Wednesday, 28 September 2016

ही घडी सार्थ आहे

     

       संधी हुशारीने आणि झडप घालून कशी पकडावी याचे एक गमतीशीर उदाहरण आचार्य अत्रे यांनी सांगितले आहे. एकदा एके ठिकाणी ते शिक्षकाच्या पदासाठी मुलाखतीला गेले होते. तिथे दहा बारा जण मुलाखतीसाठी आले होते. मुलाखत सुरू व्हायला वेळ होता. अत्रे शेजारच्या उमेदवारांशी गप्पा मारायला लागले. त्यातल्या एकाने सांगितले की मी कालच गिरगावातील एका प्रसिद्ध शाळेतील नोकरी सोडून आलो आहे. कारण माझे आणि मुख्यध्यापकांचे भांडण झाले. त्या शिक्षकाचे आणि अत्र्यांचे विषय सारखेच होते. अत्रेंनी विचार केला इथे बारा पंधरा उमेदवार आहेत. आणि जागा एकच आहे. नोकरी सोडून आलेल्या शिक्षकाच्या शाळेत त्याची जागा नक्कीच रिकामी आहे. इथे एका पदासाठी स्पर्धा आहे. शेजार्‍याला मी आलोच दोन मिनिटात म्हणून सांगून ते निघाले ते सरळ गिरगावच्या शाळेत पोचले. मुख्याध्यापकाना भेटले. त्या शिक्षकाने अचानक नोकरी सोडल्याने तिथे शिक्षकाची जरूरी होतीच. मुख्याध्यापकांनी लगेच अत्रेना ताबडतोब त्या शिक्षकाच्या जागी नेमले. (तपशिलात कदाचित थोडा फरक असण्याची शक्यता आहे.) अशा प्रकारे संधी कधी मिळेल ते सांगता येत नाही. ती जाणावी लागते आणि झडप घालून पकडावी लागते. आपल्यासमोर आहे ही संधी आहे हे समजायला आपल्या उद्दिष्टाशी सतत जागरूक राहिले पाहिजे. यासाठी अष्टवधानी असणे आवश्यक आहे.
      ही गोष्ट आहे अकबर बादशहा आणि चतुर बिरबलाची. जेव्हा बादशहाने विचारले, कोणते हत्यार श्रेष्ठ तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळे उत्तर दिले. बिरबलाने मात्र उत्तर दिले हातात हजर असेल ते हत्यार श्रेष्ठ. काही दिवसांनी बादशहा आणि बिरबल गावातून फेरफटका मारत होते. इतक्यात एक पिसाळलेला हत्ती समोरून येताना दिसला. तो  एका माणसाच्या अंगावर तो धावून जात होता. इतक्यात क्षणार्धात त्या माणसाने जवळच असलेले मरतुकडे कुत्रं उचलले, त्याला गरागरा फिरवले आणि हतीवर फेकले. त्याबरोबर तो हत्ती बावचळला आणि दुसरीकडे निघून गेला. त्या व्यक्तिला स्वत:च्या संरक्षणासाठी बाकी कुठलेही हत्यार वापरावे लागले नाही. जे हाती आले, उपलब्ध होते तेच हत्यार म्हणून वापरले. बिरबलाने लगेच हे बादशहाला दाखवून दिले. संधीही अशीच असते. कोणत्या क्षणी येईल, सांगता येत नाही. संधी सूर्योदयासारखी असते. खूप वेळ वाट पहात राहिले तर निसटून निघून जाते. एकदा का हातून निसटली की ती भूतकाळात जमा होते.
     हिंदीत एक म्हण आहे. आखाड का मास चुका इन्सान और डाळ का चुका बंदर कहीका नही रहता. म्हणजे आषाढाचा मास, पावसाळी महिना चुकलेला शेतकरी आणि डहाळी चुकलेला वानर तोंडघशी पडतात. आपल्याकडे मढी झाकून करीती पेरणी अशी म्हण आहे. म्हणजे घरात मरण ओढवले तरी प्रेत झाकून ठेवून वेळच्यावेळी पेरणी करावी नंतर उत्तरक्रिया. वर्डस्वर्थ म्हणतो, दहा हजार गेलेले दिवस एका आजची बरोबरी करू शकत नाहीत. लोखंड तापले असतानाच त्यावर घणाचे घाव घातले पाहिजेत. उन्हे आहेत तोपर्यंतच पेंढा सुकवला पाहिजे. काळ म्हणजे उन्हाची तिरीप. आता आहे तर मग नाही.
    मिळालेली संधी सोडू तर नयेच पण कधीतरी संधी आपण स्वत: निर्माण करावी लागते. वाईजवळचे पसरणी हे खेडे. शिर्के नावाचा बालक लहानपणी शेळ्या मेंढया चारायला डोंगरात जात असे. खूप हाल सोसत त्याने शिक्षण घेतले. महात्प्रयासाने इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश मिळवला खरा. पण शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे होती. त्यासाठी पुण्यातल्या एका कॉलेजच्या भोजन गृहात वाढपी म्हणून त्याने नोकरी केली. इंजींनीयरिंगची पदवी मिळवली. नंतर नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करण्याचे ठरवून आपल्या उद्योगाचा व्याप प्रचंड वाढवला. आज बी. जी.शिर्के हा बांधकाम व्यवसायातील ब्रॅंड झाला आहे.
      प्रचंड उलाढाल असलेल्या रिलायन्स समूहाचे संस्थापक धिरूभाई अंबानी, फक्त मॅट्रिक झाले होते. काही युवक आपल्याजवळ भांडवल नाही याचेच भांडवल करतात. मग अंबानींच्या जवळ कोणते भांडवल होते? पेट्रोल पंपावर नोकरीला असणार्‍या धिरूभाईनी एवढे अवाढव्य साम्राज्य कसे उभे केले असेल? त्यांनी सुरूवातीला जी काही थोडीफार बचत केली त्यावरच भांडवलाची उभारणी झाली. इंग्लंडमध्ये थॉमस कुक नावाचा लेथवर काम करणारा एक कारागीर होता. एकदा त्याला मद्यपानच्या निषेध संमेलनासाठी लिसेस्टर या गावी पंधरा मैल चालत जावे लागले. चालत जाताना त्याच्या मनात विचार आला की अशा संमेलनासाठी जर काही व्यवस्था आपण केली तर लोक सहजतेने जाऊ शकतील. आणि त्याने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी, त्यांच्या तिकीटांची व्यवस्था करणारी एक कंपनी सुरू केली. ही आंतरराष्ट्रीय व्याप्तीची विश्वासार्ह प्रवासी कंपनी आज थॉमस कुक या नावाने प्रसिद्ध आहे.
    आयुष्यात अपमान, अपयश, पराभव हेही गरजेचे असतात. कारण त्यामुळेच तर आपल्यातला स्वाभिमान जागृत होतो. माणूस पेटून उठतो, जिद्द स्फुरण पावते. आतला खंबीरपणा, अभेद्यपणा जागा होतो. म्हणून कधी कधी हार होणे हीसुद्धा एक जबरदस्त संधी असते.
   ----------------------सविता नाबर 


Published as on 28th Sept 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition




Wednesday, 21 September 2016

खुदी को कर बुलंद इतना....

    

    पार्किनसनचा एक नियम आहे, Work expands as per the need of the doer. आपल्याला दिलेले काम जर पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन नसेल तर ते काम एक तास, दोन तास, कितीही वेळ आपल्याला वाटेल तेवढा वेळ चालत रहाते. ते संपतच नाही. पण जर अर्ध्या तासात काम झालेच पाहिजे अशी अट असेल तर ते काम आपण भराभर अर्ध्या तासात पूर्ण करतो शिवाय ते व्यवस्थित होते आहे ना इकडेही आपले लक्ष असते. कुठल्याही कामाची डेडलाइन असेल तर ते मानगुटीवर बसून पूर्ण होते. अगदी तसेच आपल्यामधली कार्यक्षमता वाढवणेही आपल्याच हातात असते. जेव्हा आपण स्वत:च आपल्याशी स्पर्धा करतो आणि आपलाच नवीन विक्रम प्रस्थापित करतो तेव्हा कार्यक्षमता शंभर टक्के वाढलेली असते.
   सध्या चाललेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतला भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया. सहा वर्षाच्या आपल्या मुलीला पहिला नंबर काढायला प्रवृत्त करणारा बाप. पण लेकीने नंबर काढताच आपणही तिच्या म्हणण्याप्रमाणे सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र. त्याने निव्वळ सुवर्णपदकच मिळवले नाही तर नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. बाप लेकीने दोघांनीही आपापल्या क्षमता वाढवून गाठलेली ध्येयाची ऊंची काय दाखवते? मनात पाहिजे तर आचरणात नक्की येतेच. क्षमता आपल्याच हातात असते. ती वाढवायची की खुंटवायची, मर्जी आपकी ! एक छोटासा मुलगा विश्वास. तुमचा विश्वास बसणार नाही असा. दहाव्या वर्षी हात गमावलेला. तो पोहतो. बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय. जलतरणात फक्त सहभागी होत नाही तर डझनावारी सुवर्ण पदके मिळवतो. कशी वाढवली असेल त्याने आपली क्षमता? सर्वसामान्य मुलाची पोहण्याची सुरुवात जर शून्यातून होत असेल तर विश्वासची क्षमता उणे होती. मनाच्या क्षमतेमुळे शरीराची कुवत त्याने वाढवली.
     एकदा ध्येय कोणते हे ठरल्यावर त्यादृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आलेच. प्रयत्नांच्या दिशेने जाताना आपली क्षमता वाढवणे हे तर ओघानेच आले. क्षमता मग ती शारीरिक असो वा मानसिक. मानसिक कुवत वाढली की शारीरिक वाढायला वेळ लागत नाही. अगदी साधे सोपे उदाहरण बघा, वेटलिफ्टर सुरूवातीला एकदम जड वजने उचलू शकत नाही. सरावाने तो आपल्या वजनाच्या दुप्पट वजनही उचलतो. तेच कार्यक्षमतेचे आहे.
     यश अचानक मिळत नाही. त्यासाठी रोज जास्तीचे काम करावे लागते. रात्री किंवा सुटीच्या दिवशी काम करणार नाही अशी बंधने स्वत:वर घालून घेतली तर क्षमतेवर मर्यादा पडतात. कायम उत्साहाने काम करत रहाणे हाच यशाचा मार्ग असतो. सुरूवातीला कदाचित बेताचीच अर्थ प्राप्ती होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहिले तर केलेल्या कामाची पावती नक्कीच मिळते. मला इतकी कामे आहेत की ती आटोपून वेगळे काही करायला वेळ मिळत नाही म्हणणारे असाच युक्तिवाद करतात. वेगळे काही करायचे असेल तर हातातले काम संपवायला फार काळ द्यावा लागत नाही.
     एखाद्याला भेटायला दिलेली वेळ पाळताना तो आणखी दहा मिनिटे लागतील असे म्हणतो तेव्हा ही मिळालेली दहा मिनिटे आपल्याला बोनस मिळालेली असतात. त्या वेळात आपण नवीन काही काम करू शकत नाही. एखादा लेख वेळ मिळाला तर वाचायचा म्हणून ठेवलेला असतो तो अशावेळी वाचता येतो. मित्राला एखादा मेसेज, कुणाला फोन करायचा असतो तो करता येतो. यामुळे कार्यक्षमता वाढू शकते.
     जेव्हा आपल्या सगळ्या क्षमता वापरल्या जातात तेव्हा त्या पुर्णपणे वापरल्या गेल्यात का हे पहाणे आपले कर्तव्य असते. आपल्याकडे जे ईश्वरदत्त सामर्थ्य आहे, ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी उत्साह मिळवण्याचे काम फक्त आपल्यालाच करायचे आहे. प्रत्येकाकडे अफाट क्षमता असते. ती पूर्ण वापरली मात्र जात नाही. म्हणूनच तो सामान्य राहतो. ज्याच्याकडे महत्वाकांक्षा, उत्साह, प्रामाणिकपणा आहे तो आपल्या लायकीच्या, क्षमतेच्या बळावर जग जिंकू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. ती असली तर सर्वसामान्य क्षमता देखील उच्चपदी घेऊन जाण्यास समर्थ असते. जरूर असते ती  चिकाटीची, कार्यवेडे होण्याची. मग आपल्या प्रगतीला काही मर्यादाच रहात नाही. जे ध्येय ठरवले असेल ते गाठण्यात कोणीच अडथळा आणू शकत नाही. गरज फक्त आहे आपली क्षमता किती हे ओळखण्याची. मनातल्या विचारांप्रमाणे आपण आपल्याला बदलू शकतो. म्हणून मनात नेहमी यशाचेच विचार ठेवायला हवेत.
        खेळाडू आपली क्षमता सारखी अजमावून पुढे जात असतो. इथे स्वत;शीच स्वत:ची स्पर्धा असते. गेल्यावेळेपेक्षा आता जास्त चांगली कामगिरी केल्याचे समाधान तर असतेच. पण दोन पावले पुढे गेल्याचा आत्मविश्वास असतो. गायनात रियाजाने कधी दमसास वाढवायचा हे समजते, तशी कुवत वाढवता येते. सराव अशावेळी योग्य ठरतो. हळूहळू आपली कुवत जोखून ती वाढवायची असते. म्हणूनच खुद को कर बुलंद इतना की खुदा बंदेसे पुछे तेरी रजा क्या है
      --------------------------सविता नाबर 
     Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 21st Sept 2016


Wednesday, 14 September 2016

चातुर्याची ऐशी तैशी

    

      कदा एकाने विचारले विमानाने मुंबई बेंगलोरला दीड तास वेळ लागला. पण बेंगलोरहुन मुंबईला पोचायला 90 मिनिटे लागली हे कसे काय? प्रत्येकाचे उत्तर वेगळे होते, पायलटला काही प्रॉब्लेम असेल, विमानात बिघाड झाला असेल. काहींनी सांगितले, एअर होस्टेसचा काही प्रॉब्लेम असेल. सगळ्यांच्याजवळ तर व्यवहार चातुर्य असतेच पण प्रत्येकजण ते कसे वापरतो हे महत्वाचे असते. थोडेसे डोके चालवायला लागते. (तुम्हीही डोके चालवा) समोर दिसते तसे, डोळ्यांना झापडे बांधून उत्तर दिले तर तुम्ही खड्ड्यात पडलातच. ख्रिसमस आणि नवीन वर्ष एकाच वर्षात आलेले आहे असे कोणते साल तुम्हाला माहीत आहे? खूप वेगवेगळी उत्तरे आली. काहींनी माहीत नाही असे सांगितले तर काहींनी तसे वर्ष आले की सांगतो असे म्हटले. तर काहींनी विचार करायलाच खूप वेळ घेतला. काहींनी इस्लामी वर्ष असे त्याचे स्पष्टीकरण दिले तर एकाने आपल्या जन्माच्यावेळचे वर्ष असेल असे संगितले. तर दूसरा लिप इयर म्हणाला. सगळेजण वेलमॅनर्ड, सुशिक्षित, सुसंस्कृत दिसत होते.
    अत्यंत योग्य, शिष्टाचाराला धरून उत्तर देणे किंवा योग्य वर्तन असणे यालाच व्यवहार चातुर्य म्हणायला हवे. तिथे हवे असते फक्त डोक्याने विचार करणे. दे धडक काहीही बोलणे म्हणजे शहाणपणा नव्हे. अगदी छान उदाहरण म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तिला विचारले, तुम्हाला मुले किती? आणि नंतर विचारले तुमचे लग्न झाले आहे काय? तर हा क्रम मजेशीर ठरू शकतो. माणसाची दुसर्‍या व्यक्तीच्याप्रती आणि समाजाच्याप्रती असणारी नैसर्गिक संवेदनशीलता दाखवण्यासाठी हे व्यवहार चातुर्य वापरले जाते.
      ग्रंथ हे जरी गुरु मानले तरी ग्रंथांकडून, पुस्तकामधून सर्वच प्रश्नांना उत्तर मिळत नसते. पुस्तकात ज्ञान भरलेले असते, वाचनाने, अभ्यासाने ते आपल्याला मिळते. पण ते कसे वापरायचे हे ते पुस्तक सांगत नाही. ज्ञानाचा वापर करायला व्यवहार चातुर्य हवे. ते मात्र आजूबाजूच्या परिस्थितीच्या अवलोकनाने, निरीक्षणाने मिळते. पुस्तक वाचून निरीक्षण मिळत नाही. पुस्तकातला किडा झाला तरी व्यवहार ज्ञान ही गोष्ट वेगळीच असते. समाजातला व्यवहार माहीत असला पाहिजे.
      आनंदी प्रसंगी दु:खद घटना सांगू नये. कुणाचा तरी मृत्यू झाला आहे अशा घरात आपण गेलो तर मोठयाने बोलणे बरे दिसत नाही. ती आनंददायक घटना नसते. त्या घरातले लोक आधीच दु:खात बुडालेले असतात. लग्नघरात जाऊन घटस्फोटाविषयी बोलणे, कुणाचा तरी नवीन फ्लॅट बघायला गेल्यानंतर फलाण्या इमारतीचे बांधकाम चांगले नव्हते ती इमारत लवकर कशी कोसळली हे सांगणे म्हणजे केवळ मूर्खपणाचे! सर्वसामान्य जनरीत, रिवाज पाळणे म्हणजे व्यवहार चातुर्य किंवा कॉमन सेन्स असणे.
        पूर्वीच्याकाळी एकमेकांच्या घरी बसायला, गप्पा मारायला जाणे हा एक सोशलयाझिंगचा मोठा भाग होता.  लहानपणी आजीबरोबर एक छोटी कुणाकडे तरी बसायला गेली. कानावर पडणार्‍या गप्पा ती ऐकत होती. कुतुहलाला वाट करुन देण्यासाठी तिने तोंड उघडले. ज्यांच्याकडे गेली होती त्यांना तीन मुले होती. तिने विचारले, मोठ्या मुलीचे वडील कोण? अमुक काका, दुसर्‍या मुलाचे वडील कोण, तर तेच काका, तिसर्‍या मुलीचे वडील कोण. आजीने उत्तर दिले तेच काका. पुढचा तिचा प्रश्न चक्रावणारा होता. म्हणजे तिघांचेही वडील एकच? या प्रश्नावर मात्र आजीला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे नक्कीच वाटले असणार. तिने हो म्हणून छोटीला फक्त गप्प बसायला सांगितले. त्या छोटीला पडलेले कोडे कोणत्या स्वरूपाचे हे तिलाही कळले नसणार. कारण तिचे वय होते सहा वर्षे. माझ्या एका भाचीने एका ओळखीच्यांकडे गेल्यावर पेन्शनर आजोबा नेहमी घरीच दिसत असल्याने त्यांचे कसे चालते हा प्रश्न त्यांनाच विचारला होता. वयाच्या पाचव्या वर्षी!, ज्या वयात कमावणे म्हणजे काय हे माहीतही नसते. लहान मुलांचे प्रश्न तार्किक किंवा संदर्भाला धरून असतातच असे नाही. त्यामुळे ते आपण हसण्यावारी नेतो. पण मोठे झाल्यावर मात्र आपण तर्कसुसंगत बोलले पाहिजे एवढे मात्र नक्की.
     विशेषत: नोकरीसाठी मुलाखतीला जाताना हा सर्वांगीण विचार करून बोलावे लागते. समोरच्याच्या विचारण्याचा रोख कशावर आहे. त्याला काय अभिप्रेत आहे, त्याच्या प्रश्नाला कशा स्वरूपाचे उत्तर अपेक्षित आहे हे ओळखून बोलणे म्हणजे व्यवहार चातुर्य. जर एखाद्या आजारी माणसाला तुम्ही भेटायला गेलात आणि त्याच्या समोर अमुक व्यक्ति कशी आजारी पडली, ती लगेच कशी मेली अशा गोष्टी केल्या तर ते शहाणपणाचे ठरणार नाही. कोणी प्रवासाला एकटेच चालले आहे आणि चोरांनी कसे लुटले किंवा अपघात कसे होतात हे त्याला ऐकवले तर त्यावेळी ते नक्कीच उचित ठरणार नाही. काही लोक एखाद्याला दुखावणारे, खवचटपणे विचारणारेही असतात. अशी अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बोलताना सर्वसाधारणपणे काहीतरी तारतम्य बाळगणे इष्ट असते. संवाद मग तो लेखी असो, बोलतानाचा असो त्यामध्ये समोरच्या व्यक्तिला समजून घेणे अध्याहृत असते.
     -------------------------सविता नाबर 

 Published as on 14th Sept 2016 in Maharashtra Times, Kop edition

Friday, 9 September 2016

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत .......

    

     “द किंग्ज स्पीच” या सिनेमाचा पटकथा लेखक डेव्हिड सिडलर याला ऑस्कर पारितोषिक मिळाले. किंग जॉर्ज सहावा याच्या वाचादोषावर हा सिनेमा होता. वयाच्या 73व्या वर्षी सिडलरला पित्ताशयाचा कॅन्सर झाला होता. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा जवळजवळ दोन आठवडे आपले पित्ताशय अतिशय सुस्थितीत आणि छान असल्याची त्याने कल्पना केली. त्यानंतरच्या तपासणीत त्याचा कॅन्सर नाहीसा झाल्याचे आढळून आले. पाच वर्षाहून अधिक काळ तो कॅन्सरमुक्त राहिला. सृजनाच्या निर्मितीत त्याचे मन नेहमी मग्न असल्यामुळे स्वत:च्या आजाराचा बाऊ करण्यासाठी  त्याला वेळच नव्हता.
       एक प्रयोग करून पहा, मनात आपण जे करत आहोत ते फक्त उत्तम केले आहे अशी कल्पना करा. तेच सत्यात उतरण्याची शक्यता अगदी शंभर टक्के असते. पण हा प्रयोग पुर्णपणे मनापासून करायला हवा. एकदा का अशी सवय मनाला लावली की आपल्या हातून फक्त आणि फक्त उत्तमच घडत जाते. तशीच मानसिकता तयार होते. आपले लक्ष्य नेहमी जे उत्तम आणि चांगले आहे अशा गोष्टीवर केन्द्रित केले की सर्व सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचाच आपल्याला अनुभव यायला लागतो. आपल्या मनाला भूतकाळात जाऊन नको त्या आठवणी उगाळत बसायची सवय असते. जे विसरायला पाहिजे, असेच परत परत स्मृतीत येत रहाते. पूर्वी झालेल्या चुका, अपयश यांची उजळणी बर्‍याच वेळा मनात चालू असते. त्यामुळे आपल्या मनाच्या गाभार्‍यात या अनुभवांचाच साठा होत जातो. ज्या चुका वारंवार मनात येतात तशीच आपली प्रतिमा मनात निर्माण होते.
     बरेच लोक सतत ताण, चिंता, भीती, द्वेष या नकारात्मक भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतात. त्यामुळे त्या भावनांना खतपाणी घालणारेच वातावरण निर्माण होते. आपले आयुष्य कसे घडवायचे आपल्याच हातात असते. नकारात्मक भावनेऐवजी जर सकारात्मक भावना मनात रुजवली तर आपले आरोग्य चांगले राहतेच, मनाची स्थिति चांगली राहिल्याने ताण तणावही राहात नाहीत.
      ज्या दुसर्‍याच्या गुणांवर किंवा दोषांवर आपण मन एकाग्र करतो तेच गुण, अवगुण आपल्यात उतरतात. आणि वाढीला लागतात. माणूस जितका जास्त सहवासात तितके त्याचे दोष नजरेत भरतात. कारण लांबच्या लोकांपासून ते लपवता येतील पण नेहमी सहवासात असणार्‍या माणसांपासून कसे लपवणार? जे जे उत्तम असेल ते ते ओळखायला शिकले पाहिजे. त्याचा सत्कार, कौतुक केले पाहिजे. अवगुणांकडे लक्ष गेले तर गुण नजरेत भरत नाहीत. जी भूमिका तुम्हाला वठवायची आहे, पालक, पाल्य, शिष्य, गुरु, मित्र, अनुयायी, नेता. ती उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सतत गुणांवर लक्ष पाहिजे.
      स्वत:ची प्रतिमा ही आपल्या स्वत:वरच्या श्रद्धेवर अवलंबून असते. आपणच आपल्या कामाचा, कलेचा दर्जा ठरवत असतो. तसा दर्जा मनात पक्काही करतो. आणि जर प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त चांगले काम हातून घडले तर त्यावर आपला विश्वासच बसत नाही. आपण अस्वस्थ होतो. कारण ती पात्रता मनाने स्वीकारलेली नसते. मग हातून चुका व्हायला लागतात. आणि दर्जा घसरत जातो. म्हणून आत्मप्रतिमा उंचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी  उत्तम किंवा चांगल्यावर लक्ष केन्द्रित करणे ही योग्य आत्मप्रतिमा निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे.
       आंतरराष्ट्रीय बॉक्सर मोहम्मद अली याला प्रत्यक्ष बॉक्सिंग करण्याआधी स्वत: जिंकलेले आहोत असे स्वप्न   पहाणे महत्वाचे वाटायचे. तर सिने अभिनेता जीम कॅरी स्वत:ला जगातला सर्वश्रेष्ठ अभिनेता असल्याची कल्पना करत भूमिका करायचा. उत्तमातल्या उत्तम खेळाडूनी सकारात्मक वृत्तीचे तंत्र अवगत केलेले असते. आपल्या यशाचे श्रेय ते या तंत्राला देतात. जेव्हा तुम्ही मोठ्यातले मोठे ध्येय गाठण्याचे स्वप्न मनाशी बाळगता, तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे हे येणारच. फक्त हे अडथळे तुम्ही किती मोठे मानता हा प्रश्न असतो. छोट्या अडचणीला उगाचच मोठे केल्याने सामान्य माणूस कर्तृत्वाने अतिसामान्य रहातो. मनात आपल्या यशाचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय, त्यादृष्टीने आपण विचार करू शकत नाही.
       सतत वाईट गोष्टींचे चिंतन केल्याने तशाच गोष्टी घडत जातात. जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांनी नेहमी चांगल्या गोष्टींचेच चिंतन केले आहे. शाळकरी वयापासून ते प्रोफेशनल व्यक्तिपर्यंत या उत्तम गोष्टींना स्थान दिले तर तसेच घडत जाते. तसा पगडा आपल्या आयुष्यावर पडत जातो. मग हे व्हीज्युयलायझेशन कसे करायचे ? त्याचे तंत्र आत्मसात करणे सहज शक्य आहे. याच्या काही पायर्‍या आहेत. शांत, स्वस्थ चित्ताने बसा. दीर्घ श्वास घ्या. जेव्हा शरीराने विश्रांत अवस्थेत असाल तेव्हा मन पुर्णपणे रिकामी असू द्या. तुम्हाला जी गोष्ट घडायला हवी असेल त्याचे चित्र मनात उभे करा. तशी कल्पना करा. सविस्तर कल्पनाचित्र उभे करा. ती गोष्ट मनावर पुर्णपणे बिंबवा. आता त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असल्याची कल्पना करा. ती कल्पना मनात बंदिस्त करा. ही गोष्ट प्रत्यक्षात घडलीच पाहिजे.
    ----------------------------सविता नाबर


published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 7th Sept 2016