बर्याच जणांचा हा अनुभव
असतो. शाळेत स्टेजवर भाषण करायला उभे राहिले की ऐनवेळी हातापायाला कापरे भरते.
आवाज तरी बसतो. जीभ टाळ्याला चिकटते. हाताला दरदरून घाम सुटतो. अनामिक भीती मनाचा
ताबा घेते. परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यावर प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंत पोटात
गोळा आलेला असतो, छातीत धडधडत असते. मुलाखतीला जाताना आपले नाव
पुकारल्यावर उगाचच वेंधळेपणाने दाराला आपटतो. विनाकारण पायात पाय अडकतो. या
दडपणामागचे कारण असते मनावर असलेला भयाचा पगडा. नवीन ठिकाणी जाताना आपल्याला ते
ठिकाण मिळाले नाही तर...., परक्या प्रांतात जाताना वेळेवर फ्लाइट,
रेल्वे मिळाली नाही, पोचली नाही तर ......,
या भीतीच्या नकारात्मक विचारांनी मनाचा ताबा घेतला की आपली सारासार बुद्धी काम
करेनाशी होते. इतकेच नव्हे तर जेव्हा एखादी वाईट बातमी कानावर पडते,
तेव्हा आपल्या मनात त्या घटनेचे पुढचे वाईट चित्रण सुरू होते. म्हणूनच म्हणतात,
मन चिंति ते वैरी न चिंति.
जेव्हा आपला स्वत:वरचा विश्वास ठाम असतो,
जास्तीतजास्त काय होईल? हा विचार मनात येऊन आलेल्या प्रसंगाला शांतपणे
तोंड दिले तर तो प्रसंग फार संकटाचा रहात नाही. भित्यापाठी ब्रम्हराक्षस. भीतीमुळे कामात अडथळे निर्माण
होतात. भीतीने ग्रासलेला माणूस कुठलही काम नीटपणे करू शकत नाही. कामात मन रमत
नाही. बंगलोरची एक घटना आठवते. दहावीतला मुलगा. त्याच्या चांगल्या
निकालाने घरचे लोक आनंदात होते. त्याची शोधाशोध करत होते. पण रिझल्टच्याच दिवशी
त्या मुलाने आपला जीव दिला होता. निव्वळ नापास होऊ या भीतीने!
जेव्हा परीक्षेच्या निकालाच्या
आदल्या दिवशीच पेपरमध्ये बातमी येते, परीक्षेत नापास
होणार या भीतीने आत्महत्या. तेव्हा ही भीती जीवाचे मोल तर घेऊन जातेच. पण कित्येक
वेळा असे झाले आहे की निकाल लागल्यावर कळते ज्या विद्यार्थ्याने आपला जीव गमवला
आहे तो परीक्षेत चांगल्या तर्हेने पास झाला आहे. मग या ब्रम्हराक्षसाला घाबरायचे
कशाला? त्याक्षणी फक्त एवढाच विचार जर मनात आणला की मी फारतर
नापास होईन, मला पुन्हा परीक्षेला बसावे लागेल. त्यासाठी
जिवावर उदार व्हायची काही गरज नाही. मुलांना कधी पालक रागावतील ही भीती असते.
पण आहे त्या घटनेला तोंड देण्याचा विश्वास आपण स्वत:मध्ये आणला तर
भीतीचे नामोनिशाण राहत नाही.
पाण्याचे भय असेल तर मुलांना पोहायला मज्जाव
केला जातो, अपघाताची अनाठायी भीती असेल तर वाहन चालवायला
मनाई असते. पालकांच्या अनावश्यक भीतीमुळे एकतर मुले या क्षेत्रापासून वंचित रहातात
नाहीतर मुले अति कुतुहलापोटी त्याची चव चाखायला बघतात. हे करत असताना योग्य काळजी
घेतली नाही तर अनर्थ ओढवतो.
जसा
प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, तसेच स्वत:वरच्या विश्वासाचा
अभाव म्हणजे भीती. मनाला सकारात्मक विचारांची सवय लावली तर हा भीतीचा बागुलबुवा
नाहीसा व्हायला वेळ लागत नाही. स्वत:वर आणि परिस्थितिवर या दोन्ही गोष्टींवर
विश्वास पाहिजे. अडचणीतून मार्ग निघणार याची आपल्याला खात्री असली की पुढचा रस्ता
आपोआप दिसायला लागतो. सकारात्मक
विचारांच्या या मांदियाळीत आज मुद्दाम भीती या नकारात्मक भावनेचा उल्लेख करते आहे.
कारण या भावनेवर मात करणे तेवढेच आवश्यक असते. दिवसागणिक आपले वय वाढेल तशा भीती
वाढत असतात. वेळेवर त्याला पायबंद घातला नाही तर भीतीचा राक्षस कधी खाऊन जाईल काही
सांगता येत नाही.
मी परीक्षेच्यावेळी आजारी पडीन,
माझ्या पोटात दुखेल, स्पर्धेच्या वेळी मी ती व्यवस्थित पार पाडेन ना?
मनात संशय आला, त्याची जागा भीतीने व्यापली की मन निराशेने
ग्रासते. मनातली असेल नसेल ती आशा लोप पावते आणि पराभवाच्या दिशेने मन वाटचाल
करायला लागते. महर्षि पतंजलि यांनी योगासूत्रात सर्प रज्जु न्याय याचे एक अतिशय
समर्पक उदाहरण संगितले आहे. संध्याकाळच्या मंद प्रकाशात गुंडाळी करून ठेवलेले
दोरखंडाचे वेटोळे हे सापासारखे भासते.
प्रत्यक्षात ती दोरी असून आपल्याला सापाचा आभास होतो. आणि पुढची गंमत म्हणजे आपण
त्याला साप समजल्यामुळे शरीराला दरदरून घाम फुटतो. भीतीने गाळण उडते,
आपण ओरडतो, किंचाळतो. पण जेव्हा शहाणा माणूस त्यावर ज्ञानाचा
उजेड दाखवतो, तेव्हा सत्य परिस्थिति कळते. आपल्या मनाला त्रास
देणारी, भीती ही आभासमयी सापामुळे असते. अस्तीत्वात नसलेल्या गोष्टीने
घाबरून जातो.
अगदी बरोब्बर याउलट एक गोष्ट संत
तुलसीदासांच्या बाबतीत सांगितली जाते. पत्नी माहेरी असताना तिला रात्री भेटायला
गेलेले तुलसीदास वरती चढून जाण्यासाठी दोरीचा आधार घेतात. पत्नीला भेटून निघून
जातात. सकाळी त्यांची पत्नी पाहते तो ती दोरी नसून साप असतो. उद्दीष्ट साध्य
करण्यासाठी मार्गात आलेले सापासारखे अडसर सुद्धा इतके क्षुल्लक ठरू शकतात. भीती हे
अज्ञानाचे एक रूप आहे. सत्य परिस्थिति कळेपर्यन्त आपण आभासी जगात वावरत असतो.
म्हणून ती खरी की खोटी हे परिस्थितीच्या निकषावर घासून पुसून पाहिल्याशिवाय
कोणत्याही निर्णयाप्रत येणे बरोबर नाही.
.................................सविता नाबर
Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 26th Oct2016
No comments:
Post a Comment