Wednesday, 3 August 2016

मैत्र जीवांचे

      छोट्या चिनूने हट्टच धरला, मला सगळे केस कापायचे आहेत. पूर्ण गोटा करायचा आहे. तिच्या वडिलांना, आजीला तिचे म्हणणे पटत नव्हते. इतके सुंदर केस का कापायचे? पण ती हट्टालाच पेटली होती. केस कापल्या शिवाय जेवायलाही तयार नव्हती. तिच्या आईला वाटले की ही आजकालची फॅशन दिसते आहे. शेवटी एकदाचे केस कापून आली. चिनूचा गोड गोंडस चेहरा कसातरीच वाटत होता. पण ती खुश होती. शाळेत सोडल्यावर ती आईचा हात सोडून पळत सुटली कारण तिचा मित्र अभिमन्यु तिला भेटला. त्याच्या डोक्यावरही केस नव्हते. त्यानंतर दोनच दिवसांनी चिनूच्या आईला अभिमन्यूची आई भेटली ती म्हणाली, “अभिला कॅन्सर झाल्यामुळे त्याचे केस केमो देताना गेले. पण मुलांना काय कळतय हो! मूल खूप चिडवतात त्याला. पण तुमच्या चिनूचे मात्र मला कौतुक वाटते. त्याला एकट्याला वाईट वाटू नये म्हणून तिनेही केस कापायला लावले म्हणे!” आता चिनूच्या केस कापण्यामागचा अर्थ तिच्या आईला उमगला. चिनूने परानुभूती जाणली होती. आणि ती मैत्रीला जागली होती, अभिला वाईट वाटू नये म्हणून. मैत्रीत महत्वाच असते समजून घेणे. प्रसंगी भावनिक आधार देणे. मी इतके केले म्हणून मला त्याने किंवा तिने एवढेच करायला हवे अशी अपेक्षा न ठेवता केले तर ती आपली कृती मनापासून होते.
      माणूस एकटा राहू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवार्‍याइतकीच भावना व्यक्त करण्याची त्याची गरज तीव्र असते. मैत्रीमुळे माणसाचे जीवन समृद्ध होते. त्याला जगण्यात आनंद वाटायला लागतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला मित्रासारखी दुसरी जागा नाही. मित्र नसलेल्या माणसाचे जीवन भकास होते. तुमच्यातले गुण दाखवून दिल्याने तुमचा हुरूप वाढतो आणि नव्या जोमाने तुम्ही कामाला लागता. तसेच दोष दाखवले तरी फारसे वाईट न वाटता, स्वत;मध्ये सुधारणा घडवू शकता. आई वडील कोण असावेत हे आपल्या हातात नाही. पण मित्र कोण करावेत हे पूर्णपणे आपल्या मर्जीवर, आपल्या हातात असते. आयुष्यात मित्र ही फार मोठी संपत्ती असते. कृष्ण सुदामाची मैत्री जगजाहीर आहे. कृष्णासारख्या मित्रावर निरपेक्ष प्रेम करणारा सुदामा विरळाच. आणि गरीब सुदामाच्या पोह्यांचा पाहुणचार घेणारा श्रीकृष्णही जगावेगळा. काही गोष्टी अशा असतात ज्या आई वडील, भाऊ आणखी कोणाबरोबरच शेअर करू शकत नाही अशा मनातल्या गुजगोष्टी फक्त मित्र मैत्रीणी बरोबरच शेअर केल्या जातात. भलेही त्या सुखाच्या असोत नाहीतर वर्मी घाव बसलेल्या असोत. भावनांचा निचरा करायला मैत्रीसारखा दुसरा खांदा नाही.
    एकदा वळवंटातून दोघे मित्र जात असताना त्यांचा वाद होतो. त्या वादाच्या भरात एक दुसर्‍याला थप्पड लगावतो. ज्याला मारलेले असते तो गप्प बसतो आणि वाळूत लिहितो, आज माझ्या जिवलग मित्राने मला थप्पड मारली, मला फार वाईट वाटले. ते दोघे तसेच पुढे चालत जातात. त्यांना छान हिरवळीचा प्रदेश लागतो. तिथे आंघोळ करायची ठरवतात. एकजण केंदाळात खोल बुडायला लागतो. ज्याने थप्पड मारलेली असते तोच मित्र त्याला वाचवतो. बाहेर आल्यावर वाचलेला मित्र दगडावर कोरतो, आज माझ्या जिवलग मित्राने मला वाचवले. यावर तो दुसरा मित्र त्याला विचारतो, मी थप्पड मारल्यावर तू वाळूत लिहिलस, पण मी तुला वाचवल्यावर तू दगडावर कोरलेस. असे का? त्यावर तो उत्तरतो, जेव्हा कुणी आपल्याला दुखावते, तेव्हा क्षमेच्या वार्‍याच्या लहरींनी ते पुसले गेले पाहिजे आणि जेव्हा कुणी आपले भले करते तेव्हा त्याची आठवण कुठलाही वारा पुसू शकणार नाही अशा रीतीने ते कोरले गेले पाहिजे.  
      आपला अत्यंत जवळचा एक मित्र असतो, तो आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. तो फक्त देत असतो. तो म्हणजे वाचन. वाचनावरून आठवले, आजच्या तरुण मुलांनी वाचावे असे एक पुस्तक नुकतेच मी वाचले. श्री. विश्वास नांगरे पाटील यांचे “मन मे है  विश्वास”.  मनोनिग्रह म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे काय आणि ध्येय कसे ठेवायचं, ते कसे गाठायचे याच आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे अप्रतिम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. प्रसंगी भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावणार्‍या नायकाला चांगल्या मित्रांनी कसे सावरले, मार्गदर्शन केले याचेही दाखले त्यांनी दिले आहेत.
     डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणतात, “मित्रांमधल्या गप्पांमुळे संवादाचा आनंद तर मिळतोच. पण या बोलण्यामुळे आपलेच विचार विंचरले जातात. एखादी गुंतवळ टाकून देता येते. नवीन विचारांची वेणी नव्याने केशरचना केल्या सारखी गुंफता येते.” सच्च्या मित्राला चांगला कान हवा व्यवस्थित ऐकून घ्यायला, भक्कम खांदे हवे आधार द्यायला,  संवेदनशील मन हवे समजून घ्यायला. कधी कधी मित्राच्या समस्या सोडवण्यापेक्षा त्याला कुणीतरी मित्राने ऐकून घेणे गरजेचे वाटत असते, म्हणून जेव्हा कुणी विचारेल तुम्हाला थोडा वेळ आहे का, तुम्ही त्याला ऐकून घेण्याची बहुमोल गिफ्ट द्या. मैत्री फक्त फ्रेंडशिप बॅंडपुरतीच मर्यादित ठेवू नका.
            ----------------------------सविता नाबर 

  Published as on 3rd August 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition 



   

No comments:

Post a Comment