Wednesday, 7 December 2016

सर्व काही मनावर

     

      अगदी दैनंदिन व्यवहारातले उदाहरण पहा. आपल्या समोर हिरवीगार करकरीत कैरी कापली आहे. त्याला मस्त तिखटमिठ लावले आहे. किंवा गाभुळलेल्या चिंचांचे आकडे पडलेत. वरच टरफल काढल्यावर काय होत? आता या क्षणीही तुमच्या तोंडाला पाणी सुटलय. भलेही तुम्हाला कैरी किंवा चिंच आवडो न आवडो. डोक्यात विचार यायचा अवकाश की शरीर ते काम करायला लागते. मनाचा आणि शरीराचा हा असा जवळचा संबंध असतो. आपले मन काही पाहू शकत नाही पण जे आपण बाह्य चक्षूनी बघतो त्याचा असर मनावर होतो आणि पर्यायाने शरीरावर. यासाठी मनाचे प्रोग्रामिंग करणे आवश्यक असते जेणेकरून त्याचा सकारात्मक उपयोग होऊन आपल्या व्यक्तित्व विकासाला चालना मिळेल. एखादा तोच तोच विचार सातत्याने केल्याने आपल्या अंतर्मनात तो खोलवर रुतून बसतो. त्याला मनाचे प्रोग्रामिंग म्हणतात. हे आपल्या विचारांच्या जाळ्यामुळेच विणले जाते. सकारात्मक विचार असतील तर सकारात्मक आणि नकारात्मक विचार असतील तर नकारात्मक प्रोग्रामिंग होते. माझ्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे, मी ही गोष्ट नक्की करू शकेन असे आपण कल्पिले तर आपल्या प्रत्येक गोष्टीतून आत्मविश्वास झळकायला लागतो. हे झाले सकारात्मक प्रोग्रामिंग.  
      आपले मन अत्यंत सामर्थ्यवान असते. पण या मनाच्या सामर्थ्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करायला हवा. एक घडलेले उदाहरण सांगते. एक स्त्री बरीच वर्षे आजारी होती. ती सतत झोपून असायची. तिच्यामध्ये उठण्याची ताकद नव्हती. एक दिवस तिच्या घराला अचानक आग लागली. तिचा पतीही त्यावेळी घरी नव्हता. आणि मुले वरच्या मजल्यावर झोपली होती. तिने ती आग पाहिली आणि लोकांना गोळा करण्यासाठी आरडा ओरडा करायला लागली. मुले संकटात आहेत हे पाहिल्यावर तिच्या अंगात कुठले सामर्थ्य संचारले कुणास ठाऊक. पण ताडकन बिछ्यान्यातून उठली आणि तिने मुलांना वाचवले. खर पाहिलं तर तिच्या अंगात पूर्वी इतकीच कमी ताकद होती. पण जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ ठरली तेव्हा त्या इच्छेने शारीरिक असामर्थ्यावर मात केली. म्हणजे ताकद सुप्तावस्थेत होती. पण तिचा वापर करण हे सर्वस्वी मनाच्या इच्छेवर होते. निसर्गाने हे सामर्थ्य प्रत्येकालाच दिले आहे. पण ते वापरायचे किती हे मात्र मनावर असते. आपल्याला होणारा शारीरिक त्रास हा बर्‍याचवेळा मनावर अवलंबून असतो. म्हणून मनाची शक्ति वाढवणे आपल्या हातात असते. म्हणून नेहमी मन बळकट आणि प्रसन्न ठेवणे अतिशय आवश्यक असते. मनात नसेल तर हातून काहीच होत नाही. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण.
     रोज सकाळी उशिरा उठणारी व्यक्ति एखाद्या दिवशी महत्वाच्या मिटिंगला लवकर जायचे असेल, ट्रीपला जायचे असेल, घरी काही कार्यक्रम असेल तर गजर न लावताही लवकर उठू शकते. कारण अंतर्मन रात्री झोपतानाच त्या व्यक्तिला बजावते उद्या सकाळी तुला लवकर उठायचे आहे. जर आपण उत्तम रिझल्ट्सचे स्वप्न पाहिले तर अंतर्मन तथास्तु म्हणते. आणि त्यादृष्टीने कामाला लागते. म्हणजे सर्व सकारात्मक गोष्टी मनात सुचायला लागतात. आणि प्रगतीच्या दिशेनं आपले पाऊल पडते. आपल्या शंकेखोर मनातल्या प्रत्येक शंकेच निरसन आपले मनच करू शकते. प्रत्येक गोष्ट बदलण्याची आपल्यात शक्ति आहे. दुसर्‍याच्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. त्याला हे शक्य नाही, तिला हे जमणार नाही, त्याची कुवत काय?, अशा प्रकारच्या बोलण्याचा आपल्यावर इतका गाढ परिणाम होत असतो की लोकांचे बोलणे आपण कळत नकळत खरेच मानायला लागतो. असे नकारात्मक बोलणे कानाआड करणे चांगले. अगदी साध मनावर परिणाम करणार उदाहरण सांगते. समोर ठेवलेल्या ग्लासमधले पाणी तुम्ही प्यायलात आणि थोड्या वेळाने तुमच्या मित्राने सांगितले त्या पाण्यात पाल पडली होती. तुमची अवस्था काय होईल? मनातल्या मनात त्या पाण्यातले पालीचे विष ऊतरुन तुमच्या पोटात गेलेच म्हणून समजा.
       एकदा एक शेतकरी वासरू विकत घेऊन त्याला खांद्यावर बसवून चालला होता. तिघा चोरांनी त्याला जाताना पाहून ते वासरू हडप करण्याच्या उद्देशाने त्याला बहकवायला सुरुवात केली. पहिला चोर त्याच्या जवळ येऊन म्हणाला कुत्र्याला कशाला तुमच्या खांद्यावर बसवलय? शेतकरी म्हणाला हे कुत्रं नाही, वासरू आहे. चोर म्हणाला कुत्र्याला कधीपासून वासरू म्हणायला लागला? दूसरा आला त्यानेही तसेच म्हटले. त्यावेळी शेतकर्‍याच्या मनात शंका आली. त्याने वासराला खाली उतरवले. तोपर्यंत तिसरा चोर आला. त्यानेही वासराला कुत्रेच म्हटले. शेतकर्‍याला आता मात्र खरच वाटायला लागलं की मला फसवल नाही ना ! गावातल्या लोकांनी मला वेड्यात काढलं तर! त्याने वासरू रस्त्यातच सोडून दिले. चोरांचे फावले. त्यांनी ते वासरू घेऊन पोबारा केला.  
    एकदा सिंह दाखवायला आई तिघा मुलांना घेऊन येते. पहिला घाबरतो, आईच्या पायाला मिठी मारून घरी चल म्हणतो, दूसरा टक लावून पहातो पण चेहरा घाबरलेला, तिसरा मात्र धीटपणे म्हणतो, मी नाही घाबरत सिंहाला. तीन व्यक्तींच्या तीन प्रतिक्रिया आहेत. पण त्या तीन प्रकारची मनाची प्रक्रिया दाखवतात. आपण कुठल्या प्रकारात मोडायचे हे आपण ठरवायचे.
     ...........................सविता नाबर

Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 7th Dec 2016

 

No comments:

Post a Comment