रोजच्या व्यापात आपल्या
आयुष्याचे उद्दीष्ट काय याचा विचार करता करता जीवनाकडून आपल्या अपेक्षा फारच
वाढतात. स्वत:बरोबरच बाकीच्याना म्हणजेच कुटुंबीयांना,
मित्रमंडळींना, सग्यासोयर्यांना, आप्त बंधूंना गृहीतच
धरायला लागतो. पण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला वेळ मिळत नाही इतकेच नव्हे
तर ही गोष्ट डोक्यातही येत नाही. अशा व्यक्ति आपल्यासाठी स्पेशल असतात. ज्या
आपल्या आनंदात आणि संकटाच्या काळातही सोबत करतात, धीर देतात त्यांची आठवण
करणे, त्यांचे स्मरण करणे आपले एक प्रकारे कर्तव्य असते. जे
आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात त्यांच्यावर आपले प्रेम,
कौतुक दर्शवण्याचा हा अत्यंत खास, वेगळा मार्ग असतो. उदासीनतेच्या काळात आपल्या
चेहर्यावर हसू आणणारे लोक, समोर एखादा कठीण प्रसंग असताना मनोबल वाढवणारा,
धीराचा हात देणारा जिवलग. प्रथम धन्यवाद त्या
जगन्नियंत्याला ज्याने आपल्याला बुद्धिमान अशा माणसाच्या जन्माला घातले. पण आपल्याकडे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
किंवा क्षण तसा जवळ जवळ नाहीच.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या सोमवारी
कॅनडामध्ये थॅंक्स गिव्हींग डे साजरा केला जातो. तर अमेरिकेत नोव्हेंबर मधील
चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो. जगात अनेक ठिकाणी हे सेलेब्रेशन होते. सर्व सुखसोयी
आणि चांगले जीवन दिल्याबद्दल ईश्वराला धन्यवाद देण्याचा हा दिवस असतो. हा कार्यक्रम
खास करून आखलेला असतो. एक दिवसच हे सेलेब्रेशन करण्यापेक्षा दररोजच सकाळी उठताच
आजचा सुंदर दिवस मी पाहू शकलो, याबद्दल धन्यवाद द्यायला हवे किंवा रोज रात्री
बिछान्यावर पडताना आजचा दिवस किती छान गेला, म्हणून कृतज्ञता हवी. पण ते एका दिवसापुरते असू नये.
कधी कधी वाईटातून चांगले निष्पन्न होते, तेव्हा त्या वाईटाचेही आभार मानायला हवेत. माझी परिचित एक मध्यमवयीन
स्त्री. तिला जेव्हा दुर्धर रोगाने ग्रासले हे कळले तेव्हा थोड्या दिवसांचा सोबती
असलेला देह सत्कारणी लावायचे तिने ठरवले. अनाथांच्या भल्यासाठी ती झटायला लागली.
तन, मन आणि धनाने ती सर्वस्वी त्या बालकांची झाली. मुलांचे
दु:ख समजून घेताना कामाच्या रगाडयात आपले दु:ख ती विसरली. आणि तिची आयुर्मर्यादा आपोआपच
वाढली. शेवटच्या घटका मोजत असतानाही ती आनंदी होती आणि आजारामुळे जीवनाचा अर्थ
समजला म्हणून आपल्या आजाराला धन्यवाद ती देत होती. “तुम बेसहारा हो तो किसीका
सहारा बनो” या गाण्याचा अर्थ तेव्हा मलाही नव्याने कळला.
विंदांची कविता या संदर्भात पुन्हा एकदा आठवते, देणार्याने देत जावे. आपण नेहमीच कुणाकडून काहीतरी घेत असतो. देणारे
बरेच असतात. कधी कधी आपण आपल्याही नकळत घेत असतो. आपल्याला दुसर्याकडून जे काही
मिळते त्यासाठी त्या व्यक्तीचे, गोष्टीचे आभार मानणे आवश्यक
असते. ती असते कृतज्ञता. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,
मनात आदरभाव असणे महत्वाचे. मग चेहर्यावर तो दिसतोच. रोज आपल्याला काही ना काही
मिळत असते. वर्षभरात एकच दिवस आपण कोणाकोणाचे आभार मानणार?
रोजच्या रोज काही क्षण या स्मरणासाठी दिले तर ते आपल्याच दृष्टीने चांगले. आभार जाहीररित्या
मानायला पाहिजेत असे नाही. मनोमन त्या गोष्टीला कृतज्ञता अर्पण करायची. हा भाव आपल्या
व्यक्तीत्वात काया वाचा मने सगळीकडे तो व्यापून राहतो. व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून
जातो.
एक तर
सकाळी जागे झाल्यावर आपल्याला या सृष्टीत आणणार्या त्या अगाध शक्तीसमोर नतमस्तक
व्हायला हवे. ज्याने हा सुवर्ण दिन दाखवला. किंवा रात्री बिछान्याला पाठ टेकतानाच आजचा
दिवस मला छान होता म्हणून कृतज्ञता मनोमनी
व्यक्त करायला हवी. ही कृतज्ञता माणसाला आपले पाय जमिनीवर ठेवायला मदत करते. आपल्यापेक्षा
मोठी अफाट शक्ति या जगात आहे आणि तिच्यासमोर आपण एक लहानसा जीव ही भावना नम्र
राहायला भाग पाडते.
आपण जन्माला आलो, सुंदर मनुष्य जन्माचा लाभ
मिळाला म्हणून आपले आई वडील यांना आपण मनापासून किती धन्यवाद देतो?
ज्या ईश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला हाती पायी धडधाकट आयुष्य दिले,
पंचेंद्रियांचे सुख ज्यामुळे आपण बिनदिक्कत अनुभवू शकतो त्याच्या प्रती कृतज्ञता
दाखवतो का? जेव्हा एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची कमी असते
तेव्हा आपल्याकडे ती आहे म्हणून स्वत:ला भाग्यशाली म्हणतो का?
उबदार
मिठीचा स्पर्श, हस्तांदोलन, एखादे पुस्तक, छानसे गुलाबाचे फूल,
थॅंक यू कार्ड, त्या व्यक्तिला अत्यंत आवडणारी कोणतीही भेटवस्तू,
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एव्हढच बस्स असत. जेणेकरून त्या व्यक्तिला आपल्या करण्याचे
समाधान मिळेल. आनंद होईल. तुमच्याप्रती प्रेमाची आणि आदराची भावना वाटेल. दिलेली
भेट मोठी की छोटी हे महत्वाचे नसते, महत्वाची असते त्यामागची भावना. सकाळी उठल्यापासून आपल्या सर्व क्रिया बघितल्या तर त्या
करताना आपण आनंद घेत असतो, मजा लुटत असतो. पण आनंदाचा उगम कशात आहे हे आपल्या
लक्षात येत नाही. याची देही याची डोळा आपण सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकतो. याची
किंमत जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव भासते तेव्हाच कळते.
...........................सविता नाबर
Published in Mharashtra Times ,Kolhapur edition as on 5th Oct 2016
No comments:
Post a Comment