Wednesday, 1 June 2016

कामाची कटिबद्धता

  

          स ऐकले आहे की पं. कुमार गंधर्व मैफिली आधी अर्धा तास तंबोरा लावायचे. आणि तो चांगला लागला की मैफिलीसाठी कॅनव्हास तयार झाला रागाचे सुंदर चित्र काढायला तयार झाला असे म्हणायचे. चांगला व्यायाम, छान झोप, संतुलित आहार, प्रसन्न मन तयार असेल तर आपलाही कॅनव्हास तयार आहे असे म्हणायला पाहिजे. त्या कॅनव्हासवर आपल्या आवडत्या कामाचे अप्रतिम, मनमोहक चित्र काढायला कसे छान वाटते.
   जेव्हा कामाचे व्यवस्थित नियोजन असते तेव्हा आयुष्याला एक शिस्त लागते. एखादी घटना, प्रसंग, समारंभ, सहल या सगळ्याच गोष्टींना नियोजन आवश्यक असते. नियोजन नसेल तर तुमचे उद्दीष्ट डळमळीत होते. ट्रेन जशी रुळांच्या ट्रॅकवरुन सुरळीत जात असते. जर काही प्लॅनिंग नसेल तर ओबडधोबड रस्त्यावरून चालताना, खाच खळग्यातून वाट काढताना त्रास होतोच. डांबरी रस्ता गुळगुळीत असतो. त्रास होत नाही. तसेच नियोजनाचे आहे. नियोजनावर कधी कधी बाह्य घटकांचाही परिणाम होत असतो. त्यामुळे नियोजन जरासे इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. तो तर नियोजनाचा एक भागच म्हणता येईल. यावरून एक विनोद आठवला. मुंबईला लोकल वीस पंचवीस मिनिटे उशिरा आल्यावर एक व्यक्ति दुसर्‍याला वैतागून म्हणतो, या इंडिकेटरचा उपयोग काय मग? दूसरा तितक्याच शांतपणे म्हणतो, ट्रेन वेळेच्या किती उशिरा येते हे तरी समजते ना! विनोदाचा भाग सोडला तर नियोजनाचेही तसेच आहे. वेळेच्या व्यवस्थापनाचा समग्र विचार करताना तीन गोष्टींचा विचार महत्वाचा. एक म्हणजे ध्येय. आयुष्यात काय करायचे आहे याची स्पष्टता. दुसरी गोष्ट म्हणजे काम करायची शैली. तुम्ही हळुबाई आहात की गतिमान. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराचे घड्याळ समजून घेऊन त्यानुसार नियोजन करणे. केव्हा कोणती गोष्ट आपल्याला चांगली जमते हे ठरवणे.
    आपल्या छोट्या मोठ्या उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवणे अत्यंत गरजेचे असते. लहान सहान गोष्टींसाठी फार वेळ न देता लांबच्या आणि महत्वाच्या उद्दिष्टांसाठी जास्त वेळ देणे श्रेयस्कर असते. दैनंदिन कामानासुद्धा तितकेच महत्व आहे. रोजची जी काही कामे असतील ती वेळच्यावेळी करण्याने आयुष्याला एक शिस्त लागते. अग्रक्रमाने कोणती कामे करायची ते ठरवता येते. सोमवार ते शनिवार आपण काम करतो म्हणून रविवारचे महत्व आहे. कामाच्या वेळापत्रकामुळे सुट्टीचे महत्व असते. विद्यार्थी दशेत अभ्यास करताना एकदम परीक्षेच्या वेळी रात्रंदिवस जागून करण्यापेक्षा रोजच्या रोज जर केला तर परीक्षेच्या वेळी मनावर ताण येत नाही. तो किती करतो यापेक्षा कसा करतो यावर परीक्षेतले यश अवलंबून असते.  
      नियोजन म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. ती मनाला असलेली शिस्त असते. कामाच्या व्यवस्थापनात काही गोष्टी निश्चित आहेत. झोप, जेवण, आपली नित्यकर्मे, वर्तमानपत्र वाचणे यासाठी ठराविक वेळ द्यावाच लागतो. उरलेल्या वेळेपैकी बसवायचे असते अभ्यास, स्वयंपाक, घरच्या लोकांबरोबर गप्पा, कामासाठी प्रवास (मुंबईसारख्या ठिकाणी ऑफिससाठीही प्रवास आवश्यक असतो) मीटिंग, मित्रांची वाट पहाणे, टी.व्ही.पहाणे, मोबाईलवर बोलणे, व्हाट्सपवर चॅट करणे. यामध्ये कामाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. स्वत:कडे तटस्थपणे पहायला थोडासा वेळ द्यायला हवा. आपण कुठे चुकतोय का? आपली दिशा बरोबर आहे ना? आपण कामांचा प्राधान्यक्रम ठरवलाय का? असे प्रश्न स्वत:ला विचारायला संधि द्यायला पाहिजे. नियोजनाच्या बाबतीत घरातली स्त्री मग ती गृहिणी असो किंवा करियर वुमन असो, तिचे नियोजन अगदी परफेक्ट असते.     
    एकदा एक लावी पक्षीण शेताजवळच्या घरट्यात पिलांसह रहात होती. शेत पिकायला आले तेव्हा शेतकरी झाडाखाली येऊन बसला आणि स्वत:शीच म्हणाला, संध्याकाळी जाऊन शेतमजुर ठरवतो. आणि पीक कापून घेतो.” पिले घाबरली. आईला म्हणाली, “शेतकरी उद्याच पीक कापणार आहे तेव्हा आपण ही जागा सोडली पाहिजे. पिल्लांना आई म्हणाली, “घाबरण्याचे काही कारण नाही. उद्या काय होते ते पहा.” सर्वांचीच शेते पिकल्यामुळे शेतकर्‍याला मजूर मिळाले नाही. तो हताश होऊन झाडाखाली बसला. “ उद्या नातेवाईक, मित्रांना बोलवतो. आणि पीक कापून घेतो. पिल्ले पुन्हा आईला म्हणाली, “आता मात्र या शेतातला दाण्यांचा मोह सोडून दुसरीकडे गेले पाहिजे.” पक्षिण म्हणाली, “उद्याही शेत कापले जाणार नाही. बाळांनो घाबरू नका.”  दुसर्‍या दिवशी शेतकरी पुन्हा निराशेने झाडाखाली बसला. म्हणाला, “ नातेवाईक, मित्र कुणी मदतीला आले नाही, इतरांच्या मदतीचे काही खरे नाही. उद्या माझ्या बायको आणि मुलाना बोलवतो आणि पीक कापायला घेतो. लावी पक्षिण पिलाना म्हणाली, “आता मात्र आपले काही खरे नाही. दुसर्‍यावर भरवसा न ठेवता शेतकरी दादा उद्या स्वत:च पीक कापणार आहे. आता हे शेत सोडून आपल्याला दुसरीकडे गेले पाहिजे.” प्रयत्न स्वत:च केल्याशिवाय उद्दीष्ट साध्य होत नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. शिस्त पाळण्यामध्ये किंवा कामाचे नियोजन करण्यामध्ये दुसर्‍यावर अवलंबून रहाणे कितपत श्रेयस्कर आहे हे महत्वाचे ठरते. नाहीतर सागळाच कामाचा डोलारा कोसळतो. स्वत;च्या कामाशी बांधील रहाण्यासाठी, नियोजनातून कटिबद्ध राहुया. 
       ...............................सविता नाबर 

Published in Maharashtra Times Kolhapur edition as on 1st june 2016




No comments:

Post a Comment