सकाळच ,प्रसन्न
,कोवळ उन्ह पडलंय. आज मला प्रकर्षान वाटतंय या वेदनामय जीवनातून माझी सुटका
व्हावी. मला मुक्त व्हावस वाटतंय. आंता खूप दिवस झाले. या देहाच्या पिंजऱ्यात मी
फार काळ अडकले. एक क्षण माझा श्वास अडकला. आणि आता शरीर अगदी हलक झाल्यासारख
वाटतंय. जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली अस झालंय . माझ्या बिछान्याजवळ आता
कुणी नाही. पण सकाळची लक्ष्मी आया येऊन बघेल तर तिचा विश्वास बसणार नाही. खरच ती
आली आणि तिन सगळ्या परीचारीकाना बोलावलं. डॉकटरानाही बोलावलं. आणि सगळ्यांना एकच
धक्का बसला. चोवीस तास त्यांच्या सहवासात असलेली ,कळत नकळत प्रतिसाद देणारी
त्यांची अरुणा आता त्यांच्यात नाही. सवयीने जवळजवळ ४२ वर्ष त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य
भाग बनलेली सिस्टर अरुणा त्याना सोडून गेलीय. या सगळ्यानी माझ्यासाठी ,या नश्वर
देहासाठी खूप केल. अगदी मनापासून. मला हे समजत असल तरी मी बोलू शकत नव्हते.
माझ्यापरीने मी त्याना सांगण्याचा प्रयत्न करत होते. या कनवाळू लोकांनी घरच कुणी
करेल की नाही अशी माझी सेवा केली. काय देण लागत होते मी यांची?
घरच्या माणसांवरून आठवल. माझी अशी
अवस्था झाली त्यापासून कुणी इकडे फिरकलही
नाही. माझा भावी पती मात्र मी बरी होण्याची बरीच वर्ष वाट बघत होता. किती
स्वप्न रंगवली होती आम्ही दोघांनी! माझी अशी अवस्था झाल्यावारही तो अगदी रोज मला
पहायला यायचा. माझी आवडती निशिगंधाची फुल घेऊन. किती काळ वाट बघणार तो तरी ! मी
यातून बरी होणार नाही हे समजल्यावर त्यान आपला मार्ग निवडला.
सगळ्या जगाला माझी कथा कळलीय.
पिंकी विराणी माझ्यासाठी, मला मरण याव म्हणून खूप धडपडली. माझ्या इछेचा तर प्रश्नच
नव्हता. म्हणून इच्छामरण शक्य नव्हत. दयामरण मला कायद्याने दिल नाही. गेली ४२ वर्ष
या देहात चेतना असून लोळा गोळा या अवस्थेत मी जगले. या अवस्थेत मलां जगवल माझ्या
सहकारयानी ,माझ्या आवडीच खाण पिण देऊन,
माझ्या आवडीच संगीत ऐकवून, माझ्या शरीराची स्वच्छता राखून , माझ्या मनालाही जपल.
पण तो क्षण मी कसा विसरू शकेन......
स्त्रीच्या आयुष्यात तिचा संसार,
स्त्रीत्व हेच तर तीच जग असत. आणि त्यावरच घाला घातला, तर आयुष्यात काय उरल?
सोहनलाल असा वासनांध असेल , तो माझ्यावर अत्याचार करेल अस चुकुनही वाटलं नव्हत.
त्याचा मी काय गुन्हा केला होता म्हणून त्यान मला अशी भयानक शिक्षा दिली? केवळ मी
एक स्त्री आहे म्हणून? स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून
उघडपणाने जगता येत नाही का? तिची किंमत एक उपभोग्य वस्तू अशीच आहे का? सोहनलाल शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा मारायला
आला. माझ्यामुळे त्याला शिक्षा झाली म्हणून. माझी इतकी दारुण ,करूण परिस्थिती
करूनही तो मात्र सुटला, मला मात्र त्याच्या करण्याची सजा भोगावी लागली. तो आता
सुखाचे आयुष्य स्वत:च्या कुटुंबांसोबत जगतोय आणि मी लोकांच्या दयेला पात्र. एक
करारी, दक्ष परिचारिका म्हणून मी माझ कर्तव्य बजावत असताना हा प्रसंग माझ्यावर
गुदरला.
मला निपचित अवस्थेत पडून
राहाण कदापि आवडल नसत. पण आज अरुणाची काय अवस्था झाली आहे हे पुढच्या पिढ्यांना
कळाव , आजच्या तरुण स्त्रिया, मुली बाहेर अनेक ठिकाणी काम करतात. त्यांच्यावर
वेळोवेळी अनेक बिकट प्रसंग येऊ शकतात , त्यांनी सावध रहाव ,यासाठी मी जगाला ओरडून
सांगत होते , की बायानो जग लांडग्यांच आहे. साधूच्या रुपात कोण चोर येऊन तुमचा गळा
कापेल हे समजणार नाही. तेव्हा जाग्या व्हां. रात्र वैऱ्याची आहे. परंतु माझा क्षीण
आवाज बाहेर फुटत नव्हता. म्हणून ठरवलं आपण या अवस्थेतही , मूकपणे लढा द्यायचा.
अन्यायाविरुध्द. काहीही न बोलता. कुठलीही एक्शन न घेता. फक्त जगाला दाखवून
द्यायचं, अशीही एक अरुणा होती, तिन निपचित पडूनही झुंज दिली. आणि जगाला जाग केल.
--------------------------सविता
नाबर
Published in lokamt, Hello Kolhapur 2015