Wednesday, 31 August 2016

.............देता किती घेशील दोन करांनी !!

   

       श्रावण सोमवार, हिरव्यागार पाचुरंगी शालीमधे लपेटलेली धरित्री, कोवळ्या सुकुमार तनुला वार्‍याच्या झोताने त्रास होऊ नये म्हणून चेहर्‍यावर ओढलेली धुक्याची झिरझिरीत ओढणी, अंगा खांद्यावर खेळणारी, किलबिलणारी, छोटी पाखरे. पावसाळ्यात मन मोहून टाकणारे हे पृथ्वीचे रूप डोळ्यात साठवायला आम्ही आडी मलय्याला निघालो. डोंगराच्या पायथ्याशी दिसणार्‍या हिरव्या रंगाच्या अगणित छटा डोळ्यात मावत नव्हत्या. त्याचे पोतही काही न्यारे होते. त्या विविध छटांची गोधडी पिवळसर पायवाटेने जोडली होती. डोंगरावरून दिसणारा निसर्गाचा नजारा काही औरच होता. भक्तजन शुचिर्भूत होऊन दर्शनाला आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एक गोष्ट जाणवली.
    तिथल्या चबुतर्‍यावर भरपूरसे तांदूळ देवासाठी भाविक ठेवत होते. मनात आले, हे तांदूळ देवापुढे ठेवून त्यात कुंकू, हळद, बुक्का, अंगारा, फुले मिसळण्यापेक्षा, ते वेगळेच एका पेटीत टाकून गरीबांना शिधा म्हणून दिला तर लोकांच्या मुखी लागतील. भुकेने व्याकुळलेला जीव तृप्तीने ढेकर देईल. या वाया जाणार्‍या अन्नाचा सदुपयोग व्हावा असे वाटले तेव्हाच असेही जाणवले की दैनंदिन जीवनात आपण कितीतरी नैसर्गिक आणि राष्ट्रीय साधनसंपत्तीचा विनियोग योग्य प्रकारे न करता आपण ती वाया घालवतो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपलाच फक्त व्यक्तित्व विकास करत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही सामाजिक बांधीलकीची भावना जपली पाहिजे. कारण स्वत:कडे लक्ष देताना आपण समाजाचा एक घटक असल्याने तिकडेही लक्ष देणे अपरिहार्य असते.  त्यामुळे आपोआपच आपल्याही आयुष्याला शिस्त लागते.  
       पंगत असेल तर नक्कीच आपण आपल्याला आवश्यक तेवढे पानात घेऊ शकतो. पण पूर्वी जेवणाच्या पंक्तीत आग्रह व्हायचा आणि आपल्या मर्यादेपेक्षा जास्त जेवण पानात वाढले गेले की ते टाकून उठायला लगायचे. पण आजकाल बुफे जेवण पद्धतीतही लोकांना आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त पानात वाढून घ्यायची सवय पडली आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. एका बाजूला भुकेल्यांना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोटभरून जेवण होऊन ते वाया जात आहे. दोन्हीचा समन्वय साधायचा तर निदान आपण खाताना, जेवताना एवढी काळजी घेतली पाहिजे की आपण पानात जे टाकतोय ते कुणाच्या तरी मुखी लागले असते, म्हणू घेतानाच कमी वाढून घ्यावे, आपल्याला जेवढे हवे तितकेच खावे. देवाला दुधाचा अभिषेक, शनीला, मारुतीला तेल घालून ते वाया घालवतात. त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारात उपयोग केला किंवा तेवढेच तेल गरीबांना दिलेत तर ! त्यांच्या खाण्याला हातभार लागेलच शिवाय देव देवतांना जे तेल घालून मेणचटपणाचा थर देवावर चढवतात त्याऐवजी देव स्वच्छ राहतील.
      जेव्हा गेल्या वर्षी पाऊसच झाला नाही, तेव्हा शेतीसाठी तर पाण्याचे दुर्भिक्ष होतेच. एकीकडे प्यायच्या पाण्याचीहि भ्रांत होती. आणि दुसरीकडे आपली वाहने धुवायला, अंगणात सडा घालायला मुबलक पाणी वापरले जात होते. काही ठिकाणी पाइप फुटल्याने विनाकारण पाणी वाया जात होते. त्यावेळी जाणवले थेंब थेंब पाणी वाचवणे किती महत्वाचे आहे ते. जनावरे पाण्याविना मरत होती. लातूर, बीडसारख्या ठिकाणी लोकांना कित्येक मैल चालत जाऊन एखाद्या डबक्यातले पाणी पिण्यासाठी आणावे लागत होते. जीवनावश्यक गरजा पुरवाताना जेव्हा साधनांचा तुटवडा पडतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ती मुबलक मिळत असतानाही जपून वापरली पाहिजेत. निदान वाया जाऊ देता नये. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय म्हणजे पर्यायाने आपल्या भविष्यकाळासाठी त्या साधनांची कमतरता.
     आता गणपतीच्या दिवसात एक तर इको फ्रेन्डली गणपती (कागदाचा) आणि त्याची सजावट करणे चांगले. आणि अगदीच जमले नाही तर आणि शाडूच्या मूर्तिची स्थापना केली असेल तर त्याचे विसर्जन नदीत किंवा तलावात करण्याऐवजी काहीलीत किंवा टब, बादलीत करून ती माती पुन्हा उपयोगाला येईल असे बघावे. देवाचे निर्माल्य झाडांसाठी वापरुन त्याचा सदुपयोग करावा. पर्यावरणाचे प्रदूषणही टाळता येईल. आणि नैसर्गिक साधनांचा पुरेपूर उपयोगही होईल.
     सत्यशोधक चळवळीचे कोल्हापुरातील खंदे कार्यकर्ते आमदार कै. डी. एस. नार्वेकर यांनी काही तत्वे सांगितली होती. त्यापैकि एक, विवाह लागताना अक्षता पायदळी तुडवून तांदूळ वाया जाऊ नयेत फुलांच्या अक्षता वापराव्यात. दुसरे म्हणजे लग्नाकार्यात जो डामडौल, छान छोकीचा वाया खर्च फार न करता, जेवढा आवश्यक तेवढा करून विवाह रजिस्टर पद्धतीने करून खर्चाला फाटा दिला तर विनाकारण पैशाचा अपव्यय होणार नाही. विवाह विधीसुद्धा सुटसुटीत होतील. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. मग त्याचा विनियोग प्रत्येकाने जबाबदारीने करायला हवा. वृक्षतोड तर होतेच आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र आचरणात आणला पाहिजे. नैसर्गिक संपत्तीचा ह्रास थांबवायचा असेल तर प्रत्येकाने सुरुवात स्वत;पासूनच करायला हवी नाही का?   
      ------------------सविता नाबर  
   Published on 31st august 2016 in Maharsathra Times, Kolhapur edition

Wednesday, 24 August 2016

मन आनंद आनंद छायो

   

         र्टोल्ट ब्रेख्तने म्हटले आहे. “Everyone chases after happiness, not noticing that happiness is right at their heels.”      
     एकदा एक कोळी समुद्रकिनार्‍यावर आरामात एका झाडाखाली बिडी ओढत बसला होता. तिथून एक श्रीमंत व्यक्ति जात असताना त्याने कोळ्याला शांतपणे बसलेले पाहिले आणि त्या कोळयाला विचारले, तू एवढा बिनधास्त बसला आहेस, काही काम का करत नाहीस? तो म्हणाला, “मी आजच्या पुरते मासे मिळवले आहेत, आणखी काय करायचे?” ते ऐकल्यावर तो श्रीमंत माणूस त्याच्यावर रागावला. “निवांत झाडाखाली बसून वेळ वाया घालवतो आहेस त्यापेक्षा तू आणखी मासे का पकडत नाहीस?.” “पण मी जास्त मासे पकडून काय करू?” तो कोळी म्हणाला. श्रीमंत म्हणाला, “तू जास्त मासे मिळवून विक. आणि आलेल्या पैशातून एक मोठी बोट घे.” “मोठी बोट घेऊन मी काय करू?” “तू ती बोट घेऊन खोल समुद्रात जाऊ शकशील, आणखी मासे मिळवू शकशील. ते विकून जास्त पैसे तुला मिळतील.” “जास्त पैसे मिळाल्यावर मी काय करू?” “तू आणखी बोटी विकत घेऊन बर्‍याच लोकांना तुझ्याकडे कामाला ठेऊ शकशील.” “ते करून मी काय करू?” “तू माझ्यासारखा श्रीमंत माणूस होशील.” “त्यानंतर मी काय करू?” “तू तुझे आयुष्य शांतपणे व्यतीत करू शकशील.” कोळयाने शांतपणे वर मान करून पहिले आणि हसत तो उत्तरला, मग आता मी काय करतो आहे असे तुला वाटले?
      दिवसभरात इतक्या गोष्टी घडत असतात की त्यातून आपल्याला क्षणोक्षणी आनंद मिळत असतो. चाफा, बकुळ, पारिजातक यांचा ओंजळभर फुलांचा वास, गरमागरम वडापाव, भजी यांचा भर पावसात मिळालेला मस्त स्वाद, सकाळी दुरून कुठूनतरी कानावर पडलेले आणि दिवसभर मनात रेंगाळत राहिलेले, मी राधिका मी प्रेमिका किंवा फुललेरे क्षण माझे चे सूर, अगदी दोन सेकंदाने न हुकलेला ग्रीन सिग्नल. फक्त या क्षणांच्या बाबतीत आपण सजग राहायला हवे. संत तुलसीदासानी म्हटले आहे, गोधन, गजधन, वाजिधन और रतनधन खान, जाब आवत संतोखधन, सब धन धुरीसमान. गायींची खिल्लारे, हत्तीदळ, घोड्यांच्या रांगा, रत्नांच्या खाणी हे सगळं जरी प्राप्त झाले, तरी संतोष धनापुढे सगळच व्यर्थ आहे. लाखोंची कमाई झाली, माणिक मोत्यांची रास मिळाली, तरी ती कधीच पुरेशी वाटत नाही. समाधानी स्वभाव असला तर मात्र सार भरून पावत. इंग्रजीत म्हण आहे, count your blessings. पण आपली बुद्धी इतकी कोती असते की आपल्याला जे मिळत नाही त्याचाच आपण सतत विचार करत राहतो. ताजे उदाहरण,रिओ ऑलिम्पिकचे. साक्षी मलिकने ब्रॉँझ पदक मिळवले ते लढाई जिंकून. त्याक्षणी ती आनंदी होती. पण सिंधुने मिळवलेले सिल्व्हर मेडल, गोल्डन हरल्यामुळे मिळाले, त्यामुळे ती त्यावेळी फारशी आनंदी नव्हती.   
     एखादा रिक्षावाला किंवा बस कंडक्टर, दुकानदार तुमच्याशी वाद घालतो, कदाचित तुमचे बरोबर असते. पण त्यानंतर तो वाद विसरून आपली पुढील मार्गाक्रमणा करणे आवश्यक असते नाहीतर त्या दु:खी कष्टी मुडची सावली आपल्या पुढच्या कामावर, वातावरणावर पडते आणि सगळेच बिनसत जाते. तो वाद तुम्हाला घरापर्यंत, तुमच्या कुटुंबापर्यन्त कसा घेऊन जातो लक्षातही येत नाही. घरातल्यांशी वागताना नकळत तुसडेपणाने वागतो. म्हणजे आपल्या मुडचा कळत नकळत रिमोट कंट्रोल दुसर्‍याच्या हातात देतो.
      जेलमध्ये असणारे दोन कैदी, त्यांच्यात असणारा स्वभावाचा फरक पहा. एक आनंदी आहे आणि दुसरा दु:खी. आनंदी कैदी दुसर्‍याला विचारतो, “तू एवढा दु:खी कष्टी का आहेस? तुरुंगात येण्याआधी मी खूप मजेत होतो. एखाद्या  रिसॉर्टमध्ये असल्यासारखा होतो. त्यामुळे इथल्यापेक्षा अगदी छान जीवन होते.” दुसरा त्याला विचारतो, “तू कसा इतका समाधानी?” त्यावर आनंदी  माणूस उत्तरतो, “मी आधी दुसर्‍या एका जेलमध्ये होतो. पण तिथल्या राहाण्याच्या सोयी अत्यंत घाणेरड्या होत्या. इथेच मी जास्त प्रसन्न आणि सुखी आहे. खुपजण (कैदी) इथे राहायला मिळावे म्हणून प्रयत्नात असतात. मी त्या बाबतीत नशीबवान आहे.”
    आनंद ही गोष्ट व्यक्ति आणि परिस्थिति सापेक्ष असते. तुलना करून आपल्याला किती चांगले मिळाले याचा विचार करायचा असतो. म्हणूनच तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी. सुखाच्या पाठीमागे धावत सुटले तर ते आणखी आणखी पुढे जाते. When you are happy and you know clap your hands, when you are  happy and you know and you really want to show clap your hands. आनंदाची परिभाषा अशी आहे. आनंद दाखवला, व्यक्त केला तर तो द्विगुणित होतो. बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझ सुख सुख हंड्या झुंबर टांगल, माझ दु:ख दु:ख तयघरात कोंडल. आनंदाचा प्रकाश बाकीच्यानाही आनंद देतो. The time to be happy is now, the place to be happy is here. वर्तमानात राहायच आणि तेही आनंदी हाच आयुष्याचा मूलमंत्र आहे.  

        -----------------------सविता नाबर 

Published in Maharashtra Times ,Kolhapur edition as on 24th August 2016

Thursday, 18 August 2016

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म

   

       रुचेल ते बोलावे आणि पचेल ते खावे. जेव्हा आपले विचार सात्विक असतात तेव्हा आपले वागणेही शुद्ध आणि सात्विक असते. आणि आपले अन्न सात्विक असते तेव्हा आपले विचार सात्विक असतात. आहार, विहार, आचार, विचार हे आपल्या जीवनाचे चार आधार स्तंभ आहेत. जीवनशैलीत अत्यंत महत्व आहे ते आपल्या आहाराला. कारण आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचा आपला स्वभावधर्म, प्रकृती बनते. आपण जसे अन्न खातो तसे आपले स्वभाव वैशिष्ठ्य बनते. फार मसालेदार, तिखट, शिळे अन्न खाणार्‍या व्यक्ती सर्वसाधारणपणे तामसिक असतात. राग, क्रोधाने भारलेल्या असतात. ताजे, सकस आणि स्निग्ध खाणारे लोक राजसिक म्हणजे बलशाली असतात. तर शाकाहारी, मोजकेच सात्विक अन्न खाणारे, स्वभावाने मृदु, शांत, विचारी असतात. पटकन रियाक्ट न होता विचार करून पाऊल उचलणार्‍या असतात.
       एकदा एक चोर आपल्या केलेल्या कुकर्माचे पापक्षालन करण्यासाठी एका साधूबुवाना जेवायला बोलावतो. त्यांना जेवायला घालून तो दक्षिणा, धान्य देतो, त्यांची पूजा करतो. रात्री साधूबुवा त्याच्याकडे मुक्कामाला रहातात. सकाळी उठून तो पहातो तर त्याची तिजोरी उघडी असते, त्यातले काही जडजवाहीर चोरीला गेलेले असते. साधूबुवाही नाहीसे झालेले असतात. निरीच्छ साधुबुवांनी चोरी करण्याचे कारण त्याला समजत नाही. चोराने दिलेल्या अन्नामुळे साधूचे मनही चोरासारखे होते.     
    निरोगी व्यक्ति साधे जेवण जेवताना देखील जसे काही मेजवानी झोडत असल्यासारखे जेवतो. याउलट ज्यांचे आरोग्य चांगले नाही त्यांनी कितीही रुचकर पदार्थ खाल्ले तरी त्यांना त्यातून आनंद मिळत नाही. त्यासाठी मनाने आनंदी राहिले पाहिजे. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे भौतिकवादाची देणगी आपल्याला मिळाली आहे. काही अंशी ते अपरिहार्य आहे. पण नियंत्रणाखाली ठेवणे नक्कीच शक्य आहे. ठराविक दिवसांनी लंघन करणे आवश्यक असते. कारण पोटाला आरामाची गरज असते. पण उपास या नावाखाली नको ते पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे, तूप, गोड पदार्थ, जे पचायला जड असतात.
     जेव्हा पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ आपल्याला मोह घालतात, तेव्हा तो आपण टाळू शकत नाही. पण पेराल तसे उगवते ही म्हण आपल्या आहाराच्या बाबतीतही लागू होते. कधीतरी त्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही. पण त्या ऐवजी सकस, घरात शिजवलेले, ताजे अन्न कधीही चांगले. आपला डॉक्टर आपणच असायला हवे. आपल्या शरीराला काय आवश्यक आहे हे आपल्यालाच जास्त कळते. त्याप्रमाणे अन्न घ्यायला हवे. ढोबळ मानाने दिवसा थोडे जड अन्न घेतले तर चालते. पण रात्री हलका आहार घेऊन पचनशक्तीला थोडा आराम द्यायला हवा. कारण शरीराची गाडी गॅरेज मध्ये असते. तसेच ऋतुप्रमाणे आहार हलका किंवा जड घ्यायचे ठरवावे लागते. खाताना पोट काही म्हणत नाही पण कालांतराने बंड पुकारतेच.
      तरुणपणी कोणतेही नियंत्रण, बंधन नको असते. तारुण्यात स्वैर, स्वच्छंदी वागणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रमाण आणि वेळ यांनाही काही बंधन नसते. युवक खाण्या पिण्याच्या बाबत बेफिकीर, बेसावध असतात. आपल्याला काही होणार नाही हा फाजिल आत्मविश्वास असतो. या निष्काळजीपणाचे परिणाम लगेच दिसून आले नाहीत तरी ते उतार वयात दिसून येतात. म्हणूनच तारुण्याचा जोश थोडा आवरावा लागतो. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. काही होत नाही या भ्रमात राहून अवेळी जेवणे, वरचेवर हॉटेलात खाणे, रात्र रात्र जागरण करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
      जेवण कितीही पौष्टिक असले, सकस, दुधातुपाचे असले, जीवनसत्वयुक्त असले तरी ते शांत चित्ताने, आनंदी मनाने खाल्ले नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. जेवताना मनावर कोणताही ताण असता कामा नये. जेवताना सर्व काळजी, चिंता, शंका दूर ठेवल्या पाहिजेत. दिवसाकाठी एक तरी जेवण कुटुंबातील सर्वांनी एकत्र घ्यावे. मतभेदांविषयी चर्चा जेवताना करू नये. शब्दाने शब्द वाढत जाऊन वातावरण बिघडण्याची शक्यता असते. टीव्ही समोर बसून खाणे अयोग्य आहे. समोर घडत असलेल्या नाट्याचा भावनात्मक परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर हमखास होतोच. 
    पोटभर जेवावे. पण पोटभरून जेवू नये. आवडीने जेवावे. पण अधाशीपणे खाऊ नये. जिभेवर नियंत्रण हवे. ज्यांना शारीरिक श्रम जास्त करावे लागत नाहीत. बुद्धिजीवी व्यक्तींनी आपला आहार जाणीवपूर्वक मर्यादित ठेवला पाहिजे. आहाराबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. चौरस, समतोल आहार, जीवनसत्वे, प्रथिने, उष्मांक याबाबत माहिती घेतली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने, जेवताना घाई करणे चांगले नाही. अन्नाचे चर्वण करत सावकाश जेवले तरच ते अन्न पचते. आरोग्याचा संबंध बहुतांशी जेवणाशी असतो. कधी कधी सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जात  नाहीत. त्यामुळे सर्व जीवनसत्व पोटात जात नाहीत. काही जणांना जेवणाला नावे ठेवत खायची सवय असते. शरीराच्या यंत्राची जर योग्य निगा राखली नाही तर ते साथ तरी कसे देणार? जेवण्यासाठी जगायचे नाही तर जगण्यासाठी जेवायचे हे ठरवायचे, अन्न हे पूर्णब्रम्ह मानून!

  ---------------------------------सविता नाबर 

    published as on 17 th August 2016 in Mahatashtra Times,Kop edition



Thursday, 11 August 2016

याचे कारण काय?

   

           श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अतिशय धूसर सीमारेषा आहे. श्रद्धा ठेवताना आपण अलगदपणे कधी अंधश्रद्धेच्या भावनेला बळी पडलो हे लक्षातही येत नाही. बर्‍याच लोकांची देवावर श्रद्धा असते. स्वामी विवेकानंदांनी मूर्तिपूजा ही आवश्यक आहे असे सांगितले. मनाला लगाम घालताना, समोर काहीतरी ठोस साधन असणे आवश्यक असते. मनाला कुठल्यातरी गोष्टीचा आधार हवा असतो. तो मूर्तीरूपाने मिळतो. आपले मन इतके सामर्थ्यशाली असते की, जे विचार मनात येतात ते प्रसंग रूपाने आपल्या बाबतीत घडत असतात. मनाला जसे खाद्य पुरवावे तसे ते वागत असते. त्याचे परिणाम तसे तसे आपल्याला मिळत असतात.
     पूर्वी रोजच्या देवपूजेला पाटावर बसताना कद किंवा मुकटा, थोडासा सैल करून किंवा सोडून बसायची प्रथा होती. काही ठिकाणी अजूनही देवपूजेला पाटावर बसताना कद सैल करून बसतात. पूर्वी तो तोकडा असल्याने बसताना त्रासदायक होऊ नये यासाठी कासोटा सोडून बसण्याचा प्रकार असावा. पण ती जेव्हा पद्धत म्हणून अंगिकारली जाते तेव्हा ते हास्यास्पद ठरते.
     मांजर आडवे गेले की काम होत नाही, पाल अंगावर पडली की आंघोळ करावी. हल्लीच कुठेतरी वाचले की पालीच्या त्वचेमद्धे विषारी द्रव्य असते, ती आपल्या अंगावर पडल्यावर आपल्याला ते बाधक ठरू शकते. पण त्याची कारणमीमांसा न करता बर्‍याच वेळा अंधानुकरण होते. पुढची शेळी खड्ड्यात पडली की मागोमाग दुसरीहि खड्ड्यात पडते तशातली गत होते. पूर्वीच्या ज्या चालीरीती होत्या त्यांच्या पाठीमागे एकतर शास्त्रीय कारण होते किंवा परिस्थितीनुरूप सोय होती. पण आज त्या चालीरीती म्हणून आपल्या संस्कृतीच्या नावाखाली जेव्हा कारण समजून न घेता पुढे चालवल्या जातात त्याला अंधश्रद्धा म्हणावे नाहीतर काय!
    श्रद्धा आपला आत्मविश्वास वाढवते तर अंधश्रद्धा मनाला कमकुवत करते. जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आपण पूर्ण प्रयत्नाने, शर्थीने प्रयत्न करून आपले ईप्सित साध्य करायला बघतो. डोळ्यावर पट्टी बांधून जेव्हा अमुक घडले तर माझे ध्येय साध्य होईल असे मनाने ठरवले आणि हातावर हात धरून बसले तर काहीच होत नाही. अगदी साधे उदाहरण पहा जर विद्यार्थी दशेत अभ्यास जिद्दीने केला तर यश हमखास आहेच. अशावेळी श्रद्धा असते ती आपल्या नियमित अभ्यासावर. पण तेच जर अभ्यास न करता फक्त परीक्षेच्यावेळी पुस्तकाची पाने उलटली आणि देवाला साकडे घातले की मला परीक्षेत यश दे, मी संकष्टी करीन, एकवीस उपास करीन तर ती शंभर टक्के अंधश्रद्धा ठरते. ज्या गोष्टीचे विश्लेषण बुद्धीने करता येते ती श्रद्धा.
     वैद्यकीय क्षेत्रात याच थिअरीचा उपयोग केला जातो. कधी कधी क्षुल्लक आजाराचे निराकरण डॉक्टरांच्या ज्या एखाद्या औषधाने होते, ते फार उत्तम, महत्वाचे औषध नसून साधे सलाईन असू शकते. याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. मनाच्या सामर्थ्यावर आजार बरा होऊ शकतो. ही असते श्रद्धा. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर, असणारा दृढ विश्वास. श्रद्धा अशावेळी खूप महत्वाचे काम करते. डॉक्टरावर विश्वास असेल तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतो. पण श्रद्धा डळमळीत असेल तर काहीच उपयोग होत नाही. श्रद्धा म्हणजे आपल्या ज्ञानाची, अंदाजाची, बुद्धीची, निर्णयशक्तीची आपल्याला असलेली खात्री.
       पूर्वीच्याकाळी गुरु शिष्य परंपरेत एका गुरुकुलात गुरुकडे काही शिष्य शिकत होते. गुरु अत्यंत ज्ञानी होते. शिष्य अर्थातच त्यांचा आदर करत होते. रोज रात्री एक मांजर आश्रमाच्या स्वैपाक खोलीत येऊन सगळे दूध पिऊन जात होते. शिष्य याबद्दल खूप त्रासून गेले होते. ती त्यांच्या डोक्याला एक कटकटच झाली होती. मग त्यांनी एक गमतीशीर गोष्ट केली. गुरूला तर मुक्या प्राण्याला शिक्षा द्यायची नव्हती. त्यांनी त्या मांजराला एका खांबाला बांधून घातले आणि त्याला रोज दूध द्यायाला लागले. दिवसांमागून दिवस गेले. जुने शिष्य विद्या घेऊन आश्रमातून गेले, नवीन शिष्य शिकायला आले. गुरु स्वर्गवासी झाले. आश्रमातले दैनंदिन व्यवहार चालू झाले. मांजराला अजूनही ते खांबाला बांधून ठेवतच होते. आणि त्याला दूध प्यायला घालत होते. एके दिवशी ते मांजर मेले. दुसर्‍या दिवशी नवीन गुरूंनी शिष्यांना एक मांजर पकडून आणायला सांगितले आणि त्याला खांबाला बांधायचे फर्मान सोडले. मांजराला खांबाला का बांधले जाते हे त्या नवीन गुरूंना माहीत नव्हते. त्यांना फक्त गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे एवढेच माहीत होते. शिष्यांना शिकवताना मांजराला खांबाला बांधलेले त्यांनी पाहिले होते. ती पद्धत फक्त त्यांनी पुढे चालू ठेवली.
     अगदी असेच आपले पूर्वज पिढ्यान पिढ्या ज्या काही रूढी, परंपरा चालवत आले आहेत, त्यांच्या काळात, त्या योग्य असतील. परंतु, आपण त्याचा  विचार न करता तशाच पुढे चालू ठेवतो. त्याला प्रश्न करणे हे आगाऊपणाचे ठरते. तेव्हा आपण ज्या काही पद्धती चालू ठेवतो त्याचा साकल्याने विचार करावा एवढेच!

   -----------------------सविता नाबर  
    Published as on 10th August 2016 in Maharashtra Times ,Kolhapur edition