प्रसंग एक : “तुझ्या
डोळ्यात मला माझी स्वप्ने दिसतात. तुझ्या सोबतीनेच मला आयुष्य काढायचे आहे. तूच
माझ्या जीवनाची प्रेरणा आहेस.” “.........” “ आज आपण सिनेमाला जाऊ. तो सिनेमा आपल्या
सारख्या प्रेमीजनांसाठीच आहे. मला आशा आहे तू संध्याकाळी येशील.” “..........” “ आपण कुठेतरी दूर जाऊ. बाईकवरून मस्त निसर्गाची
सफर करू. दुसर्या दिवशी परत येऊ. मला खात्री आहे, तुला
यायला आवडेल.” “........” तिचा होकार गृहीतच.
पण इथे तिने निक्षून नकार द्यायला हवा.
प्रसंग
दोन : एक मैत्रीण आपल्या सखीला म्हणते “ट्रीपला यायला तुला
काय हरकत आहे? घरात सगळे करायला तर बाई आहे. तुझ्याकडे काम
करणार्या बाईला सासुबाईंकडे लक्ष ठेवायला सांग ना दोन दिवस.” सखी गुळमुळीतपणे
म्हणते, “ ते खरय गं. पण लेकाची परीक्षा आहे. नवर्याला दोन
दिवस फिरतीला जायचे आहे. मी जमले तर बघते.” ज्या एखाद्या गुंतागुंतीच्या
क्षणी सखीची घरात आवश्यकता आहे अशावेळी तिने मैत्रीणीला नकारच द्यायला हवा. कर्तव्याचा
प्राधान्यक्रम ठरवणे सखीच्या हातात आहे.
प्रसंग तीन:
“ अरे पपाना सांगायची काय गरज आहे ? कॉलेजला गेलोय म्हणून
सांगायचे आणि पटदिशी जाऊन यायचे. कुणाला काय कळतय ! माझ्या मित्राचे बहरिनला
चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. तो काय म्हणतोय ते बघू तर खर!! फार तर नोकरीसाठी थोडे
पैसे आगाऊ द्यायला लागतील. आजकाल सगळीकडेच द्यावे लागतात. नोकरी मिळाली की बघ, पपा जाम खुश होतील.” मित्र दग्ध्यात पडलेला. नकार देऊ तरी कसा? अगदी जवळचा मित्र.
प्रसंग
चार: “ अरे खा रे. एकवेळ जिलब्या खाल्ल्या म्हणून काही होत नाही. काय झाले तर बघू.
मी आहे न! काय साखर वाढते बघूया. तुला असले जालिम औषध देतो की झपकन तुझी शुगर कमी
आलीच पाहिजे.” सांगणारा सामान्य माणूसच. पण आव मात्र डॉक्टरच्या वरताण! अशा
मित्राचे ऐकावे का?
“फक्त
पन्नास हजारासाठी जामीन पाहिजे. आणि मी त्याला चांगला ओळखतो. तो तुझी एक पै देखील
बुडवणार नाही. त्याला जामीन म्हणजे मलाच जामीन राहिल्यासारखा आहेस रे तू! आणि ते
देखील फक्त महिन्याभरासाठी. तू अगदी डोळे झाकून जामीन रहा” मित्राचा सल्ला मानावा
का?
जिथे
नाही, नको म्हणणे अत्यंत आवश्यक आहे तिथे कुठलाही संकोच न करता, नाही म्हणणेच योग्य असते. कधी स्पष्ट शब्दात, तर
कधी शर्करावगुंठित वेष्टनात. गुळमुळीतपणाचे फार मोठे दुष्परिणाम पुढे भोगावे
लागतात. तिला किंवा त्याला नाही म्हटले तर काय वाटेल? याचा
विचार मनात जास्त येतो पण आपल्या प्राधान्यक्रमात काय बसते याचा विचार आधी झाला
पाहिजे. कारण होकाराबरोबर बांधिलकी ( commitment) आली. रोजच्या
आपल्या दैनंदिन आयुष्यात नाही म्हणण्यासारख्या अनेक गोष्टी सामोर्या येतात. कधी
आपण सजग असतो, कधी नसतो. पण प्रत्येक गोष्टीकडे डोळेझाक न
करता बघायला हवे. ‘नाही’ दोन अक्षरी
शब्द पण त्यात कितीतरी मोठे सामर्थ्य आहे. व्यक्तिमत्व कणखर बनायला मदत होते.
दारूच्या पहिल्याच प्याल्याला जर नाही म्हटले नाही तर पुढचे भविष्य फक्त
प्याल्याच्याच हातात असते.
लहान
मुलांचे किंवा पौगंडावस्थेतल्या मुला मुलींचे लैंगिक शोषण या नकाराच्या
स्वातंत्र्यावरच अवलंबून असते. कारण आपण नाही म्हटले तर शेजारचे किंवा ओळखीचे काका
रागावतील या भावनेने काकांची मजल पुढे जाते आणि ज्यासाठी पुर्णपणे काका जबाबदार
असतात त्याचे दोष मात्र असहाय बळी ठरलेल्या व्यक्तीच्या माथी फोडले जाते. मुलांनी
आपल्या विश्वासातल्या व्यक्तिला याविषयी ताबडतोब कल्पना देणे जरूरी असते. या
ताणाखाली खूप मुले जगतात, बर्याच वेळा आयुष्यातून उठतात. मूळ
असते ते ठामपणे नकार देण्याचे स्वातंत्र्य त्याला माहीतच नसते यामध्ये. अपराधीपणाच्या
भावनेखाली मनाचा कोंडमारा मात्र होत रहातो.
कधी मोह, कधी भीडेखातर, कधी मैत्रीत नाही कसे म्हणायचे म्हणून, कधी आपण
नाही म्हटले तर आपल्या सारख्याने या गोष्टीला नकार देणे वाईट दिसते म्हणून, सगळ्यांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणून धडपड असते, तर कधी आपल्या प्रेस्टिजला शोभत नाही म्हणून, उगाच
होकार भरला जातो. कधी कुणाचा स्वभावच कुणालाही नाही म्हणायचा नसतो. पुढे जाऊन
आपल्या होकाराचे परिणाम काय होतील याची मानसिक तयारी मात्र ठेवावी लागते. नकार
देणे थोडेसे कौशल्याचे काम आहे.
लहान
गावातल्या मुली सिनेमात काम देणार म्हणून कुणाच्या भुलथापाना बळी पडतात, तर कधी लग्नाच्या आमिषाने परिस्थितिवर मात करण्यासाठी नकार देणे जड जाते.
बाहेरच्या जगाचे फारसे ज्ञान झाले नाही की कुणाच्या स्वभावाचा थांग लागत नाही. आणि
एकदा भरलेला होकार पाय मागे घेऊ शकत नाही. जसे एक खोटे लपवायला अनेक वेळा खोटे
बोलावे लागते तसे असा एक होकार पाचवायला पुढे अनेक होकार द्यावे लागतात. म्हणून
नकाराचा अधिकार बजावलाच पाहिजे.
---------------------------------सविता नाबर
published in Maharashtra Times Kop ed. on 23rd March 2016
No comments:
Post a Comment