ऐंशी वर्षांचे वृद्ध गृहस्थ
कोकणातून मुंबईला नातवाच्या लग्नासाठी आले. बरोबर मुलगा आणि सून. पण ते एकटेच
दुसर्याच स्टेशनवर ढकलले गेले. मुंबईच्या लोकलच्या गर्दीत हरवून गेले. त्यात
ऐकायलाही कमी येत होते. भांबावलेल्या आजोबांना काही कळेचना. पण एका सज्जन
गृहस्थाने ( त्याचे नाव वीरप्पन. त्यावेळी चन्दन तस्कर वीरप्पन आपल्या नावामुळे
कुख्यात झाला होता.)त्यांना आपल्या अर्ध्या खोलीच्या घरात नेले. त्यांना खायला
प्यायला दिले. आणि त्यांच्या विश्रांतीची सोय केली. त्यांच्याजवळ जपून आणलेली काही
रक्कम होती. ती आपल्या सेफ कस्टडीत ठेवली. आणि त्यांच्या नातेवाईकांचा शोध घ्यायला
लागला. आजोबांना पत्ता धडपणे सांगता येत नव्हता. पण त्यांच्याकडच्या छोट्याशा
डायरीत त्यांच्या लेकाचा ऑफिसचा खूप जुना फोन नंबर होता. त्यावरून त्याने त्या
लेकाची चौकशी सुरू केली. असे करता करता सकाळी हरवलेल्या आजोबाना संध्याकाळी सातला
सुखरूप त्यांच्या घरी त्यांच्या पुंजीसहित त्या गृहस्थाने पोचवले. घरच्यांनी देऊ
केलेली बक्षिसीही घेतली नाही. हा देवदूत दिसायला अगदीच सामान्य, काळा
कुरूप, उंचीने ठेंगणा होता. आजोबा व्यवस्थित घरी आले म्हणून
सगळ्यांनीच नि:श्वास सोडला. कारण घरची मंडळी काळजीत होती. परवा दिवशी लग्न होते. लग्नघरात
एक वयस्क बाई होत्या. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेल्या. त्यांनी त्या वीरप्पनला बघून
नाक मुरडले. आपल्याच तोर्यात त्या त्याच्या समोरून निघून गेल्या. पण आजोबांची
छोटी नात म्हणाली, काकू अशी का बघत गेलीस विरप्पनकडे? त्यांनीच तर आपल्या आजोबांना घरी आणून सोडले ना? एका
मोठ्या वयाच्या स्त्रीला लहान मुलीने शिकवले होते. माणसाच्या बाह्यरुपापेक्षा
त्याच्या माणुसकीला जोखले होते. हा प्रसंग होता माझ्या भावाच्याच विवाहाच्यावेळचा.
वीरप्पन हा रेल्वेतला पोर्टर होता.
प्रत्येकजण आपल्या जागी श्रेष्ठच
असतो. आपल्या कमी लेखण्याने कुणाचीही किंमत कमी होत नाही. अनेक वर्षे गुरुजींच्या घरी अभ्यास पूर्ण करून
विद्यार्थी घरी परत निघाला. गरीबाघरचा होता. सकाळी गुरुजींना नमस्कार केला.
म्हणाला, " गुरुजी,
दक्षिणा काय देऊ ? म्हणाले," रानात
जा. मला मुठभर वाया गेलेला पाचोळा आण दक्षिणा म्हणून. " विद्यार्थी रानात गेला. भाताच्या
खाचराच्या बांधाला सुकलेल्या
पानांचा ढिग होता. त्यानं पानं उचलली. झोळीत टाकली. रानाचा मालक धावत आला." माजा पाचूळा
टाक. त्याचा जाळुन राब क्येला की भात
अक्षी जोमात उगवतंय.."चेल्यानं
पानं परत ढिगात टाकली. गुरुजींचे शब्द
आठवले. वाया गेलेली पानं. तो तसाच चालत राहिला. डोळे उघडे ठेवून सगळीकडे
निरखत होता, कुठं पाचोळा मिळतोय का. पण वाया गेलेली पानं मिळत नव्हती. ओढ्यात वहात वहात पान चाललं होतं. त्यावरही चार मुंग्या भेदरून जीव वाचवत थांबल्या
होत्या. एक
भलं मोठं पान ओढत मुंग्या वारुळात नेत होत्या. एक पान पिकून गेलं होतं. वाऱ्यावर
झुलत होतं. त्यानं तोडायला हात पुढं
केला पण तो थांबला. त्या पानाच्या मागे
नव्या पानाचा एक हिरवा कोंब वाढत होता. तो
किड्यांमुंग्यांपासून वाचवण्यासाठी पिकलं पान अजून तिथं थांबलं
होतं. त्या पानांतील कण मुंग्यांनी नेले होते. पानाला जाळी पडली होती. संध्याकाळी दमलेला तरुण मान खाली घालून
आश्रमात रिकाम्या हातांनी परतला." गुरुजी,
रानात एकही वाया गेलेलं पान मला मिळालं
नाही."गुरुजी म्हणाले ," मला दक्षिणा मिळाली. जा. जग फार मोठं आहे. तिथं वाया काही
जात नाही,” प्रत्येक गोष्टीला किंमत असते. म्हणून आपण एखाद्या
व्यक्तीकडे क:पदार्थ म्हणून पाहिले की त्यावर आपली लायकी ठरते. समोरच्याची नाही.
बादशहाने जेव्हा सगळ्यात श्रेष्ठ हत्यार कोणते हा प्रश्न विचारला तेव्हा
दरबारातील प्रत्येकाने वेगवेगळे हत्यार श्रेष्ठ असे सांगितले. पण बिरबलाचे म्हणणे
आपल्या हातात ऐनवेळी जे हत्यार असेल तेच श्रेष्ठ. एकदा एक पिसाळलेला हत्ती
सैरावैरा धावत सुटला. लोक घाबरून पळायला लागले. काय करावे कुणालाच काही सुचेना.
इतक्यात जवळच उभा असलेला सामान्य माणूस, हत्ती अंगावर येतोय म्हटल्यावर
त्याने शेजारीच असलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले आणि हवेत गरागरा फिरवून हत्तीवर
भिरकावले. त्याबरोबर हत्तीला काय झाले हे न समजल्याने एकदम बावचळला आणि मागे वळला.
त्याला लगेच साखळदंडाने बांधण्यात आले. एक किरकोळ कुत्रेही माणसाचा जीव वाचवू
शकले.
उच्चपदावरून पायउतार झाल्यावर लोक विचारत
नाहीत. साधी चौकशीही करत नाहीत. हा तर कित्येकजणांचा अनुभव असेल. कारण खुर्चीवर
असताना त्या वरिष्ठ पदामुळे लोकांना तुच्छ लेखायची सवय असते. पण तरीही त्यावेळी
लोक मान देत असतात. तो त्या पदाचा, खुर्चीचा मान असतो. कधी कधी
कामवाली, भाजीवाली, कचरेवाला यांना काही
व्यक्ति एकेरी हाक मारतात. तर काही लोक त्यांच्याशी बहुमानार्थी बोलत असूनही
नजरेतली त्या व्यक्तींविषयीची तुच्छता
जाणवत असते. आपल्या देहबोलीतून समोरच्याला हे नक्कीच जाणवत असते. भलेही तो
कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातला असो. जेव्हा आपण दुसर्याविषयी
आदर दाखवतो, तेव्हाच आपल्यालाही आदर मिळतो. कधी कधी दोन
गोष्टी आपणहून गोडपणे बोलल्या तर आपली कामेही चुटकीसरशी होऊन जातात. याचा अनुभव
नक्कीच घ्या.
....................सविता नाबर Published in Maharashtra Times, Kolhapur edition as on 30th Nov.2016
No comments:
Post a Comment