आज हेलन केलरचा जन्मदिवस . 27 जून 1880 रोजी अमेरिकेच्या आलबामा राज्यात तिचा जन्म झाला. आई केट(कथरीन) अडाम्स आणि वडील आर्थर केलर. हेलन दोघी बहीणीतली मोठी . शिवाय तिला दोघे मोठे सावत्र भाऊही होते . तिच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती आणि केवळ कापसाच्या उत्पादनावर त्यांचा चरितार्थ चालत होता. प्रथम आर्मी मध्ये असणारे तिचे वडील नंतर एका साप्ताहिकाचे संपादक बनले .
तिच्यापेक्षा फक्त चौदा वर्षानी मोठी असलेली तिची अंध शिक्षिका अॅनी सुलीवान, हिने हेलनची या जगाशी ओळख करून दिली. कारण भाषेच्या अभावी ती कुणाशीही काहीच संवाद साधू शकत नव्हती. जन्मली तेव्हा हेलनला ऐकुही येत होत आणि दिसतही होत. पण ती साधारण दीड एक वर्षांची असताना तिला मॅनेंजायटीस सारखा आजार झाला आणि त्यामध्ये तिच्या या दोन्ही संवेदना नाहीशा झाल्या. ती खरतर सहा महिन्याची असताना बोलायला लागली आणि वर्षभराची मुलगी चालायलाही लागली होती. हेलन त्यांच्या कुकची मुलगी, तिची बालमैत्रीण, मार्था वॉशिंग्टन हिच्याबरोबर काहीबाही संवाद साधत होती. त्या दोघींनी मिळून त्यांच्यापुरतीच खुणांची भाषा विकसित केली होती. त्या आधारे त्या एकमेकींशी संवाद साधत. हेलन या काळात खूप हिंसक होत असे. त्याच प्रमाणे जेव्हा आनंदाने खुश असे तेव्हाही तीच वागणं नियंत्रणा बाहेरच होत. या सगळ्याचा तिच्या मैत्रिणीला आणि आई वडिलांनाही त्रास होत असे. तिच्या नातेवाईकांना वाटायचं तिला सरळ कुठल्यातरी संस्थेत दाखल करावं .
मुळातच बुद्धिमान असलेली हेलन लाडाने थोडी बिघडली होती. अॅनी सुलीव्हानने आल्यानंतर आठवडा भरातच हेलनच्या घरच्यांचा विश्वास संपादन केला. आणि मुख्य घरात न राहाता ती हेलनला घेऊन घराशेजारच्या आऊट हाऊस मधे दोन आठवडे राहीली. सुलीव्हान हिने प्रथम तिला एक बाहुली भेट दिली आणि डॉल म्हणून तिचा हेलनशी परिचय करून दिला. तेव्हा हेलन उद्विग्न झाली. हेलनला ती हातावर एक एक इंग्लिश अक्षर गिरवून शिकवत होती. डी ओ एल एल . अॅनीने हात पंप चालू करून त्या पाण्याखाली हेलनचा एक हात धरला आणि दुसर्या हाताने तिने ड्ब्ल्यु ए टी ई आर लिहिलं. म्हणजे हाताला थंडगार जाणवलेला स्पर्श म्हणजे वॉटर हे तिला कळलं. जेव्हा हातावरचा पाण्याचा स्पर्श तिला सुखावून गेला, तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी जाणून घ्यायला ती उत्सुक झाली. तीन प्रेमाने चुचकारत आणि आंजारून गोंजारून आज्ञा पालनाचे धडे देत शिस्त लावली.
हेलनन लोकांशी होता होईल तितका संवाद साधून बोलायला सुरुवात केली. ती सुलीव्हान कडून ब्रेल मध्ये लिहायला आणि वाचायला शिकली. मूक बधिरांच्या खुणा ती स्पर्शातून जाणायला शिकली. तिचा बोलण्याचा प्रयत्न काहीसा असफल झाला. पण सार्वजनिक समारंभात ती दुभाषाच्या सहाय्याने आपल बोलणं लोकांपर्यंत पोचवू लागली. तरीही तीन जगासाठी एक शिक्षणतज्ञ ,एक कुशल संघटक म्हणून खूप मोठी कामगिरी केली. अवघ आयुष्य तिन यासाठी वेचल. लोकांचं बोलणं ती ऐकायची. त्यांच्या ओठांवर बोट ठेवून ,ओठांच्या हालचालींवरून ती शब्द जाणून घ्यायची. तिची स्पर्शाची संवेदना अत्यंत तीव्र होती. ब्रेल लिपीमधे ती पारंगत झाली आणि खुणांच्या भाषेमध्येही तेवढीच माहिर झाली. इतकच नव्हे तर टेबलवर हात ठेवला की, बोटांच्या पेरांच्या सहाय्यानं जवळपास कुठेही वाजणारे संगीत ती अनुभवू शकत होती. तिची कथा आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली होती. सर्वसामान्य जनतेपासून ते प्रसिद्ध साहित्यिक, कलाकारांपर्यंत सगळेच तिला ओळखत होते. तिने याचा योग्य फायदा उठवला. मार्क ट्वेन हा त्यापैकीच एक. हेलनच असामान्य कौशल्य आणि कुशाग्र बुद्धी आलेक्जांडर ग्रहाम बेल आणि मार्क ट्वेन यांनी ताडली होती. 19व्या शतकातील दोन असामान्य व्यक्ति म्हणजे नेपोलियन आणि हेलन अशा शब्दात मार्क ट्वेन याने तिचा गौरव केला होता.
एक अंध, मुक बधिर मुलगी, तिन तीच जग कस पाहिलं असेल? आणि त्यातून सृजनाची निर्मिती करणे म्हणजे मोठ जोखमीच काम ! तिन लिखाण केल. 1903 मधे तीच “स्टोरी ऑफ माय लाईफ” हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ते 50 भाषांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. प्रथम ब्रेल टाइप रायटरवर टाइप करून नंतर ती साध्या टाइप रायटरवर टाइप करत असे. तिच्या पासपोर्टवरही तिचा व्यवसाय लेखिका म्हणून लिहिला होता. या टाइप रायटरवरच्या शब्दांच्या माध्यमातून तीन अमेरिकन लोकांशी आणि जगातल्या सर्व लोकांशी संवाद साधला. तीन तिच्या लिखाणातून सत्याचीच कास धरली. कामगारांच्या हक्कांसाठी आणि स्त्रीयांच्या शोषणा विरुद्ध हे हत्यार तीन वापरलं. ती स्त्रीयांसाठी लढा देणारी, कामगारांच्या हितासाठी प्रयत्न करणारी, कट्टर समाजवादी लेखिका होती.
ती मोठ मोठ्या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात आली आणि ते लोक तीचे अगदी जिवाभावाचे होऊन गेले. रूझवेल्ट, आइनस्टाईन, एमा गॉडमेन ,चार्ली चॅपलिन, हेन्री फोर्ड, जॉन केनेडी, जो डेव्हिडसन, आयसेनहोवर आणि असे बरेच. जगात सगळीकडे तिला मान मरातब मिळाला. अनेक सत्कार झाले. कित्येक पुरस्कार मिळाले. तिला हार्वर्ड युनिवर्सिटी, बर्लिन युनिव्हार्सिटी, दिल्ली युनिवर्सिटी, यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्या. 1955 मधे, स्वत: प्रेरणास्त्रोत असलेल्या फिल्मसाठी अकादमी अवॉर्ड मिळाले.
१ जून १९६८ रोजी तिच्या वाढदिनाच्या काही दिवस आधी तिला मृत्यू आला. मृत्यूनंतर तिच्या सहकारी अॅनी सुलीव्हान आणि पॉली थौंप्सन यांच्या शेजारी तिला चिरनिद्रा देण्यात आली.
……………………………………सविता नाबर
published in Saptahik Sarvakal on 27th June 2016
No comments:
Post a Comment