Saturday, 31 December 2016

मी अरुणा बोलतेय...............

    

       काळच ,प्रसन्न ,कोवळ उन्ह पडलंय. आज मला प्रकर्षान वाटतंय या वेदनामय जीवनातून माझी सुटका व्हावी. मला मुक्त व्हावस वाटतंय. आंता खूप दिवस झाले. या देहाच्या पिंजऱ्यात मी फार काळ अडकले. एक क्षण माझा श्वास अडकला. आणि आता शरीर अगदी हलक झाल्यासारख वाटतंय. जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली अस झालंय . माझ्या बिछान्याजवळ आता कुणी नाही. पण सकाळची लक्ष्मी आया येऊन बघेल तर तिचा विश्वास बसणार नाही. खरच ती आली आणि तिन सगळ्या परीचारीकाना बोलावलं. डॉकटरानाही बोलावलं. आणि सगळ्यांना एकच धक्का बसला. चोवीस तास त्यांच्या सहवासात असलेली ,कळत नकळत प्रतिसाद देणारी त्यांची अरुणा आता त्यांच्यात नाही. सवयीने जवळजवळ ४२ वर्ष त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली सिस्टर अरुणा त्याना सोडून गेलीय. या सगळ्यानी माझ्यासाठी ,या नश्वर देहासाठी खूप केल. अगदी मनापासून. मला हे समजत असल तरी मी बोलू शकत नव्हते. माझ्यापरीने मी त्याना सांगण्याचा प्रयत्न करत होते. या कनवाळू लोकांनी घरच कुणी करेल की नाही अशी माझी सेवा केली. काय देण लागत होते मी यांची?
    घरच्या माणसांवरून आठवल. माझी अशी अवस्था झाली त्यापासून कुणी इकडे फिरकलही  नाही. माझा भावी पती मात्र मी बरी होण्याची बरीच वर्ष वाट बघत होता. किती स्वप्न रंगवली होती आम्ही दोघांनी! माझी अशी अवस्था झाल्यावारही तो अगदी रोज मला पहायला यायचा. माझी आवडती निशिगंधाची फुल घेऊन. किती काळ वाट बघणार तो तरी ! मी यातून बरी होणार नाही हे समजल्यावर त्यान आपला मार्ग निवडला.    
       सगळ्या जगाला माझी कथा कळलीय. पिंकी विराणी माझ्यासाठी, मला मरण याव म्हणून खूप धडपडली. माझ्या इछेचा तर प्रश्नच नव्हता. म्हणून इच्छामरण शक्य नव्हत. दयामरण मला कायद्याने दिल नाही. गेली ४२ वर्ष या देहात चेतना असून लोळा गोळा या अवस्थेत मी जगले. या अवस्थेत मलां जगवल माझ्या सहकारयानी ,माझ्या आवडीच खाण पिण  देऊन, माझ्या आवडीच संगीत ऐकवून, माझ्या शरीराची स्वच्छता राखून , माझ्या मनालाही जपल. पण तो क्षण मी कसा विसरू शकेन......
     स्त्रीच्या आयुष्यात तिचा संसार, स्त्रीत्व हेच तर तीच जग असत. आणि त्यावरच घाला घातला, तर आयुष्यात काय उरल? सोहनलाल असा वासनांध असेल , तो माझ्यावर अत्याचार करेल अस चुकुनही वाटलं नव्हत. त्याचा मी काय गुन्हा केला होता म्हणून त्यान मला अशी भयानक शिक्षा दिली? केवळ मी एक स्त्री आहे म्हणून? स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून उघडपणाने जगता येत नाही का? तिची किंमत एक उपभोग्य वस्तू अशीच आहे का?  सोहनलाल शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा मारायला आला. माझ्यामुळे त्याला शिक्षा झाली म्हणून. माझी इतकी दारुण ,करूण परिस्थिती करूनही तो मात्र सुटला, मला मात्र त्याच्या करण्याची सजा भोगावी लागली. तो आता सुखाचे आयुष्य स्वत:च्या कुटुंबांसोबत जगतोय आणि मी लोकांच्या दयेला पात्र. एक करारी, दक्ष परिचारिका म्हणून मी माझ कर्तव्य बजावत असताना हा प्रसंग माझ्यावर गुदरला.
         मला निपचित अवस्थेत पडून राहाण कदापि आवडल नसत. पण आज अरुणाची काय अवस्था झाली आहे हे पुढच्या पिढ्यांना कळाव , आजच्या तरुण स्त्रिया, मुली बाहेर अनेक ठिकाणी काम करतात. त्यांच्यावर वेळोवेळी अनेक बिकट प्रसंग येऊ शकतात , त्यांनी सावध रहाव ,यासाठी मी जगाला ओरडून सांगत होते , की बायानो जग लांडग्यांच आहे. साधूच्या रुपात कोण चोर येऊन तुमचा गळा कापेल हे समजणार नाही. तेव्हा जाग्या व्हां. रात्र वैऱ्याची आहे. परंतु माझा क्षीण आवाज बाहेर फुटत नव्हता. म्हणून ठरवलं आपण या अवस्थेतही , मूकपणे लढा द्यायचा. अन्यायाविरुध्द. काहीही न बोलता. कुठलीही एक्शन न घेता. फक्त जगाला दाखवून द्यायचं, अशीही एक अरुणा होती, तिन निपचित पडूनही झुंज दिली. आणि जगाला जाग केल.  

                        --------------------------सविता नाबर    



Published in lokamt, Hello Kolhapur 2015

Wednesday, 28 December 2016

लाईफ स्टाइल

    

        तंगाच्या पाठोपाठ पळतापळता त्याच्या हातात मांज्याऐवजी आली जीवंत विजवाहक तार. आणि दोन्ही हाताने पकडलेली ती तार त्याचे हातच घेऊन गेली. वयाच्या सातव्या वर्षी आईवडिलांच्या बरोबर घरात रहाणारा तो, रस्त्यावर कसा आला हे त्याला आठवत नाही. बाकीच्या मुलांप्रमाणे तोही रस्त्यावर राहायला लागला. अवघा सात वर्षाचा. खांद्यापासून दोन्ही हात नसलेला मुलगा, भीक मागतोय आणि मुंबई सीएसटीच्या प्लॅटफॉर्मवर पायाच्या दोन बोटांमधे सिगरेट धरून ती ओढतोय. डोळ्यासमोर हे दृश्य आणायलाही कठीण. सपोर्ट (Society Undertaking Poor People's Onus For Rehabilitation)ग्रुपच्या सुजाता मॅडमनी त्याला बघितले आणि त्याच्या अंगातली हुशारी ओळखली. जो मुलगा पायाने सिगरेट ओढतो आहे तो लिहू पण शकेल. त्याला शिकवले पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला सपोर्टच्या ऑफिसमध्ये आणल. अत्यंत मुश्किलीने त्याची ती वाईट सवय सोडवली. शाळेतले सगळे विषय त्याला शिकण्यासाठी मोह घालायला लागले. दहावीला त्याला 71 टक्के गुण मिळाले. तो उत्तम सॉकर खेळतो. बुद्धिबळ आणि कॅरमही खेळतो. पूर्णपणे स्वावलंबी असलेला तो आज कोल्हापुरात शासकीय तंत्रनिकेतनमधे शिकतो आहे. बुद्धीची देवता त्याच्यावर प्रसन्न आहे आणि कष्टाची त्याला पर्वा नाही. मग यश आपोआपच त्याच्यामागे चालत आले तर नवल नाही! ही असामान्य कथा आहे राजेश पिल्ले याची! तपश्चर्या, कुठलीही गोष्ट तडीस नेऊन ती पार पडण्याची मानसिकता, कष्ट करण्याची जबरदस्त तयारी, जीवनाकडे आशावादी नजरेने पाहण्याची दृष्टी, सकारात्मक दृष्टीकोन. काय नाही राजेशकडे? दैनंदिन आयुष्यात मला काय मिळाले नाही याकडे वळणारी आपली दृष्टी या घटनेने खचितच लज्जित होईल. गम की अंधेरी रात मे दिल को न बेकरार कर, वो सुबह जरूर आयेगी, सुबह का इंतजार कर. मनातल्या अंधाराला पळवून लावण्यासाठी स्वत:च्या जाणिवेची इवलीशी दिवली लावली तरी पुरे!!
     सुबह का इंतजार करताना रोजच्या रहाटगाडग्यात, कामाच्या घाईगर्दीत स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे. कारण आयुष्य खुप सुन्दर आहे. म्हणूनच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. स्वत;वर प्रेम केल तरच आपण दुसर्‍यावर प्रेम करू शकणार. सोशल मीडियामध्ये लोकांशी संवाद साधतो. पण अंतर्नादाचे काय? तो हरवू न देता, संवाद साधायला हवा, मनाशी आणि शरीराशी. शरीर काय बोलत आहे आणि मन काय सांगत आहे याची दखल घेतली की आपोआप दुसर्‍यांशीसुद्धा संवाद साधण सोप जात. हेच असते मनन आणि चिंतन. फार काही गंभीर गोष्ट नसते ती. आपण उगाच त्याचा बाऊ करतो एवढच. आपल्याला मिळालेली अलौकिक पंचेंद्रिये, त्यांच्या शक्ति रंग, गंध, स्पर्श, चव, स्वर यावर बुद्धीचे नियंत्रण हवे. त्यांचा पुरेपूर उपयोग आपण जरूर करून घेतला पाहिजे. मिळालेल्या नैसर्गिक देणगीची जाणीव आपल्याला व्हायला हवी.
         कुठलेही काम करताना मन लावून केले की त्याचा कंटाळा येत नाही. अगदी कागदाची घडी घालताना देखील. त्यातून फक्त आनंदच मिळतो. उदाहरणच द्यायचे झाले तर डॉक्टरकडे गेल्यावर, कुठेही भल्यामोठ्या रांगेत उभे रहाताना, तास दोन तास थांबायला लागणार असेल त्याचा सदुपयोग कसा करावा याचा विचार केला तर त्या वेळेचा कंटाळा येणार नाही. त्या वेळेत गाणी ऐकणे, वाचन केले तर वेळ सार्थकी लागेल. एकदा का आपल्याला एवढा वेळ लागणार आहे ही परिस्थिति स्वीकारली की त्याचा त्रास होत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसाही असला तरी तो आपल्याला बदलता येत नाही. त्या अनुषंगाने आपण बदलले पाहिजे. कारण दुसर्‍याला बदलण्यापेक्षा आपण स्वत: बदलणे सोपे आणि श्रेयस्कर असते. दुसर्‍या व्यक्तीकडून आपण केलेली अपेक्षाच जर चुकीची असेल तर अपेक्षाभंगाचे दु:ख आपल्यालाच भोगावे लागते. आपल्याला जे हवे ते त्याच्याकडे नाही याचा स्वीकार केला तर आपण दु:खी होत नाही. ऑफिसमधल्या शिपायाने वेळेवर पाण्याचा ग्लास आणून दिला नाही म्हणून आकांडतांडव करणारे महाभाग स्वत:चेच ब्लड प्रेशर वाढवून घेत असतात. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलो, तर आयुष्यभर एकटे राहू....!  दुसर्‍याचे दोष दाखवताना एक बोट त्याच्याकडे निर्देशित असते आणि बाकी चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. ते आपल्या लक्षात फक्त येत नाही एवढेच.
        बघता बघता वर्ष संपले. काहींना नव्याने विचार करायला प्रेरणा मिळाली तर काही जणांना आपल्या अंगभूत कौशल्याचा जो विसर पडला होता त्याची जाणीव झाली. काहींना आत्मविश्वास मिळाला, तर काहींना आपल्या चुकांची जाणीव झाली, काहीनी भीतीच्या भिंती सहजपणे ओलांडल्या. जाता जाता केलेले मार्गदर्शन सत्कारणी लागलेले बघून आनंद झाला. सदराला मिळालेला प्रतिसाद मलाही खूप काही देऊन गेला. स्वप्न पहाणं, ते साकार करण हेच आपले ध्येय असायला हवे. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं! विश्वास उडाला की आशा संपते! काळजी घेण सोडल की प्रेम संपत! पुन्हा आपली भेट होईल वेगळ्या विषयांवर, वेगळ्या माध्यमातून. संवाद होणारच आहे. तेच तर माणूसपणाचे वैशिष्ट्य आहे. याचसाठी केला स्तंभप्रवास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून तूर्तास तरी BFN.
      ..........................सविता नाबर 

Published in Maharashtra Times, kolhapur edition as on 28th Dec 2016

Wednesday, 21 December 2016

आठवणींच्या झुल्यावर

     

       माणसाची सहजप्रवृत्ती असते पूर्वीच्या आठवणीत रमण्याची. ते सुद्धा वाईट गोष्टी आठवण्याकडे आपला कल असतो. गतस्मृतींमध्ये आपण सहज हरवून जातो आणि त्यावर आपल्या भावभावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला लागतात. थोडासाही मोकळा वेळ मिळाला तरी मन आठवणीत रमते. आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे. ज्या आठवणीत रमायच त्या जर कटू असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर, पर्यायाने आचरणावर पडतोच. नको म्हटले की मन तिकडेच ओढ घेते. यावरून एक गोष्ट सहजच आठवली.
          एकदा एक मनुष्य साधू महाराजांकडे गेला आणि मला अमरत्वाचा मंत्र द्या, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, म्हणून तो खनपटीलाच बसला. साधुबुवांनी त्याला अमरत्वाचा मंत्र दिला. पण त्यासाठी एक अट त्यांनी त्याला घातली. तू जेव्हा जेव्हा हा मंत्र म्हणशील तेव्हा तुझ्या नजरेसमोर पांढरा हत्ती फक्त आणू नकोस. तसे झाले तर तुझ्या तप:श्चर्येवर पाणी फिरेल. ठीक आहे म्हणून त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण साधुबुवांनी सांगितल्याप्रमाणे जे नको तेच नजरेसमोर यायला लागले. सतत पांढरा हत्तीच नजरसमोर नाचायला लागला. जेवढे आपण नको म्हणतो, करायचे नाही असे बाजवतो तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे आपले मनही त्या नकाराकडेच ओढ घेते. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत, अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. पंख असतानाही डंखाचाच विचार मनात येतो ना?
             एखाद्या व्यक्तीची आठवण निघाली की त्या व्यक्तिविषयी कटू आठवण असेल तर त्याच्या नामोल्लेखाबरोबर मनात भूतकाळातल्या कडवट स्मृति रेंगाळायला लागतात. पण जर अशा आठवणी मनातून नाहीशाच केल्या. त्यांना आपल्या स्मृतीपटलाच्या रडारवरुन नाहीसे केले की वाईट आठवणींना जागा रहात नाही. पर्यायाने चांगल्या गोष्टींसाठी आपल्या मनात भरपूर जागा मिळू शकते. आपल्याच स्मृतींकडे साक्षीभावाने एकदा का अशी पाहायची सवय झाली की वाईट आठवणी या वाईट रहातच नाहीत. किंबहुना आठवणींच्या क्षितिजावर कटुतेचा मागमूस उरत नाही.   
      विलियम वर्डस्वर्थची डॅफोडील्स ही अतिशय सुंदर, अर्थगर्भ कविता आहे.............
         निर्हेतुक मजेत भटकणार्‍या कवीला वाटते, ह्या फिरत फिरत जाणार्‍या एकट्या ढगासारखाच मीही एक पंछी अकेला आहे. असेच मग भटकत असताना एकदा त्याला एका तळ्याकाठी गर्द वृक्षराजीच्या छायेत सोनेरी रंगाच्या (पिवळ्या) डॅफोडील्सचे घोस दृष्टीस पडतात. वार्‍याच्या झुळुकीने आनंदाने ते डोलत असतात. मनाच्या उदास अवस्थेत हे दृश्य जेव्हा अंत:चक्षुसमोर येते तेव्हा मन त्या ताटव्यांच्या बरोबर डोलायला लागते. कवीला वाटते, मनाची अशी अवस्था कधीही आली तरी अशा छान गोष्टी आठवण्यामुळे कंटाळवाणा वाटणारा एकांतही सुखावह वाटायला लागतो.
       I wandered lonely as a cloud
          That floats on high o'er vales and hills,
          When all at once I saw a crowd,
          A host, of golden daffodils;
          Beside the lake, beneath the trees,
          Fluttering and dancing in the breeze.   
           For oft, when on my couch I lie
          In vacant or in pensive mood,
          They flash upon that inward eye
          Which is the bliss of solitude;
          And then my heart with pleasure fills,
          And dances with the daffodils.
      (फक्त पहिले आणि शेवटचे कडवे घेतले आहे.)
        हातात काम चालले असेल तरीही मन गतस्मृतींमध्ये रममाण होते. त्याला फक्त अटकाव करायचा असतो तो वाईट आठवणीमधे गुंतण्यापासून ! मनाचे हे वाईट विचारांचे मोहोळ थांबवायचे असेल तर आजच चांगल्या कृतींची रुजवण करूया, जेणेकरून ती उद्याची ऑर्कीडची बाग असेल. ती आपली स्वत:ची असायला पाहिजे. त्या बागेचे मालक आपणच! त्यामुळे बागेत कुठली फुलझाड लावायची हे सर्वस्वी आपल्याच मनावर. दुसर्‍यांच्या आवडीची झाडे लावून आपल्याला त्याचा आनंद किती मिळणार? मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून वाटचाल करताना बर्‍याचवेळा त्यांचा झेंडा हाती धरला जातो. किंवा कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडतो यासाठी आठवणी स्वत;च्याच असायला पाहिजेत. आपल्या भावनांना तिलांजली देऊन त्यावर दुसर्‍यांच्या इमारतींचे मजले चढवणार्‍या मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करणे उचित नाही. आठवणी चांगल्या असायला हव्या असतील तर आज मनात चिरंतन रहाणार्‍या, आपल्या मनाला भावणार्‍याच गोष्टी करायला हव्यात.
         पाडगावकरांच्या कवितेत “सांगा कस जगायच, कण्हत कण्हत की गाण म्हणत” यामध्ये थोडासा बदल करून म्हणावस वाटत, “सांगा कस जगायच, कटू आठवणीत झुरायच की गोड आठवणीत झुलायच?” आठवणींच गारुड मनावर नेहमीच असत. पण त्या कसल्या प्रकारच्या यायला हव्यात हे आपणच ठरवायचं. बर्‍याच वेळेला आपले जवळचे नातेवाईक, ओळखीचे बुजुर्ग लोक हे स्वत:ला लोकांचे आलेले कटू अनुभव ऐकवत असतात. पण कडवट आठवणींना कवटाळून बसायला आपल्याकडे तेवढा वेळही नाही. याउलट चांगल्या स्मृतींनी मात्र आपल्याला उत्साह येतो आणि त्यामुळेच तर पुढे जायला बळ मिळत.
   
            .........................सविता नाबर  

    Published in Maharashtra Time,Kolhapur edition as on 21st Dec 2016



Thursday, 15 December 2016

मागे वळून पाहताना..............

         

        का पब्लिक टेलिफोन बुथमध्ये फोन करायला एक मुलगा आला. त्याने विचारले, काका एक फोन करू का? त्या मुलाचे वागणे अगदी नम्र होते. दुकानदाराने त्याला फोन दिला आणि त्याचे बोलणे ऐकायला लागला. जुन्या डायलवाल्या फोनवर पलीकडचे बोलणेही कधी कधी स्पष्ट ऐकायला येत असे. तो दुकानदार कान देऊन ऐकायला लागला. “बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का? नको. मी दोन महिन्यापूर्वीच एकाला कामासाठी ठेवले आहे.” “बाई, मला खुप गरज आहे, तुम्ही त्याला देत असलेल्या पगाराच्या अर्ध्या पगारात मी काम करायला तयार आहे.” “पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे.” “तुमच्या बागकामाबरोबरच घरातले कामही मी फुकट करेन. त्याचे पैसे घेणार नाही.” “तरीही नको. तू दुसरीकडे काम पहा.”
      एवढे झाल्यावर तो हसत निघाला. दुकानदाराला आश्चर्य वाटले. तो त्या मुलाला म्हणाला, तुझी कष्ट करण्याची तयारी आहे, तुझा स्वभावही मला आवडला. तू माझ्याकडेच कामाला का राहत नाहीस? त्यावर तो मुलगा म्हणाला, “मी त्या बाईंकडे काम मागत नव्हतो तर मी स्वत:चे काम तपासत होतो. मीच त्यांच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकांना आवडते का, पसंत पडते का हे पाहत होतो.” आत्मपरीक्षणाचे असेच आहे. आपण स्वत: कोण आहे आणि आपण करतो ते काम परफेक्ट होते की नाही ते पहाणे जास्त महत्वाचे. यासाठी वेळोवेळी स्वत:ची तपासणी, चाचपणी करणे आवश्यक असते. जेव्हा स्वत:कडे तटस्थपणे आपण पाहतो तेव्हा हे लक्षात येते. तटस्थ म्हणजे तटावरून आपल्या स्थितीकडे पहाणे.  
      आत्मपरीक्षण म्हणजे थोडक्यात स्वत:चे मूल्यमापन करणे. स्वत;चे योग्यप्रकारे मूल्यमापन करता येणे ही फार मोठी गोष्ट आहे. कित्येकाना ते जमत नाही. कितीतरी लोक बदकांच्या थव्यात सापडलेल्या राजहंसाच्या पिलाप्रमाणे असतात. पाण्यात पाहिल्यावरच त्याना कळते आपण राजहंस आहोत. आत्मविश्वासाची नवी जाणीव होते. आणि ती जाणीव त्यांचे संपूर्ण जीवन बदलणारी असते. माणसाला जेव्हा स्वत:ची किंमत समजते, तेव्हा त्याला त्याच्या अंतरंगातूनच अपार सामर्थ्य मिळते. आत्मपरीक्षणातून दोष समजतात. आपण कुठे कमी पडतो आहे हे लक्षात येते. जेव्हा एखाद्या माणसाने फसवले असे आपण म्हणतो, तेव्हा आपल्यातला लोभ हा दोष त्याला कारणीभूत असू शकतो. नोटा दुप्पट करून देतो म्हणून फसवले असे जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा हा दोष त्याच्या स्वत:मध्ये असतो.
     एकदा मुल्ला नसरुद्दीनला रस्त्यात काहीतरी शोधताना लोकांनी पाहिले आणि विचारले, “मुल्ला तुम्ही काय शोधताय?” “ सोन्याची नाणी शोधतोय.” मुल्लानी उत्तर दिले. आम्हीही तुम्हाला शोधण्यासाठी मदत करू म्हणून तेही शोधायला लागले. बराच वेळ शोध घेतल्यावरही नाणी सापडली नाहीत म्हणून लोकांनी त्याला  विचारले, नाणी नक्की कुठे पडली? मुल्लाने अंधारातल्या आपल्या घराकडे बोट दाखवत म्हटले, तिकडे माझ्या घरात. ग्रामस्थ त्याच्या उत्तराला हसायला लागले. जर सोन्याची नाणी घरात गहाळ झाली आहेत तर इतक्या दूर बाहेर का शोधताय? त्यावर मुल्लानी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. “ कारण माझ्या घरातल्यापेक्षा इथे उजेड भरपूर आहे. हसू नका. तुम्ही सर्वजण असेच तर वागत असता, तुमच्या आतल्या, मनातल्या प्रश्नांना बाहेरचा उपचार शोधत असता.”
      आत्मपरीक्षणामधे स्वत:ला सुधारण्यासाठी कधी कधी आत्मप्रतिमा उंचावणे गरजेचे असते. यासाठी उत्तमाची रोजिनिशी लिहिली तर फायद्याचे ठरते. जागतिक ख्यातीचा बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद याने उत्तमाची रोजिनिशी लिहिण्याचे तंत्र आत्मसात करून ते घवघवीत यश मिळवण्यासाठी वापरले. आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी ही रोजिनिशी आहे. याला बायोडेटा ट्रेनिंग म्हणतात. बायोडेटामधे जसे दुसर्‍यावर छाप टाकायला लिहितो तसेच हे स्वत:वर छाप टाकायला लिहायचे. पूर्वी आपल्या हातून जे आनंददायक घडले असेल ते आठवून वर्णन केल्यावर भूतकाळातल्या उत्तम स्मृति हे शब्दांकन करताना जाग्या होतात. त्यांचे मनात चित्रण होत राहते. पुन्हा जेव्हा या नोंदी आपण वाचतो, तेव्हा या स्मृतींचे चित्रण आठवून त्याचा चांगला फायदा होतो.
    योगाभ्यास करताना एक तंत्र आम्ही शिकलो होतो. त्याला रिफ्लेक्शन टेक्निक म्हणतात. रात्री बिछान्यावर पडण्यापूर्वी दिवसभरात आपण काय काय केले हे क्रमाने आठवणे. यामुळे आपली स्मृति वाढण्यास मदत होतेच. शिवाय आपण दिवसभरात काय काय केले याचा संगतवार विचार केल्याने आपल्या आचरणात, विचारात बदल करणे शक्य होते. अगदी रोजच्या रोज नाही जमले तरी ठराविक दिवसानी एकदा तरी हे मागे वळून पहाणे आवश्यक असते. स्वत:च्या विचारांचा, आपण कसे वागलो, बोललो ते जाणीवपूर्वक न्याहाळण्याचा हा एक प्रयत्न असतो. यामधे आपल्यातील दोष जाणवल्यामुळे स्वत:ला कोसायचे नसते तर न्युनगंड न बाळगता सुधारणा करण्यासाठी स्वत:ला दिलेली ती एक संधी असते. दैनंदिनी लिहिण्यातून हा आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला चोखाळता येतो. ते सहज शक्यही आहे. दुसर्‍या कुणी आपले दोष दाखवण्यापेक्षा आपणच आपले परीक्षण त्रयस्थ नजरेतून केले तर काय वाईट?  
     .........................सविता नाबर

Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 14th Dec 2016