Saturday, 30 April 2016

भुलू नको वरलीया रंगा !!

  

       एक चीनी रूपककथा आहे. एक चीनी माणूस घरात पाणी भरण्यासाठी कावडीचा उपयोग करत होता. त्या कावडीच्या एका बाजूचा माठ व्यवस्थित होता तर दुसर्‍या बाजूचा फुटका होता. जेव्हा जेव्हा तो पाणी भरून न्यायचा तेव्हा तेव्हा त्याला फक्त दीड भांडे पाणी मिळायचे. एक दिवस फुटका माठ त्या माणसाला म्हणाला, “माझ्यामुळे तुझे किती नुकसान होते. बाजूच्या माठातले पानी तुला पूर्ण मिळते पण माझ्यामुळे तुला भांडे भरलेले मिळत नाही. मी अर्धाच आहे.” त्यावर तो चीनी माणूस म्हणाला, “तू ज्या बाजूला आहेस त्या बाजूला तू पाहिलेस का? ती बाजू फुलांनी भरुन गेली आहे. कारण तुझ्यामधून पडणारे पाणी जमीन भिजवते म्हणून त्या बाजूलाच मी फुलांची रोपे लावली होती. ती आता तरारून वाढली आहेत आणि भरपूर फुले देत आहेत. तू स्वत:वर विनाकारण रुष्ट होऊ नको. तुझ्यामुळे मला जी फुले मिळालेली आहेत त्यामुळे आज माझे टेबल सुशोभित दिसतय.”
         स्वत:मधल्या न्यूनामुळे खजील होऊन बरीच मुले दुसर्‍याशी स्पर्धा करायला, तसेच व्हायला बघतात. दुसर्‍याची प्रतिकृती होण्याला काय अर्थ आहे? बाह्यरुपावर भाळून तसेच व्हायचा प्रयत्न होतो, एकदा त्या गोष्टीच्या अंतरात शिरून पहा त्याचे असली रूप! चकाकते ते सगळेच सोने नसते. ती आभासी चकाकी असते. मृगजळ असते. वरवर पाहिले तर हे आभासी रूप अगदी सत्य स्वरूप वाटते. जे समोर दिसते ते सत्य असेलच असे नाही. दुसर्‍याचा भपका आपल्या मनाला खरा वाटतो, त्याच्या मागची कारुण्याची, निराशेची, दु:खाची छटा, व्यथा समजत नाही.
     मुंबईच्या चंदेरी दुनियेचा तरुणाईला खूप मोह पडतो. पैसा, नाव, प्रसिद्धी, कीर्ती काय अन काय. सगळ्याचा भूलभुलईय्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत असतो. पण तिथे जाण्याचा मार्ग कसा आहे याचा विचार मनात येत नाही. म्हणूनच तरुण, पौगंडावस्थेतली मुले, मुली सिनेमात काम मिळण्यासाठी लहान गावातून पळून जातात. कधी त्यांच्या स्वत:च्या तर कधी दुसर्‍या कुणाच्या मर्जीने. प्रसंगी परिस्थितीशी केवढी मोठी तडजोड करावी लागते याची कल्पना जेव्हा प्रत्यक्ष मार्ग चोखळला जातो तेव्हाच येते. अनेक खडतर आणि बिकट प्रसंगांचा सामना करावा लागतो. याशिवाय, जर यदाकदाचित तुमच्या मनासारखे यश मिळालेच तर ते टिकवणे त्याहून कर्मकठिण असते. कधी यश डोक्यात चढते तर कधी पैसा मनाला धुंद बनवतो. ही डोळ्यावरची झापडे दूर करणे दुसर्‍या कुणाला शक्य नसते ते आपले आपणच समजून करायचे असते. नाहीतर प्रत्युषा बॅनर्जी किंवा दिव्या भारती व्हायला फारसा वेळ लागत नाही.
    नुकतेच घडलेले उदाहरण. घरची आर्थिक परिस्थिति बेताची असली तरी शैक्षणिक पार्श्वभूमी सशक्त असलेला अवधूत पाटील हा चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झालेला, दहावीला 94 टक्के गुण मिळवून, मेडीकलला प्रवेश घेऊ इच्छिणारा, एका क्षणाच्या पैशाच्या मोहाने अट्टल घरफोडी करणारा झाला. चोरी केल्यावर सहज मिळणारा पैसा त्याला आकर्षित करून गेला. सहज साध्य असलेल्या पैशाच्या मोहाने भविष्यातल्या परिश्रमावर कुरघोडी केली. त्या क्षणी जर तो या सोन्याच्या वर्खामागे दडलेल्या पितळेला जाणता, तर हा मार्ग त्याने पत्करला नसता.  
         बर्‍याच वर्षाने वर्गातल्या मित्राला भेटल्यावर त्याच्याकडे लेटेस्ट मर्सिडिस आहे म्हणून स्वत:ला कमी समजणारा, आयुष्यात आपण काही कमवू शकलो नाही म्हणून स्वत:ला कोसणारा जगदीश, त्याला माहीत नसते की त्याचा शाळू सोबती हा मर्सिडिजचा मालक नसून ड्रायव्हर आहे. ज्योती एकच मूल आहे म्हणून मनोमनी खंतावणारी, शेजारणीला दोन मुले आहेत म्हणून तिचा हेवा करत असते पण प्रत्यक्षात शेजारणीचे स्वत:चे मूल कॅन्सरशी झुंज देत असते आणि दुसरे दत्तक घेतलेले असते. नवर्‍याने थोडे रोमॅंटिक असावे म्हणून वाट बघणारी रेश्मा, मैत्रिणीचा नवरा कसा तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडायला धावतो म्हणून दु:स्वास करत असते. प्रत्यक्ष परिस्थिती अशी असते की तिच्या जुन्या गाडीचा दरवाजा आतून न उघडता बाहेरूनच उघडावा लागत असतो. दुसर्‍याकडे पाहताना आपल्या अनेकवार मनात येते की ही व्यक्ति सुखी, श्रीमंत, नशीबवान आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला जे मिळालेले असते त्याची मोजदाद कुठेच नसते. लोकांच्या हंड्या झुंबरे बघताना त्यावर तडा गेलेला नाही ना हे बघा.
       कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी एका कार्यक्रमाच्यावेळी सांगितलेला हा प्रसंग. कवि कुसुमाग्रज हे त्यांना अत्यंत पूजनीय होते. वयाच्या चोवीसाव्या वर्षी प्रसिद्ध झालेला पाडगावकरांचा कविता संग्रह त्यांनी कुसुमाग्रजांना पाठवला. महिना, दोन महीने झाले, तीन झाले, पाडगावकरांनी आशा सोडली. आपण पाठवलेला काव्यसंग्रह त्यावर काही वक्तव्य तर सोडाच पण तो साधा पोचला म्हणूनही त्यांचे उत्तर नाही. तो महाकवी. आपण पोरसवदा. ते काय संदेश देणार आपल्यासारख्याला? पाच महिन्यांनी कुसुमाग्रजांचे पोस्ट कार्ड आले. त्यात लिहिले होते, “तुमचा जिप्सी हा कविता संग्रह वाचला. तो मला खूप आवडला. आता मला काव्य करणे बंद करायला हरकत नाही.” एवढ्या प्रतिक्रियेने पाडगावकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यावेळी धनुर्धारी मासिकाचे संपादक असलेले कुसुमाग्रज ज्या रस्त्यावरून जायचे त्याच्या कोपर्‍यावर, पाडगावकर कवि दिसतो कसा आननि! म्हणून निव्वळ त्यांना पाहाण्यासाठी उभे राहायचे. नंतर काही वर्षात त्यांचे कुसुमाग्रजांशी वैयक्तिक संबंध वाढले. पण उमेदवारीच्या काळात या आदर्शाला समोर ठेवून त्यांनी प्रयत्नांचे सातत्य मात्र सोडले नाही. ज्या क्षेत्रात गती आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून स्वत;च्या वाढीसाठी अव्याहत परिश्रम करण्याला पर्याय नाही.

      ----------------------सविता नाबर 
  Published in Maharashtra Times as on 27th April 2016
 

Wednesday, 20 April 2016

क्षमा तिथे शांती

   

     क पाच सहा वर्षांची मुलगी हातातून एक काचेचे बाउल नेते आहे. जवळच सोफावर तिची आई तिच्या छोट्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. ममा, मी हे ओट्यावर ठेवते असे म्हणून ती ते बाउल आत घेऊन जायला निघते आणि आईकडे बघता बघता ती समोरच्या दरवाजाला आपटते. बाउल हातातून निसटते. त्याचे तुकडे तुकडे होतात. मुलीचा चेहरा रडवेला. आता आई रागवणार या भीतीने. पण तिच्या आईच्या चेहर्‍यावर एक हलकीच स्मितरेषा. मुलीचा चेहरा आपसूकच हसरा होतो. चेहर्‍यावर निश्वास सोडल्याचा आविर्भाव आणि आईविषयी डोळ्यात ममत्व भरलेले. आई जवळ बोलावते. मुलीच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, “राणी, असू दे. पडलं तर पडलं. तू काही मुद्दाम केल नाहीस. पुन्हा करताना जपून कर.” माझ्या मनासमोर एक घटना तरळून गेली. याची मी शॉर्ट फिल्म केली. हा दिलासा, क्षमा करण्याची वृत्ती मुलीला आत्मविश्वास देऊन जाते. मोठेपणी आपणच आपल्याला बर्‍याच गोष्टीत क्षमा करत नाही आणि न्यूनगंडाच्या ओझ्याखाली जीव गुदमरतो. व्यक्तिमत्वाची सुरुवात इथूनच, या भित्रेपणातून होते.  
      अल्प शिक्षित माता, कौटुंबिक समस्येने ग्रासलेली आई आपल्या पाल्याला घेऊन रस्त्यातून जात असते . आपल्याच गतीने त्या लहान बाळालाही चालवत असते. मधेच दगडाला अडकून किंवा मुलाचे चालण्याकडे लक्ष नसल्यामुळे ते पडते. ते पडल्यावर त्याला काय आणि कुठे लागले पाहण्याआधी त्या मुलाच्या पाठीत धपाटा बसतो, कसा पडलास? आता हे जर त्या मुलाला माहीत असते तर ते आईबरोबर तिचे बोट धरून कशाला आले असते? पडणे हा त्याचा गुन्हा असतो का? पण मुलाच्या मनात अपराधीपणाची भावना खोलवर रुजते ती अशावेळी. कारण नसताना आपले काही चुकले हे त्याच्या मनाला कमकुवत बनवते.
    एखादी क्षुल्लक चूक, आयुष्याच्या पटावर नगण्य असताना त्याबद्दल स्वत:ला दोषी किंवा अपराधी समजलात तर उभे रहाण्याचा पायाच खचतो. यशाची चव कळते अपयशाची चव घेतल्यावर. जेव्हा आपण कुठेतरी कमी पडतो बाकीच्यांच्या मानाने स्पर्धेत मागे आहोत हे लक्षात आल्यावर न्यूनगंड मनावर स्वार होतो. आपण स्वत:ला क्षमा करत नाही. त्यातून बाकीचे डिवचणारे असतातच. त्या डिवचण्याने आपली मान खाली जाते.
     जे व्यसनाधीन होतात, कशाची तरी वाईट चटक लागते. त्यातून बाहेर पडल्यावरही त्यांना स्वत;विषयी उगाचच कमीपणा वाटत असतो, आणि त्यातून जर कुणी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल काही चिडवले तर धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे वाटते. अशावेळी झाले गेले विसरून, मी आज जो आहे तो खरा असे विचार मनात यायला हवेत. त्या क्षणापासून नव्याने सुरुवात केली तरच जगण्याला नवा अर्थ मिळेल. अन्यथा न्यूनगंडाच्या ओझ्याखाली दबून राहायला होईल.
         स्वत:ला जाणीवपूर्वक क्षमा करणे, मागच्या चुकीचा पुढच्या ध्येयावर परिणाम होऊ न देणे अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजीत याला let go अशी संज्ञा आहे. जुने जाऊ द्या मरणालागूनि, जाळूनि किंवा पुरुनि टाका. भूतकाळात फार अडकले की भविष्यकाळ अंध:कारमय होतो. झाल्या गेल्या प्रसंगावर मात करून पुढे जाणे योग्य. आपण त्यातच अडकतो. आणि अगदी बारीकशा गोष्टीचा बाऊ करतो.  
    सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या तिने आपल्या मर्जीने आवडीच्या मुलाशी विवाह केला. तो दोन चार वर्षे कसातरी टिकला. मुलगा व्यसनाधीन झाला. तिच्या नोकरीने तारले होते. पण एक दिवस कळले की तिने जीव दिला. सासर माहेर तुटलेले. ज्याच्यावर विश्वास ठेवला तो कुचकामी ठरला. पण या गोष्टीसाठी तिने जीव का पणाला लावावा? कधीतरी अशा समस्येवर काळ हे औषध असू शकते. जगण्याला आवश्यक भक्कम आधार लागतो पैशाचा. तो तर तिच्याकडे होता. मग स्वत:ला दोषी समजण्याइतकी मनाची अपराधी अवस्था करून जीवाचे मोल का द्यावे?            
       आपल्या हातून चूक होते कधी कळत कधी नकळत. नकळत आपल्याकडून कोणी दुखावले जाते. कधी आपण आपल्यालाच दुखवलेले असते. केलेली चूक कधी लगेच जाणवते, कधी बर्‍याच उशिरा. एक दोन विषयात नापास झाल्यावर इयत्ता पाचवीतला मुलगा आत्महत्या करतो, कधी आपण परीक्षेत नापास होणार या भीतीनेच जिवाची बाजी लावली जाते. वडिलांनी मोबाइलचा हट्ट पुरवला नाही म्हणून आयुष्य संपवले जाते. वाढदिवसाला अमुक एक मनासारखी गोष्ट पालकांनी घेऊन दिली नाही म्हणून जीवन संपवले जाते. जीवनातल्या हजारो लहान मोठ्या चुकांच्या तुलनेत आपले आयुष्य कोट्यावधी रुपयांचे, अनमोल असते.
     स्वत:ला क्षमा करणे आयुष्याची दिशा बदलते. क्षमाशीलता ही एक प्रक्रिया आहे. प्रत्येकाच्या बाबतीत ती वेगळी असू शकते. हे एका रात्रीत घडणेही शक्य नसते. पण एकदा मनावर घेतले की किती वेळ लागतो? भूतकाळ तर आपण बदलू शकत नाही. तो स्वीकारून पुढे जाणेच आपल्या हातात असते. म्हणून स्वीकारार्हता खूप मोठी देणगी ठरते. ती करुणा, प्रेम स्वत:बद्दलचा आदर वाढवण्यास मदत करते.
       -----------------------सविता नाबर   


Published in Maharashtra Times Kolhapur ed. on 20th April 2016

Wednesday, 13 April 2016

फुलण्यासाठी अवकाश हवे

   

     मैत्रीणीचा मुलगा राघव आय आय टीला गेल्यानंतर वेळी अवेळी त्याला जेवण मिळेना, आधी आई घरी त्याची जेवणासाठी वाट बघत असायची. तो घरी आला की त्याला अन्न गरम करून वाढायची. चार चार दिवस कपड्यांना पाणी लागेना, इस्त्री तर दुरच. इथे आई स्वत: त्याचे पसरलेले कपडे गोळा करून, धुवून इस्त्री करून ठेवायची. आता त्याच्या मोज्यांचे बोळे त्याला स्वत;लाच हातात धरवत नव्हते. एकेकाळी स्वच्छ मोजे हातात मिळायचे. राघव बुद्धिमान होता. पण बाकीच्या आईच्या सूचना तो कानाआड करत होता. गृहीत धरलेल्या आईची किंमत त्याला हॉस्टेलवर राहायला गेल्यावर कळाली. आईने त्याची कामे करण्यामुळे त्याला एक प्रकारे परावलंबितव आले.
      पक्ष्यांच्या पिलाना पंखात ठराविक बळ आले की त्या पिलाचे आईवडील चारापाणी खायला घालणे तर सोडाच पण उडायला शिकवतात, चक्क उघड्या जगात ढकलून देतात. आपल्या माघारी आपल्या पिलाला चारा कोण देईल, त्याला उडता येईल का अशा शंका त्यांच्या मनातही येत नाहीत. बुद्धिमान माणसाच्या पिलाला मात्र वयाच्या विशी बावीशी पर्यन्त आईवडील शिकवत असतात, त्याला खायला घालत असतात. पण त्यांना मुलांना ठराविक अवकाश देणे जमत नाही. ही स्पेस देणे केव्हा जमेल? जेव्हा मुलांना त्यांचे निर्णय त्यानीच घेणे भाग पडायला लागेल. मुलांना जबाबदारीची जाणीव होईल. मूल जर खेळाडू, कलाकार, संशोधक असेल तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दे. त्याच्या मार्गतली धोंड तुम्ही बनता कामा नये. मुलगा किंवा मुलगी मोठी झाली तरी त्यांना वारंवार सूचना देणे आईवडिलांच्या इतके अंगवळणी पडलेले असते की त्यांचे विवाह झाले तरी कधी कधी विसरून तशाच सूचना ते देत रहातात.
      जेव्हा मुलांना त्यांचे अवकाश दिले जाते तेव्हा ती स्वयंभू व्हायचा प्रयत्न करतात. आणि वेळोवेळी स्वत: निर्णय घेतल्यामुळे मनाचा कमकुवतपणा नाहीसा होतो. पायातली शृंखला नाहीशी होते. मला माझा स्वत;चा वेळ पाहिजे म्हणून मुलांना विचार करायला, मनातली भीती घालवायला, पुढचा पावित्रा घ्यायला वेळ दिला पाहिजे. काही वेळ फक्त एकटे रहाणे, स्वत;च्या चिंतनात गुरफटणे आवश्यक असते. अशावेळी तेवढा आवकाश दिले पाहिजे. सम्यक दृष्टीने विचार करायला हा एकटेपणा महत्वाचा असतो. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने एखाद्याला समूहात रहाणे पसंत असेल तर त्याच्या जोडीदाराला एकटे राहायला आवडत असेल. पण म्हणून त्यातल्या एकाने जर आपले मत दुसर्‍यावर लादले तर नात्याची वीण सैल होते. एकमेकांच्या मतांचा आदर करणे म्हणजे स्पेस, अवकाश देणे. सतत प्रश्नांचा भडिमार म्हणजे सुद्धा एखाद्याच्या अवकाशावर घाला असतो. नातेसंबंधामधील  अवकाश मैत्रीणी, मित्र, पतिपत्नी, आईवडिल आणि मुले, सासू सून, नणंद-भावजय यांनी जपणे फार आवश्यक असते. संसारामध्ये काय आवश्यक आहे हे एका ठराविक मर्यादेत सांगणे ठीक असते. पण जर फार ढवळाढवळ केली तर तो नात्यात हस्तक्षेप होऊ शकतो. मग नातेच गोत्यात येऊ शकते.
     आजकाल लीव्ह इन रिलेशन शिप मोठ्या दिमाखदारपणे स्वीकारली जाते. पण....... स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता, घेतलेला निर्णय पचवण्याची, त्याची जबाबदारी पार पाडण्याची, पुर्णपणे चूक स्वीकारण्याची मानसिकता अजून आपल्याकडे नाही. एकमेकांवर दोष ढकलून नामानिराळे राहण्याची वृत्ती लहानपणापासून संस्कारित होते. प्रत्युशा बॅनर्जी एकच नाही. कितीतरी आहेत. आर्थिकरित्या स्वतंत्र असणे जेवढे जरूरी असते त्याहून कित्येक पट अधिक मानसिकरित्या स्वावलंबी असणे गरजेचे असते.
     जनरेशन गॅप किंवा दोन पिढ्यांमधले अंतर का असते?  मागील पिढीने एक पाऊल पुढे जाण्याची आणि नवीन पिढीने एक पाऊल मागे येण्याची तसदी घेतली तरच समन्वय साधला जातो. रेल्वेच्या दोन रुळांमद्धे बारीकशी फट  असते. जेव्हा रेल्वे त्यावरून जाते तेव्हा घर्षण होऊन ते प्रसरण पावतात आणि ते एकमेकांना चिकटतात. मुळातच ते जर चिकटलेले असले तर घर्षण झाल्याने ते वाकडे होतील. नातेसंबंधामधेही असेच आहे. आयुष्यातल्या असंख्य बिकट परिस्थितीत एकमेकांना भिडायची वेळ येते तेव्हा एक त्रयस्थ म्हणून आपल्या जोडीदाराला सल्ला देणे  निकडीचे असते. दोघांपैकी एखादा कुरघोडी करणारा असेल तर त्याच्या निर्णयाने, फार जवळीकीने श्वास घुसमटतो. आईवडिलांच्या छत्र छायेत असताना मुलांचा, विवाहानंतर जोडीदाराचा, मानसिक, बौद्धिक विकास होणे अत्यंत गरजेचे असते. थोडेसे अंतर राखले की हा विकास होतो आणि तो निरखता येतो.
    मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, इतुके आलो जवळ जवळ की, जवळपणाचे झाले बंधन.  
   निकट असूनही श्वासापुरते दूर असावे, जवळपणातही पंखाना आकाश दिसावे.
      अवकाश असले की एकत्र येण्यातही गंमत असते. अविस्मरणीय घटना, प्रसंग आपण आपल्या जिवलग व्यक्तीबरोबर शेअर करतो. आनंदी आणि दु:खद प्रसंगात आपल्याला सुहृदाचीच साथ असते. नात्यांची गुंफण मृदु मुलायम ठेवण्यासाठी आपल्या अशा काही खास आठवणी असतात. वेळेवर अंतर ठेवणे आणि एकत्र येणे हेच तर जीवन आहे. हे ज्याला जमते तो आयुष्य खर्‍या अर्थी जगतो.
       ----------------------सविता नाबर
 Published in Maharashtra Times, Kop ed. on 6th Jan 2016

शतदा प्रेम करावे

  

          वीन वर्षाची सुरुवात होते तीच मुळी गुलाबी थंडीने. वातावरणातला सुखद गारवा नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देत असतो. मग नवीन वर्ष आणि नवीन काम याची सांगड घातली गेली नाही तरच नवल. नवे वर्ष प्रेरणा, उत्साह, आशा, आकांक्षा घेऊन येते, त्याला कसे वळण द्यायचे हे आपल्याच हातात असते. नव्या वर्षाचा सूर्य उगवला आहे. या उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवीन कामाची सुरूवात करू या. आपल्याला 365 सुवर्ण संधी मिळाल्या आहेत. त्या सत्कारणी लावूया.
      तुम्ही मुंगीकडे  पाहिलंय ? एखादा छोटासा  कण घेऊन जात असताना तो कित्येकवेळा खाली पडतो  पण तरीही तिचे  काम अव्याहत चालूच असते. मुंगीच्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतरही तिचा पाठपुरावा चालूच असतो. आपल्या स्वत:च्या  बाबतीतही पहा, विद्यार्थी दशेत सायकल शिकताना कित्येकवेळा आपण पडतो पण प्रयत्न सोडुन देत नाही. सायकल शिकत असताना  आपण मोजत नाही  किती वेळा आपण प्रयत्न केला याचा. पण सायकल चालवायला यायला लागल्यावरचा आत्मविश्वास, आभाळ कवेत घेतल्याइतका मोठा असतो. आशा माणसाला जिवंत ठेवते. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे.  God helps  those who help themselves . जो स्वत:ला मदत करतो त्याला ईश्वर मदत करतो. दगडाला देवपण येण्यासाठी त्यालाही छिन्नीचे घाव सोसावे लागतातच ना !
      एकदा बेडकांचा एक समूह जंगलातून जात होता. जाता जाता एका डबक्यात दोन बेडूक पडले. ते वर येण्यासाठी धडपडायला लागले. बाजूने बाकीचे बेडूक जमा झाले आणि ओरडायला लागले. आता तुम्हाला वर येता येणार नाही. तुम्ही आतच मारणार. कशाला त्रास घेताय, शांतपणे मरा. दोहोतला एक त्याने आशा सोडून दिली आणि मरणाच्या आधीन झाला. दूसर्‍याला मात्र त्याला ऐकू येत नसल्याने त्यांच्या ओरड्याकडे लक्ष न देता जोरजोराने उड्या मारून काठावर येण्यासाठी प्रयत्न करायला लागला. सरतेशेवटी, त्याच्या कष्टाना यश मिळाले. आणि तो वर आला. त्याने जगण्याची दुर्दम्य इच्छा सोडून दिली असती, तर त्याचे मरण नक्कीच होते. आपणही बाकीच्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आशा सोडून दिली तर......सुंदर जगण्याचा अनुभव मिळेल? आशावाद म्हणजे झगझगीत प्रकाश. कठीण परिस्थितीतही गगनाला गवसणी घालण्याचे आशावादी माणसाचे विचार असतात. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा वनस्पतीना जीवन देतो, त्याप्रमाणे आशावाद हा माणसाला जीवन देतो. आशावादामुळेच तुमची विचारसरणी सकारात्मक होते.      
     सुक्याबरोबर ओलेही कधी कधी जळते. जुन्या वर्षातल्या कटू गोष्टी, कमतरता विसरताना, काळजात एक जीवघेणी कळ उठली, सकारात्मक विचारांच्या कवीला निरोप देताना. दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी एक प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन झाले. जन्माबरोबरच मृत्यू हे जरी वैश्विक सत्य असले तरी अशा गोष्टीवर मन विश्वास ठेवू बघत नाही. त्यांच्या काव्यावरच तर चार पिढ्यांच्या भावना पोसल्या. ज्यांनी जगण्यावर प्रेम करायला शिकवले. एकदाच नव्हे तर शतदा. तो कवि शारीर स्वरुपात जरी आपल्यात राहिला नाही तरी विचारांचा ठेवा मागे ठेवून गेला आहे. त्याचा केवढा तरी मोठा मानसिक आधार आपल्या मनाला आहे. वेळोवेळी ऐकलेल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांची एक प्रेमळ प्रतिमा मनात निर्माण झाली होती. जाड भिंगाच्या चष्म्या आडून पहाणारे मोठ्ठे डोळे आणि ओठांचा चंबू पाहून वाटते की ते सांगताहेत, पुता, आयुष्य मौल्यवान आहे. भरभरून जग. जगण्यासाठी पर्याय दोनच. आशा किंवा निराशा. मग सांगा कस जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत. स्वत:वर आणि जगण्यावर प्रेम असेल तर आपले अवघे जीवन आशेने भरलेले आणि भारलेले असते. यासाठीच उत्साहाचा झरा जागता ठेवायला,  निसर्गातल्या अनेक सुंदर गोष्टीना दाद द्यायला शिकले पाहिजे. एखादी छान रांगोळी, सुमधुर आवाजातलं गाणं , सुंदरसं चित्र यांचा मनापासून आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. या साध्या ,छोट्या गोष्टी मधेही तुम्हाला आनंदाचा ठेवा मिळेल. हसत राहिलात तर सारे जग तुमच्या बरोबर हसते. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते  आशावादी रहाणे.
              .................................सविता नाबर     
                 
 Published in Maharashtra Times Kop ed. on 6th Jan 2016