एकदा एकाने विचारले विमानाने मुंबई बेंगलोरला दीड
तास वेळ लागला. पण बेंगलोरहुन मुंबईला पोचायला 90 मिनिटे लागली हे कसे काय? प्रत्येकाचे उत्तर वेगळे होते, पायलटला काही
प्रॉब्लेम असेल, विमानात बिघाड झाला असेल. काहींनी सांगितले, एअर होस्टेसचा काही प्रॉब्लेम असेल. सगळ्यांच्याजवळ तर व्यवहार चातुर्य
असतेच पण प्रत्येकजण ते कसे वापरतो हे महत्वाचे असते. थोडेसे डोके चालवायला लागते.
(तुम्हीही डोके चालवा) समोर दिसते तसे, डोळ्यांना झापडे
बांधून उत्तर दिले तर तुम्ही खड्ड्यात पडलातच. ख्रिसमस आणि नवीन वर्ष एकाच वर्षात
आलेले आहे असे कोणते साल तुम्हाला माहीत आहे? खूप वेगवेगळी
उत्तरे आली. काहींनी माहीत नाही असे सांगितले तर काहींनी तसे वर्ष आले की सांगतो
असे म्हटले. तर काहींनी विचार करायलाच खूप वेळ घेतला. काहींनी इस्लामी वर्ष असे
त्याचे स्पष्टीकरण दिले तर एकाने आपल्या जन्माच्यावेळचे वर्ष असेल असे संगितले. तर
दूसरा लिप इयर म्हणाला. सगळेजण वेलमॅनर्ड, सुशिक्षित, सुसंस्कृत दिसत होते.
अत्यंत योग्य, शिष्टाचाराला धरून उत्तर देणे किंवा योग्य वर्तन असणे यालाच व्यवहार
चातुर्य म्हणायला हवे. तिथे हवे असते फक्त डोक्याने विचार करणे. दे धडक काहीही
बोलणे म्हणजे शहाणपणा नव्हे. अगदी छान उदाहरण म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तिला
विचारले, तुम्हाला मुले किती? आणि नंतर
विचारले तुमचे लग्न झाले आहे काय? तर हा क्रम मजेशीर ठरू
शकतो. माणसाची दुसर्या
व्यक्तीच्याप्रती आणि समाजाच्याप्रती असणारी नैसर्गिक संवेदनशीलता दाखवण्यासाठी हे
व्यवहार चातुर्य वापरले जाते.
ग्रंथ हे जरी गुरु मानले तरी ग्रंथांकडून, पुस्तकामधून सर्वच प्रश्नांना उत्तर मिळत नसते. पुस्तकात ज्ञान भरलेले
असते, वाचनाने, अभ्यासाने ते आपल्याला
मिळते. पण ते कसे वापरायचे हे ते पुस्तक सांगत नाही. ज्ञानाचा वापर करायला व्यवहार
चातुर्य हवे. ते मात्र आजूबाजूच्या परिस्थितीच्या अवलोकनाने,
निरीक्षणाने मिळते. पुस्तक वाचून निरीक्षण मिळत नाही. पुस्तकातला किडा झाला तरी
व्यवहार ज्ञान ही गोष्ट वेगळीच असते. समाजातला व्यवहार माहीत असला पाहिजे.
आनंदी
प्रसंगी दु:खद घटना सांगू नये. कुणाचा तरी मृत्यू झाला आहे अशा घरात आपण गेलो तर
मोठयाने बोलणे बरे दिसत नाही. ती आनंददायक घटना नसते. त्या घरातले लोक आधीच दु:खात
बुडालेले असतात. लग्नघरात जाऊन घटस्फोटाविषयी बोलणे, कुणाचा
तरी नवीन फ्लॅट बघायला गेल्यानंतर फलाण्या इमारतीचे बांधकाम चांगले नव्हते ती
इमारत लवकर कशी कोसळली हे सांगणे म्हणजे केवळ मूर्खपणाचे! सर्वसामान्य जनरीत, रिवाज पाळणे म्हणजे व्यवहार चातुर्य किंवा कॉमन सेन्स असणे.
पूर्वीच्याकाळी एकमेकांच्या घरी बसायला, गप्पा मारायला जाणे हा एक सोशलयाझिंगचा मोठा भाग होता. लहानपणी आजीबरोबर एक छोटी कुणाकडे तरी बसायला गेली.
कानावर पडणार्या गप्पा ती ऐकत होती. कुतुहलाला वाट करुन देण्यासाठी तिने तोंड
उघडले. ज्यांच्याकडे गेली होती त्यांना तीन मुले होती. तिने विचारले, मोठ्या मुलीचे वडील कोण? अमुक काका, दुसर्या मुलाचे वडील कोण, तर तेच काका, तिसर्या मुलीचे वडील कोण. आजीने उत्तर दिले तेच काका. पुढचा तिचा प्रश्न
चक्रावणारा होता. म्हणजे तिघांचेही वडील एकच? या प्रश्नावर मात्र
आजीला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे नक्कीच वाटले असणार. तिने हो म्हणून
छोटीला फक्त गप्प बसायला सांगितले. त्या छोटीला पडलेले कोडे कोणत्या स्वरूपाचे हे तिलाही
कळले नसणार. कारण तिचे वय होते सहा वर्षे. माझ्या एका भाचीने एका ओळखीच्यांकडे
गेल्यावर पेन्शनर आजोबा नेहमी घरीच दिसत असल्याने त्यांचे कसे चालते हा प्रश्न त्यांनाच
विचारला होता. वयाच्या पाचव्या वर्षी!, ज्या वयात कमावणे
म्हणजे काय हे माहीतही नसते. लहान मुलांचे प्रश्न तार्किक किंवा संदर्भाला धरून
असतातच असे नाही. त्यामुळे ते आपण हसण्यावारी नेतो. पण मोठे झाल्यावर मात्र आपण तर्कसुसंगत
बोलले पाहिजे एवढे मात्र नक्की.
विशेषत: नोकरीसाठी
मुलाखतीला जाताना हा सर्वांगीण विचार करून बोलावे लागते. समोरच्याच्या विचारण्याचा
रोख कशावर आहे. त्याला काय अभिप्रेत आहे, त्याच्या प्रश्नाला
कशा स्वरूपाचे उत्तर अपेक्षित आहे हे ओळखून बोलणे म्हणजे व्यवहार चातुर्य. जर
एखाद्या आजारी माणसाला तुम्ही भेटायला गेलात आणि त्याच्या समोर अमुक व्यक्ति कशी
आजारी पडली, ती लगेच कशी मेली अशा गोष्टी केल्या तर ते
शहाणपणाचे ठरणार नाही. कोणी प्रवासाला एकटेच चालले आहे आणि चोरांनी कसे लुटले किंवा
अपघात कसे होतात हे त्याला ऐकवले तर त्यावेळी ते नक्कीच उचित ठरणार नाही. काही लोक
एखाद्याला दुखावणारे, खवचटपणे विचारणारेही असतात. अशी
अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बोलताना सर्वसाधारणपणे काहीतरी तारतम्य बाळगणे इष्ट
असते. संवाद मग तो लेखी असो, बोलतानाचा असो त्यामध्ये
समोरच्या व्यक्तिला समजून घेणे अध्याहृत असते.
-------------------------सविता नाबर
Published as on 14th Sept 2016 in Maharashtra Times, Kop edition
No comments:
Post a Comment