Wednesday, 13 April 2016

फुलण्यासाठी अवकाश हवे

   

     मैत्रीणीचा मुलगा राघव आय आय टीला गेल्यानंतर वेळी अवेळी त्याला जेवण मिळेना, आधी आई घरी त्याची जेवणासाठी वाट बघत असायची. तो घरी आला की त्याला अन्न गरम करून वाढायची. चार चार दिवस कपड्यांना पाणी लागेना, इस्त्री तर दुरच. इथे आई स्वत: त्याचे पसरलेले कपडे गोळा करून, धुवून इस्त्री करून ठेवायची. आता त्याच्या मोज्यांचे बोळे त्याला स्वत;लाच हातात धरवत नव्हते. एकेकाळी स्वच्छ मोजे हातात मिळायचे. राघव बुद्धिमान होता. पण बाकीच्या आईच्या सूचना तो कानाआड करत होता. गृहीत धरलेल्या आईची किंमत त्याला हॉस्टेलवर राहायला गेल्यावर कळाली. आईने त्याची कामे करण्यामुळे त्याला एक प्रकारे परावलंबितव आले.
      पक्ष्यांच्या पिलाना पंखात ठराविक बळ आले की त्या पिलाचे आईवडील चारापाणी खायला घालणे तर सोडाच पण उडायला शिकवतात, चक्क उघड्या जगात ढकलून देतात. आपल्या माघारी आपल्या पिलाला चारा कोण देईल, त्याला उडता येईल का अशा शंका त्यांच्या मनातही येत नाहीत. बुद्धिमान माणसाच्या पिलाला मात्र वयाच्या विशी बावीशी पर्यन्त आईवडील शिकवत असतात, त्याला खायला घालत असतात. पण त्यांना मुलांना ठराविक अवकाश देणे जमत नाही. ही स्पेस देणे केव्हा जमेल? जेव्हा मुलांना त्यांचे निर्णय त्यानीच घेणे भाग पडायला लागेल. मुलांना जबाबदारीची जाणीव होईल. मूल जर खेळाडू, कलाकार, संशोधक असेल तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दे. त्याच्या मार्गतली धोंड तुम्ही बनता कामा नये. मुलगा किंवा मुलगी मोठी झाली तरी त्यांना वारंवार सूचना देणे आईवडिलांच्या इतके अंगवळणी पडलेले असते की त्यांचे विवाह झाले तरी कधी कधी विसरून तशाच सूचना ते देत रहातात.
      जेव्हा मुलांना त्यांचे अवकाश दिले जाते तेव्हा ती स्वयंभू व्हायचा प्रयत्न करतात. आणि वेळोवेळी स्वत: निर्णय घेतल्यामुळे मनाचा कमकुवतपणा नाहीसा होतो. पायातली शृंखला नाहीशी होते. मला माझा स्वत;चा वेळ पाहिजे म्हणून मुलांना विचार करायला, मनातली भीती घालवायला, पुढचा पावित्रा घ्यायला वेळ दिला पाहिजे. काही वेळ फक्त एकटे रहाणे, स्वत;च्या चिंतनात गुरफटणे आवश्यक असते. अशावेळी तेवढा आवकाश दिले पाहिजे. सम्यक दृष्टीने विचार करायला हा एकटेपणा महत्वाचा असतो. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने एखाद्याला समूहात रहाणे पसंत असेल तर त्याच्या जोडीदाराला एकटे राहायला आवडत असेल. पण म्हणून त्यातल्या एकाने जर आपले मत दुसर्‍यावर लादले तर नात्याची वीण सैल होते. एकमेकांच्या मतांचा आदर करणे म्हणजे स्पेस, अवकाश देणे. सतत प्रश्नांचा भडिमार म्हणजे सुद्धा एखाद्याच्या अवकाशावर घाला असतो. नातेसंबंधामधील  अवकाश मैत्रीणी, मित्र, पतिपत्नी, आईवडिल आणि मुले, सासू सून, नणंद-भावजय यांनी जपणे फार आवश्यक असते. संसारामध्ये काय आवश्यक आहे हे एका ठराविक मर्यादेत सांगणे ठीक असते. पण जर फार ढवळाढवळ केली तर तो नात्यात हस्तक्षेप होऊ शकतो. मग नातेच गोत्यात येऊ शकते.
     आजकाल लीव्ह इन रिलेशन शिप मोठ्या दिमाखदारपणे स्वीकारली जाते. पण....... स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता, घेतलेला निर्णय पचवण्याची, त्याची जबाबदारी पार पाडण्याची, पुर्णपणे चूक स्वीकारण्याची मानसिकता अजून आपल्याकडे नाही. एकमेकांवर दोष ढकलून नामानिराळे राहण्याची वृत्ती लहानपणापासून संस्कारित होते. प्रत्युशा बॅनर्जी एकच नाही. कितीतरी आहेत. आर्थिकरित्या स्वतंत्र असणे जेवढे जरूरी असते त्याहून कित्येक पट अधिक मानसिकरित्या स्वावलंबी असणे गरजेचे असते.
     जनरेशन गॅप किंवा दोन पिढ्यांमधले अंतर का असते?  मागील पिढीने एक पाऊल पुढे जाण्याची आणि नवीन पिढीने एक पाऊल मागे येण्याची तसदी घेतली तरच समन्वय साधला जातो. रेल्वेच्या दोन रुळांमद्धे बारीकशी फट  असते. जेव्हा रेल्वे त्यावरून जाते तेव्हा घर्षण होऊन ते प्रसरण पावतात आणि ते एकमेकांना चिकटतात. मुळातच ते जर चिकटलेले असले तर घर्षण झाल्याने ते वाकडे होतील. नातेसंबंधामधेही असेच आहे. आयुष्यातल्या असंख्य बिकट परिस्थितीत एकमेकांना भिडायची वेळ येते तेव्हा एक त्रयस्थ म्हणून आपल्या जोडीदाराला सल्ला देणे  निकडीचे असते. दोघांपैकी एखादा कुरघोडी करणारा असेल तर त्याच्या निर्णयाने, फार जवळीकीने श्वास घुसमटतो. आईवडिलांच्या छत्र छायेत असताना मुलांचा, विवाहानंतर जोडीदाराचा, मानसिक, बौद्धिक विकास होणे अत्यंत गरजेचे असते. थोडेसे अंतर राखले की हा विकास होतो आणि तो निरखता येतो.
    मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, इतुके आलो जवळ जवळ की, जवळपणाचे झाले बंधन.  
   निकट असूनही श्वासापुरते दूर असावे, जवळपणातही पंखाना आकाश दिसावे.
      अवकाश असले की एकत्र येण्यातही गंमत असते. अविस्मरणीय घटना, प्रसंग आपण आपल्या जिवलग व्यक्तीबरोबर शेअर करतो. आनंदी आणि दु:खद प्रसंगात आपल्याला सुहृदाचीच साथ असते. नात्यांची गुंफण मृदु मुलायम ठेवण्यासाठी आपल्या अशा काही खास आठवणी असतात. वेळेवर अंतर ठेवणे आणि एकत्र येणे हेच तर जीवन आहे. हे ज्याला जमते तो आयुष्य खर्‍या अर्थी जगतो.
       ----------------------सविता नाबर
 Published in Maharashtra Times, Kop ed. on 6th Jan 2016

No comments:

Post a Comment