Wednesday, 21 December 2016

आठवणींच्या झुल्यावर

     

       माणसाची सहजप्रवृत्ती असते पूर्वीच्या आठवणीत रमण्याची. ते सुद्धा वाईट गोष्टी आठवण्याकडे आपला कल असतो. गतस्मृतींमध्ये आपण सहज हरवून जातो आणि त्यावर आपल्या भावभावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला लागतात. थोडासाही मोकळा वेळ मिळाला तरी मन आठवणीत रमते. आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे. ज्या आठवणीत रमायच त्या जर कटू असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर, पर्यायाने आचरणावर पडतोच. नको म्हटले की मन तिकडेच ओढ घेते. यावरून एक गोष्ट सहजच आठवली.
          एकदा एक मनुष्य साधू महाराजांकडे गेला आणि मला अमरत्वाचा मंत्र द्या, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, म्हणून तो खनपटीलाच बसला. साधुबुवांनी त्याला अमरत्वाचा मंत्र दिला. पण त्यासाठी एक अट त्यांनी त्याला घातली. तू जेव्हा जेव्हा हा मंत्र म्हणशील तेव्हा तुझ्या नजरेसमोर पांढरा हत्ती फक्त आणू नकोस. तसे झाले तर तुझ्या तप:श्चर्येवर पाणी फिरेल. ठीक आहे म्हणून त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण साधुबुवांनी सांगितल्याप्रमाणे जे नको तेच नजरेसमोर यायला लागले. सतत पांढरा हत्तीच नजरसमोर नाचायला लागला. जेवढे आपण नको म्हणतो, करायचे नाही असे बाजवतो तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे आपले मनही त्या नकाराकडेच ओढ घेते. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत, अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. पंख असतानाही डंखाचाच विचार मनात येतो ना?
             एखाद्या व्यक्तीची आठवण निघाली की त्या व्यक्तिविषयी कटू आठवण असेल तर त्याच्या नामोल्लेखाबरोबर मनात भूतकाळातल्या कडवट स्मृति रेंगाळायला लागतात. पण जर अशा आठवणी मनातून नाहीशाच केल्या. त्यांना आपल्या स्मृतीपटलाच्या रडारवरुन नाहीसे केले की वाईट आठवणींना जागा रहात नाही. पर्यायाने चांगल्या गोष्टींसाठी आपल्या मनात भरपूर जागा मिळू शकते. आपल्याच स्मृतींकडे साक्षीभावाने एकदा का अशी पाहायची सवय झाली की वाईट आठवणी या वाईट रहातच नाहीत. किंबहुना आठवणींच्या क्षितिजावर कटुतेचा मागमूस उरत नाही.   
      विलियम वर्डस्वर्थची डॅफोडील्स ही अतिशय सुंदर, अर्थगर्भ कविता आहे.............
         निर्हेतुक मजेत भटकणार्‍या कवीला वाटते, ह्या फिरत फिरत जाणार्‍या एकट्या ढगासारखाच मीही एक पंछी अकेला आहे. असेच मग भटकत असताना एकदा त्याला एका तळ्याकाठी गर्द वृक्षराजीच्या छायेत सोनेरी रंगाच्या (पिवळ्या) डॅफोडील्सचे घोस दृष्टीस पडतात. वार्‍याच्या झुळुकीने आनंदाने ते डोलत असतात. मनाच्या उदास अवस्थेत हे दृश्य जेव्हा अंत:चक्षुसमोर येते तेव्हा मन त्या ताटव्यांच्या बरोबर डोलायला लागते. कवीला वाटते, मनाची अशी अवस्था कधीही आली तरी अशा छान गोष्टी आठवण्यामुळे कंटाळवाणा वाटणारा एकांतही सुखावह वाटायला लागतो.
       I wandered lonely as a cloud
          That floats on high o'er vales and hills,
          When all at once I saw a crowd,
          A host, of golden daffodils;
          Beside the lake, beneath the trees,
          Fluttering and dancing in the breeze.   
           For oft, when on my couch I lie
          In vacant or in pensive mood,
          They flash upon that inward eye
          Which is the bliss of solitude;
          And then my heart with pleasure fills,
          And dances with the daffodils.
      (फक्त पहिले आणि शेवटचे कडवे घेतले आहे.)
        हातात काम चालले असेल तरीही मन गतस्मृतींमध्ये रममाण होते. त्याला फक्त अटकाव करायचा असतो तो वाईट आठवणीमधे गुंतण्यापासून ! मनाचे हे वाईट विचारांचे मोहोळ थांबवायचे असेल तर आजच चांगल्या कृतींची रुजवण करूया, जेणेकरून ती उद्याची ऑर्कीडची बाग असेल. ती आपली स्वत:ची असायला पाहिजे. त्या बागेचे मालक आपणच! त्यामुळे बागेत कुठली फुलझाड लावायची हे सर्वस्वी आपल्याच मनावर. दुसर्‍यांच्या आवडीची झाडे लावून आपल्याला त्याचा आनंद किती मिळणार? मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून वाटचाल करताना बर्‍याचवेळा त्यांचा झेंडा हाती धरला जातो. किंवा कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडतो यासाठी आठवणी स्वत;च्याच असायला पाहिजेत. आपल्या भावनांना तिलांजली देऊन त्यावर दुसर्‍यांच्या इमारतींचे मजले चढवणार्‍या मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करणे उचित नाही. आठवणी चांगल्या असायला हव्या असतील तर आज मनात चिरंतन रहाणार्‍या, आपल्या मनाला भावणार्‍याच गोष्टी करायला हव्यात.
         पाडगावकरांच्या कवितेत “सांगा कस जगायच, कण्हत कण्हत की गाण म्हणत” यामध्ये थोडासा बदल करून म्हणावस वाटत, “सांगा कस जगायच, कटू आठवणीत झुरायच की गोड आठवणीत झुलायच?” आठवणींच गारुड मनावर नेहमीच असत. पण त्या कसल्या प्रकारच्या यायला हव्यात हे आपणच ठरवायचं. बर्‍याच वेळेला आपले जवळचे नातेवाईक, ओळखीचे बुजुर्ग लोक हे स्वत:ला लोकांचे आलेले कटू अनुभव ऐकवत असतात. पण कडवट आठवणींना कवटाळून बसायला आपल्याकडे तेवढा वेळही नाही. याउलट चांगल्या स्मृतींनी मात्र आपल्याला उत्साह येतो आणि त्यामुळेच तर पुढे जायला बळ मिळत.
   
            .........................सविता नाबर  

    Published in Maharashtra Time,Kolhapur edition as on 21st Dec 2016



No comments:

Post a Comment