Wednesday, 9 November 2016

स्वप्नी वसे ते.........

    

       ध्ये कधी ठरते जेव्हा आपण स्वप्न पहातो. स्वप्न जागेपणाची असोत अथवा निद्रितावस्थेतली पण ती प्रत्यक्षात आणणे मात्र आपल्याच हातात असते. मनाच्या पडद्यासमोर काहीच नसेल किंबहुना मनाचा पाटी कोरी  असेल त्यावर काही चित्रच नसेल तर ते प्रत्यक्षात तरी काय आणणार? पाहिलेले स्वप्न दरवेळी वास्तवात हुबेहूब उतरेलच असे नाही, त्यात काही फरकही पडू शकतो. मनातल्या चित्रात रंग भरणे हे आपल्या प्रयत्नावर असते. चांगली स्वप्ने प्रगतीला पोषक ठरतात. स्वप्ने नसतील तर आयुष्य नीरस बनते. श्रीमंतांच्या पायावर पाणी घालताना प्रभूण्यांचा राम त्यांच्या कानातल्या भिकबाळीने मोहून गेला. पाण्याची धार चुकली आणि त्याच्या योग्यतेविषयी त्याला ऐकून घ्यावे लागले. त्याच भिकबाळी मिळवण्याच्या स्वप्नाने तो प्रेरित झाला आणि पेशव्यांचा न्यायमूर्ती झाला. 
     जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती कशा निर्माण झाल्या? कोल्हापूरच्या महाराजांचा पॅलेस, ताजमहाल, गेटवे ऑफ इंडिया, बंगलोरचे विधानसौध. असंख्य गोष्टी. अर्थातच तुमचे उत्तर असेल की त्या कारागिरांनी निर्माण केल्या म्हणून अस्तित्वात आल्या. पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांचा विचार करणे महत्वाचे होते. निर्मितीआधी ती कलाकृतीचे स्वप्न पहाणे आवश्यक होते. तेव्हाच त्यादृष्टीने पावले उचलली गेली. म्हणून पहिली पायरी, योग्य ती स्वप्ने पहाणे. मगच त्या दिशेने मार्गाक्रमणा करता येते. मुळात मनात काही चित्रच नसेल तर नजरेसमोर काय ध्येय ठेवणार? भलेही मन:चक्षु समोर जरी अंधुकशी आकृती असली तरी ती विचार केल्यावर स्पष्ट होऊ शकते. यशस्वी होणारी व्यक्ति सर्वप्रथम स्वप्ने पाहायला शिकते आणि त्याबरहुकूम पावले उचलते. ही स्वप्ने विकत मिळत नाहीत. किंबहुना ती समजली तरी ती आपलीशी होत नाहीत. त्यासाठी स्वत:च विचार करावा लागतो. चिंतन, मनन, मनाला योग्य ती दिशा दाखवावी लागते. क्वचित प्रसंगी आजूबाजूचे लोक मदत करतीलही. पण त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग हवा.
     एक व्यावसायिक इंजिनियर होता. त्याला चित्रकलेची अतोनात आवड होती. पण व्यवसायातून त्याला वेळ मिळत नव्हता. निवृत्ती नंतर त्याने ठरवले की आता काही झाले तरी आपण आपल्या छंदाला वेळ द्यायचा. त्याने भरपूर चित्रे काढली. केवळ स्वत;च्या आनंदासाठी. आणि अल्पावधीतच तो एक नावाजलेला, प्रसिद्ध चित्रकार झाला. ज्याक्षणी त्याने ठरवले आपण तनमन आपल्या आवडीसाठी झोकून द्यायचे. एक चांगला चित्रकार व्हायचे त्याक्षणी त्याने वयाची अट न जुमानता काम सुरू केले. त्याने स्वप्न पाहिले एक अप्रतिम चित्रकार होण्याचे. 
     एकदा स्वप्ने पाहायला सुरुवात केली की जमिनीची मशागत करतो तशी मनाची मशागत करायला हवी. आपले स्वप्न मनाने पूर्ण स्वीकारले पाहिजे. स्वप्नांची मुळे मनात खोलवर रूजली पाहिजेत. यशापयशाच्या खडबडीत मार्गाने भरलेला आयुष्याचा रस्ता चालताना समोर ध्येय असेल तर मार्गाची पर्वा रहात नाही. मुळात ध्येयाचा रस्ता लांबचा  असतो. मनाला हा स्वप्नाचा दीर्घ प्रवास समजून द्यावा लागतो. मिळालेल्या यशाने न हुरळता, पराभवाने निराश न होता आपले काम करत राहिलात तर अंतिम ध्येय फार लांब नसते. आपली परिस्थिती आणि योग्यता आपणच ओळखली पाहिजे. You are your best judge.      
      ही आहे एका गरीब, स्वप्नाळू मुलाची गोष्ट. त्याचा बाप घोड्यांना प्रशिक्षण देणारा ट्रेनर होता. पण त्याची नोकरी एका जागी स्थिर नव्हती. गावोगावी तो फिरत असायचा. त्यामुळे त्या मुलाचे शिक्षणही एका ठिकाणी होत नव्हते. मुलगा सहा सात वर्षांचा असताना त्याच्या शिक्षकांनी मुलांना मोठेपणी तुम्ही कोण होणार याविषयी लिहायला संगितले. या मुलाने चार पानांचा सविस्तर निबंधच शिक्षकांना सादर केला. मोठेपणी त्याला स्वत:च्या मालकीचे 200 एकर जागेत स्वत:ची पागा असलेले, घोड्यांचा फिरण्याचा मोठा ट्रॅक असलेले स्वत:च्या मालकीचे रॅंच असावे असे लिहिले होते. त्या रॅंचवर 4000 स्क्वे. फुटाचे घर असेल, असे बरेच काही. शिक्षकांनी त्याच्या पेपरवर फेल असा शेरा मारून त्याला परत दिले. त्या मुलाने शिक्षकांना या शेर्‍याबद्दल विचारले. “तू गरीब आहेस, तुझे स्वप्न अवास्तव आहे. असे उत्तर त्याला मिळाले. त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या स्वप्नावर त्याला ठाम राहायला संगितले. “तुम्ही तुमचा शेरा कायम ठेवा पण माझे उत्तर तेच राहील,” त्या मुलाने लिहिले.  
     आता तो मुलगा एका रॅंचचा मालक होता. आणि त्याची 200 एकरमध्ये वसलेली रॅंच शाळांमधील मुलांना दाखवण्यासाठी खुली होती. एक दिवस एक शिक्षक त्यांच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन ती दाखवायला आले. त्याच्या घरातल्या हॉलमध्ये एक मोठी फ्रेम भिंतीवर लटकत होती. पेपरवर लिहीलेल्या फेल या शेर्‍यासहित ती अभिमानाने मिरवत होती. शिक्षक मात्र त्या रॅंचच्या मालकासमोर खजील होऊन उभे होते. आपली स्वप्ने दुसर्‍यांनी चोरली, स्वप्नांना पायदळी तुडवायचा प्रयत्न केला तरी आपल्यासाठी ती ध्वजासारखी असतात. स्वप्नी वसे ते प्रत्यक्ष दिसे, तेच आपुल्या हाती असे. यावरून विंदांची एक कविता आठवते.
“नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्‍यांची, आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची.
 असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. 
     .....................................सविता नाबर 

Published in Maharashtra Times, Kolhapur editionas on 9th Nov.2016
      

No comments:

Post a Comment