एकदा एक धोबी त्याच्या मुलाला घेऊन त्याचे म्हातारे झालेले गाढव
विकायला बाजारात चालला होता. मुलगा अर्थातच गाढवावर स्वार झालेला. रस्त्यात धोब्याचे
मित्र भेटले, “काय मुलगा आहे! स्वत: गाढवावर बसून चालला आहे आणि वयस्क बाप बिचारा
चालतोय” मुलाला हे ऐकून शरम वाटली. तो खाली उतरला. आता बाप गाढवावर बसला. काही
अंतर गेल्यावर काही स्त्रियांनी हे दृश्य पाहिले ते म्हणाले,
बरोबर गाढव असताना बिचारा मुलगा चालतोय. पुन्हा बाप लेकाने निर्णय बदलला. दोघेही
गाढवावर आरुढ झाले. हे ज्या लोकांनी पाहिले ते म्हणाले, “दोघेही
बिचार्या म्हातार्या प्राण्यावर बसलेत. त्यांना जरासुद्धा कशी दया माया नाही.”
पुन्हा ते दोघे खाली उतरले आणि गाढवाचे पाय काठीने बांधले आणि त्याला उलटे टांगून दोघेजण
खांद्यावर घेऊन निघाले. गाढवाचे ओझे वाहून ते इतके दमले की नदीच्या पूलावरून
जाताना एका मोठ्या दगडाला ठेचकाळून पडले. गाढव पुलावरून पाण्यात कोसळले आणि त्याला
जलसमाधी मिळाली. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे.
निर्णय घेताना स्वत:च्या परिस्थितीला अनुसरून
घेतला पाहिजे. आपला निर्णय चुकेल म्हणून बरेच जण निर्णय लांबणीवर टाकत असतात.
कामात अपयश येईल म्हणून निर्णय घेण्याचे टाळत असतात. जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा
आपले डोके शांत ठेवले पाहिजे. बुद्धी समतोल ठेवली पाहिजे. खूप लोक छोट्या छोट्या
गोष्टींवरून डोके फिरवून घेतात. समोरची व्यक्ति संतापली की जो आपले डोके शांत
ठेवतो तो खरा शहाणा माणूस. तोच व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो कारण अशावेळी त्याची
बुद्धी समतोल रहाते. समतोल बुद्धीची कसोटी अडचणीच्या परिस्थितीत आणि संकटाच्या
वेळी लागते. अशा माणसावर कितीही मोठ्या जबाबदारीचे काम सोपवले तरी तो काम पूर्ण
करूनच दाखवतो. महत्वाचे निर्णय घेताना परतीचे दोर उघडे ठेवले म्हणजे फार नुकसान होत
नाही. ज्याला एखाद्या प्रश्नांच्या दोन्ही बाजू बरोबर वाटू लागतात. त्याला कुठल्याच
बाजूने निर्णय घेता येत नाही.
एका
फांदीवर तीन पक्षी बसले आहेत. त्यातले दोघेजण फांदीवरून उडायचा विचार करतात. मग
फांदीवर किती पक्षी राहातील? बरेच लोक म्हणतात एकच पक्षी
राहील. काहीजण म्हणतात कुणीच असणार नाही. कारण ते दोन पक्षी उडल्यावर फांदीच्या
हेलकाव्याने उरलेला पक्षीही उडून जाईल. पण तसे बघायला गेले तर यापैकी कोणतेच उत्तर
खरे नाही. कारण जोपर्यंत मनाशी घेतलेला निर्णय प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत खरी
काहीच हालचाल होत नाही. म्हणून दोन पक्षी नुसते ठरवतात,
जोपर्यंत काहीच अॅक्शन घेत नाहीत तोपर्यंत काही घडत नाही. आपल्या आयुष्यातही असेच
असते. आपण बर्याच गोष्टी मनात ठरवतो, हे करायचे आहे, ते करायचे आहे, पण अॅक्शन होत नाही. कारण निर्णय
होत नसतो.
आयआयएमला
हा प्रश्न विचारला गेला होता. काही मुले रेल्वे ट्रॅकवर खेळत असतात. पैकी एक मुलगा
ज्यावर गाडी येत नाही अशा वापरत नसलेल्या ट्रॅकवर खेळत असतो. आणि दहा बारा मुले, गाड्यांची नेहमी ये जा चालू असणार्या ट्रॅकवर खेळत असतात. लांबून रेल्वे
येताना दिसते. सिग्नल तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याक्षणी काय निर्णय घ्याल? जास्त मुले खेळणार्या मार्गावरून ट्रेनला जाऊ द्याल की एकच मुलगा खेळतोय
त्या मार्गावर गाडी घ्यायला सांगाल? बरेच लोक जो ट्रॅक
वापरात नाही त्यावर गाडी घायला सांगतील, कदाचित तुमचाही तोच
निर्णय असेल. पण थोडासा विचार केलात तर लक्षात येईल, जी मुले
वापरात असणार्या ट्रॅकवर खेळताहेत, त्यांना त्यावर गाडी
येणार याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ती मुले नक्कीच सावध असणार. ट्रेनचा हॉर्न
ऐकताक्षणी ती बाजूला होणार. जो मुलगा पडक्या ट्रॅकवर खेळतोय,
त्यावर ट्रेन नक्कीच येणार नाही ही त्याला खात्री आहे. तार्किक दृष्ट्या तो बरोबर
आहे. समजा तुम्ही तो खेळत असलेल्या मार्गावर गाडी घेतली तर त्या मुलाचा मृत्यू
ठरलेलाच आहे. शिवाय, तो ट्रॅक नदुरुस्त असल्याने त्यावरून
गाडी घेतली तर ती सरळ जाणार नाही. अपघात होऊन गाडीतल्या माणसांच्या जीवाला धोका
आहे. म्हणजे फक्त दहा बारा जणांचा जीव वाचवताना बाकीच्या शेकडो लोकांना तुम्ही
मृत्युच्या दावणीला बांधत आहात. अशा प्रकारचे त्वरित निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर
बर्याच वेळा येत असते आणि आपण दग्ध्यात पडत असतो. अशावेळी थोडा विचार करून निर्णय
घ्यावा लागतो.
निर्णय
घेता न येणे म्हणजे जे परिणाम होतील त्याला तोंड देण्याची तयारी नसणे. जे नुकसान
सोसावे लागणार त्याला मानसिक तयारी नसते. म्हणून अशा लोकांना निश्चित निर्णय घेता
येत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे. One can not have a cake and eat
it also. कोणताही निर्णय घेताना दुसर्या एखाद्या गोष्टीची त्याग
करण्याची तयारी पाहिजे. प्रश्न लोंबकळत ठेवण्यापेक्षा त्याचा लगेच निकाल लावणे
आवश्यक असते.
.............................सविता नाबर
Published in Maharashtra Times on 22nd June 2016 in Kolhapur Times
No comments:
Post a Comment