Wednesday, 15 June 2016

मरणात खरोखर जग जगते

   

          रियर म्हणा, सुख म्हणा, आनंद म्हणा, भविष्य म्हणा सगळ्याची फलनिष्पत्ती एकच. पैसा! कुणी सरधोपट मार्गाने मिळवतो तर कुणी उंगली टेढी करून, झटपट वाम मार्गाने मिळवतो. पण याहूनही सर्वश्रेष्ठ सुख जगात आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. यावरून एक गोष्ट आठवली. एकदा एक गरीब माणूस देवाकडे गेला आणि त्याने त्याच्याकडे धनाची मागणी केली. कारण तुम्हा आम्हाला माहीत आहे. पैसा हे आपले अंतिम ध्येय. “मला सुखी कर माझ्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून मी सुखी नाही. मला मुला लेकराना चांगले चुंगले खायला घालून मोठे करायचे आहे.” देव म्हणाला “ठीक आहे. एक लाख रुपये देतो, तुझा एक हात मला दे. दोन लाख देतो, तुझा एका हात आणि एक पाय मला दे. आणखी एक लाख देतो तुझा एक डोळा मला दे.” असे करत वीस पंचवीस लाखात त्याचा अवघा देह विकला गेला. गरीब माणसाने आता विचार केला पैसा मिळणार असेल तरी त्या बदल्यात आपला देह जाणार. त्याने देवाची क्षमा मागितली. मी काहीही कुरकुर करणार नाही. पण माझा देह धडधाकट ठेव. मी कष्ट करायला तयार आहे. देव म्हणाला, “आता कळले सुख म्हणजे काय ते? दृष्टीसुख, रुचि,गंध, स्पर्श यांचे सुख काय हे तुला कळले असेलच, पण काम करण्याचे, हाती पायी धड असण्याचेही केवढे सुख आहे हेही तुला लक्षात आले असेल.” जेव्हा आपली पंचेंद्रिये शाबूत असतात तेव्हा आपल्याला त्या अवयवांचे महत्व कळत नाही. हातपाय धड असताना चालण्यातले सुख म्हणजे काय हे उमगत नाही. आल्हाददायक रंगांची दुनिया आपण पहात असताना नेत्रहीनांच्या दुनियेतला अंधार आपल्याला जाणवत नाही. 
     शाळकरी वयात एक पुस्तक वाचले होते त्याचे नाव होते कोमा. मूळ लेखक रॉबिन कुक याच्या पुस्तकाचा रवींद्र गुर्जर यांनी अनुवाद केला होता. एखादी व्यक्ति आजारी झाली की तिची तब्बेत आणखी ढासळवून शेवटच्या पंथाला लावायची. आणि सरतेशेवटी, त्या व्यक्तीचे जितके अवयव वापरता येतील तेवढे काढून गरजूंना विकायचे. त्यावेळी अवयव विकणे हेच काहीतरी विचित्र वाटत होते. पण शास्त्र जसे प्रगत झाले तसे मानवी अवयव हेसुद्धा इतर वस्तूसारखेच विकाऊ आहेत हे कळायला लागले. मानवी अवयव जर उपयोगी पडतात तर मृत्यूनंतर त्यांचा उपयोग का करू नये? आता हळू हळू ही अवयव दानाची संकल्पना पुढे येते आहे, रुजते आहे.
       धाकटय़ा भावाच्या अपघाती मृत्यूनंतर अवयव दानाचे महत्त्व भिवंडी येथील विनोद शेटे यांच्या लक्षात आले. उपचारा अभावी तसेच योग्यवेळी अवयव उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमावावा लागतो. यावर ठोस उपाय योजनांची गरज आहे. याची सुरुवात आपल्यापासून करण्यासाठी त्यांनी कुटुंबीयांपुढे अवयव दानाची संकल्पना मांडली. त्याला कुटुंबातील सदस्यांनीही सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे स्वत:चा वाढदिवस आणि जागतिक नेत्रदान दिनाचे निमित्त साधून शेटे आणि कुटुंबातील २४ सदस्यांनी नेत्रदान करत या संकल्पनेची सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील अगदी छोट्या मुलापासून ते 75 वर्षांच्या आजोबांनी सुद्धा नेत्रदान केले. आपला वाढदिवस दणक्यात  साजरा करण्यासाठी नाच, गाण्यावर थिरकत पैशांची उधळपट्टी करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला आढळतील. वाढदिवस आणि जागतिक नेत्रदान दिनाचे निमित्त साधून शेटे यांनी कुटुंबातील २४ सदस्यांसह एकत्रितपणे नेत्रदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. समाजातील अंध व्यक्तींना नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी हा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दानाचाही संकल्प असून, त्याची सुरुवात नेत्रदानापासून करण्याचा एकत्रित निर्णय  घेतला आहे. या उपक्रमात आता कुटुंबीयांतील आणखी १० सदस्य सहभागी झाले असून, मित्र परिवारालादेखील त्यांनी अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. माणसाच्या आयुष्यातली, जन्म आणि मृत्यू ही दोनच ढळढळीत सत्य. जन्माचा सोहळा आनंदाने साजरा होतो. ऐपत नसली तरीही. मृत्युला मात्र गंभीरतेची सजा. उदासीनतेची छटा. किंबहुना मरण कुणालाच न रुचणारे. स्वत:च्या दु:खात चूर असताना दुसर्‍याच्या भल्याचा विचार डोक्यातही येत नाही. अशा वेळी शेटेंसारखे लोक समाजापुढे आदर्श घालून देतात.
    आपल्या पश्चात आपले दोन डोळे दोन व्यक्तींना दृष्टीदान देऊ शकतात. संकल्प अनेक लोक करतात. पण संकल्प आणि प्रत्यक्ष नेत्रदान यामध्ये बरेच अंतर आहे. अस म्हणतात की मृत्यूनंतर शरीराची जेव्हा राख बनते तेव्हा डोळेही त्यामध्ये भस्मसात होतात. मग हाच अत्यंत उपयोगी अवयव बेचिराख होण्यापेक्षा दुसर्‍या कुणाच्या सत्कारणी लागला तर! तेही एकाच वेळी तुम्ही दोन व्यक्तींना डोळे देऊन उपयोगी पडू शकता. तुमच्या डोळ्यांना आणखी काही वर्ष जीवदान मिळते आणि दृष्टी रुपानं सृष्टीचे रूप पाहायला सज्ज होऊ शकता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मृत व्यक्तीचे डोळे, नेत्रहीन व्यक्तिला बसवण्यासाठी चोवीस तासच नाही तर चार दिवसांपर्यंतच्या मुदतीत ते बसवू शकतात. खरेतर ग्रामीण भागात सामाजिक चळवळ फार मोठ्या प्रमाणावर नसते. पण आज अत्याळ सारखं छोट गाव नेत्रदानामधे सर्वात पुढे आहे. किती सुसंस्कृत, पुढारलेले आहेत त्या गावाचे लोक अस म्हणावस वाटत. लोकांमध्ये इतकी जन जागृती झाली आहे की कुणाच्याही घरी मृत्यू झाला की कार्यकर्त्यांना बोलावले जाते. डॉक्टरांना फोन होतो. नेत्र काढून नेत्र पेढीत पाठवले जातात. अशीच चळवळ आता जवळपासच्या तीन चार गावात बेळगुंदी, कौलगे, करंबळी इथे चालू झाली आहे. गडहिंग्लजला देहदानाची चळवळ चालू झाली आहे.
    मृत्युच्या पश्चात एक देह सात जणांचे आयुष्य बदलू शकतो. अजूनही आपल्याकडे अवयवदाना विषयी म्हणावी तितकी जन जागृती नाही. कितीतरी लोक त्याच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने चंद्रपुर येथे अवयव दान यावर एक हृद्य कार्यक्रम झाला. पुगालिया यांनी स्वत;च्या वाढदिनी अवयव दानाचा संकल्प केलाच पण त्यांच्या बरोबर 113 जणांनी असा संकल्प केला. मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान, हाडे, हृदय, यकृत, फुफ्फुसे, स्वादूपिंड यांचे दान गरजू व्यक्तिला, ज्यांच्या शरीरातील हे अवयव निकामी झाले आहेत अशांना करता येते. त्यांना जीवनदान मिळते. आपल्याकडे अशा गरजू व्यक्ति हजारोंनी वाट पाहत आहेत. आपला देह मृत्यूनंतर वाया जाऊ देण्यापेक्षा जर तो दुसर्‍या कुणाच्या उपयोगी पडला तर !
                ................................ सविता नाबर 

Published in Saptahik Sarvkal on 13th June 2016

No comments:

Post a Comment