास, वेगळा मार्ग असतो. उदासीनतेच्या काळात आपल्या चेहर्‍यावर हसू आणणारे लोक, समोर एखादा कठीण प्रसंग असताना मनोबल वाढवणारा, धीराचा हात देणारा जिवलग. प्रथम धन्यवाद त्या जगन्नियंत्याला ज्याने आपल्याला बुद्धिमान अशा माणसाच्या जन्माला घातले. पण आपल्याकडे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस किंवा क्षण तसा जवळ जवळ नाहीच.
     ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी कॅनडामध्ये थॅंक्स गिव्हींग डे साजरा केला जातो. तर अमेरिकेत नोव्हेंबर मधील चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो. जगात अनेक ठिकाणी हे सेलेब्रेशन होते. सर्व सुखसोयी आणि चांगले जीवन दिल्याबद्दल ईश्वराला धन्यवाद देण्याचा हा दिवस असतो. हा कार्यक्रम खास करून आखलेला असतो. एक दिवसच हे सेलेब्रेशन करण्यापेक्षा दररोजच सकाळी उठताच आजचा सुंदर दिवस मी पाहू शकलो, याबद्दल धन्यवाद द्यायला हवे किंवा रोज रात्री बिछान्यावर पडताना आजचा दिवस किती छान गेला, म्हणून कृतज्ञता हवी.  पण ते एका दिवसापुरते असू नये.  
      कधी कधी वाईटातून चांगले निष्पन्न होते, तेव्हा त्या वाईटाचेही आभार मानायला हवेत. माझी परिचित एक मध्यमवयीन स्त्री. तिला जेव्हा दुर्धर रोगाने ग्रासले हे कळले तेव्हा थोड्या दिवसांचा सोबती असलेला देह सत्कारणी लावायचे तिने ठरवले. अनाथांच्या भल्यासाठी ती झटायला लागली. तन, मन आणि धनाने ती सर्वस्वी त्या बालकांची झाली. मुलांचे दु:ख समजून घेताना कामाच्या रगाडयात आपले दु:ख ती विसरली. आणि तिची आयुर्मर्यादा आपोआपच वाढली. शेवटच्या घटका मोजत असतानाही ती आनंदी होती आणि आजारामुळे जीवनाचा अर्थ समजला म्हणून आपल्या आजाराला धन्यवाद ती देत होती. “तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो” या गाण्याचा अर्थ तेव्हा मलाही नव्याने कळला.
       विंदांची कविता या संदर्भात पुन्हा एकदा आठवते, देणार्‍याने देत जावे. आपण नेहमीच कुणाकडून काहीतरी घेत असतो. देणारे बरेच असतात. कधी कधी आपण आपल्याही नकळत घेत असतो. आपल्याला दुसर्‍याकडून जे काही मिळते त्यासाठी त्या व्यक्तीचे, गोष्टीचे आभार मानणे आवश्यक असते. ती असते कृतज्ञता. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनात आदरभाव असणे महत्वाचे. मग चेहर्‍यावर तो दिसतोच. रोज आपल्याला काही ना काही मिळत असते. वर्षभरात एकच दिवस आपण कोणाकोणाचे आभार मानणार? रोजच्या रोज काही क्षण या स्मरणासाठी दिले तर ते आपल्याच दृष्टीने चांगले. आभार जाहीररित्या मानायला पाहिजेत असे नाही. मनोमन त्या गोष्टीला कृतज्ञता अर्पण करायची. हा भाव आपल्या व्यक्तीत्वात काया वाचा मने सगळीकडे तो व्यापून राहतो. व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून जातो.
       एक तर सकाळी जागे झाल्यावर आपल्याला या सृष्टीत आणणार्‍या त्या अगाध शक्तीसमोर नतमस्तक व्हायला हवे. ज्याने हा सुवर्ण दिन दाखवला. किंवा रात्री बिछान्याला पाठ टेकतानाच आजचा दिवस मला छान होता  म्हणून कृतज्ञता मनोमनी व्यक्त करायला हवी. ही कृतज्ञता माणसाला आपले पाय जमिनीवर ठेवायला मदत करते. आपल्यापेक्षा मोठी अफाट शक्ति या जगात आहे आणि तिच्यासमोर आपण एक लहानसा जीव ही भावना नम्र राहायला भाग पाडते.
        आपण जन्माला आलो, सुंदर मनुष्य जन्माचा लाभ मिळाला म्हणून आपले आई वडील यांना आपण मनापासून किती धन्यवाद देतो? ज्या ईश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला हाती पायी धडधाकट आयुष्य दिले, पंचेंद्रियांचे सुख ज्यामुळे आपण बिनदिक्कत अनुभवू शकतो त्याच्या प्रती कृतज्ञता दाखवतो का? जेव्हा एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची कमी असते तेव्हा आपल्याकडे ती आहे म्हणून स्वत:ला भाग्यशाली म्हणतो का?
      उबदार मिठीचा स्पर्श, हस्तांदोलन, एखादे पुस्तक, छानसे गुलाबाचे फूल, थॅंक यू कार्ड, त्या व्यक्तिला अत्यंत आवडणारी कोणतीही भेटवस्तू, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एव्हढच बस्स असत. जेणेकरून त्या व्यक्तिला आपल्या करण्याचे समाधान मिळेल. आनंद होईल. तुमच्याप्रती प्रेमाची आणि आदराची भावना वाटेल. दिलेली भेट मोठी की छोटी हे महत्वाचे नसते, महत्वाची असते त्यामागची भावना. सकाळी उठल्यापासून आपल्या सर्व क्रिया बघितल्या तर त्या करताना आपण आनंद घेत असतो, मजा लुटत असतो. पण आनंदाचा उगम कशात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. याची देही याची डोळा आपण सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकतो. याची किंमत जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव भासते तेव्हाच कळते.
        ...........................सविता नाबर  

Published in Mharashtra Times ,Kolhapur edition as on 5th Oct 2016