एका पब्लिक टेलिफोन बुथमध्ये फोन करायला एक
मुलगा आला. त्याने विचारले,
काका एक फोन करू का? त्या मुलाचे वागणे अगदी नम्र होते.
दुकानदाराने त्याला फोन दिला आणि त्याचे बोलणे ऐकायला लागला. जुन्या डायलवाल्या
फोनवर पलीकडचे बोलणेही कधी कधी स्पष्ट ऐकायला येत असे. तो दुकानदार कान देऊन
ऐकायला लागला. “बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला
द्याल का? “नको. मी दोन महिन्यापूर्वीच
एकाला कामासाठी ठेवले आहे.” “बाई, मला खुप गरज आहे, तुम्ही त्याला देत असलेल्या पगाराच्या अर्ध्या पगारात मी काम करायला तयार
आहे.” “पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी
आहे.” “तुमच्या बागकामाबरोबरच घरातले कामही मी फुकट करेन. त्याचे पैसे घेणार
नाही.” “तरीही नको. तू दुसरीकडे काम पहा.”
एवढे झाल्यावर तो हसत निघाला. दुकानदाराला
आश्चर्य वाटले. तो त्या मुलाला म्हणाला,
तुझी कष्ट करण्याची तयारी आहे, तुझा स्वभावही मला आवडला. तू
माझ्याकडेच कामाला का राहत नाहीस? त्यावर तो मुलगा म्हणाला, “मी त्या बाईंकडे काम मागत नव्हतो तर मी स्वत:चे काम तपासत होतो. मीच
त्यांच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकांना आवडते का, पसंत पडते का हे पाहत होतो.” आत्मपरीक्षणाचे असेच आहे. आपण स्वत: कोण आहे
आणि आपण करतो ते काम परफेक्ट होते की नाही ते पहाणे जास्त महत्वाचे. यासाठी
वेळोवेळी स्वत:ची तपासणी, चाचपणी करणे आवश्यक असते. जेव्हा
स्वत:कडे तटस्थपणे आपण पाहतो तेव्हा हे लक्षात येते. तटस्थ म्हणजे तटावरून आपल्या
स्थितीकडे पहाणे.
आत्मपरीक्षण म्हणजे थोडक्यात स्वत:चे
मूल्यमापन करणे. स्वत;चे योग्यप्रकारे मूल्यमापन करता
येणे ही फार मोठी गोष्ट आहे. कित्येकाना ते जमत नाही. कितीतरी लोक बदकांच्या
थव्यात सापडलेल्या राजहंसाच्या पिलाप्रमाणे असतात. पाण्यात पाहिल्यावरच त्याना
कळते आपण राजहंस आहोत. आत्मविश्वासाची नवी जाणीव होते. आणि ती जाणीव त्यांचे
संपूर्ण जीवन बदलणारी असते. माणसाला जेव्हा
स्वत:ची किंमत समजते,
तेव्हा त्याला त्याच्या अंतरंगातूनच अपार सामर्थ्य मिळते. आत्मपरीक्षणातून दोष
समजतात. आपण कुठे कमी पडतो आहे हे लक्षात येते. जेव्हा एखाद्या माणसाने फसवले असे आपण
म्हणतो, तेव्हा आपल्यातला लोभ हा दोष त्याला कारणीभूत असू
शकतो. नोटा दुप्पट करून देतो म्हणून फसवले असे जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा हा दोष त्याच्या
स्वत:मध्ये असतो.
एकदा मुल्ला नसरुद्दीनला रस्त्यात काहीतरी
शोधताना लोकांनी पाहिले आणि विचारले, “मुल्ला तुम्ही काय शोधताय?” “ सोन्याची नाणी
शोधतोय.” मुल्लानी उत्तर दिले. आम्हीही तुम्हाला शोधण्यासाठी मदत करू म्हणून तेही
शोधायला लागले. बराच वेळ शोध घेतल्यावरही नाणी सापडली नाहीत म्हणून लोकांनी त्याला
विचारले, नाणी नक्की कुठे पडली? मुल्लाने
अंधारातल्या आपल्या घराकडे बोट दाखवत म्हटले, तिकडे माझ्या घरात. ग्रामस्थ त्याच्या
उत्तराला हसायला लागले. जर सोन्याची नाणी घरात गहाळ झाली आहेत तर इतक्या दूर बाहेर
का शोधताय? त्यावर मुल्लानी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. “ कारण माझ्या
घरातल्यापेक्षा इथे उजेड भरपूर आहे. हसू नका. तुम्ही सर्वजण असेच तर वागत असता, तुमच्या आतल्या, मनातल्या प्रश्नांना
बाहेरचा उपचार शोधत असता.”
आत्मपरीक्षणामधे
स्वत:ला सुधारण्यासाठी कधी कधी आत्मप्रतिमा उंचावणे गरजेचे असते.
यासाठी उत्तमाची रोजिनिशी लिहिली तर फायद्याचे ठरते. जागतिक ख्यातीचा बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद याने उत्तमाची
रोजिनिशी लिहिण्याचे तंत्र आत्मसात करून ते घवघवीत यश मिळवण्यासाठी वापरले.
आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी ही रोजिनिशी आहे. याला बायोडेटा ट्रेनिंग म्हणतात.
बायोडेटामधे जसे दुसर्यावर छाप टाकायला लिहितो तसेच हे स्वत:वर छाप टाकायला
लिहायचे. पूर्वी आपल्या हातून जे आनंददायक घडले असेल ते आठवून वर्णन केल्यावर भूतकाळातल्या
उत्तम स्मृति हे शब्दांकन करताना जाग्या होतात. त्यांचे मनात चित्रण होत राहते.
पुन्हा जेव्हा या नोंदी आपण वाचतो, तेव्हा या स्मृतींचे चित्रण आठवून त्याचा
चांगला फायदा होतो.
योगाभ्यास करताना एक तंत्र
आम्ही शिकलो होतो. त्याला रिफ्लेक्शन टेक्निक म्हणतात. रात्री बिछान्यावर पडण्यापूर्वी
दिवसभरात आपण काय काय केले हे क्रमाने आठवणे. यामुळे आपली स्मृति वाढण्यास मदत
होतेच. शिवाय आपण दिवसभरात काय काय केले याचा संगतवार विचार केल्याने आपल्या
आचरणात,
विचारात बदल करणे शक्य होते. अगदी रोजच्या रोज नाही जमले तरी ठराविक दिवसानी एकदा
तरी हे मागे वळून पहाणे आवश्यक असते. स्वत:च्या विचारांचा, आपण कसे वागलो, बोललो ते
जाणीवपूर्वक न्याहाळण्याचा हा एक प्रयत्न असतो. यामधे आपल्यातील दोष जाणवल्यामुळे स्वत:ला
कोसायचे नसते तर न्युनगंड न बाळगता सुधारणा करण्यासाठी स्वत:ला दिलेली ती एक संधी
असते. दैनंदिनी लिहिण्यातून हा आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला चोखाळता येतो. ते
सहज शक्यही आहे. दुसर्या कुणी आपले दोष दाखवण्यापेक्षा आपणच आपले परीक्षण त्रयस्थ
नजरेतून केले तर काय वाईट?
.........................सविता नाबर
Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 14th Dec 2016
No comments:
Post a Comment