पतंगाच्या पाठोपाठ पळतापळता त्याच्या हातात मांज्याऐवजी आली जीवंत विजवाहक तार. आणि दोन्ही हाताने पकडलेली ती तार त्याचे हातच घेऊन गेली. वयाच्या सातव्या वर्षी आईवडिलांच्या बरोबर घरात रहाणारा तो, रस्त्यावर कसा आला हे त्याला आठवत नाही. बाकीच्या मुलांप्रमाणे तोही रस्त्यावर राहायला लागला. अवघा सात वर्षाचा. खांद्यापासून दोन्ही हात नसलेला मुलगा, भीक मागतोय आणि मुंबई सीएसटीच्या प्लॅटफॉर्मवर पायाच्या दोन बोटांमधे सिगरेट धरून ती ओढतोय. डोळ्यासमोर हे दृश्य आणायलाही कठीण. सपोर्ट (Society Undertaking Poor People's Onus For Rehabilitation)ग्रुपच्या सुजाता मॅडमनी त्याला बघितले आणि त्याच्या अंगातली हुशारी ओळखली. जो मुलगा पायाने सिगरेट ओढतो आहे तो लिहू पण शकेल. त्याला शिकवले पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला सपोर्टच्या ऑफिसमध्ये आणल. अत्यंत मुश्किलीने त्याची ती वाईट सवय सोडवली. शाळेतले सगळे विषय त्याला शिकण्यासाठी मोह घालायला लागले. दहावीला त्याला 71 टक्के गुण मिळाले. तो उत्तम सॉकर खेळतो. बुद्धिबळ आणि कॅरमही खेळतो. पूर्णपणे स्वावलंबी असलेला तो आज कोल्हापुरात शासकीय तंत्रनिकेतनमधे शिकतो आहे. बुद्धीची देवता त्याच्यावर प्रसन्न आहे आणि कष्टाची त्याला पर्वा नाही. मग यश आपोआपच त्याच्यामागे चालत आले तर नवल नाही! ही असामान्य कथा आहे राजेश पिल्ले याची! तपश्चर्या, कुठलीही गोष्ट तडीस नेऊन ती पार पडण्याची मानसिकता, कष्ट करण्याची जबरदस्त तयारी, जीवनाकडे आशावादी नजरेने पाहण्याची दृष्टी, सकारात्मक दृष्टीकोन. काय नाही राजेशकडे? दैनंदिन आयुष्यात मला काय मिळाले नाही याकडे वळणारी आपली दृष्टी या घटनेने खचितच लज्जित होईल. गम की अंधेरी रात मे दिल को न बेकरार कर, वो सुबह जरूर आयेगी, सुबह का इंतजार कर. मनातल्या अंधाराला पळवून लावण्यासाठी स्वत:च्या जाणिवेची इवलीशी दिवली लावली तरी पुरे!!
सुबह का इंतजार करताना रोजच्या रहाटगाडग्यात, कामाच्या घाईगर्दीत स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे. कारण आयुष्य खुप सुन्दर आहे. म्हणूनच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. स्वत;वर प्रेम केल तरच आपण दुसर्यावर प्रेम करू शकणार. सोशल मीडियामध्ये लोकांशी संवाद साधतो. पण अंतर्नादाचे काय? तो हरवू न देता, संवाद साधायला हवा, मनाशी आणि शरीराशी. शरीर काय बोलत आहे आणि मन काय सांगत आहे याची दखल घेतली की आपोआप दुसर्यांशीसुद्धा संवाद साधण सोप जात. हेच असते मनन आणि चिंतन. फार काही गंभीर गोष्ट नसते ती. आपण उगाच त्याचा बाऊ करतो एवढच. आपल्याला मिळालेली अलौकिक पंचेंद्रिये, त्यांच्या शक्ति रंग, गंध, स्पर्श, चव, स्वर यावर बुद्धीचे नियंत्रण हवे. त्यांचा पुरेपूर उपयोग आपण जरूर करून घेतला पाहिजे. मिळालेल्या नैसर्गिक देणगीची जाणीव आपल्याला व्हायला हवी.
कुठलेही काम करताना मन लावून केले की त्याचा कंटाळा येत नाही. अगदी कागदाची घडी घालताना देखील. त्यातून फक्त आनंदच मिळतो. उदाहरणच द्यायचे झाले तर डॉक्टरकडे गेल्यावर, कुठेही भल्यामोठ्या रांगेत उभे रहाताना, तास दोन तास थांबायला लागणार असेल त्याचा सदुपयोग कसा करावा याचा विचार केला तर त्या वेळेचा कंटाळा येणार नाही. त्या वेळेत गाणी ऐकणे, वाचन केले तर वेळ सार्थकी लागेल. एकदा का आपल्याला एवढा वेळ लागणार आहे ही परिस्थिति स्वीकारली की त्याचा त्रास होत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसाही असला तरी तो आपल्याला बदलता येत नाही. त्या अनुषंगाने आपण बदलले पाहिजे. कारण दुसर्याला बदलण्यापेक्षा आपण स्वत: बदलणे सोपे आणि श्रेयस्कर असते. दुसर्या व्यक्तीकडून आपण केलेली अपेक्षाच जर चुकीची असेल तर अपेक्षाभंगाचे दु:ख आपल्यालाच भोगावे लागते. आपल्याला जे हवे ते त्याच्याकडे नाही याचा स्वीकार केला तर आपण दु:खी होत नाही. ऑफिसमधल्या शिपायाने वेळेवर पाण्याचा ग्लास आणून दिला नाही म्हणून आकांडतांडव करणारे महाभाग स्वत:चेच ब्लड प्रेशर वाढवून घेत असतात. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलो, तर आयुष्यभर एकटेच राहू....! दुसर्याचे दोष दाखवताना एक बोट त्याच्याकडे निर्देशित असते आणि बाकी चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. ते आपल्या लक्षात फक्त येत नाही एवढेच.
बघता बघता वर्ष संपले. काहींना नव्याने विचार करायला प्रेरणा मिळाली तर काही जणांना आपल्या अंगभूत कौशल्याचा जो विसर पडला होता त्याची जाणीव झाली. काहींना आत्मविश्वास मिळाला, तर काहींना आपल्या चुकांची जाणीव झाली, काहीनी भीतीच्या भिंती सहजपणे ओलांडल्या. जाता जाता केलेले मार्गदर्शन सत्कारणी लागलेले बघून आनंद झाला. सदराला मिळालेला प्रतिसाद मलाही खूप काही देऊन गेला. स्वप्न पहाणं, ते साकार करण हेच आपले ध्येय असायला हवे. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं! विश्वास उडाला की आशा संपते! काळजी घेण सोडल की प्रेम संपत! पुन्हा आपली भेट होईल वेगळ्या विषयांवर, वेगळ्या माध्यमातून. संवाद होणारच आहे. तेच तर माणूसपणाचे वैशिष्ट्य आहे. याचसाठी केला स्तंभप्रवास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून तूर्तास तरी BFN.
..........................सविता नाबर
Published in Maharashtra Times, kolhapur edition as on 28th Dec 2016
No comments:
Post a Comment