Wednesday, 15 June 2016

बोल बोल म्हणता.....

           

      का व्यक्तीच्या मनातल्या भावना दुसर्‍यापर्यंत पोचण्यासाठी संभाषण उपयुक्त ठरते. कधीकधी देहबोलीतूनही व्यक्त होता येते. संभाषण म्हणजे निव्वळ बोलणे नव्हे. मनातले विचार समोरच्याला कळायला हवेत. दुसर्‍याच्या मनातले विचार जाणून त्याप्रमाणे आपले आचरण करणे म्हणजे communication. संभाषण किंवा संवाद हा त्याचा एक प्रकार. संवादाचे किती प्रकार आपण अनुभवत असतो. घरात आणि घराबाहेर. फोन, मोबाईलवर, मुले आणि पालक, पति पत्नी, मित्र मैत्रिणीमधला, मालक नोकरातला, कार्यालयातील सहकार्‍यातला, भावनांच्या असंख्य छटा दाखवणारे संवाद. बोलणे आणि ऐकणे यांची सुंदरशी गुंफण म्हणजे संवाद.
     चेहर्‍याला एक तोंड, दोन कान का असतात? म्हणजे जेवढे बोलाल त्याच्या दुप्पट ऐकले पाहिजे. प्रत्येकवेळी बोलणे म्हणजे संवाद नव्हे. कधीतरी ऐकून घेणे म्हणजेसुद्धा सांगणार्‍याला दिलेला प्रतिसाद असतो. समोरच्या व्यक्तीच्या शब्दांना स्पर्श करणे, त्यांना सर्व बाजूंनी पहाणे, शब्दातील भावनांचा गंध, आस्वाद घेणे, म्हणजे श्रवण. इयत्ता पहिली किंवा दुसरीतला धडा मला आठवतो. एकदा देवाने सशाला संगितले नारद बसले आहेत बागेत. जा त्यांना बोलावून आण. सशाने ऐकले नारळ पडले आहेत बागेत. ससा बागेत गेला पाहतो तो काय नारळ तर उंचच उंच झाडावर. त्यावर आपण कसे चढणार आणि देवांना नारळ कसा देणार म्हणून विचारात पडला बिचारा. बराच वेळ झाला तरी सशाचा पत्ता नाही. देवाने पाहिले, ससा आपला विचारात गढलेला. काय घडले हे देवाला कळले तेव्हा देवाने सशाला म्हटले, थांब तू नीट ऐकत नाहीस ना, तुझे कान आता लांब करतो. म्हणून सशाचे कान देवाने ओढून लांब केले. कथा जरी बालांसाठी असली तरी त्याचा गर्भितार्थ आपण मोठ्यांनी उचलायला हरकत नाही. कारण लहानपणी गोष्टीचा तथ्यांश हा तिच्या बाह्यरुपातच पाहतो. पण आपण जरा कळण्याच्या वयातले झालो की त्या रूपकापाठीमागचा हा दडलेला अर्थ कळतो. हा झाला व्यवस्थित न ऐकण्याचा परिणाम. आजच्या घडीला हे संभाषणात कमी पडल्याचा परिणाम म्हणता येईल.
        संभाषण परिचित व्यक्तीबरोबर होते आणि अनोळखी माणसाबरोबरही होते. आपल्याला जे पूर्वीपासून ओळखत नाहीत त्यांचे आपल्याविषयी चांगले मत व्हावे असे वाटत असेल तर ही एकच गोष्ट उपयोगी पडते. आकर्षक कसे बोलावे हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. आपले विचार आणि मते कशी मांडायची याविषयी आधी योजना करून फार कमी लोक बोलतात. त्या क्षणी जे शब्द सुचतात ते बोलतात. आपल्या बोलण्यात सौन्दर्य असणारे, पाल्हाळ नसेलेले, पारदर्शक असेल असे संभाषण हवे. उत्तम संभाषण कला असलेल्या लोकांचे बोलणे आपण ऐकले तर आपल्या बोलण्यातही तशीच खुबी हळूहळू येते.
    संभाषण करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे जरुरीपेक्षा जास्त बोलू नये. संभाषण जितके लांबेल तितका त्याचा प्रभाव कमी होतो. कारण लोकांना बडबडीचा कंटाळा येतो. संभाषणात कोणालाही दोनपैकी एक भूमिका करावी लागते. एक तर स्वत: बोलावे लागते किंवा दुसर्‍याचे ऐकावे लागते. जसे उत्तम बोलणारे कमी असतात तसेच उत्तम श्रवण भक्ति करणारेही कमी असतात. आपण त्याच्या बोलण्यात रस घेत आहोत असे त्याला वाटले पाहिजे. समोरच्या माणसाला पुर्णपणे बोलू द्यावे आणि बोलणे संपल्यावर प्रश्न विचारावा. तो बोलत असताना मधेच शंका काढून प्रश्न विचारू नये. त्याचे बोलणे तोडू नये.
    संभाषणात येणारा व्यत्यय हा बाहेरील गोंगाट, आवाज यामुळे असू शकतो किंवा जर आपले समोरच्याच्या बोलण्याकडे नीट लक्ष नसेल तर, किंवा संभाषणाच्या बाबतीत आपले मन जर खुले नसेल तर बोलण्याचा गर्भितार्थ कानातून आतपर्यंत पोचू शकत नाही. कधी मन उगाचच पूर्वग्रह दूषित असते, त्यामुळे संभाषणाचा योग्य परिणाम होत नाही. एका पतिराजांना आपल्या पत्नीच्या ऐकायला येण्याविषयी शंका असते. हे नवरोजी बायकोला प्रथम दुसर्‍या खोलीतून आज जेवायला काय म्हणून विचारतात. काही प्रतिसाद नाही म्हणून थोडे जवळ जाऊन आज जेवायला काय करणार आहेस म्हणून विचारतात, पुन्हा प्रतिसाद थंडच. पुन्हा थोडे जवळ जाऊन अगदी सहा फुटावरून तोच प्रश्न विचारतात. प्रतिसाद शून्यच. तिच्या अगदी मागे राहून तोच प्रश्न विचारल्यावर पत्नी वैतागून मोठ्या आवाजात उत्तरते, तुमच्या चौथ्यान्दा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे, बिर्याणी. नवरा अचंभीत !! (म्हणजे बहिरे कोण?)
     बोलण्यापेक्षा ऐकणे अवघड. ऐकण्यालाही 3 अर्थ आहेत. To hear , to listen, to obey उत्तम श्रोता हा फक्त तुम्ही बोलता तेवढे ऐकत नाही तर तुम्ही न बोललेल, अर्धवट बोललेल, बोलू न शकलेलही कौशल्याने समजून घेतो. Between the lines सारखे बिटविन द words समजून घेतो. नुसते कानांनी नाही तर डोळ्यांनीही ऐकायला शिकले पाहिजे. पुस्तक वाचताना प्रत्येक शब्दाचा मनाशी संवाद घडत असतो. डोळ्याने वाचत असलो तरी शब्द मनाशी बोलत असतो.
   अत्यंत प्रभावशाली कम्युनिकेशनचे एक उदाहरण सांगते. एकदा एक नेत्रहीन मुलगा बागेतील पायरीवर बसलेला असतो. जवळच एका पाटीवर लिहिलेले असते “मी अंध आहे, मला मदत करा.” त्याच्या जवळच्या एका भांड्यात काही नाणी पडलेली असतात. एक माणूस ते पहातो आणि एक क्लृप्ती लढवतो. त्या लिहीलेल्या संदेशात बदल करतो, “आजचा दिन कैसा सुंदर, परंतु असे मम नयनी अंधार ” त्याचे भांडे नाण्यांनी भरून जाते. दोन्ही वाक्यांमधला अर्थ एकच. तो मुलगा अंध आहे. त्याला सहानुभूती मिळणारच. पण दुसर्‍या वाक्यातल्या संदेशाने लोकांच्या हृदयाला हात घातला आहे. बाकीचे लोक किती भाग्यशाली आहेत जे त्या मुलासारखे अंध नाहीत. संभाषणातून संवाद साधण्यासाठी वेळोवेळी अशा सर्जनशीलतेचीही गरज असते.  
              ...................सविता नाबर 
Published in Maharashtra Times, Kolhapur edition on 8th June 2016

No comments:

Post a Comment