कचर्याच्या
कोंडाळ्याच्या बाहेर खूपच कचरा साठत होता. बरेच दिवस तसाच असायचा. एक दिवस
कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली आणि तिथे एका दगडाला शेंदरी रंग
फासून ठेवण्यात आले. झाले बघणार्याचा नजरिया बदलला. तिथला कचरा तर नाहीसा झालाच.
पण लोक येता जाता नमस्कार करायला लागले. म्हणजे घाणीच्या ढीगाची जागा स्वच्छतेने
घेतली. करामत होती एका शेंदरी दगडाची. लोकांची श्रद्धा अशा रीतीने सत्कारणी लावली
त्याबद्दल आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांवर त्या बुद्धिवंताचे किती उपकार झाले!
काही
दिवसांपूर्वी प्रख्यात लेखक, पत्रकार विनय हर्डीकर यांच्याशी गप्पा
मारण्याचा योग आला. एखादी गोष्ट आपण अगदीच मोडीत काढतो. पण त्याचा सकारात्मक कसा
उपयोग होतो याचे मूर्तीमंत उदाहरण हर्डीकरांच्या रूपाने आमच्यासमोर उभे होते.
कित्येकांना निद्रानाशाचा विकार असेल. तसा त्यांनाही आहे. पण जागेपणाचा उपयोग
त्यांनी पुर्णपणे वाचनासाठी केला. त्यामुळे वेळ वाया गेला असेही वाटत नाही. आणि
तक्रार करायला जागाही राहत नाही.
समोरच्या नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक हेतूने
पहाणे तर आलेच पण त्या आपल्या विरोधी गोष्टींना आपल्या फॉर करून घेणे, त्याचा
पूर्णपणे सकारात्मक हेतुसाठीच उपयोग करणे हे खूप कमी लोकांना जमते. म्हणजे
न्यूनाचा एक भक्कम पायरी म्हणून उपयोग करून त्यावरच विश्वासाने पाय रोवून पुढे
जायचे असते. होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मला अगदी प्रकर्षाने जाणवलेले
सत्य. जन जागृती शंभर टक्के नसली तरी झाली आहे नक्कीच. लोकांमधली सजगता, सामाजिक जाणिवेची प्रगल्भता वाढली आहे. हजारो शेणी दान केल्या आणि हजारो
पुरण पोळ्या होळीच्या मुखात घालण्याऐवजी गरिबांच्या तोंडी लागल्या. सकारात्मकतेचे
हे समाधान खूप काही देऊन गेले. न सांगताच!!
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा
हे पहाताना, भरलेला दुधाचा प्याला,
त्यात साखर वेलदोडे टाकून त्याची चव वाढवता येते ना ! तुम्ही समोरच्या गोष्टीकडे
कसे पहाता, त्यावर काय प्रतिसाद देता यावर तुमची प्रवृत्ती
अवलंबून असते. जगायचं तर आहेच, मग ते रडत खडत जगण्यापेक्षा
हसत हसत जगलेलं चांगलं नाही का? मला एक अत्यंत मार्मिक उधृत
आठवले,
काटयांनी भरलेल्या रस्त्याने चालताना, मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची,
समोरून पायच नसलेल्या माणसाला पाहून, जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची!!
एकाच गोष्टीकडे बघण्याचा
प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगवेगळा असतो. आता हेच पहा, समजा जुनी
कार तुम्हाला भेट मिळाली आहे. एकजण म्हणतो, जुनाट भंगार आहे, दुसर्याला ते कामचलाऊ स्वस्तातले सेकंड हँड वाहन वाटू शकते तर तिसर्याला
ती अॅंटीक मौल्यवान वस्तु वाटू शकते. जर दिवसाच्या सुरुवातीचा सेल्स कॉल अगदीच
कुचकामी ठरला. तर बघणार्याचा नजरिया असा की, नकारात्मक
विचार करणारा म्हणतो, आजचा दिवस काही चांगला जाणार नाही.
सुरुवातच भंकस झाली आहे. सकारात्मक दृष्टीने पाहाणारा म्हणतो, प्रत्येक कॉल वेगळा असतो. पुढचा नक्कीच चांगला असणार.
एक लहान मुलगा शाळेतून घरी येतो, आपल्या हातातली शिक्षकांनी दिलेली चिठ्ठी आईला देतो. आई ती चिठ्ठी वाचते
आणि अश्रुभरल्या डोळ्यांनी मुलाला सांगते, बाळा तुझ्या
शिक्षकांनी लिहिलय तुमचा मुलगा अतिशय बुद्धीमान आणि हुशार आहे. त्याला
शिक्षणदेण्या योग्य आमच्याकडे एकही शिक्षक नाही. तुम्ही त्याला घरीच शिकवा. कालांतराने
तो मुलगा एक अद्वितीय संशोधक होतो. कित्येक वर्षानी एकदा घरातल्या काही जुन्या
पुराण्या वस्तु पहात असताना त्याला ड्रॉवरमध्ये एक घडी केलेला जुनाट कागद सापडतो.
त्यावर लिहिलेले असते, तुमचा मुलगा शिकायला मानसिक रित्या अत्यंत
कमकुवत आहे. आमच्या शाळेत त्याला शिकवता येण्यासारखे नाही. तो चिठ्ठी वाचून रडतो, आपल्या डायरीत लिहितो, “थॉमस अल्वा एडिसन हा मानसिक
रित्या आजारी मुलगा आज जगभरातला महान संशोधक झाला आहे, ते
केवळ त्याच्या आईमुळे.” दहा हजार प्रयोग केल्यानंतर एडिसन बल्बचा शोध लावण्यात
यशस्वी झाला. पण त्या अयशस्वी प्रयोगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोण असा होता, मला त्यातून कळले की दहा हजार मार्ग आपल्या प्रयोगासाठी योग्य नव्हते.
एकदा एक
प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी देतात. पेपर बघितल्यावर सगळे
विद्यार्थी चक्रावतात. कारण तो कोरा असतो. फक्त मध्यभागी एक काळा ठिपका असतो. काही
वेळाने सगळ्या विद्यार्थ्यांच्या कडून प्राध्यापक उत्तरपत्रिका घेतल्यावर
प्रत्येकाचे उत्तर वाचायला लागतात. प्रत्येकाने काळ्या ठिपक्या बद्दल लिहिलेले
असते. तो मध्यभागी आहे वगैरे. प्राध्यापक सांगतात, हाच
आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण! आपण संपूर्ण पांढरा असलेला पेपर पहात नाही.
एक क्षुल्लक काळा ठिपका नजरेत भरतो. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे ते
पहाण्यापेक्षा, त्याचा सृजन सोहळा बघण्यापेक्षा एक काळा
ठिपका, जो आयुष्यातला काहीतरी तब्बेतीचा प्रश्न, पैशाचा प्रश्न असू शकतो, याकडे आपले लक्ष जाते, त्यावरच आपण लक्ष केन्द्रित करतो. मग सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत?
..................................सविता नाबर
(published in Maharashtra Times Kop Ed 30March 2016)
No comments:
Post a Comment