Friday, 8 April 2016

एक क्षण जाणिवेचा !!



एक अत्यंत हुशार, उज्ज्वल करिअरचा मुलगा नोकरीसाठी मुलाखतीला जातो. त्याला लहानपणापासून आईने वाढवलेले असते. बापाविना पोरका अशा त्या मुलाचे संगोपन, शिक्षण आईने मोठ्या मेहनतीने, लोकांच्या घरची कामे करून केलेले असते. आपल्या कष्टाची जाणीवही त्या मातेने मुलाला दिलेली नसते. मुलाखत घेणारा त्या मुलाचा हात हातात घेतो. त्याचा हात अगदी मुलायम असतो. तो त्या मुलाला म्हणतो. घरी गेल्यावर आईचा हात हातात घे आणि स्वच्छ धू. तिला कामात मदत कर. तो मुलगा जेव्हा आईचे हात हातात घेतो तेव्हा त्याला जाणवतात, तिचे सुरकुतलेले, भेगाळलेले हात, त्याच्या डोळ्यात पाणी येते. आईने आपल्यासाठी, आपला भविष्यकाळ चांगला व्हावा म्हणून किती कष्ट केले याची जाणीव त्याला होते. तो उरलेले आईचे काम स्वत: करून टाकतो. दुसर्‍या दिवशी पुन्हा मुलाखतीच्या जागी तो अधिकार्‍याला भेटतो. अधिकारी त्याला विचारतो, काल जेव्हा तू आईचे हात हातात घेतलेस तेव्हा तुला काय वाटले. तो युवक म्हणतो, कष्टाची दाखल घेण म्हणजे काय हे मला काल कळाले, आईला मदत केल्यावर मला समजले की काम करवून घेण म्हणजे काय असते ते. आणि तिसरी गोष्ट मला समजली ती म्हणजे, आपल्या कुटुंबातल्या लोकांशी चांगले नाते कसे बांधायचे! पाणावलेल्या त्या मुलाच्या नजरेने सर्व काही संगीतलेले असते. 
        दुसर्‍याबद्दलचा आदरभाव दाखवणे, सुंदरतेची , बुद्धीची तारीफ करणे आपल्या हातात असते. पण आपण हात फारच आखडता घेतो. मनाची उदारता दाखवत नाही. एका कौतुकभरल्या शब्दाने बरीच कामे होणार असतात. प्रोत्साहन मिळणार असते. आत्मविश्वास मिळणार असतो. कौतुक कुणी कुणाचे करावे याला काही बंधन नाही. बहुतेक मोठ्या माणसांनी लहानांचे करावे. त्यामुळे लहानाना काम करण्याची स्फूर्ति मिळते. अंगावर मूठभर मांस चढल्याने आत्मविश्वास वाढतो. मुलांचा गुणात्मक परीघ विस्तारतो.
      कलाकार जेव्हा मन लावून काम करतात, तेव्हा त्यांना दर्दी लोकांच्या पसंतीची एक पावती पाहिजे असते. ती  मनाला हुरूप देऊन जाते. गायकाची मैफल जर रसिक समोर नसतील तर रंगणारच नाही. म्हणूनच स्व. बालगंधर्व रसिक प्रेक्षकांना मायबाप म्हणत. दाद देणारे श्रोते असतील तर संगीताचा निर्भेळ आनंद दोन्ही बाजूने लुटला जातो. मैफल संपल्यावरही बराच काळ श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहतो. जसे हातात घेतलेले सुवासिक फूल बाजूला ठेवले तरी त्याचा सुवास हाताला लागलेलाच असतो.
      आईने गरमागरम ताटात वाढलेले अन्न, बाबांनी लाडक्या लेकीसाठी घरच्या काटकसरीतून आणलेला मोबाइल, जो आनंद देतो, त्या गोष्टीची आईवडिलांना मी कृतज्ञ आहे ही जाणीव करून देणे. दादाने किंवा ताईने प्रसंगी स्वत:चा बराच वेळ खर्ची घालून अभ्यासात केलेली मदत. यात औपचारिकपणा नाही. यामुळे नातेसंबंध दृढ व्हायला मदत होते. परीक्षा झाल्यावर मित्र मैत्रीणींसाठी घरी आईने केलेली पार्टी, स्वत: खपून केलेले पदार्थ, आईला घातलेली हलकी मिठी तिच्या श्रमाचे सार्थक करते. कधी बाबांची बाइक नादुरुस्त असताना आपली बाइक त्यांना ऑफिसला जाताना देऊन आपण बसची रांग पकडली तर बापाला नक्कीच अशा मुलाचा बाप झाल्याचे समाधान वाटते.
      जेव्हा झाडापानांशी तुम्ही बोलता तेव्हा त्यांची पाने, फुले मोहरून उठतात. फळाफुलांनी लहडून जातात. हा प्रयोग करून पहा. त्यांच्याशी संवाद साधला तर ती किती प्रतिसाद देतात याचा. कुत्र्या मंजरांसारखे मुके प्राणीसुद्धा जवळ घेऊन तुम्ही त्याच्याशी काही बोललात, की लगेच अंग घासून आपले प्रेम व्यक्त करतात. त्यांना ना तुमची भाषा समजते ना बोलण्याचा आविर्भाव, तिथे असतो जिव्हाळा सांगणारा एक स्पर्श.  
        माणसाचा जन्म मिळाल्याबद्दल आपण विधात्याला, निसर्गाला धन्यवाद देतो का? दिवस पार पडला की आजचा दिवस छान होता. त्यासाठी कुठलीतरी मोठी शक्ति कार्यरत आहे यावर विश्वास हवा. जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा जरूर सगळ्यांना जगन्नियंत्याची आठवण होते. पण सुखात असताना मला हे चांगले दिवस दिसले म्हणून कृतज्ञ होणे कुणाला जमते? पाश्चात्य देशात थॅंक्स गिविंग डे असतो. निदान त्यानिमिताने कृतज्ञता व्यक्त केली जाते. पण आपल्याकडचे काय? आपण सगळ्यांनाच गृहीत धरणार का?
      कौतुक किंवा इंग्रजीत ज्याला appreciation म्हणतो त्याला समानार्थी शब्द gratitude, respect, admiration, esteem, thankful असे अनेक शब्द आहेत. कौतुक हा एक प्रातींनिधिक शब्द झाला. इथे appreciation म्हणजे दखल म्हणता येईल.
     माणूस हा भाग्यवान प्राणी आहे. त्याला शब्दासारखे संवादाचे प्रभावी माध्यम वापरुन दुसर्‍याच्या भावना जाणता येतात, त्याच्यापर्यन्त पोचता येते. कृतज्ञता व्यक्त करायला “वा, छान!”, “किती केलेस तू” एवढे मोजकेच शब्द पुरेसे असतात, तर कधी शब्दाचे काम हलक्याशा स्पर्शाने होते. केलेल्या श्रमाचे सार्थक पाठीवरची थाप बरेच काही सांगून जाते. तर कधी नजरेतला आश्वासक भाव साफल्यपूर्तीचा आनंद देऊन जातो. गरज असते फक्त केलेल्या कामाची दखल घेतल्याची जाणीव देणे!! त्यामुळे नातेसंबंध सुधारतात, बळकट होतात. 

published in Maharashtra Times-Kop Ed. on 6April 2016

No comments:

Post a Comment