रविवारची सुंदर, प्रसन्न सकाळ, सगळे कोल्हापूर शहर गर्द धुक्याच्या दुलईत लपेटलेले. शिवाजी
विद्यापीठापासून ते टाउन हॉल पर्यन्त सगळीकडे पांढर्या पारदर्शी ओढणीसारखे धुकेच
धुके. थोड्याच वेळात साडे नऊ दहाच्या सुमारास रंग बहारची मैफल सुरू झाली. आणि
वातावरणातला आल्हाददायक गारवा कोवळ्या उन्हाची शाल घेऊन रसिक दर्दींच्या उबेला
आला. चित्र, शिल्प, संगीत या तिन्ही
कलांचा त्रिवेणी संगम अनुभवयाला करवीर रसिक जातीने हजर होता. आपल्याला आयुष्यात
काय पाहिजे हा प्रश्न तिथे त्याक्षणी कुणीही स्वत:ला विचारला असता तर नक्कीच, त्याचे उत्तर मिळाले असते. शिल्पकार प्लास्टर ऑफ पॅरिसचा हा एवढा गोळा
घेऊन शिल्प कोरण्यात दंग होते. तर चित्रकार आपल्या चित्र चितारण्यात मग्न. शेजारी
गुजरी तोडीची सुरेल मैफल. एकाचवेळी दृकश्राव्य आनंद घेताना आपल्या पंचेंद्रियाना
मिळणारे अतुलनीय समाधान काय असते हे कुणी आपल्यासारखा भाग्यवानच जाणे !
हे
म्हणजे तुम्हाला Beating Around The Bush वाटू शकेल. पण माझ्या विषयाकडे येताना मला रंगबहारच्या मैफलीचा उल्लेख
करणे अपरिहार्य वाटले. कारण प्रत्येक कलाकार आपआपल्या कलेत मग्न होता. तन्मयतेने
आपल्या कलेची साधना करण्यात तल्लीन झाला होता. शिल्प आकाराला येताना, चित्रातले स्केच काढताना , रंग भरताना , स्वरांचा लगाव लागताना त्या कलेशी तद्रूप झाल्याची खूण दिसत होती. आपल्या
आवडत्या कलेत कलाकार प्राण ओतत होता. हे कसे? प्रत्येक
कलाकाराने विशिष्ट ध्येय ठरवले होते. तेही आपला आवडत्या क्षेत्रात काम करण्याचे.
जेव्हा आपला व्यवसाय, आपले काम आणि आपली आवड एकच असते तेव्हा
तन मनाने आपण त्या कामाशी एकरूप होऊ शकतो. पण आयुष्यात ध्येय ठरवणे महत्वाचे.
शुद्ध शालेय शिक्षण आणि पुढे करियर म्हणजे पैसा मिळवणे हेच उद्दीष्ट कशासाठी?
राही सरनोबत किंवा अंजली भागवत जेव्हा
लक्ष्यवेध करतात तेव्हा त्यांनाच विचारलं पाहिजे एकाग्रतेचे महत्व. आयुष्यात असेच वन पोइंटेडनेस म्हणजेच एका बिन्दुवर मन केन्द्रित हवे
म्हणजे ते काम शंभर टक्के साध्य होते. जेव्हा गुरु द्रोणाचार्यानी आपल्या
शिष्यांना पक्ष्याचा डोळा भेदण्याचे काम सोपवले, तेव्हा
त्यांना आपले लक्ष्य सोडून बाकीचे काय दिसते आहे असे विचारले, तेव्हा प्रत्येकाने आपआपल्या परी वेगवेगळी उत्तरे दिली. कोणी म्हणाले
आकाश दिसते, तर कुणाला झाडाच्या फांद्या दिसत होत्या. कुणाला
पक्षी दिसत होता. फक्त अर्जुनालाच पक्ष्याचा डोळा दिसत होता. जे साधायचे आहे
त्यावर मन पुर्णपणे एकाग्र झाले नाही तर मनाच्या सैर भैर अवस्थेत किंवा
विचारांच्या फापट पसार्यात ध्येय गाठणार कसे?
एखादे
काम हातात घेतले की त्याचा ध्यास असल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही. थॉमस अल्वा
एडिसन याने जेव्हा विजेचा बल्ब शोधला तेव्हा त्याचे नऊशे नव्याणव प्रयोग असफल
झाले. तेव्हा कुठे हजारावा प्रयोग यशस्वी झाला. परंतु त्यासाठी तेवढ्या वेळा
प्रयोग करताना त्याने किती एकाग्र चित्ताने काम केले असेल ! तहान भूक विसरून, देहाचे चोचले बाजूला सारून जेव्हा त्याने त्या प्रयोगाला आपले भान हरपून, मन केन्द्रित केले तेव्हाच तो काही करू शकला. तुमची बुद्धी सर्वात जास्त कोणत्या विषयात चालते
हे तुम्हाला निरीक्षण करून,
अभ्यास करून ठरवावे लागते. स्वत:चे निरीक्षण केल्यावर तुमची खरी आवड कळते.
जेव्हा
आयुष्याचे उद्दीष्ट ठरवतो तेव्हा कामांचा प्राधान्यक्रम ठरवणेसुद्धा तेवढेच
महत्वाचे असते. म्हणजेच महत्वाचे काम प्रथम आणि त्यानंतर येतात त्यापेक्षा गौण
कामे. आपल्या ध्येयासाठी जास्त वेळ आणि अग्रक्रम देणे महत्वाचे. आपले ध्येय
गाठण्यासाठी वॉरन बफेट याने तीन अत्यंत साध्या सोप्या पायर्या सांगितल्या आहेत.
त्याचा खाजगी विमानचालक फ्लिन्ट याला त्याने सांगितल्या त्या तुम्हा आम्हालाही
उपयुक्त आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आठवडाभरात पूर्ण करावयाच्या आपल्या
ध्येयांची यादी करा. त्या गोष्टी वीस पंचवीस असू शकतील. दुसरी पायरी म्हणजे, पुन्हा एकवार त्या यादीकडे पहा त्यातल्या अत्यंत महत्वाच्या पाच गोष्टी
ठरवा, त्याच्या भोवती वर्तुळ करा. पुन्हा विचार करा. आणि
तिसर्या पायरीला त्या पाच महत्वाच्या गोष्टीच करायच्या मनापासून ठरवा आणि
त्यासाठी वेळ द्या. अनावश्यक गोष्टी करण्यासाठी जो तुमचा वेळ जाणार आहे तो नक्कीच
वाचेल. म्हणजेच उरलेल्या गोष्टी आपण ठरवतो त्या फक्त वेळ खाणार्या असतात. त्यातून
निष्पन्न काहीच होत नसते.
शिकार्याने
एकाचवेळी दोन सावज टिपायचे ठरवले तर शक्य आहे का? दोन्हीही
हातातून जाणार. एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर मन केन्द्रित केले तर एक ना धड भाराभार
चिंध्या अशी गत होते त्यापेक्षा एकावेळी एकच पुर्णपणे मन लावून केली तर त्यामध्ये
तुमचे कौशल्य वाढते.
........................सविता
नाबर
published in Maharashtra Times, Kop ed. on 20th Jan 2016
No comments:
Post a Comment