Wednesday, 21 September 2016

खुदी को कर बुलंद इतना....

    

    पार्किनसनचा एक नियम आहे, Work expands as per the need of the doer. आपल्याला दिलेले काम जर पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन नसेल तर ते काम एक तास, दोन तास, कितीही वेळ आपल्याला वाटेल तेवढा वेळ चालत रहाते. ते संपतच नाही. पण जर अर्ध्या तासात काम झालेच पाहिजे अशी अट असेल तर ते काम आपण भराभर अर्ध्या तासात पूर्ण करतो शिवाय ते व्यवस्थित होते आहे ना इकडेही आपले लक्ष असते. कुठल्याही कामाची डेडलाइन असेल तर ते मानगुटीवर बसून पूर्ण होते. अगदी तसेच आपल्यामधली कार्यक्षमता वाढवणेही आपल्याच हातात असते. जेव्हा आपण स्वत:च आपल्याशी स्पर्धा करतो आणि आपलाच नवीन विक्रम प्रस्थापित करतो तेव्हा कार्यक्षमता शंभर टक्के वाढलेली असते.
   सध्या चाललेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतला भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया. सहा वर्षाच्या आपल्या मुलीला पहिला नंबर काढायला प्रवृत्त करणारा बाप. पण लेकीने नंबर काढताच आपणही तिच्या म्हणण्याप्रमाणे सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र. त्याने निव्वळ सुवर्णपदकच मिळवले नाही तर नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. बाप लेकीने दोघांनीही आपापल्या क्षमता वाढवून गाठलेली ध्येयाची ऊंची काय दाखवते? मनात पाहिजे तर आचरणात नक्की येतेच. क्षमता आपल्याच हातात असते. ती वाढवायची की खुंटवायची, मर्जी आपकी ! एक छोटासा मुलगा विश्वास. तुमचा विश्वास बसणार नाही असा. दहाव्या वर्षी हात गमावलेला. तो पोहतो. बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय. जलतरणात फक्त सहभागी होत नाही तर डझनावारी सुवर्ण पदके मिळवतो. कशी वाढवली असेल त्याने आपली क्षमता? सर्वसामान्य मुलाची पोहण्याची सुरुवात जर शून्यातून होत असेल तर विश्वासची क्षमता उणे होती. मनाच्या क्षमतेमुळे शरीराची कुवत त्याने वाढवली.
     एकदा ध्येय कोणते हे ठरल्यावर त्यादृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आलेच. प्रयत्नांच्या दिशेने जाताना आपली क्षमता वाढवणे हे तर ओघानेच आले. क्षमता मग ती शारीरिक असो वा मानसिक. मानसिक कुवत वाढली की शारीरिक वाढायला वेळ लागत नाही. अगदी साधे सोपे उदाहरण बघा, वेटलिफ्टर सुरूवातीला एकदम जड वजने उचलू शकत नाही. सरावाने तो आपल्या वजनाच्या दुप्पट वजनही उचलतो. तेच कार्यक्षमतेचे आहे.
     यश अचानक मिळत नाही. त्यासाठी रोज जास्तीचे काम करावे लागते. रात्री किंवा सुटीच्या दिवशी काम करणार नाही अशी बंधने स्वत:वर घालून घेतली तर क्षमतेवर मर्यादा पडतात. कायम उत्साहाने काम करत रहाणे हाच यशाचा मार्ग असतो. सुरूवातीला कदाचित बेताचीच अर्थ प्राप्ती होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहिले तर केलेल्या कामाची पावती नक्कीच मिळते. मला इतकी कामे आहेत की ती आटोपून वेगळे काही करायला वेळ मिळत नाही म्हणणारे असाच युक्तिवाद करतात. वेगळे काही करायचे असेल तर हातातले काम संपवायला फार काळ द्यावा लागत नाही.
     एखाद्याला भेटायला दिलेली वेळ पाळताना तो आणखी दहा मिनिटे लागतील असे म्हणतो तेव्हा ही मिळालेली दहा मिनिटे आपल्याला बोनस मिळालेली असतात. त्या वेळात आपण नवीन काही काम करू शकत नाही. एखादा लेख वेळ मिळाला तर वाचायचा म्हणून ठेवलेला असतो तो अशावेळी वाचता येतो. मित्राला एखादा मेसेज, कुणाला फोन करायचा असतो तो करता येतो. यामुळे कार्यक्षमता वाढू शकते.
     जेव्हा आपल्या सगळ्या क्षमता वापरल्या जातात तेव्हा त्या पुर्णपणे वापरल्या गेल्यात का हे पहाणे आपले कर्तव्य असते. आपल्याकडे जे ईश्वरदत्त सामर्थ्य आहे, ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी उत्साह मिळवण्याचे काम फक्त आपल्यालाच करायचे आहे. प्रत्येकाकडे अफाट क्षमता असते. ती पूर्ण वापरली मात्र जात नाही. म्हणूनच तो सामान्य राहतो. ज्याच्याकडे महत्वाकांक्षा, उत्साह, प्रामाणिकपणा आहे तो आपल्या लायकीच्या, क्षमतेच्या बळावर जग जिंकू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. ती असली तर सर्वसामान्य क्षमता देखील उच्चपदी घेऊन जाण्यास समर्थ असते. जरूर असते ती  चिकाटीची, कार्यवेडे होण्याची. मग आपल्या प्रगतीला काही मर्यादाच रहात नाही. जे ध्येय ठरवले असेल ते गाठण्यात कोणीच अडथळा आणू शकत नाही. गरज फक्त आहे आपली क्षमता किती हे ओळखण्याची. मनातल्या विचारांप्रमाणे आपण आपल्याला बदलू शकतो. म्हणून मनात नेहमी यशाचेच विचार ठेवायला हवेत.
        खेळाडू आपली क्षमता सारखी अजमावून पुढे जात असतो. इथे स्वत;शीच स्वत:ची स्पर्धा असते. गेल्यावेळेपेक्षा आता जास्त चांगली कामगिरी केल्याचे समाधान तर असतेच. पण दोन पावले पुढे गेल्याचा आत्मविश्वास असतो. गायनात रियाजाने कधी दमसास वाढवायचा हे समजते, तशी कुवत वाढवता येते. सराव अशावेळी योग्य ठरतो. हळूहळू आपली कुवत जोखून ती वाढवायची असते. म्हणूनच खुद को कर बुलंद इतना की खुदा बंदेसे पुछे तेरी रजा क्या है
      --------------------------सविता नाबर 
     Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 21st Sept 2016


No comments:

Post a Comment