एकदा सकाळीच चहा करताना नजर गेली
एका मुंगीकडे. ती गव्हाचा एक दाणा घेऊन जात होती. सकाळच्या निवांत क्षणी मला टक
लावून त्या मुंगीचा प्रवास बघणे
मनोरंजक वाटले. वाटेत तिच्या दृष्टीने कितीतरी अडथळे आले. कट्ट्याची उंचच
उंच किनार. पण तरीही मुंगी त्यावरुन चढून गेली. मधेच एक चमचा आडवा आला. त्यावरूनही
गहू घेऊन तिने पार केला. आता आली कट्ट्याच्या सीमेंट भरलेल्या भेगेची दरी. बराच
वेळ कदाचित तिने सखोल विचार केला. गव्हाचा कण भेगेच्या दोन्ही कडांवर राहील असा
सरकवला. हळूच भेग उतरून ती पलीकडे गेली. तिथून तिने तो हलकेच खेचून ओढला. पुन्हा
मार्गस्थ झाली. मग मुंगी आली तिच्या घराच्या छिद्राशी. पण तो गहू आतमध्ये जाता
जाईना. तिने ती गहू तिथेच टाकला आणि आपल्या मार्गाने पुढे निघू गेली. ना खंत ना
खेद! इतका प्रवास एका उद्दिष्टासाठी केला. तो प्रवासही तिने मजेत, पुर्णपणे समरस होऊन केला. पण ध्येय निष्फळ ठरल्यावर त्याला तिथेच सोडून
दुसर्या कामाला निघाली.
खरे तर
जे काम आपण हातात घेतो ते तडीस तर न्यायचे असतेच. पण ते काम संपवताना चालणारी क्रिया
अनुभवणे मोठे मजेशीर असते. तोच जीवनानुभव असतो. ईप्सित स्थळी पोचण्याच्या
आनंदापेक्षा तो आनंद मिळवण्यासाठी केलेले परिश्रम आणि तो प्रवास जास्त सुखकारक
असतो. खर तर शिखरावरच्या आनंदापेक्षा तिथे पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो जास्त
प्रगल्भ करणारा असतो. शिखर गाठणे हा एकच क्षण असतो.
कार्यशाळेच्या
निमित्ताने मुलांच्या प्रवृत्ती कशा असतात याचा अनुभव आला. त्या कार्यशाळेत 12 ते
15 वयोगटातल्या मुलांना काही कागदी वस्तु बनवण्यास सांगितल्या. काही जणांनी त्या
अगदी शांत चित्ताने, मन लावून पूर्ण केल्या. काहींनी
अर्धवट केल्या. काहींनी ताई पुढे काय करायचे म्हणून गाडी तिथेच थांबवली. ज्यांनी
काम पूर्ण केले ते खर्या अर्थी आयुष्यात काही धडपड करून पुढे जाणारे होते.
काहींच्यात दिलेले काम पूर्ण करण्याचा पेशन्स नव्हता,
त्यांना लवकर ध्येय पूर्ण करायचे होते. पण त्यासाठी लागणारे कष्ट, त्यातला आनंद घेता येत नव्हता. लवकर काय ते एकदाचे पूर्ण करून रिकामे होऊ
ही प्रवृत्ती त्यामागे होती.
अरुणिमा सिन्हा हिने माऊंट एवरेस्ट शिखर सर
केले. तिने जेव्हा शिखरावर पाय ठेवला तेव्हाचा तिचा आनंद नक्कीच अवर्णानिय असणार.
पण जिंकलेला तो क्षण जितका महत्वाचा त्याहीपेक्षा कितीतरी पट तिने लढलेली लढाई
जास्त महत्वाची होती. एक पाय गुडघ्यातून निकामी झाल्यानंतर तिच्या जिद्दीने केलेला
सराव, मागे न फिरता अडचणींशी मुकाबला करून शिखरावर जाण्याची बाळगलेली तमन्ना! सुधा
चंद्रनने स्वत:चा पाय नसताना नकली पायावर केलेला नृत्याचा सराव आणि मग लोकांनी
तिचे जीव तोडून केलेले कौतुक!!
एका
बुजुर्ग गायकाने सद्य परिस्थितीचा सांगितलेला किस्सा. माझ्या मुलाला एका महिन्यात
संगीतात तयार करा म्हणून एक पालक मागे लागले. रियालिटी शोमध्ये सगळ्यांनाच पी हळद
अन हो गोरी असा परिणाम इन्स्टंटच्या जमान्यात पाहिजे असतो. त्यासाठी तन मन जेव्हा झोकून
दिले जाते, तेव्हाच यशाचे शिखर दिसते. त्यातही
त्यावेळपुरते मिळणारे यश अत्युच्च असे मुले आणि पालक यांची समजूत असते. त्या त्या
वेळच्या अपयशाने ही मुले ओक्साबोक्षी रडतात. त्यांचे पालकही निराश होतात. जसे तेच
त्यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. पण ते करताना
प्रत्येक क्षण आनंदाने जगणे, कष्टाला संतोषाच परिमाण देणे
आपल्या हातात असते. ही मुले जेव्हा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली म्हणून रडतात
तेव्हा प्रकर्षाने आठवतात भीमसेन जोशींसारखे, कुमार गंधर्वांसारखे
अतिरथी, महारथी गायक ज्यांनी कलेसाठी आपल आयुष्य वेचले.
गोपाळराव देऊसकरांसारखा चित्रकार एक कलाकृती निर्माण करायला कित्येक तास, दिवस, तहान भुकेची शुद्ध हरपून काम करत राहिला.
जी. कांबळे, आबालाल रेहमान, बाबुराव पेंटर, हे चित्रकार तर करमरकर, फडके यांच्यासारखे शिल्पकार यांनी आपले जीवन बहाल केले. डॉक्टर लागू, विजया मेहता, विक्रम गोखले यांनी रंगभूमी हीच आपली
माय अशी भावना मनी मानसी जागवली. ध्येय गाठताना त्यांचा प्रवासही अद्भुत होता, जो त्यांनी उत्कटतेने अनुभवला.
या
थोर कलाकारांनी उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न केला. ते प्रत्येक क्षण जगले. एखादे
चांगले बी पेरले, त्याला व्यवस्थित खतपाणी दिले की ते
चांगले फोफावते. त्याचे झाड कसे होईल याची चिंता निसर्गावर सोपवते. कीर्ती, नाव मिळावं म्हणून त्यांनी काही केले नाही. जीवन आनंदाने जगणे हाच ध्यास
होता, मग यश आपोआपच चालत येते. कस्तुरीला आपल्याकडे सुवास
आहे म्हणून सांगावे लागत नाही. तो दरवळतो, तेव्हा लोक
त्याच्याकडे आकृष्ट होतातच. आताचा क्षण आनंदाने जगणे हीच तर आयुष्याची
इतिकर्तव्यता असते.
-----------------सविता नाबर
published in Maharashtra Times Kop.ed. on 9th march 2016
No comments:
Post a Comment