शाळेत असताना समाजसेवा या
विषयासाठी आम्हाला रोज केलेल्या पाच चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या हातून घडलेली
चांगली कामे लिहायची असत. आठवून आठवून आम्ही लिहीत असू. कागदाचे कपटे गोळा करून
कचर्याच्या बादलीत टाकले. कपाबशी फुटल्यावर त्याच्या काचा कुणाच्या पायाला लागू
नयेत म्हणून केरात टाकल्या. प्रश्न पडायचा रोज रोज काचा केरात टाकायला कपबश्या तरी
किती फोडणार? एखाद्या वृद्ध स्त्रीला रस्ता ओलांडायला मदत केली.
त्यातला मतीतार्थ त्यावेळी लक्षात यायचा नाही. पण जसे जसे मोठे होत गेलो तसातसा
त्यातला अर्थ कळायला लागला.
ही गोष्ट तर बहुतेक जणांना माहीतच असेल.
एक गरीब मुलगा सेल्स बॉयचे काम करत करत शाळा शिकत होता. एक दिवस त्याच्याकडे खायला
काहीच नव्हते. खिशात असणार्या मोजक्या पैशात तो काहीच खाऊ शकत नव्हता. विक्रीसाठी
ज्या दारात तो गेला तिथे त्याने पिण्यासाठी फक्त पाणी मागितले. परंतु त्या
घरातल्या स्त्रीने त्याचा भुकेला चेहरा ओळखून त्याला एक पेलाभर दूध आणून दिले. ते
प्याल्यावर त्या मुलाने विचारले “ याचे पैसे किती?” ती स्त्री
म्हणाली,
“ जेव्हा मी एखाद्याला मदत करते तेव्हा त्या बदल्यात पैसे घेणे हे माझ्या तत्वात
बसत नाही.” मनापासून तिचे आभार मानून तो मुलगा निघून गेला. काही वर्षानी ती स्त्री
असाध्य रोगाने आजारी पडली. स्थानिक डॉक्टरांनी हात टेकले. तिला मोठ्या
शहरात नेले. डॉक्टर हॉवर्ड केली यांना तिच्यावर उपचार करायला बोलावले. ती ज्या
गावातून आली होती त्या गावाचे नाव ऐकताच डॉक्टर केली यांचे डोळे चमकले. त्यांनी
तिला ओळखले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून तिला वाचवले. सरते शेवटी त्या
आजारातून डॉक्टर केली यांनी तिला पूर्ण बरे केले. हॉस्पिटलच्या बिलावर त्यांनी काही
लिहिले. घाबरतच तिने ते हातात घेतले. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी खर्च होऊन आता
काही शिल्लक रहाणार नाही असे तिला मनोमन वाटले. तिने बिलावरून नजर फिरवली. त्यावर
लिहिले होते, “ पेड इन फुल विथ वन ग्लास ऑफ मिल्क” खाली डॉक्टर हॉवर्ड केलीची सही होती.
आपला धर्म हा जातीवर अवलंबून नसून
आपल्याला अमूल्य असा मिळालेल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. तो आहे माणुसकीचा. जेव्हा
माणुसकी गुण म्हणून आपण विकसित करत असतो, तेव्हा परानुभूतीची गरज (empathy) असते. दुसर्याच्या
भूमिकेत जाऊन त्याचा विचार करणारी मानसिकता हवी. कधी माणुसकी असते कृतीत तर कधी
शब्दात, तर कधी स्पर्शात !
बर्याच वेळेला एखाद्याची हरवलेली पर्स, दागिने, महत्वाच्या कागदपत्रांची बॅग, पैशाची थैली, आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातील व्यक्ति जेव्हा योग्य त्या व्यक्तिला परत
करतात, तेव्हा सापडलेल्या वस्तूची,
पैशाची गरज असतानाही दाखवलेला प्रामाणिकपणा त्यातून दिसतो आणि आपल्या तोंडून सहज
उद्गार येतात, ती व्यक्ति माणुसकीने वागली. एका लेखकाने
दिलेला एक प्रसंग आहे, लेखक आणि त्याची पत्नी स्टँडवर उतरून गेले.
नंतर त्यांच्या लक्षात आले की पत्नीची पर्स एसटीमधेच विसरली आहे. परत पावली
आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही त्यांचीच वाट
पहाताहेत. ही घ्या बाई तुमची पर्स म्हणून परत केल्यावर त्यांना आश्चर्य वाटले, ही पर्स आमची हे तुम्ही कशावरून ओळखले असे विचारल्यावर ते म्हणाले, ही पर्स तुमच्या हातात बघितली होती. ती तुम्हाला परत करण्यासाठी म्हणून
आम्ही चाललो होतो. पन्नास रुपयांची नोट देऊ केल्यावर ती घ्यायला ड्रायव्हरने
नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, “तुम्ही आमच्याशी इतक चांगलं
बोलल्यानंतर आम्ही तुमच्याकडून बक्षीस कसे घेणार? लेखक
पत्नीने संगितले, “खरे तर मी त्यांच्याशी विशेष काहीच बोलले
नव्हते. दिवसभर तुम्ही चांगलं ड्रायव्हिंग केलत. थॅंक यू. एवढच म्हणाले.” ड्रायव्हरने
संगितले, “माझ्या अठ्ठावीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये शिव्या
देणारे प्रवासी नेहमीच भेटले. थॅंक यू म्हणणार्या तुम्ही पाहिल्याच!” मनापासुन
कौतुकाचे दोन शब्द इतका आनंद देऊ शकतात. अशी माणुसकी जागवणारे शब्दही कधी कधी खूप
काही सांगून जातात.
मानवनिर्मित
धर्माचा अभिमान बाळगण्यापेक्षा निसर्गनिर्मित धर्माचा धडा गिरवणे चांगले. मानव
जात म्हणजे बुद्धीने विचार करणारा प्राणी. सहानुभूती जाणवत असताना परानुभूतीहि
तेवढीच संवेदनशीलतेने जपणारा. दुसर्याच्या सुखात सुख मानणारा आणि दु:खात दु:खी
होणारा माणूस. त्याचा धर्म फक्त माणुसकी आहे. बाकी सारे गुण त्याने स्वत:ला नंतर
चिकटवले. स्वत;च्या
सुखासाठी धडपडणारा माणूस जेव्हा दुसर्यासाठी आऊट ऑफ द वे जाऊन काही करतो, तेव्हा तो
त्याचा सहजधर्म बनतो. तीच आयुष्याची परिपूर्ती असते.
.............................सविता नाबर
Published in Maharashtra Times as on 19th oct.2016
No comments:
Post a Comment