रुचेल ते बोलावे आणि पचेल
ते खावे.
जेव्हा आपले विचार सात्विक असतात तेव्हा आपले वागणेही शुद्ध आणि
सात्विक असते. आणि आपले अन्न सात्विक असते तेव्हा आपले विचार सात्विक असतात. आहार, विहार, आचार, विचार हे आपल्या
जीवनाचे चार आधार स्तंभ आहेत. जीवनशैलीत अत्यंत महत्व आहे ते आपल्या आहाराला. कारण
आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचा आपला स्वभावधर्म,
प्रकृती बनते. आपण जसे अन्न खातो तसे आपले स्वभाव वैशिष्ठ्य बनते. फार मसालेदार, तिखट, शिळे अन्न खाणार्या व्यक्ती सर्वसाधारणपणे
तामसिक असतात. राग, क्रोधाने भारलेल्या असतात. ताजे, सकस आणि स्निग्ध खाणारे लोक राजसिक म्हणजे बलशाली असतात. तर शाकाहारी, मोजकेच सात्विक अन्न खाणारे, स्वभावाने मृदु, शांत, विचारी असतात. पटकन रियाक्ट न होता विचार
करून पाऊल उचलणार्या असतात.
एकदा एक चोर आपल्या केलेल्या कुकर्माचे
पापक्षालन करण्यासाठी एका साधूबुवाना जेवायला बोलावतो. त्यांना जेवायला घालून तो
दक्षिणा, धान्य देतो, त्यांची पूजा करतो. रात्री साधूबुवा
त्याच्याकडे मुक्कामाला रहातात. सकाळी उठून तो पहातो तर
त्याची तिजोरी उघडी असते, त्यातले काही जडजवाहीर चोरीला
गेलेले असते. साधूबुवाही नाहीसे झालेले असतात. निरीच्छ साधुबुवांनी चोरी करण्याचे
कारण त्याला समजत नाही. चोराने दिलेल्या अन्नामुळे साधूचे मनही चोरासारखे होते.
निरोगी
व्यक्ति साधे जेवण जेवताना देखील जसे काही मेजवानी झोडत असल्यासारखे जेवतो. याउलट
ज्यांचे आरोग्य चांगले नाही त्यांनी कितीही रुचकर पदार्थ खाल्ले तरी त्यांना
त्यातून आनंद मिळत नाही. त्यासाठी मनाने आनंदी राहिले पाहिजे. जागतिकीकरणाच्या
रेट्यामुळे भौतिकवादाची देणगी आपल्याला मिळाली आहे. काही अंशी ते अपरिहार्य आहे. पण
नियंत्रणाखाली ठेवणे नक्कीच शक्य आहे. ठराविक दिवसांनी लंघन करणे आवश्यक असते.
कारण पोटाला आरामाची गरज असते. पण उपास या नावाखाली नको ते पदार्थ खाल्ले जातात.
साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे, तूप, गोड पदार्थ, जे पचायला जड असतात.
जेव्हा पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ आपल्याला मोह घालतात, तेव्हा
तो आपण टाळू शकत नाही. पण पेराल तसे उगवते ही म्हण आपल्या आहाराच्या बाबतीतही लागू
होते. कधीतरी त्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही. पण त्या ऐवजी सकस, घरात शिजवलेले, ताजे अन्न कधीही चांगले. आपला
डॉक्टर आपणच असायला हवे. आपल्या शरीराला काय आवश्यक आहे हे आपल्यालाच जास्त कळते.
त्याप्रमाणे अन्न घ्यायला हवे. ढोबळ मानाने दिवसा थोडे जड अन्न घेतले तर चालते. पण
रात्री हलका आहार घेऊन पचनशक्तीला थोडा आराम द्यायला हवा. कारण शरीराची गाडी गॅरेज
मध्ये असते. तसेच ऋतुप्रमाणे आहार हलका किंवा जड घ्यायचे ठरवावे लागते. खाताना पोट
काही म्हणत नाही पण कालांतराने बंड पुकारतेच.
तरुणपणी कोणतेही नियंत्रण, बंधन नको असते. तारुण्यात स्वैर, स्वच्छंदी वागणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रमाण आणि वेळ यांनाही काही बंधन नसते. युवक
खाण्या पिण्याच्या बाबत बेफिकीर, बेसावध असतात. आपल्याला
काही होणार नाही हा फाजिल आत्मविश्वास असतो. या निष्काळजीपणाचे परिणाम लगेच दिसून
आले नाहीत तरी ते उतार वयात दिसून येतात. म्हणूनच तारुण्याचा जोश थोडा आवरावा
लागतो. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. काही होत नाही या भ्रमात
राहून अवेळी जेवणे, वरचेवर हॉटेलात खाणे, रात्र रात्र जागरण करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
जेवण कितीही पौष्टिक असले, सकस, दुधातुपाचे असले,
जीवनसत्वयुक्त असले तरी ते शांत चित्ताने, आनंदी मनाने
खाल्ले नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. जेवताना मनावर कोणताही ताण असता कामा
नये. जेवताना सर्व काळजी, चिंता, शंका
दूर ठेवल्या पाहिजेत. दिवसाकाठी एक तरी जेवण कुटुंबातील सर्वांनी एकत्र घ्यावे.
मतभेदांविषयी चर्चा जेवताना करू नये. शब्दाने शब्द वाढत जाऊन वातावरण बिघडण्याची
शक्यता असते. टीव्ही समोर बसून खाणे अयोग्य आहे. समोर घडत असलेल्या नाट्याचा
भावनात्मक परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर हमखास होतोच.
पोटभर जेवावे. पण पोटभरून जेवू नये. आवडीने
जेवावे. पण अधाशीपणे खाऊ नये. जिभेवर नियंत्रण हवे. ज्यांना शारीरिक श्रम जास्त
करावे लागत नाहीत. बुद्धिजीवी व्यक्तींनी आपला आहार जाणीवपूर्वक मर्यादित ठेवला
पाहिजे. आहाराबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. चौरस, समतोल आहार, जीवनसत्वे, प्रथिने, उष्मांक
याबाबत माहिती घेतली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने, जेवताना
घाई करणे चांगले नाही. अन्नाचे चर्वण करत सावकाश जेवले तरच ते अन्न पचते. आरोग्याचा
संबंध बहुतांशी जेवणाशी असतो. कधी कधी सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे सर्व जीवनसत्व पोटात जात नाहीत.
काही जणांना जेवणाला नावे ठेवत खायची सवय असते. शरीराच्या यंत्राची जर योग्य निगा
राखली नाही तर ते साथ तरी कसे देणार? जेवण्यासाठी जगायचे नाही तर जगण्यासाठी
जेवायचे हे ठरवायचे, अन्न हे पूर्णब्रम्ह मानून!
---------------------------------सविता
नाबर
published as on 17 th August 2016 in Mahatashtra Times,Kop edition
No comments:
Post a Comment