एकदा एक माणूस निर्हेतुकपणे रस्त्याने
चालला होता. एक दगड त्याच्या दिशेने भिरभिरत आला आणि त्याच्या पायच्या अंगठ्याला
जोरात लागला. त्याचा अंगठा रक्ताने माखला. चिडून त्याने तो दगड उचलला आणि
भिरकावला. पण त्याने भिरकावलेला दगड जवळच्या घराच्या खिडकीवर आपटला त्यामुळे
खिडकीची काच फुटली. त्या घराचा मालक त्याच्याशी तावातावाने भंडायला आला. म्हणजे या
सगळ्या भांडणाचे मूळ त्या माणसाच्या निरुद्योगीपणामुळे झाले. यासाठी कार्यमग्न रहाणे आवश्यक आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला रितेपण येता कामा नये.
जेव्हा एखादा गायक, चित्रकार, शिल्पकार, व्यावसायिक आपल्या कलेमध्ये, व्यवसायात निमग्न असतो, तेव्हा आपले काम सोडून
दुसर्या गोष्टीचा विचार करायलाही त्याला वेळ नसतो. हात रिकामे
रहात नाहीत, त्यामुळे डोके रिकामे रहात
नाही. रिकाम्या डोक्यात भलतेच विचार येत रहातात. वाचन म्हणजे व्यग्र किंवा कार्यरत राहणे नव्हे. कधी कधी वाचन चालू असताना एकीकडे डोळे
अक्षरांवरून फिरत असतात. आणि दुसरीकडे मनात
विचारांची मालिका चालू असते. म्हणजे वाचन हे passive आहे. काम अशा प्रकारचे असावे की त्यामध्ये तन आणि मनाने गुंतून जावे.
आजूबाजूच्या जगाचे भान नसावे. काम हे काम न राहाता आनंदाचे निधान असावे. कुठल्याही
कार्यातली मनाची गुंतवणूक ही फार मोठी असते.
लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते. एका
माणसाला म्हणे एक भूत प्रसन्न होते. काही वर माग असे म्हटल्यावर तो म्हणतो माझे
कुठलेही काम तू पूर्ण करायचेस. पण भूत म्हणते एक अट आहे. मला सतत काम संगितले
पाहिजे. मी मोकळा असलो की तुला खाणार. तो माणूस सांगेल ते काम भूत झटक्यात करून
टाकत असते. त्या माणसाला प्रश्न पडतो, आता याला सांगायचे तरी काय? मोकळे राहिले की खाणार.
मग त्या भुताला एक खांब जमिनीत रोवायला सांगतो. जोपर्यंत मी काम सांगत नाही
तोपर्यंत या खांबावर खाली वर करत रहा. आपले मन असेच असते. त्याला काही काम नसले की
ते नको त्या विचारात गुंतते. मन कुठल्याही कामात मग्न असले की मात्र आपल्याला
कशाचीच शुद्ध नसते. मनाला शारीरिक व्यग्रतेची जोड दिली तर उत्तमच.
खरेतर लहानपणापासून स्वत;ला कार्यमग्न ठेवण्याकडे माणसाचा कल असतोच. लहान मुलसुद्धा आपल्यामते स्वत;ला कशात तरी गुंतवून ठेवत असते. एखादे किडामुंगी पळत असेल त्यावर हाताने
फटाफटा मारून आSS आSS करत आपल्या
पराक्रमाकडे दुसर्यांचे लक्ष वेधत असते. चार ते आठ वयोगटातली मुले वेळ जायचे काही
साधन नसेल तर सतत आईच्या पाठीमागे भुणभूण लावतात. आईचा पदर धरून, मला काहीतरी खेळायला दे असा धोशा लावलेला असतो. अशावेळी त्या मुलाला हे
करू नको, ते करू नको असे सांगण्यापेक्षा काहीतरी करायला देणे
आवश्यक असते.
योगा इन्स्टिट्यूट मुंबई इथे मी जेव्हा
प्रशिक्षण घेत होते, तेव्हा इन्स्टिट्यूटच्या
डीन देसाई मॅडम या नेहमी कार्यमग्न असल्याचे आम्ही पाहात होतो. कुणीही बोलायला आले
तरी त्या गप्पांमध्ये कधीच वेळ काढत नसत. सतत कामात व्यस्त असत. आलेल्या व्यक्तिलाच
काहीतरी काम सांगत. स्वत: कार्यमग्न राहून दुसर्यालाही व्यग्र ठेवण्याची किमया
त्यांना सहज साधली होती. दु:खाच्या वेळी कामच माणसाच्या मदतीला धावून येते. अशावेळी मोकळा वेळ
त्रासदायकच वाटतो. रिकाम्या मनात भलभलते विचार येतात. त्यापेक्षा मन काही कारणाने व्यग्र ठेवणे कधीही हितकर असते. ज्याला फुरसतीच्या वेळात खरोखर आनंद मिळवायचा असतो, त्याला कामातून प्रथम समाधान मिळाले पाहिजे.
मध्यंतरी
आलेली व्ही आर एस ची लाट बर्याच जणांना निराशेच्या अंधारात लोटून गेली. त्यातून जे सावरले ते तरले. पण जे त्यातच
गुरफाटले त्यांना दिशाहीनतेमुळे पुढे काय करावे हे सुचेना आणि भविष्यातला प्रकाश
नाहीसा झाला. वयाची पन्नास पंचावन्न वर्ष झाली की आपल्याकडे निवृत्तीची भाषा तोंडी
यायला लागते. ही निवृत्ती शारीरिक असते. पण मानसिकरित्या नको इतका जीव संसारात
गुंतलेला असतो. वयाच्या सत्तरी , पंचाहत्तरीतही पाश्चात्य
देशातली माणसं अगदी फिट अँड फाईन असतात. पुर्णपणे स्वावलंबी. म्हणून लगेच वयस्क
लोकांनी शारीरिक कष्टाची काम केली पाहिजेत असं नाही. पण मन अशा गोष्टीमधे गुंतवून
ठेवाव की जेणेकरून तब्बेतीची कुरकुर डोक वर काढणार नाही.
निम ग्रामीण भागात औद्योगिक विकास कमी
झालेला असतो त्यामुळे लोकांना भरपूर वेळ गप्पा मारायला असतो. त्यामुळे त्यांचा कल
काही सर्जनशील काम करण्यापेक्षा वेळ कसा घालवावा याकडे जास्त असतो. रिकामे मन हे सैतानाचे घर असते ही म्हण तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे कामात व्यस्त रहाणे ही माणसाची गरज आहे. कामाच्या ध्यासामुळे तो परिपूर्ण होतो. माणसाच्या आयुष्यातील कार्य
वगळल्यास बाकी शून्यच उरेल.
..............................सविता
नाबर
Published in Maharashtra Times, Kolhapur edition on 15th june 2016
No comments:
Post a Comment