“द किंग्ज स्पीच” या सिनेमाचा पटकथा लेखक डेव्हिड सिडलर याला ऑस्कर पारितोषिक मिळाले. किंग जॉर्ज सहावा याच्या वाचादोषावर हा सिनेमा होता. वयाच्या 73व्या वर्षी सिडलरला पित्ताशयाचा कॅन्सर झाला होता. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा जवळजवळ दोन आठवडे आपले पित्ताशय अतिशय सुस्थितीत आणि छान असल्याची त्याने कल्पना केली. त्यानंतरच्या तपासणीत त्याचा कॅन्सर नाहीसा झाल्याचे आढळून आले. पाच वर्षाहून अधिक काळ तो कॅन्सरमुक्त राहिला. सृजनाच्या निर्मितीत त्याचे मन नेहमी मग्न असल्यामुळे स्वत:च्या आजाराचा बाऊ करण्यासाठी त्याला वेळच नव्हता.
एक प्रयोग करून पहा, मनात आपण जे करत आहोत ते फक्त उत्तम केले आहे अशी कल्पना करा. तेच सत्यात
उतरण्याची शक्यता अगदी शंभर टक्के असते. पण हा प्रयोग पुर्णपणे मनापासून करायला
हवा. एकदा का अशी सवय मनाला लावली की आपल्या हातून फक्त आणि फक्त उत्तमच घडत जाते.
तशीच मानसिकता तयार होते. आपले लक्ष्य नेहमी जे उत्तम आणि चांगले आहे अशा गोष्टीवर
केन्द्रित केले की सर्व सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचाच आपल्याला अनुभव यायला
लागतो. आपल्या मनाला भूतकाळात जाऊन नको त्या आठवणी उगाळत
बसायची सवय असते. जे विसरायला पाहिजे, असेच परत परत स्मृतीत
येत रहाते. पूर्वी झालेल्या चुका, अपयश यांची उजळणी बर्याच
वेळा मनात चालू असते. त्यामुळे आपल्या मनाच्या गाभार्यात या अनुभवांचाच साठा होत जातो.
ज्या चुका वारंवार मनात येतात तशीच आपली प्रतिमा मनात निर्माण होते.
बरेच
लोक सतत ताण, चिंता, भीती, द्वेष या नकारात्मक भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतात. त्यामुळे त्या
भावनांना खतपाणी घालणारेच वातावरण निर्माण होते. आपले आयुष्य कसे घडवायचे आपल्याच
हातात असते. नकारात्मक भावनेऐवजी जर सकारात्मक भावना मनात रुजवली तर आपले आरोग्य
चांगले राहतेच, मनाची स्थिति चांगली राहिल्याने ताण तणावही
राहात नाहीत.
ज्या दुसर्याच्या गुणांवर किंवा दोषांवर आपण मन
एकाग्र करतो तेच गुण, अवगुण आपल्यात उतरतात. आणि वाढीला
लागतात. माणूस जितका जास्त सहवासात तितके त्याचे दोष नजरेत भरतात. कारण लांबच्या लोकांपासून
ते लपवता येतील पण नेहमी सहवासात असणार्या माणसांपासून कसे लपवणार? जे जे उत्तम असेल ते ते ओळखायला शिकले पाहिजे. त्याचा सत्कार, कौतुक केले पाहिजे. अवगुणांकडे लक्ष गेले तर गुण नजरेत भरत नाहीत. जी
भूमिका तुम्हाला वठवायची आहे, पालक,
पाल्य, शिष्य, गुरु, मित्र, अनुयायी, नेता. ती
उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सतत गुणांवर लक्ष पाहिजे.
स्वत:ची प्रतिमा ही आपल्या स्वत:वरच्या
श्रद्धेवर अवलंबून असते. आपणच आपल्या कामाचा, कलेचा दर्जा ठरवत
असतो. तसा दर्जा मनात पक्काही करतो. आणि जर प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त चांगले
काम हातून घडले तर त्यावर आपला विश्वासच बसत नाही. आपण अस्वस्थ होतो. कारण ती
पात्रता मनाने स्वीकारलेली नसते. मग हातून चुका व्हायला लागतात. आणि दर्जा घसरत
जातो. म्हणून आत्मप्रतिमा उंचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम किंवा चांगल्यावर लक्ष केन्द्रित करणे ही
योग्य आत्मप्रतिमा निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सर मोहम्मद अली याला प्रत्यक्ष
बॉक्सिंग करण्याआधी स्वत: जिंकलेले आहोत असे स्वप्न पहाणे
महत्वाचे वाटायचे. तर सिने अभिनेता जीम कॅरी स्वत:ला जगातला सर्वश्रेष्ठ अभिनेता
असल्याची कल्पना करत भूमिका करायचा. उत्तमातल्या उत्तम खेळाडूनी सकारात्मक
वृत्तीचे तंत्र अवगत केलेले असते. आपल्या यशाचे श्रेय ते या तंत्राला देतात.
जेव्हा तुम्ही मोठ्यातले मोठे ध्येय गाठण्याचे स्वप्न मनाशी बाळगता, तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे हे येणारच. फक्त हे अडथळे तुम्ही किती
मोठे मानता हा प्रश्न असतो. छोट्या अडचणीला उगाचच मोठे केल्याने सामान्य माणूस
कर्तृत्वाने अतिसामान्य रहातो. मनात आपल्या यशाचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय, त्यादृष्टीने आपण विचार करू शकत नाही.
सतत वाईट
गोष्टींचे चिंतन केल्याने तशाच गोष्टी घडत जातात. जे लोक यशस्वी झालेले आहेत
त्यांनी नेहमी चांगल्या गोष्टींचेच चिंतन केले आहे. शाळकरी वयापासून ते प्रोफेशनल
व्यक्तिपर्यंत या उत्तम गोष्टींना स्थान दिले तर तसेच घडत जाते. तसा पगडा आपल्या
आयुष्यावर पडत जातो. मग हे व्हीज्युयलायझेशन कसे करायचे ?
त्याचे तंत्र आत्मसात करणे सहज शक्य आहे. याच्या काही पायर्या आहेत. शांत,
स्वस्थ चित्ताने बसा. दीर्घ श्वास घ्या. जेव्हा शरीराने विश्रांत अवस्थेत असाल
तेव्हा मन पुर्णपणे रिकामी असू द्या. तुम्हाला जी गोष्ट घडायला हवी असेल त्याचे
चित्र मनात उभे करा. तशी कल्पना करा. सविस्तर कल्पनाचित्र उभे करा. ती गोष्ट मनावर
पुर्णपणे बिंबवा. आता त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असल्याची कल्पना करा. ती
कल्पना मनात बंदिस्त करा. ही गोष्ट प्रत्यक्षात घडलीच पाहिजे.
----------------------------सविता नाबर
published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 7th Sept 2016
No comments:
Post a Comment