Thursday, 3 November 2016

मन क्यूँ बहका री बहका........

    

                           
         ती होती एक श्रीमंत घराण्यातली टीन एजर. श्रीमंती शिष्टाचाराचे जोखड मानेवर असलेली. मोठ्यांच्या रितीरिवजांच्या नियमांनी बांधलेली. या सगळ्याचा तिला एक दिवस उबग आला. आणि ती बाहेर पडली जग बघायला. सर्वसामान्यांच्या जगात ती गोंधळून गेली. पण तिला भेटलेल्या एका सर्वसाधारण पत्रकाराने तिची आम दुनियेशी ओळख करून दिली. तिला जगण्याचा अर्थ कळला. संपन्न भिंतींच्या कोठडीत बंदिस्त असलेल्या तिला नवीन अनुभवांनी ताजेतवाने केले आणि ती पुन्हा आपल्या जगात परतली. ही कथा आहे रोमन हॉलिडे या इंग्लिश सिनेमाची. उमदा, देखणा ग्रेगरी पेक आणि नाजुक कमनीय ऑड्री हेपबर्न यांच्या लाजवाब अभिनयाची. सांगायचे तात्पर्य म्हणजे रोज गोड खाल्ले तरी त्याचा एक दिवस कंटाळा येतोच. त्यामधे बदल पाहिजे. नाहीतर तोचतोचपणा आयुष्याला कंटाळवाणेपणा आणतो. हा कंटाळा कसा दूर करायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीवर, इच्छेवर आणि ताकदीवर आहे.
         जसा उजेडाचा अभाव म्हणजे अंधार तसा उत्साहाचा अभाव म्हणजे कंटाळा. आठवडाभर जर सुट्टीच उपभोगली तर रविवारची किंमत शून्य. अंग मोडून काम केले, बुद्धीला भरपूर कसरत करायला लावली की आराम आणि विश्रांतीची हवीशी वाटते. कधीतरी आळस येणे हा सुद्धा आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. पण या कंटाळ्याचा कंटाळा करायचा नाही. प्रत्येक अनुभवाला उत्कटतेने सामोरे जाण्याची सवय कंटाळा नाहीसा करते. आपण हाती घेतलेले काम जर मनापासून केले तर कधीच कंटाळा येत नाही. मग वेळ जात नाही अशी अवस्था येत नाही.  
      माझ्या मुंबई बंगळुरूच्या प्रवासात एक मुलगा सारखा चुळबुळ करत होता. वयाने असेल वीस एक वर्षांचा. कधी इयरफोन लावून गाणी ऐकायचा. तर कधी बॅगमधली पुस्तके काढून वाचायचा. कधी मोबाईलवर गेम्स खेळायचा. पण त्याचे मन कशातच रमत नव्हते. मी न राहवून त्याला त्याच्या अस्वस्थतेबद्दल विचारले. पुढचा एक दिवस अखंड ट्रेन मध्ये घालवायचा याचा त्याला कंटाळा आला होता. दडपण आले होते. त्याला त्याच्या छंदाविषयी विचारले. पण आयुष्यात कसल्याच गोष्टीत रस नसलेला तो युवक जीवन जगायचे म्हणून जगायचे अशा मनोवृत्तीचा दिसला. शेवटी कंपोझची गोळी घेऊन तो सरळ झोपून गेला.
       कंटाळा जाणूनबुजून दूर केला नाही तर मनाला काही फालतू व्यवधान लागू शकते. अशातच व्यसने मोह घालतात. म्हणून सक्रिय काहीतरी केले पाहिजे हे नक्की. पण जर हातून काहीच घडत नसेल तर आजूबाजूला असणार्‍या कलेचा, कलाकृतीचा आनंद घेणेही फार चांगले. काव्य, शास्त्र, विनोद यांचा आस्वाद घ्यावा. आपण करत असणार्‍या सर्व गोष्टींना कारणीभूत असते ते मन. ते जेवढे प्रफुल्लित आणि ताजे तेवढे मनस्वास्थ्य चांगले. कधी कंटाळा घालवण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. तर कधी मनाला कामात बुडवून टाकण्याची गरज असते. जो कार्यवेडा असतो त्याला फारसा कंटाळा कधी येत नाही. झाडांना जसे खतपाणी घालून जोपासावे लागते तसे आपल्या मनालाही आवडते काम देऊन आनंदित करायला लागते.
      अमेरिकेत काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांनी आपल्याच एका मित्राचा खून केला. वरवर दिसणार्‍या कारणापेक्षा त्यांचा मूळ हेतु टाइमपास होता. आपला कंटाळा घालवण्यासाठी दुसर्‍याच्या जिवावर उठण्याइतका कंटाळा विवेकावर कुरघोडी करू शकतो? स्वत:ची करमणूक इतक्या थराला जाऊ शकते? कंटाळा ही मनाची स्थिती आहे. ती नकारात्मक विचारामद्धे बदलण्याआधी आपल्या मनाला काहीतरी खाद्य द्यायला हवे. काही श्रीमंत मुले मनाला रमवण्यासाठी सुरूवातीला अपेयपानच्या नादी लागतात, ड्रग्जचा अनुभव चाखला जातो. हीच वेळ असते विवेकाच्या पायरीवरून घसरण्याची. त्याचवेळी मनाला सावरायला हवे.
         हा कंटाळा आपल्याला सकारात्मक आणि सक्रिय सृजनशीलतेकडे नेऊ शकतो. स्वत:मधला विश्वास वाढवायला नक्कीच मदत करतो. बर्‍याच वर्षांपूर्वी आमच्या शेजारी रहाणार्‍या एका लहान मुलीने आपले केस, भुवया  कापले होते. तिला एकटीला कंटाळा यायचा. आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने हे कृत्य केले. त्यावर आईची प्रतिक्रिया तिला समजून घेण्याची किंवा काही सांगण्याची नव्हती. “काय केलस हे भलतेच" म्हणून मुलीच्या पाठीत धपाटा बसला. आजकाल शारीरिक खेळ कमी झाले आहेत. नजरेसमोर फक्त दिखाऊ, बेगडी दुनिया असते. आभासालाच मुले खरे जग समजतात. त्याच्या आधीन होतात. टीव्ही आणि मोबाईलवर दिसणारे मोहमयी जग त्यांच्या दृष्टीने सत्य बनून जाते. त्यामुळे त्यांचा भावनांक वाढला तरी तो योग्य रीतीने विकसित होत नाही.
     जेव्हा मन अगदी सुस्तावलेले असते. कोणताही आक्रमक पावित्रा ते घेऊ शकत नाही. अशा वेळी आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार, गोष्टी डोक्यात येत असतात. मेंदू त्या गोळा करतो. त्यातून एखादी नवीन सृजनशील कलाकृतीही निर्माण होऊ शकते. कंटाळ्यालाही एखाद्या क्रिएटिव्ह कामात बदलण्याची शक्ति असू शकते. त्याचा फक्त विधायक उपयोग करून घेतला पाहिजे. कधी कधी कंटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाची कोरी पाटी नवीन कल्पनांचे स्वागत करते. आणि अनेक अडचणींना आपोआपच उत्तर मिळत जाते.
     ................................सविता नाबर 

  Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 2nd Nov.2016

      

No comments:

Post a Comment