संधी हुशारीने आणि झडप घालून कशी पकडावी
याचे एक गमतीशीर उदाहरण आचार्य अत्रे यांनी सांगितले आहे. एकदा एके ठिकाणी ते
शिक्षकाच्या पदासाठी मुलाखतीला गेले होते. तिथे दहा बारा जण मुलाखतीसाठी आले होते.
मुलाखत सुरू व्हायला वेळ होता. अत्रे शेजारच्या उमेदवारांशी गप्पा मारायला लागले. त्यातल्या
एकाने सांगितले की मी कालच गिरगावातील एका प्रसिद्ध शाळेतील नोकरी सोडून आलो आहे.
कारण माझे आणि मुख्यध्यापकांचे भांडण झाले. त्या शिक्षकाचे आणि अत्र्यांचे विषय
सारखेच होते. अत्रेंनी विचार केला इथे बारा पंधरा उमेदवार आहेत. आणि जागा एकच आहे.
नोकरी सोडून आलेल्या शिक्षकाच्या शाळेत त्याची जागा नक्कीच रिकामी आहे. इथे एका
पदासाठी स्पर्धा आहे. शेजार्याला मी आलोच दोन मिनिटात म्हणून सांगून ते निघाले ते
सरळ गिरगावच्या शाळेत पोचले. मुख्याध्यापकाना भेटले. त्या शिक्षकाने अचानक नोकरी
सोडल्याने तिथे शिक्षकाची जरूरी होतीच. मुख्याध्यापकांनी लगेच अत्रेना ताबडतोब
त्या शिक्षकाच्या जागी नेमले. (तपशिलात कदाचित थोडा फरक असण्याची शक्यता आहे.) अशा
प्रकारे संधी कधी मिळेल ते सांगता येत नाही. ती जाणावी लागते आणि झडप घालून पकडावी
लागते. आपल्यासमोर आहे ही संधी आहे हे समजायला आपल्या उद्दिष्टाशी सतत जागरूक
राहिले पाहिजे. यासाठी अष्टवधानी असणे आवश्यक आहे.
ही गोष्ट
आहे अकबर बादशहा आणि चतुर बिरबलाची. जेव्हा बादशहाने विचारले, कोणते हत्यार श्रेष्ठ
तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळे उत्तर दिले. बिरबलाने मात्र उत्तर दिले हातात हजर
असेल ते हत्यार श्रेष्ठ. काही दिवसांनी बादशहा आणि बिरबल गावातून फेरफटका मारत
होते. इतक्यात एक पिसाळलेला हत्ती समोरून येताना दिसला. तो एका माणसाच्या अंगावर तो धावून जात होता.
इतक्यात क्षणार्धात त्या माणसाने जवळच असलेले मरतुकडे कुत्रं उचलले, त्याला गरागरा फिरवले आणि हतीवर फेकले. त्याबरोबर तो हत्ती बावचळला आणि
दुसरीकडे निघून गेला. त्या व्यक्तिला स्वत:च्या संरक्षणासाठी बाकी कुठलेही हत्यार
वापरावे लागले नाही. जे हाती आले, उपलब्ध होते तेच हत्यार
म्हणून वापरले. बिरबलाने लगेच हे बादशहाला दाखवून दिले. संधीही अशीच असते. कोणत्या
क्षणी येईल, सांगता येत नाही. संधी सूर्योदयासारखी असते. खूप
वेळ वाट पहात राहिले तर निसटून निघून जाते. एकदा का हातून निसटली की ती भूतकाळात
जमा होते.
हिंदीत एक म्हण आहे. आखाड का मास चुका
इन्सान और डाळ का चुका बंदर कहीका नही रहता. म्हणजे आषाढाचा मास, पावसाळी महिना चुकलेला
शेतकरी आणि डहाळी चुकलेला वानर तोंडघशी पडतात. आपल्याकडे मढी झाकून करीती पेरणी
अशी म्हण आहे. म्हणजे घरात मरण ओढवले तरी प्रेत झाकून ठेवून वेळच्यावेळी पेरणी
करावी नंतर उत्तरक्रिया. वर्डस्वर्थ म्हणतो, दहा हजार गेलेले
दिवस एका आजची बरोबरी करू शकत नाहीत. लोखंड तापले असतानाच त्यावर घणाचे घाव घातले
पाहिजेत. उन्हे आहेत तोपर्यंतच पेंढा सुकवला पाहिजे. काळ म्हणजे उन्हाची तिरीप.
आता आहे तर मग नाही.
मिळालेली संधी सोडू तर नयेच पण कधीतरी संधी
आपण स्वत: निर्माण करावी लागते. वाईजवळचे पसरणी हे खेडे. शिर्के नावाचा बालक लहानपणी शेळ्या मेंढया चारायला
डोंगरात जात असे. खूप हाल सोसत त्याने शिक्षण घेतले. महात्प्रयासाने इंजिनियरिंग
कॉलेजात प्रवेश मिळवला खरा. पण शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा यक्षप्रश्न
त्याच्यापुढे होती. त्यासाठी पुण्यातल्या एका कॉलेजच्या भोजन गृहात वाढपी म्हणून
त्याने नोकरी केली. इंजींनीयरिंगची पदवी मिळवली. नंतर नोकरी न करता स्वतंत्र
व्यवसाय करण्याचे ठरवून आपल्या उद्योगाचा व्याप प्रचंड वाढवला. आज बी. जी.शिर्के हा बांधकाम व्यवसायातील ब्रॅंड झाला आहे.
प्रचंड उलाढाल असलेल्या रिलायन्स समूहाचे
संस्थापक धिरूभाई अंबानी, फक्त मॅट्रिक झाले होते. काही युवक
आपल्याजवळ भांडवल नाही याचेच भांडवल करतात. मग अंबानींच्या जवळ कोणते भांडवल होते? पेट्रोल पंपावर नोकरीला असणार्या धिरूभाईनी एवढे अवाढव्य साम्राज्य कसे
उभे केले असेल? त्यांनी सुरूवातीला जी काही थोडीफार बचत केली
त्यावरच भांडवलाची उभारणी झाली. इंग्लंडमध्ये थॉमस कुक नावाचा लेथवर काम करणारा एक कारागीर
होता. एकदा त्याला मद्यपानच्या निषेध संमेलनासाठी लिसेस्टर या
गावी पंधरा मैल चालत जावे लागले.
चालत जाताना
त्याच्या मनात विचार आला की अशा संमेलनासाठी जर काही व्यवस्था आपण केली तर लोक सहजतेने जाऊ शकतील. आणि त्याने
प्रवाशांच्या सुखसोयीसाठी, त्यांच्या
तिकीटांची व्यवस्था करणारी एक कंपनी सुरू केली. ही आंतरराष्ट्रीय व्याप्तीची विश्वासार्ह प्रवासी कंपनी आज थॉमस कुक या नावाने
प्रसिद्ध आहे.
आयुष्यात अपमान, अपयश, पराभव हेही गरजेचे असतात. कारण त्यामुळेच तर आपल्यातला स्वाभिमान जागृत
होतो. माणूस पेटून उठतो, जिद्द स्फुरण पावते. आतला खंबीरपणा, अभेद्यपणा जागा होतो. म्हणून कधी कधी हार होणे हीसुद्धा एक जबरदस्त संधी
असते.
----------------------सविता नाबर
Published as on 28th Sept 2016 in Maharashtra Times, Kolhapur edition
No comments:
Post a Comment