Thursday, 11 August 2016

याचे कारण काय?

   

           श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अतिशय धूसर सीमारेषा आहे. श्रद्धा ठेवताना आपण अलगदपणे कधी अंधश्रद्धेच्या भावनेला बळी पडलो हे लक्षातही येत नाही. बर्‍याच लोकांची देवावर श्रद्धा असते. स्वामी विवेकानंदांनी मूर्तिपूजा ही आवश्यक आहे असे सांगितले. मनाला लगाम घालताना, समोर काहीतरी ठोस साधन असणे आवश्यक असते. मनाला कुठल्यातरी गोष्टीचा आधार हवा असतो. तो मूर्तीरूपाने मिळतो. आपले मन इतके सामर्थ्यशाली असते की, जे विचार मनात येतात ते प्रसंग रूपाने आपल्या बाबतीत घडत असतात. मनाला जसे खाद्य पुरवावे तसे ते वागत असते. त्याचे परिणाम तसे तसे आपल्याला मिळत असतात.
     पूर्वी रोजच्या देवपूजेला पाटावर बसताना कद किंवा मुकटा, थोडासा सैल करून किंवा सोडून बसायची प्रथा होती. काही ठिकाणी अजूनही देवपूजेला पाटावर बसताना कद सैल करून बसतात. पूर्वी तो तोकडा असल्याने बसताना त्रासदायक होऊ नये यासाठी कासोटा सोडून बसण्याचा प्रकार असावा. पण ती जेव्हा पद्धत म्हणून अंगिकारली जाते तेव्हा ते हास्यास्पद ठरते.
     मांजर आडवे गेले की काम होत नाही, पाल अंगावर पडली की आंघोळ करावी. हल्लीच कुठेतरी वाचले की पालीच्या त्वचेमद्धे विषारी द्रव्य असते, ती आपल्या अंगावर पडल्यावर आपल्याला ते बाधक ठरू शकते. पण त्याची कारणमीमांसा न करता बर्‍याच वेळा अंधानुकरण होते. पुढची शेळी खड्ड्यात पडली की मागोमाग दुसरीहि खड्ड्यात पडते तशातली गत होते. पूर्वीच्या ज्या चालीरीती होत्या त्यांच्या पाठीमागे एकतर शास्त्रीय कारण होते किंवा परिस्थितीनुरूप सोय होती. पण आज त्या चालीरीती म्हणून आपल्या संस्कृतीच्या नावाखाली जेव्हा कारण समजून न घेता पुढे चालवल्या जातात त्याला अंधश्रद्धा म्हणावे नाहीतर काय!
    श्रद्धा आपला आत्मविश्वास वाढवते तर अंधश्रद्धा मनाला कमकुवत करते. जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आपण पूर्ण प्रयत्नाने, शर्थीने प्रयत्न करून आपले ईप्सित साध्य करायला बघतो. डोळ्यावर पट्टी बांधून जेव्हा अमुक घडले तर माझे ध्येय साध्य होईल असे मनाने ठरवले आणि हातावर हात धरून बसले तर काहीच होत नाही. अगदी साधे उदाहरण पहा जर विद्यार्थी दशेत अभ्यास जिद्दीने केला तर यश हमखास आहेच. अशावेळी श्रद्धा असते ती आपल्या नियमित अभ्यासावर. पण तेच जर अभ्यास न करता फक्त परीक्षेच्यावेळी पुस्तकाची पाने उलटली आणि देवाला साकडे घातले की मला परीक्षेत यश दे, मी संकष्टी करीन, एकवीस उपास करीन तर ती शंभर टक्के अंधश्रद्धा ठरते. ज्या गोष्टीचे विश्लेषण बुद्धीने करता येते ती श्रद्धा.
     वैद्यकीय क्षेत्रात याच थिअरीचा उपयोग केला जातो. कधी कधी क्षुल्लक आजाराचे निराकरण डॉक्टरांच्या ज्या एखाद्या औषधाने होते, ते फार उत्तम, महत्वाचे औषध नसून साधे सलाईन असू शकते. याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. मनाच्या सामर्थ्यावर आजार बरा होऊ शकतो. ही असते श्रद्धा. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर, असणारा दृढ विश्वास. श्रद्धा अशावेळी खूप महत्वाचे काम करते. डॉक्टरावर विश्वास असेल तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतो. पण श्रद्धा डळमळीत असेल तर काहीच उपयोग होत नाही. श्रद्धा म्हणजे आपल्या ज्ञानाची, अंदाजाची, बुद्धीची, निर्णयशक्तीची आपल्याला असलेली खात्री.
       पूर्वीच्याकाळी गुरु शिष्य परंपरेत एका गुरुकुलात गुरुकडे काही शिष्य शिकत होते. गुरु अत्यंत ज्ञानी होते. शिष्य अर्थातच त्यांचा आदर करत होते. रोज रात्री एक मांजर आश्रमाच्या स्वैपाक खोलीत येऊन सगळे दूध पिऊन जात होते. शिष्य याबद्दल खूप त्रासून गेले होते. ती त्यांच्या डोक्याला एक कटकटच झाली होती. मग त्यांनी एक गमतीशीर गोष्ट केली. गुरूला तर मुक्या प्राण्याला शिक्षा द्यायची नव्हती. त्यांनी त्या मांजराला एका खांबाला बांधून घातले आणि त्याला रोज दूध द्यायाला लागले. दिवसांमागून दिवस गेले. जुने शिष्य विद्या घेऊन आश्रमातून गेले, नवीन शिष्य शिकायला आले. गुरु स्वर्गवासी झाले. आश्रमातले दैनंदिन व्यवहार चालू झाले. मांजराला अजूनही ते खांबाला बांधून ठेवतच होते. आणि त्याला दूध प्यायला घालत होते. एके दिवशी ते मांजर मेले. दुसर्‍या दिवशी नवीन गुरूंनी शिष्यांना एक मांजर पकडून आणायला सांगितले आणि त्याला खांबाला बांधायचे फर्मान सोडले. मांजराला खांबाला का बांधले जाते हे त्या नवीन गुरूंना माहीत नव्हते. त्यांना फक्त गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे एवढेच माहीत होते. शिष्यांना शिकवताना मांजराला खांबाला बांधलेले त्यांनी पाहिले होते. ती पद्धत फक्त त्यांनी पुढे चालू ठेवली.
     अगदी असेच आपले पूर्वज पिढ्यान पिढ्या ज्या काही रूढी, परंपरा चालवत आले आहेत, त्यांच्या काळात, त्या योग्य असतील. परंतु, आपण त्याचा  विचार न करता तशाच पुढे चालू ठेवतो. त्याला प्रश्न करणे हे आगाऊपणाचे ठरते. तेव्हा आपण ज्या काही पद्धती चालू ठेवतो त्याचा साकल्याने विचार करावा एवढेच!

   -----------------------सविता नाबर  
    Published as on 10th August 2016 in Maharashtra Times ,Kolhapur edition


No comments:

Post a Comment