“न बोलणार्याचे सोने खपत नाही, पण बोलणार्याची मातीही खपते” पासष्टाव्या
कलेबाबत म्हणजेच जाहिरातीबद्दल असे म्हटले जाते. ही बडबड विनाकारण नसून आपले
उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग असतो. आजकाल या बोलण्याला
पर्यायाने जाहिरातीला खूप महत्व आले आहे. ही जाहिरात कधी होते? तुमचे उत्पादन तेवढे चांगले आहे याची ग्वाही देण्यासाठी. स्वत:वरचा विश्वास
हा असाच स्वत:बद्दल ग्वाही देणारा असला पाहिजे. जेवढा आपला आत्मविश्वास दांडगा
तेवढी आपली सर्जनशीलता मोठी आणि आयुष्यातले यशही मोठे. यश मिळवण्यासाठी
आपल्यातल्या आवडीला वेळेच्या प्रमाणबद्ध चौकटीत बसवले पाहिजे. आपल्या जीवनाचे
सुंदरसे शिल्प तयार होण्यासाठी आवश्यक असते आपली आवड , आपला
कल ओळखणे आणि त्याबद्दल वाटणारा विश्वास. त्यासाठी वेळेचा साचा असणे अपरिहार्य
असतेच असते. त्याशिवाय त्याला आखीव रेखीवपणा येत नाही. पण कधी कधी वेळेच्या
साच्यात न बसवताही सुंदर शिल्प तयार करता येते तेव्हा लागते जिगर, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जबरदस्त मनीषा. आपल्या मधल्या राजहंसाला
शोधायला थोडेसे अंतर्मुख व्हायला पाहिजे. प्रत्येकात तो असतो. पण त्याचा प्रकार, पोत समजला पाहिजे.
जॉर्ज
बर्नॉर्ड शॉ यांचे पिग्मलियन नाटक, त्याचे पुलंनी केलेले मराठी रूपांतर, “ती फुलराणी”
नाटक आजच्या तरुण पिढीने पाहिले किंवा वाचले असेल. त्यातली नायिका फुले विकणारी मंजु, तिला स्वत:च्या आतमध्ये काय सामर्थ्य आहे याची जाणीवच नसते. पण जेव्हा
प्राध्यापक तिला शिकवतो, तिची भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न
करतो. तेव्हा तिला तो क्षण गवसतो. त्या क्षणी मी कुणीतरी आहे याची तिला जाणीव
होते. तिच्यात आत्मविश्वास जागृत होतो. आपल्यामध्ये दुसर्या कोणाही व्यक्तीत
नसलेले गुण असू शकतात. फक्त ते आपल्याला जाणवले पाहिजेत. कधी ते परिस्थिती जाणवून
देते, तर कधी संपर्कातली व्यक्ति. निद्रिस्त कलेला, गुणाला जागृत होण्यासाठी कशी आणि कधी संधि मिळेल हे सांगता येत नाही.
रामशास्त्री प्रभुणे पेशव्यांचे न्यायमूर्ती
का आणि कसे झाले हा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. भिकबाळीने
त्यांच्यातल्या विद्वत्तेला जागृत केले. निसर्गाने प्रत्येकात काहीतरी असे बीज
पेरले आहे, ज्याचे रोप वाढले की
मानवी मनाला, समाजाला आनंद होतो. ते आपल्यातून शोधून मात्र
आपल्यालाच काढायचे असते. डॉक्टर वि. ना. श्रीखंडे, प्रख्यात
सर्जन पण त्यांच्या बोलण्यामध्ये दोष होता. कुणासमोर बोलायचे तर ते तोतरत. मग
बोलायला जीभ धजावणार तरी कशी? पण त्या दोषावर त्यांनी मात तर
केलीच पण ते इतके मोठे निष्णात सर्जन झाले की त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय
स्तरावर पसरली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेळ आणि संधि दिली पाहिजे. मी कोण आहे हे
स्वत:ला जाणवणे महत्वाचे. जो स्वत:ला ओळखतो त्याच्या जीवनाचा प्रवास सोपा होतो.
स्वत्वाची ओळख पटायला वयाची काहीच अट नसते. किंबहुना वयाच्या कोणत्या टप्प्यावर
स्वत्वाची जाणीव होईल हे सांगता येत नाही.
करियर
करणे म्हणजे तरी काय? आपला
स्वभावधर्म, कल ओळखून, मनाला आनंद
देणारी जीवनशैली निवडणे. ते निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असते. पैसा
मिळवणे म्हणजे सर्वस्व नव्हे. त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. लोकांच्या
आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहण्यापेक्षा आपल्याला स्वत:ला काय पाहिजे हे
समजले पाहिजे. स्वत:चा स्वत:वर विश्वास असला की लोकांचा आपोआपच बसतो.
एकदा एक नवविवाहिता तिच्या आईकडे आली आणि
आपल्याला संसारात किती कष्ट पडतात , किती धडपड करावी लागते याचा पाढा वाचायला लागली. आईने तिला उदाहरण दिले, उकळत्या पाण्यात थोडावेळ गाजर ठेवले, अंडे ठेवले
आणि कॉफीच्या बिया टाकल्या तर परिणाम त्या तीन्हीवर काय दिसतो ते पहा. घट्ट असलेले
गाजर शिजून मऊ पडते, तर नाजुक असणारे अंडे उकळत्या
पाण्याच्या धगीने एकदम घट्ट होते. कॉफीच्या बिया मात्र उकळत्या पाण्याने आपला
स्वाद त्या पाण्याला देतात आणि त्याचा रंग व चव बदलतात. परिस्थितीचा आपल्यावर
प्रभाव न पाडता आपलाच ठसा आजूबाजूच्या वातावरणावर उमटवतात. आणि सुगंध देतात. कठीण
परिस्थितीत कसे वागायचे तू ठरव. परिस्थितीचे आकलन व्हायला आपल्या कामी येतो तो
आत्मविश्वास !! तो तर आपल्याजवळच असतो. !!
..................................सविता नाबर
published in Maharashtra Times, Kop ed. on 13thJan 2016
No comments:
Post a Comment