एक चीनी रूपककथा आहे. एक चीनी माणूस घरात पाणी भरण्यासाठी
कावडीचा उपयोग करत होता. त्या कावडीच्या एका बाजूचा माठ व्यवस्थित होता तर दुसर्या
बाजूचा फुटका होता. जेव्हा जेव्हा तो पाणी भरून न्यायचा तेव्हा तेव्हा त्याला फक्त
दीड भांडे पाणी मिळायचे. एक दिवस फुटका माठ त्या माणसाला म्हणाला, “माझ्यामुळे तुझे किती नुकसान होते. बाजूच्या माठातले पानी तुला पूर्ण
मिळते पण माझ्यामुळे तुला भांडे भरलेले मिळत नाही. मी अर्धाच आहे.” त्यावर तो चीनी
माणूस म्हणाला, “तू ज्या बाजूला आहेस त्या बाजूला तू पाहिलेस
का? ती बाजू फुलांनी भरुन गेली आहे. कारण तुझ्यामधून पडणारे
पाणी जमीन भिजवते म्हणून त्या बाजूलाच मी फुलांची रोपे लावली होती. ती आता तरारून
वाढली आहेत आणि भरपूर फुले देत आहेत. तू स्वत:वर विनाकारण रुष्ट होऊ नको.
तुझ्यामुळे मला जी फुले मिळालेली आहेत त्यामुळे आज माझे टेबल सुशोभित दिसतय.”
स्वत:मधल्या
न्यूनामुळे खजील होऊन बरीच मुले दुसर्याशी स्पर्धा करायला,
तसेच व्हायला बघतात. दुसर्याची प्रतिकृती होण्याला काय अर्थ आहे? बाह्यरुपावर भाळून तसेच व्हायचा प्रयत्न होतो, एकदा
त्या गोष्टीच्या अंतरात शिरून पहा त्याचे असली रूप! चकाकते ते सगळेच सोने नसते. ती
आभासी चकाकी असते. मृगजळ असते. वरवर पाहिले तर हे आभासी रूप अगदी सत्य स्वरूप
वाटते. जे समोर दिसते ते सत्य असेलच असे नाही. दुसर्याचा भपका आपल्या मनाला खरा
वाटतो, त्याच्या मागची कारुण्याची,
निराशेची, दु:खाची छटा, व्यथा समजत
नाही.मुंबईच्या चंदेरी दुनियेचा तरुणाईला खूप मोह पडतो. पैसा, नाव, प्रसिद्धी, कीर्ती काय अन काय. सगळ्याचा भूलभुलईय्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत असतो. पण तिथे जाण्याचा मार्ग कसा आहे याचा विचार मनात येत नाही. म्हणूनच तरुण, पौगंडावस्थेतली मुले, मुली सिनेमात काम मिळण्यासाठी लहान गावातून पळून जातात. कधी त्यांच्या स्वत:च्या तर कधी दुसर्या कुणाच्या मर्जीने. प्रसंगी परिस्थितीशी केवढी मोठी तडजोड करावी लागते याची कल्पना जेव्हा प्रत्यक्ष मार्ग चोखळला जातो तेव्हाच येते. अनेक खडतर आणि बिकट प्रसंगांचा सामना करावा लागतो. याशिवाय, जर यदाकदाचित तुमच्या मनासारखे यश मिळालेच तर ते टिकवणे त्याहून कर्मकठिण असते. कधी यश डोक्यात चढते तर कधी पैसा मनाला धुंद बनवतो. ही डोळ्यावरची झापडे दूर करणे दुसर्या कुणाला शक्य नसते ते आपले आपणच समजून करायचे असते. नाहीतर प्रत्युषा बॅनर्जी किंवा दिव्या भारती व्हायला फारसा वेळ लागत नाही.
नुकतेच घडलेले उदाहरण. घरची आर्थिक परिस्थिति बेताची असली तरी शैक्षणिक पार्श्वभूमी सशक्त असलेला अवधूत पाटील हा चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झालेला, दहावीला 94 टक्के गुण मिळवून, मेडीकलला प्रवेश घेऊ इच्छिणारा, एका क्षणाच्या पैशाच्या मोहाने अट्टल घरफोडी करणारा झाला. चोरी केल्यावर सहज मिळणारा पैसा त्याला आकर्षित करून गेला. सहज साध्य असलेल्या पैशाच्या मोहाने भविष्यातल्या परिश्रमावर कुरघोडी केली. त्या क्षणी जर तो या सोन्याच्या वर्खामागे दडलेल्या पितळेला जाणता, तर हा मार्ग त्याने पत्करला नसता.
बर्याच वर्षाने वर्गातल्या मित्राला भेटल्यावर त्याच्याकडे लेटेस्ट मर्सिडिस आहे म्हणून स्वत:ला कमी समजणारा, आयुष्यात आपण काही कमवू शकलो नाही म्हणून स्वत:ला कोसणारा जगदीश, त्याला माहीत नसते की त्याचा शाळू सोबती हा मर्सिडिजचा मालक नसून ड्रायव्हर आहे. ज्योती एकच मूल आहे म्हणून मनोमनी खंतावणारी, शेजारणीला दोन मुले आहेत म्हणून तिचा हेवा करत असते पण प्रत्यक्षात शेजारणीचे स्वत:चे मूल कॅन्सरशी झुंज देत असते आणि दुसरे दत्तक घेतलेले असते. नवर्याने थोडे रोमॅंटिक असावे म्हणून वाट बघणारी रेश्मा, मैत्रिणीचा नवरा कसा तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडायला धावतो म्हणून दु:स्वास करत असते. प्रत्यक्ष परिस्थिती अशी असते की तिच्या जुन्या गाडीचा दरवाजा आतून न उघडता बाहेरूनच उघडावा लागत असतो. दुसर्याकडे पाहताना आपल्या अनेकवार मनात येते की ही व्यक्ति सुखी, श्रीमंत, नशीबवान आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला जे मिळालेले असते त्याची मोजदाद कुठेच नसते. लोकांच्या हंड्या झुंबरे बघताना त्यावर तडा गेलेला नाही ना हे बघा.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी एका कार्यक्रमाच्यावेळी सांगितलेला हा प्रसंग. कवि कुसुमाग्रज हे त्यांना अत्यंत पूजनीय होते. वयाच्या चोवीसाव्या वर्षी प्रसिद्ध झालेला पाडगावकरांचा कविता संग्रह त्यांनी कुसुमाग्रजांना पाठवला. महिना, दोन महीने झाले, तीन झाले, पाडगावकरांनी आशा सोडली. आपण पाठवलेला काव्यसंग्रह त्यावर काही वक्तव्य तर सोडाच पण तो साधा पोचला म्हणूनही त्यांचे उत्तर नाही. तो महाकवी. आपण पोरसवदा. ते काय संदेश देणार आपल्यासारख्याला? पाच महिन्यांनी कुसुमाग्रजांचे पोस्ट कार्ड आले. त्यात लिहिले होते, “तुमचा जिप्सी हा कविता संग्रह वाचला. तो मला खूप आवडला. आता मला काव्य करणे बंद करायला हरकत नाही.” एवढ्या प्रतिक्रियेने पाडगावकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यावेळी धनुर्धारी मासिकाचे संपादक असलेले कुसुमाग्रज ज्या रस्त्यावरून जायचे त्याच्या कोपर्यावर, पाडगावकर कवि दिसतो कसा आननि! म्हणून निव्वळ त्यांना पाहाण्यासाठी उभे राहायचे. नंतर काही वर्षात त्यांचे कुसुमाग्रजांशी वैयक्तिक संबंध वाढले. पण उमेदवारीच्या काळात या आदर्शाला समोर ठेवून त्यांनी प्रयत्नांचे सातत्य मात्र सोडले नाही. ज्या क्षेत्रात गती आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून स्वत;च्या वाढीसाठी अव्याहत परिश्रम करण्याला पर्याय नाही.
----------------------सविता नाबर
Published in Maharashtra Times as on 27th April 2016
No comments:
Post a Comment