आपले आयुष्यातले उद्दिष्ट
ठरवले की त्यानंतर कामाचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे,
हे आपण आधी पाहिले आहे. काम करताना आपली संपूर्ण क्रयशक्ती त्या क्षणाच्या कामावर
केन्द्रित झाली पाहिजे. आपल्या प्राध्यान्याप्रमाणे काम करताना कामाचे वेगेवेगळे
कप्पे करायला हवेत. म्हणजे उदाहरणच द्यायचे तर घरचे आणि ऑफिसचे काम यातही अशी
विभागणी केली पाहिजे. ऑफिसचे काम करताना पूर्ण लक्ष कार्यालयीन कामकाजावर पाहिजे.
तर घरचे काम करताना मन शंभर टक्के घरात पाहिजे. मल्टी टास्किंग आणि कामाचे विभाजन
यामध्ये अगदी अंधुक रेषा आहे. विशेषत: स्त्रिया मल्टी टास्किंग करण्यात माहिर
असतात. पण कामाचे विभाजन वेगळे. म्हणजे समजा चपाती करताना एका हाताने लाटता लाटता
दुसर्या हाताने दुसरे कोणते तरी काम करणे, असे जमणे शक्य नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपला शंभर
टक्के प्रेझेंस हवा. जे काम आपण करतो त्याला पुर्णपणे न्याय देणे आवश्यक आहे.
आपल्याला आमटी,
भात, भाजी करायची आहे. पण प्रत्येक पदार्थ हा स्वतंत्रपणेच शिजवावा
लागणार. तांदूळ भातासाठी वापरणार. आमटीसाठी डाळ वापरणार. सगळे पोटात एकत्र होणार
म्हणून आपण सगळे एकत्र करून शिजवत नाही. डाळ तांदूळ एकत्र केले तर त्याची खिचडीच
बनून जाईल. म्हणजे वेगळाच पदार्थ तयार होणार. हे रूपकात्मक उदाहरण झाले. पण सर्वसामान्यपणे
आपण जेव्हा एक काम करत असतो तेव्हा त्यावर मन पुर्णपणे केन्द्रित व्हायला हवे.
म्हणजे हातात घेतलेले काम शंभर टक्के यशस्वी होते. एक काम करत असताना जर मनात
दुसर्याच कामाविषयी विचार चालले असतील तर चालू असलेल्या कामावर पुर्णपणे लक्ष
केन्द्रित होत नाही आणि पर्यायाने ते चांगले होत नाही. साफ बिघडुन जाते.
यासाठी
योगाभ्यासाचे उदाहरण द्यायला मला आवडेल. दररोज न चुकता योगासने करणारी कित्येक
मंडळी आहेत. पण कालांतराने या क्रिया मशीनवत (mechanical)
होतात. मनाचा वारू भलतीकडेच धावत असतो. त्यामुळे त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळत
नाही. जेव्हा एखादे आसन करताना आपल्या प्रत्येक हालचालीवर आपले मन केन्द्रित असते,
श्वासोश्वासावर लक्ष असते तेव्हाच त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. एखादी व्यक्ति
अनेक ठिकाणी कार्यरत असते आणि तरीही ती यशस्वी असते. अनेक उच्च पदांवर काम करत
असते, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेते,
शिवाय व्यवसायातही तेवढ्याच आघाडीने यश मिळवते, घरच्या गोष्टीतही तितकाच
रस असतो. या सगळ्याचे मूळ आहे, कामाचे अत्यंत यशस्वी विभाजन करण्यात. व्यवसायाच्या
ठिकाणी असतील तर पुर्णपणे तेवढा वेळ फक्त व्यवसायाच्याच गोष्टी,
घरी असतील तर घरच्या गोष्टी करण्याला प्राधान्य दिलेले असते. मनाला आपणहूनच काही
कप्प्यांमद्धे विभागले तर हे सहज शक्य होते. याला इंग्रजीत categorization of work असे म्हणता येईल.
करियर आणि कुटुंब या कात्रीत सापडलेल्या
व्यक्तींना विशेषत: स्त्रियांना ही कामांची विभागणी अगदी हुशारीने करावी लागते.
आणि त्या करतातही सराईतपणे. युवकांसमोर जरी हा प्रश्न असला तरी निसर्गाने स्त्रीवर
टाकलेली जबाबदारी तिलाच पूर्ण करावी लागते. कुटुंबाचा आधारस्तंभही घरातील स्त्रीच
असते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्ससाठी मी आयसीआयसीआयच्या एम.डी. ललिता
गुप्ते यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी संगितले होते की परदेशात,
परराज्यात कामासाठी गेल्यावर घरच्या आघाडीवर, मनाचा कुटुंबासाठीचा कप्पा थोड्या काळासाठी का
होईना बंद ठेवावा लागतो, त्यासाठी या कंपार्टमेंटलायझेशनची आवश्यकता भासते.
जागतिक स्तरावर काम करणार्या पेप्सिकोच्या इंद्रा नुयी यांना त्यांच्या मुलींच्या
पीटीएच्या मिटिंगाला कसे वंचित राहावे लागते हे विषादाने संगितले. ही झाली अत्यंत
उच्च पदावर काम करणार्या लोकांची कथा. पण सर्वसाधारण पणे,
हा अलिखित नियमच बनून जातो की आपली भावनिक गुंतवणूक, जे काम आपण करतो
त्यामध्ये असावी. जर हातात एक आणि मनात दुसरेच असेल तर काम धडपणे पूर्णत्वाला न
जाता भरकटत जाते. यामध्ये आपली मानसिक गुंतवणूक महत्वाची असते.
शरीराने
आपण घरी असतो पण जेव्हा कामाचा ताण मनावर असतो, तेव्हा तो कुटुंबियांवर
व्यक्त करण्यापेक्षा कामाचा ताण विसरून जाऊन घरच्यांशी प्रेमादराने बोलणे आवश्यक
असते. उगीच वड्याचे तेल वांग्यावर काढले जाऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या
विचारांचा व्यवस्थित मेळ घालण्यासाठी मनाचे कप्पे असणे महत्वाचे असते. घर,
पालकत्व, नातेसंबंध, खेळ, छंद, आपला मित्रपरिवार, या सगळ्यांचा मेळ घालणे
आवश्यक असते. यामुळे आपल्या मनातला गोंधळ कमी व्हायला तर मदत होतेच. शिवाय जगणे
सुसह्य होते.
आपण कप्प्यांमधे फक्त त्यात्या कामाला बंदिस्त
न करता, दुसर्याबद्दल वाटणारे मत्सर, द्वेष,
राग या नकारात्मक भावनांना सुद्धा कुलूपबद्ध करू शकतो. एखाद्या व्यक्तिविषयी
असणारी तीव्र द्वेषाची भावना जेव्हा मनाच्या दाराआड बंद करतो तेव्हा मोकळ्या
झालेल्या मनात आनंद, उत्साह, आशा, आत्मविश्वास या सकारात्मक भावनांना जागा आपोआपच मिळते.
-----------सविता नाबर
published in Maharastra Times,Kolhapur edition as on 23rd Nov.2016
No comments:
Post a Comment