नवीन वर्षाची सुरुवात होते तीच मुळी गुलाबी थंडीने. वातावरणातला सुखद गारवा नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देत असतो. मग नवीन वर्ष आणि नवीन काम याची सांगड घातली गेली नाही तरच नवल. नवे वर्ष प्रेरणा, उत्साह, आशा, आकांक्षा घेऊन येते, त्याला कसे वळण द्यायचे हे आपल्याच हातात असते. नव्या वर्षाचा सूर्य उगवला आहे. या उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवीन कामाची सुरूवात करू या. आपल्याला 365 सुवर्ण संधी मिळाल्या आहेत. त्या सत्कारणी लावूया.
तुम्ही मुंगीकडे पाहिलंय ? एखादा छोटासा कण घेऊन जात असताना तो कित्येकवेळा खाली पडतो पण तरीही तिचे काम अव्याहत चालूच असते. मुंगीच्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतरही तिचा पाठपुरावा चालूच असतो. आपल्या स्वत:च्या बाबतीतही पहा, विद्यार्थी दशेत सायकल शिकताना कित्येकवेळा आपण पडतो पण प्रयत्न सोडुन देत नाही. सायकल शिकत असताना आपण मोजत नाही किती वेळा आपण प्रयत्न केला याचा. पण सायकल चालवायला यायला लागल्यावरचा आत्मविश्वास, आभाळ कवेत घेतल्याइतका मोठा असतो. आशा माणसाला जिवंत ठेवते. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे. God helps those who help themselves . जो स्वत:ला मदत करतो त्याला ईश्वर मदत करतो. दगडाला देवपण येण्यासाठी त्यालाही छिन्नीचे घाव सोसावे लागतातच ना !
एकदा बेडकांचा एक समूह जंगलातून जात होता. जाता जाता एका डबक्यात दोन बेडूक पडले. ते वर येण्यासाठी धडपडायला लागले. बाजूने बाकीचे बेडूक जमा झाले आणि ओरडायला लागले. आता तुम्हाला वर येता येणार नाही. तुम्ही आतच मारणार. कशाला त्रास घेताय, शांतपणे मरा. दोहोतला एक त्याने आशा सोडून दिली आणि मरणाच्या आधीन झाला. दूसर्याला मात्र त्याला ऐकू येत नसल्याने त्यांच्या ओरड्याकडे लक्ष न देता जोरजोराने उड्या मारून काठावर येण्यासाठी प्रयत्न करायला लागला. सरतेशेवटी, त्याच्या कष्टाना यश मिळाले. आणि तो वर आला. त्याने जगण्याची दुर्दम्य इच्छा सोडून दिली असती, तर त्याचे मरण नक्कीच होते. आपणही बाकीच्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आशा सोडून दिली तर......सुंदर जगण्याचा अनुभव मिळेल? आशावाद म्हणजे झगझगीत प्रकाश. कठीण परिस्थितीतही गगनाला गवसणी घालण्याचे आशावादी माणसाचे विचार असतात. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा वनस्पतीना जीवन देतो, त्याप्रमाणे आशावाद हा माणसाला जीवन देतो. आशावादामुळेच तुमची विचारसरणी सकारात्मक होते.
सुक्याबरोबर ओलेही कधी कधी जळते. जुन्या वर्षातल्या कटू गोष्टी, कमतरता विसरताना, काळजात एक जीवघेणी कळ उठली, सकारात्मक विचारांच्या कवीला निरोप देताना. दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी एक प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन झाले. जन्माबरोबरच मृत्यू हे जरी वैश्विक सत्य असले तरी अशा गोष्टीवर मन विश्वास ठेवू बघत नाही. त्यांच्या काव्यावरच तर चार पिढ्यांच्या भावना पोसल्या. ज्यांनी जगण्यावर प्रेम करायला शिकवले. एकदाच नव्हे तर शतदा. तो कवि शारीर स्वरुपात जरी आपल्यात राहिला नाही तरी विचारांचा ठेवा मागे ठेवून गेला आहे. त्याचा केवढा तरी मोठा मानसिक आधार आपल्या मनाला आहे. वेळोवेळी ऐकलेल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांची एक प्रेमळ प्रतिमा मनात निर्माण झाली होती. जाड भिंगाच्या चष्म्या आडून पहाणारे मोठ्ठे डोळे आणि ओठांचा चंबू पाहून वाटते की ते सांगताहेत, पुता, आयुष्य मौल्यवान आहे. भरभरून जग. जगण्यासाठी पर्याय दोनच. आशा किंवा निराशा. मग सांगा कस जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत. स्वत:वर आणि जगण्यावर प्रेम असेल तर आपले अवघे जीवन आशेने भरलेले आणि भारलेले असते. यासाठीच उत्साहाचा झरा जागता ठेवायला, निसर्गातल्या अनेक सुंदर गोष्टीना दाद द्यायला शिकले पाहिजे. एखादी छान रांगोळी, सुमधुर आवाजातलं गाणं , सुंदरसं चित्र यांचा मनापासून आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. या साध्या ,छोट्या गोष्टी मधेही तुम्हाला आनंदाचा ठेवा मिळेल. हसत राहिलात तर सारे जग तुमच्या बरोबर हसते. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते आशावादी रहाणे.
.................................सविता नाबर
Published in Maharashtra Times Kop ed. on 6th Jan 2016
No comments:
Post a Comment