Wednesday, 23 November 2016

कप्प्यांची करामत

    

     आपले आयुष्यातले उद्दिष्ट ठरवले की त्यानंतर कामाचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, हे आपण आधी पाहिले आहे. काम करताना आपली संपूर्ण क्रयशक्ती त्या क्षणाच्या कामावर केन्द्रित झाली पाहिजे. आपल्या प्राध्यान्याप्रमाणे काम करताना कामाचे वेगेवेगळे कप्पे करायला हवेत. म्हणजे उदाहरणच द्यायचे तर घरचे आणि ऑफिसचे काम यातही अशी विभागणी केली पाहिजे. ऑफिसचे काम करताना पूर्ण लक्ष कार्यालयीन कामकाजावर पाहिजे. तर घरचे काम करताना मन शंभर टक्के घरात पाहिजे. मल्टी टास्किंग आणि कामाचे विभाजन यामध्ये अगदी अंधुक रेषा आहे. विशेषत: स्त्रिया मल्टी टास्किंग करण्यात माहिर असतात. पण कामाचे विभाजन वेगळे. म्हणजे समजा चपाती करताना एका हाताने लाटता लाटता दुसर्‍या हाताने दुसरे कोणते तरी काम करणे, असे जमणे शक्य नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपला शंभर टक्के प्रेझेंस हवा. जे काम आपण करतो त्याला पुर्णपणे न्याय देणे आवश्यक आहे.
        आपल्याला आमटी, भात, भाजी करायची आहे. पण प्रत्येक पदार्थ हा स्वतंत्रपणेच शिजवावा लागणार. तांदूळ भातासाठी वापरणार. आमटीसाठी डाळ वापरणार. सगळे पोटात एकत्र होणार म्हणून आपण सगळे एकत्र करून शिजवत नाही. डाळ तांदूळ एकत्र केले तर त्याची खिचडीच बनून जाईल. म्हणजे वेगळाच पदार्थ तयार होणार. हे रूपकात्मक उदाहरण झाले. पण सर्वसामान्यपणे आपण जेव्हा एक काम करत असतो तेव्हा त्यावर मन पुर्णपणे केन्द्रित व्हायला हवे. म्हणजे हातात घेतलेले काम शंभर टक्के यशस्वी होते. एक काम करत असताना जर मनात दुसर्‍याच कामाविषयी विचार चालले असतील तर चालू असलेल्या कामावर पुर्णपणे लक्ष केन्द्रित होत नाही आणि पर्यायाने ते चांगले होत नाही. साफ बिघडुन जाते.
        यासाठी योगाभ्यासाचे उदाहरण द्यायला मला आवडेल. दररोज न चुकता योगासने करणारी कित्येक मंडळी आहेत. पण कालांतराने या क्रिया मशीनवत (mechanical) होतात. मनाचा वारू भलतीकडेच धावत असतो. त्यामुळे त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही. जेव्हा एखादे आसन करताना आपल्या प्रत्येक हालचालीवर आपले मन केन्द्रित असते, श्वासोश्वासावर लक्ष असते तेव्हाच त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. एखादी व्यक्ति अनेक ठिकाणी कार्यरत असते आणि तरीही ती यशस्वी असते. अनेक उच्च पदांवर काम करत असते, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेते, शिवाय व्यवसायातही तेवढ्याच आघाडीने यश मिळवते, घरच्या गोष्टीतही तितकाच रस असतो. या सगळ्याचे मूळ आहे, कामाचे अत्यंत यशस्वी विभाजन करण्यात. व्यवसायाच्या ठिकाणी असतील तर पुर्णपणे तेवढा वेळ फक्त व्यवसायाच्याच गोष्टी, घरी असतील तर घरच्या गोष्टी करण्याला प्राधान्य दिलेले असते. मनाला आपणहूनच काही कप्प्यांमद्धे विभागले तर हे सहज शक्य होते. याला इंग्रजीत categorization of work असे म्हणता येईल.
      करियर आणि कुटुंब या कात्रीत सापडलेल्या व्यक्तींना विशेषत: स्त्रियांना ही कामांची विभागणी अगदी हुशारीने करावी लागते. आणि त्या करतातही सराईतपणे. युवकांसमोर जरी हा प्रश्न असला तरी निसर्गाने स्त्रीवर टाकलेली जबाबदारी तिलाच पूर्ण करावी लागते. कुटुंबाचा आधारस्तंभही घरातील स्त्रीच असते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्ससाठी मी आयसीआयसीआयच्या एम.डी. ललिता गुप्ते यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी संगितले होते की परदेशात, परराज्यात कामासाठी गेल्यावर घरच्या आघाडीवर, मनाचा कुटुंबासाठीचा कप्पा थोड्या काळासाठी का होईना बंद ठेवावा लागतो, त्यासाठी या कंपार्टमेंटलायझेशनची आवश्यकता भासते. जागतिक स्तरावर काम करणार्‍या पेप्सिकोच्या इंद्रा नुयी यांना त्यांच्या मुलींच्या पीटीएच्या मिटिंगाला कसे वंचित राहावे लागते हे विषादाने संगितले. ही झाली अत्यंत उच्च पदावर काम करणार्‍या लोकांची कथा. पण सर्वसाधारण पणे, हा अलिखित नियमच बनून जातो की आपली भावनिक गुंतवणूक, जे काम आपण करतो त्यामध्ये असावी. जर हातात एक आणि मनात दुसरेच असेल तर काम धडपणे पूर्णत्वाला न जाता भरकटत जाते. यामध्ये आपली मानसिक गुंतवणूक महत्वाची असते.
     शरीराने आपण घरी असतो पण जेव्हा कामाचा ताण मनावर असतो, तेव्हा तो कुटुंबियांवर व्यक्त करण्यापेक्षा कामाचा ताण विसरून जाऊन घरच्यांशी प्रेमादराने बोलणे आवश्यक असते. उगीच वड्याचे तेल वांग्यावर काढले जाऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या विचारांचा व्यवस्थित मेळ घालण्यासाठी मनाचे कप्पे असणे महत्वाचे असते. घर, पालकत्व, नातेसंबंध, खेळ, छंद, आपला मित्रपरिवार, या सगळ्यांचा मेळ घालणे आवश्यक असते. यामुळे आपल्या मनातला गोंधळ कमी व्हायला तर मदत होतेच. शिवाय जगणे सुसह्य होते.
        आपण कप्प्यांमधे फक्त त्यात्या कामाला बंदिस्त न करता, दुसर्‍याबद्दल वाटणारे मत्सर, द्वेष, राग या नकारात्मक भावनांना सुद्धा कुलूपबद्ध करू शकतो. एखाद्या व्यक्तिविषयी असणारी तीव्र द्वेषाची भावना जेव्हा मनाच्या दाराआड बंद करतो तेव्हा मोकळ्या झालेल्या मनात आनंद, उत्साह, आशा, आत्मविश्वास या सकारात्मक भावनांना जागा आपोआपच मिळते.
            -----------सविता नाबर

published in Maharastra Times,Kolhapur edition as on 23rd Nov.2016

Wednesday, 16 November 2016

प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट

     

      कुठल्याही समारंभाला, फंक्शनला जाताना आपण आपली प्रतिमा आरशात बघून निरखतो. केस ठीक आहेत ना, आपला ड्रेस व्यवस्थित आहे ना, चेहरा पुरेसा स्वच्छ (?) आहे ना, अशी दुसर्‍यांवर छाप पाडणारी लक्षणे पाहतो. बावळटपणा चेहर्‍यावर दिसू नये ही धडपड नक्कीच असते. आपली लोकांमधली प्रतिमा जपण्यासाठी किती जाणीवपूर्वक प्रयत्न असतो आपला! पण हे झाले आपले बाह्यरुप. आपले अंतर्मन असेच प्रभावी, उत्साही ठेवले तर चेहर्‍यावर आत्मविश्वास प्रकट होत असतो.
       स्वप्रतिमा मनात अतिशय सकारात्म, आत्मविश्वासी ठेवायला हवी. जर बावळट, कमजोर असेल तर तसाच आपला बाह्य आविर्भाव रहातो. काही व्यक्तींच्या चेहर्‍यावरून आत्मविश्वास ओसंडून वाहात असतो. त्यांच्या वागण्या बोलण्यात, हालचालीत एक शिस्त, दमदारपणा दिसून येतो. चालण्यात एक डौल असतो. चेहर्‍यावरच्या आविर्भावात आपण कोणीतरी विशेष आहोत, स्वगौरवाचे भाव असतात. स्वत:वर योग्य नियंत्रण असते. तर काही व्यक्ति चेहर्‍यावरून अत्यंत बावळट वाटतात. न्युनगंडाचे पुरेपूर दर्शन हालचालीवरून होत असते. हे कधी असते? जेव्हा आपल्या कामावर, वागण्यावर आपलाच विश्वास नसतो. पण जेव्हा आपण काही उद्देश साध्य केला आहे, विशेष काम केले आहे, मनाजोगे काम झाले आहे. आपल्या अचिव्ह्मेंटवर आपण खुश असतो, तेव्हा आपला आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वातून डोकावत (exude)असतो. म्हणजे आपली स्वत:ची प्रतिमा जशी आपण रेखाटतो, अगदी तीच प्रतिमा जनमानसात व्यक्त होत असते.    
      मिस्टर बीन ही इंग्रजी सिरिज बर्‍याच जणांनी पहिली असेल, त्यामध्ये तो एक वेंधळा म्हणून लोकांसमोर पेश होतो. जाताजाता पाय अडकून स्वत:चीच भंबेरी उडवतो. स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे असे तीन तेरा वाजवतो. पण ही झाली एक काल्पनिक हास्यमालिकेची झलक. प्रत्यक्षातही असेच असते. समोरची व्यक्ति जर हुशार असेल तर आपल्या हालचाली, आविर्भावावरुन, बोलण्यावरून, आवाजातील चढ उतार, नम्रपणा, उद्दामपणा, अजिजी, रास्त अभिमान, आत्मविश्वास हे ओळखू शकतो. आत्मगौरवाचे प्रतिबिंब आपल्या चेहर्‍यावर दिसत असते.
      आपली उभे राहण्याची, बसण्याची पद्धत, डोळ्यातले भाव, हातवारे, चेहर्‍यावरच्या बिनदिक्कत हलणार्‍या रेषा या सगळ्यांचा एकूण प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडत असतो आणि त्यानुसार आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे लोक ठरवत असतात. हा प्रभाव कसा निर्माण होतो, आपणच आपली मनात निर्माण केलेली प्रतिमा असते त्यामुळे. समजा कुठेतरी भाषण द्यायचे आहे, कुणाशी तरी बोलायचे आहे, त्यामध्ये मी यशस्वी होईन ही भावना मनात असेल तशी प्रतिमा मनात ठेवली तरच त्यामध्ये यशस्वी होऊ. मला काय जमतय असे जर मनात आले तर ते होणार नाही हे नक्की. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतो. आपले स्वत:बद्दलचे self esteem महत्वाचे!
     एकदा आमच्या कार्यशाळेत एक मुलगी आली. ती फार अबोल होती. कायम बावरलेले भाव चेहर्‍यावर असायचे. तिला प्रथम बोलत करण, व्यक्त होऊ देण हे महत्वाच होत. म्हणून पहिल्यांदा गेम घेतला, ज्यामधे स्वत:विषयी सांगायचं होत. नंतर मी तिच्याकडे जास्त लक्ष देऊन प्रश्न विचारायला लागल्यावर तिच्या आकसून जाण्यामागच कारण कळलं. लहानपणी आईवडिलांनी तू जास्त बोलतेस. वाद घालतेस, उलट बोलतेस अशा वक्तव्याने तिचा आत्मविश्वास खच्ची झाला होता. तिने स्वत:च्या मनात स्वत:विषयी तशीच प्रतिमा निर्माण केली होती ज्याचा परिणाम तिच्या वागणुकीवर झाला होता. ती पुर्णपणे न्युनगंडाने पछाडली होती.
    एक पाश्चात्य रूपक कथा सांगितली जाते. एकदा एक वाघ आपल्या वर्षानुवर्षांच्या जीवनाला कंटाळला. तेच ते पशुना मारून खाणे, आपल्या श्रेष्ठतेचा तोरा मिरवणे, आपल्याहून कनिष्ठ प्राण्यांना तुच्छ लेखणे. सगळ्या प्राण्यांना आपल्याविषयी ममत्व वाटावे अस वागायचे त्याने ठरवले. म्हणून त्याने रिटायर होऊन एक निरुपद्रवी प्राणी म्हणून कुणालाही त्रास न देता जगायचे असे ठरवले. रिटायरमेंटनंतरचे आयुष्य काढायचे यासाठी तो डुकरांच्या वृद्धाश्रमात गेला. त्याने आश्रमाच्या दाराची बेल वाजवली. एक डुकराचे पिलु बाहेर आले. वाघाने आपली इच्छा बोलून दाखवली. ते पिलु म्हणाले, तुमचे दात इतके भयानक आहेत की त्याची आम्हाला सगळ्यांना भीतीच वाटते. तुम्हाला आत कसे घेणार? दुसर्‍या दिवशी वाघ त्याचे दात काढून पुन्हा आश्रमाच्या दाराशी आला. दुसरे पिलु म्हणाले, वाघोबा, तुमच्या तीक्ष्ण नख्यांची आम्हाला फार भीती वाटते. तुम्हाला कसा प्रवेश देणार? झाले वाघाने आपले पंजे बोथट करून टाकले. आता त्याला आतमध्ये येण्याची परवानगी मिळाली. आणि तो आत आल्यावर त्याच्यावर पिलानी हल्ला केला, त्याची अवस्था मरणप्राय करून टाकली. शिवाय बाकीच्या प्राण्यांना घाबरवायला वाघाला त्यांनी जेरबंद करून आणले. प्राण्यांनी आपल्याला चांगले म्हणावे, त्यांच्या मनातली स्वत:ची प्रतिमा वाघ जपायला गेला आणि झाले भलतेच. यासाठी आपल्या मनातलीच आपली प्रतिमा योग्य आणि स्पष्ट हवी.
     प्रथम आपण स्वत:ला आहे तसे स्वीकारले की आपल्या व्यक्तिमत्वावर काम करणे सोपे जाते. व्यक्तिमत्वाचा विकास करणे सहज शक्य होते. फालतू न्युनगंड किंवा अहंगंडाखाली न राहाता I am what is I am. हे मुलतत्व  जर स्वीकारल तर स्वत:ला उंचावण खूप सोप जात.
                      .सविता नाबर   



Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 16th Nov 2016

Wednesday, 9 November 2016

स्वप्नी वसे ते.........

    

       ध्ये कधी ठरते जेव्हा आपण स्वप्न पहातो. स्वप्न जागेपणाची असोत अथवा निद्रितावस्थेतली पण ती प्रत्यक्षात आणणे मात्र आपल्याच हातात असते. मनाच्या पडद्यासमोर काहीच नसेल किंबहुना मनाचा पाटी कोरी  असेल त्यावर काही चित्रच नसेल तर ते प्रत्यक्षात तरी काय आणणार? पाहिलेले स्वप्न दरवेळी वास्तवात हुबेहूब उतरेलच असे नाही, त्यात काही फरकही पडू शकतो. मनातल्या चित्रात रंग भरणे हे आपल्या प्रयत्नावर असते. चांगली स्वप्ने प्रगतीला पोषक ठरतात. स्वप्ने नसतील तर आयुष्य नीरस बनते. श्रीमंतांच्या पायावर पाणी घालताना प्रभूण्यांचा राम त्यांच्या कानातल्या भिकबाळीने मोहून गेला. पाण्याची धार चुकली आणि त्याच्या योग्यतेविषयी त्याला ऐकून घ्यावे लागले. त्याच भिकबाळी मिळवण्याच्या स्वप्नाने तो प्रेरित झाला आणि पेशव्यांचा न्यायमूर्ती झाला. 
     जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती कशा निर्माण झाल्या? कोल्हापूरच्या महाराजांचा पॅलेस, ताजमहाल, गेटवे ऑफ इंडिया, बंगलोरचे विधानसौध. असंख्य गोष्टी. अर्थातच तुमचे उत्तर असेल की त्या कारागिरांनी निर्माण केल्या म्हणून अस्तित्वात आल्या. पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांचा विचार करणे महत्वाचे होते. निर्मितीआधी ती कलाकृतीचे स्वप्न पहाणे आवश्यक होते. तेव्हाच त्यादृष्टीने पावले उचलली गेली. म्हणून पहिली पायरी, योग्य ती स्वप्ने पहाणे. मगच त्या दिशेने मार्गाक्रमणा करता येते. मुळात मनात काही चित्रच नसेल तर नजरेसमोर काय ध्येय ठेवणार? भलेही मन:चक्षु समोर जरी अंधुकशी आकृती असली तरी ती विचार केल्यावर स्पष्ट होऊ शकते. यशस्वी होणारी व्यक्ति सर्वप्रथम स्वप्ने पाहायला शिकते आणि त्याबरहुकूम पावले उचलते. ही स्वप्ने विकत मिळत नाहीत. किंबहुना ती समजली तरी ती आपलीशी होत नाहीत. त्यासाठी स्वत:च विचार करावा लागतो. चिंतन, मनन, मनाला योग्य ती दिशा दाखवावी लागते. क्वचित प्रसंगी आजूबाजूचे लोक मदत करतीलही. पण त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग हवा.
     एक व्यावसायिक इंजिनियर होता. त्याला चित्रकलेची अतोनात आवड होती. पण व्यवसायातून त्याला वेळ मिळत नव्हता. निवृत्ती नंतर त्याने ठरवले की आता काही झाले तरी आपण आपल्या छंदाला वेळ द्यायचा. त्याने भरपूर चित्रे काढली. केवळ स्वत;च्या आनंदासाठी. आणि अल्पावधीतच तो एक नावाजलेला, प्रसिद्ध चित्रकार झाला. ज्याक्षणी त्याने ठरवले आपण तनमन आपल्या आवडीसाठी झोकून द्यायचे. एक चांगला चित्रकार व्हायचे त्याक्षणी त्याने वयाची अट न जुमानता काम सुरू केले. त्याने स्वप्न पाहिले एक अप्रतिम चित्रकार होण्याचे. 
     एकदा स्वप्ने पाहायला सुरुवात केली की जमिनीची मशागत करतो तशी मनाची मशागत करायला हवी. आपले स्वप्न मनाने पूर्ण स्वीकारले पाहिजे. स्वप्नांची मुळे मनात खोलवर रूजली पाहिजेत. यशापयशाच्या खडबडीत मार्गाने भरलेला आयुष्याचा रस्ता चालताना समोर ध्येय असेल तर मार्गाची पर्वा रहात नाही. मुळात ध्येयाचा रस्ता लांबचा  असतो. मनाला हा स्वप्नाचा दीर्घ प्रवास समजून द्यावा लागतो. मिळालेल्या यशाने न हुरळता, पराभवाने निराश न होता आपले काम करत राहिलात तर अंतिम ध्येय फार लांब नसते. आपली परिस्थिती आणि योग्यता आपणच ओळखली पाहिजे. You are your best judge.      
      ही आहे एका गरीब, स्वप्नाळू मुलाची गोष्ट. त्याचा बाप घोड्यांना प्रशिक्षण देणारा ट्रेनर होता. पण त्याची नोकरी एका जागी स्थिर नव्हती. गावोगावी तो फिरत असायचा. त्यामुळे त्या मुलाचे शिक्षणही एका ठिकाणी होत नव्हते. मुलगा सहा सात वर्षांचा असताना त्याच्या शिक्षकांनी मुलांना मोठेपणी तुम्ही कोण होणार याविषयी लिहायला संगितले. या मुलाने चार पानांचा सविस्तर निबंधच शिक्षकांना सादर केला. मोठेपणी त्याला स्वत:च्या मालकीचे 200 एकर जागेत स्वत:ची पागा असलेले, घोड्यांचा फिरण्याचा मोठा ट्रॅक असलेले स्वत:च्या मालकीचे रॅंच असावे असे लिहिले होते. त्या रॅंचवर 4000 स्क्वे. फुटाचे घर असेल, असे बरेच काही. शिक्षकांनी त्याच्या पेपरवर फेल असा शेरा मारून त्याला परत दिले. त्या मुलाने शिक्षकांना या शेर्‍याबद्दल विचारले. “तू गरीब आहेस, तुझे स्वप्न अवास्तव आहे. असे उत्तर त्याला मिळाले. त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या स्वप्नावर त्याला ठाम राहायला संगितले. “तुम्ही तुमचा शेरा कायम ठेवा पण माझे उत्तर तेच राहील,” त्या मुलाने लिहिले.  
     आता तो मुलगा एका रॅंचचा मालक होता. आणि त्याची 200 एकरमध्ये वसलेली रॅंच शाळांमधील मुलांना दाखवण्यासाठी खुली होती. एक दिवस एक शिक्षक त्यांच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन ती दाखवायला आले. त्याच्या घरातल्या हॉलमध्ये एक मोठी फ्रेम भिंतीवर लटकत होती. पेपरवर लिहीलेल्या फेल या शेर्‍यासहित ती अभिमानाने मिरवत होती. शिक्षक मात्र त्या रॅंचच्या मालकासमोर खजील होऊन उभे होते. आपली स्वप्ने दुसर्‍यांनी चोरली, स्वप्नांना पायदळी तुडवायचा प्रयत्न केला तरी आपल्यासाठी ती ध्वजासारखी असतात. स्वप्नी वसे ते प्रत्यक्ष दिसे, तेच आपुल्या हाती असे. यावरून विंदांची एक कविता आठवते.
“नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्‍यांची, आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची.
 असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. 
     .....................................सविता नाबर 

Published in Maharashtra Times, Kolhapur editionas on 9th Nov.2016
      

Thursday, 3 November 2016

मन क्यूँ बहका री बहका........

    

                           
         ती होती एक श्रीमंत घराण्यातली टीन एजर. श्रीमंती शिष्टाचाराचे जोखड मानेवर असलेली. मोठ्यांच्या रितीरिवजांच्या नियमांनी बांधलेली. या सगळ्याचा तिला एक दिवस उबग आला. आणि ती बाहेर पडली जग बघायला. सर्वसामान्यांच्या जगात ती गोंधळून गेली. पण तिला भेटलेल्या एका सर्वसाधारण पत्रकाराने तिची आम दुनियेशी ओळख करून दिली. तिला जगण्याचा अर्थ कळला. संपन्न भिंतींच्या कोठडीत बंदिस्त असलेल्या तिला नवीन अनुभवांनी ताजेतवाने केले आणि ती पुन्हा आपल्या जगात परतली. ही कथा आहे रोमन हॉलिडे या इंग्लिश सिनेमाची. उमदा, देखणा ग्रेगरी पेक आणि नाजुक कमनीय ऑड्री हेपबर्न यांच्या लाजवाब अभिनयाची. सांगायचे तात्पर्य म्हणजे रोज गोड खाल्ले तरी त्याचा एक दिवस कंटाळा येतोच. त्यामधे बदल पाहिजे. नाहीतर तोचतोचपणा आयुष्याला कंटाळवाणेपणा आणतो. हा कंटाळा कसा दूर करायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीवर, इच्छेवर आणि ताकदीवर आहे.
         जसा उजेडाचा अभाव म्हणजे अंधार तसा उत्साहाचा अभाव म्हणजे कंटाळा. आठवडाभर जर सुट्टीच उपभोगली तर रविवारची किंमत शून्य. अंग मोडून काम केले, बुद्धीला भरपूर कसरत करायला लावली की आराम आणि विश्रांतीची हवीशी वाटते. कधीतरी आळस येणे हा सुद्धा आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. पण या कंटाळ्याचा कंटाळा करायचा नाही. प्रत्येक अनुभवाला उत्कटतेने सामोरे जाण्याची सवय कंटाळा नाहीसा करते. आपण हाती घेतलेले काम जर मनापासून केले तर कधीच कंटाळा येत नाही. मग वेळ जात नाही अशी अवस्था येत नाही.  
      माझ्या मुंबई बंगळुरूच्या प्रवासात एक मुलगा सारखा चुळबुळ करत होता. वयाने असेल वीस एक वर्षांचा. कधी इयरफोन लावून गाणी ऐकायचा. तर कधी बॅगमधली पुस्तके काढून वाचायचा. कधी मोबाईलवर गेम्स खेळायचा. पण त्याचे मन कशातच रमत नव्हते. मी न राहवून त्याला त्याच्या अस्वस्थतेबद्दल विचारले. पुढचा एक दिवस अखंड ट्रेन मध्ये घालवायचा याचा त्याला कंटाळा आला होता. दडपण आले होते. त्याला त्याच्या छंदाविषयी विचारले. पण आयुष्यात कसल्याच गोष्टीत रस नसलेला तो युवक जीवन जगायचे म्हणून जगायचे अशा मनोवृत्तीचा दिसला. शेवटी कंपोझची गोळी घेऊन तो सरळ झोपून गेला.
       कंटाळा जाणूनबुजून दूर केला नाही तर मनाला काही फालतू व्यवधान लागू शकते. अशातच व्यसने मोह घालतात. म्हणून सक्रिय काहीतरी केले पाहिजे हे नक्की. पण जर हातून काहीच घडत नसेल तर आजूबाजूला असणार्‍या कलेचा, कलाकृतीचा आनंद घेणेही फार चांगले. काव्य, शास्त्र, विनोद यांचा आस्वाद घ्यावा. आपण करत असणार्‍या सर्व गोष्टींना कारणीभूत असते ते मन. ते जेवढे प्रफुल्लित आणि ताजे तेवढे मनस्वास्थ्य चांगले. कधी कंटाळा घालवण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. तर कधी मनाला कामात बुडवून टाकण्याची गरज असते. जो कार्यवेडा असतो त्याला फारसा कंटाळा कधी येत नाही. झाडांना जसे खतपाणी घालून जोपासावे लागते तसे आपल्या मनालाही आवडते काम देऊन आनंदित करायला लागते.
      अमेरिकेत काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांनी आपल्याच एका मित्राचा खून केला. वरवर दिसणार्‍या कारणापेक्षा त्यांचा मूळ हेतु टाइमपास होता. आपला कंटाळा घालवण्यासाठी दुसर्‍याच्या जिवावर उठण्याइतका कंटाळा विवेकावर कुरघोडी करू शकतो? स्वत:ची करमणूक इतक्या थराला जाऊ शकते? कंटाळा ही मनाची स्थिती आहे. ती नकारात्मक विचारामद्धे बदलण्याआधी आपल्या मनाला काहीतरी खाद्य द्यायला हवे. काही श्रीमंत मुले मनाला रमवण्यासाठी सुरूवातीला अपेयपानच्या नादी लागतात, ड्रग्जचा अनुभव चाखला जातो. हीच वेळ असते विवेकाच्या पायरीवरून घसरण्याची. त्याचवेळी मनाला सावरायला हवे.
         हा कंटाळा आपल्याला सकारात्मक आणि सक्रिय सृजनशीलतेकडे नेऊ शकतो. स्वत:मधला विश्वास वाढवायला नक्कीच मदत करतो. बर्‍याच वर्षांपूर्वी आमच्या शेजारी रहाणार्‍या एका लहान मुलीने आपले केस, भुवया  कापले होते. तिला एकटीला कंटाळा यायचा. आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने हे कृत्य केले. त्यावर आईची प्रतिक्रिया तिला समजून घेण्याची किंवा काही सांगण्याची नव्हती. “काय केलस हे भलतेच" म्हणून मुलीच्या पाठीत धपाटा बसला. आजकाल शारीरिक खेळ कमी झाले आहेत. नजरेसमोर फक्त दिखाऊ, बेगडी दुनिया असते. आभासालाच मुले खरे जग समजतात. त्याच्या आधीन होतात. टीव्ही आणि मोबाईलवर दिसणारे मोहमयी जग त्यांच्या दृष्टीने सत्य बनून जाते. त्यामुळे त्यांचा भावनांक वाढला तरी तो योग्य रीतीने विकसित होत नाही.
     जेव्हा मन अगदी सुस्तावलेले असते. कोणताही आक्रमक पावित्रा ते घेऊ शकत नाही. अशा वेळी आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार, गोष्टी डोक्यात येत असतात. मेंदू त्या गोळा करतो. त्यातून एखादी नवीन सृजनशील कलाकृतीही निर्माण होऊ शकते. कंटाळ्यालाही एखाद्या क्रिएटिव्ह कामात बदलण्याची शक्ति असू शकते. त्याचा फक्त विधायक उपयोग करून घेतला पाहिजे. कधी कधी कंटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाची कोरी पाटी नवीन कल्पनांचे स्वागत करते. आणि अनेक अडचणींना आपोआपच उत्तर मिळत जाते.
     ................................सविता नाबर 

  Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 2nd Nov.2016