Tuesday, 12 April 2016

दुसर्याच्या भूमिकेतून..........

  

      विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या त्रयींचा कवितांचा कार्यक्रम एकदा कॉलेजमध्ये ठेवला होता. कार्यक्रम छान पार पडला. प्रत्येकाला मानधनाचे पाकीट दिले. आता सगळेजण जायला निघणार इतक्यात विंदानी मला विचारले, “इथे जवळच ऑर्थोपेडीक हॉस्पिटल आहे ना? मला जरा तिथे घेऊन चल. तिथे आमच्या एका मित्राच्या पत्नीला अॅडमिट केले आहे.” त्यांना घेऊन जाताना त्यांनी जिन्यात मधेच आपल्या मानधनाच्या पाकिटात स्वत:च्या खिशातले पैसे घातले. तिथे त्या बाईंना भेटल्यावर, त्यांच्याशी गप्पा झाल्यावर हळूच ते पाकीट विंदानी त्यांच्या हातात सरकवले. आणि म्हणाले, शिरूभाऊंनी हे तुमच्या औषधपाण्यासाठी दिले आहेत. वेळीच कामास येतील. त्या बाई म्हणजे शाहीर अमर शेख यांच्या पत्नी. परतताना राहवेना म्हणून विंदाना विचारले, तुम्ही तुमचे मानधन ,त्यात आणखी भर घालून त्यांना दिले. मग तुम्ही शिरूभाऊंचे नाव का घेतले. त्यावर ते म्हणाले. घेणार्‍याचे मन आधीच ओझ्याखाली असते. आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागते आहे अशावेळी याचक होत मन. देणार्‍याकडून घेताना त्रास वाढतो. अशावेळी निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत नाही. माझ्या दृष्टीने म्हणशील तर त्या व्यक्तिला पैसे मिळणे महत्वाचे होते. कुणी दिले हे गौण आहे. हा प्रसंग सांगितला आहे, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी. देता देता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे हे म्हणताना विंदा स्वत: परानुभूती (empathy)घेत होते. दातृत्व असणारे किती लोक अशा भूमिकेतून विचार करत असतील?
      हनुमंतप्पा सियाचेनमध्ये शहीद झाला. पण भौतिक सुखात रमलेल्या आपल्या सारख्या नागरिकाला त्याच्या बलिदानाचे काय सोयर सूतक? आपण मात्र सगळ्या गोष्टींचा हव्यास धरताना एवढासुद्धा विचार करत नाही जे सैनिक सरहद्दीवर आपल्यासाठी जिवाची अक्षरश: बाजी लावतात, त्यांच्या आठवणीत एक दिवस किंबहुना एक क्षण थोडासा परभाव प्रवेश करून पहावा. सियाचेनचे वातावरण ,तिथले तापमान पाहता आपल्यासारख्याला तिथे एक तास सुद्धा काढणे भयावह वाटते, अगदी कल्पनेतसुद्धा. जे सैनिक आपल्यासाठी बलिदान देतात त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबाचे काय होत असेल याचा विचार कुणी करते का? त्याची तरुण पत्नी, लहान मुले, आई वडील यांच्या भविष्याचे काय, मुलांच्या शिक्षणाचे काय ?
     शिक्षणात फारसे गम्य नसलेली मुले घरच्यांकडुन, नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून अगदीच मोडीत काढली जातात. नापास झाल्यावर लोक वाटेल तसे बोलतात. 2000 साली मुंबई मटासाठी एक मोठा लेख मी करत होते. दहावीच्या परीक्षेला एवढे महत्व कशाला? त्यावेळी मेरीटमध्ये आलेल्या मुलांची मानसिक स्थिति जाणून घेतली, शिक्षकांची विद्यार्थ्यांबद्दलची मते, त्यांनी अभ्यास कसा करावा यासाठीचे त्यांचे प्रयत्न, हे लक्षात घेताना नापास मुलांसाठी क्लास घेणारे श्री. धुरी यांचेही मत मी ऐकले. खास करून नापास मुलांना वर काढणे, त्यांच्या मनाला उभारी देण्याचे त्यांचे काम स्पृहणीय होते. त्यांच्या मते, मुले पियर प्रेशर आणि पालकांच्या अपेक्षांमुळे खचत जातात. इथे कामी येते परभाव प्रवेशाची संकल्पना. त्या विद्यार्थ्याला काय वाटते, ते त्याच्या भूमिकेत थोडा वेळ शिरून जाणून घेणे महत्वाचे असते. लहान मुलाला आपल्याबरोबर आपल्याच वेगात फरपटवत घेऊन जाणारे अडाणी पालक, चालताना ते मूल पडले की त्याला कुठे लागले काय हे न पाहता आधी त्याच्याच पाठीत धपाटा घालतात. चूक कोणाची? क्षणभर पडलेल्या त्या मुलाला लागलेल्या जागेवर फुंकर घालणे हे महत्वाचे. त्या लहान मुलाच्या जागी स्वत:ला कल्पून पहा. परभाव प्रवेश असा पदोपदी आपल्याला उपयोगी पडत असतो. आपल्याला त्याची फक्त जाणीव पाहिजे.
     गोष्ट आहे पाश्चात्य देशातली. एक मुलगा पाळीव प्राण्यांच्या दुकानात जातो. दुकानदार त्याला बर्‍याच प्रकारची कुत्र्याची पिले दाखवतो. तो सगळ्या कुत्र्याच्या पिलांकडे पाहतो आणि एक कुत्र्याचे लंगडे पिलु विकत घ्यायला पाहतो. त्याच्याकडे तेवढे पुरेसे पैसे नसतात. तो दुकानदाराला म्हणतो, मी पैसे जमवीन आणि हे कुत्र्याचे लंगडे पिलु विकत घेईन. दुकानदार म्हणतो, तू ह्या लंगड्या पिलाबरोबर खेळूसुद्धा शकणार नाहीस. त्या ऐवजी चांगले धडधाकट पिलु घे. तो नाही म्हणतो. हळूच आपल्या पॅंटचा पाय सरकवतो, तो कॅलिपरमध्ये असतो. तो दुकानदाराला सांगतो, माझ्याबरोबर खेळायला हेच पिलु योग्य आहे कारण तेच फक्त माझ्या गतीने पळू शकेल. इथे हवी परानुभूती.          
      नातेसंबंध जपताना परानुभूती असेल, परभाव प्रवेश माहीत असला तर ते चांगले दृढ होतात. सासू-सून, जावा-जावा, सासरा-जावई, नणंद-भावजय यांच्यामध्ये एकतर्फी संबंध कधी कधी ताणले जातात. थोडासा परभावप्रवेशाचा त्याला स्पर्श लाभला तर ते संपन्न व्हायला नक्कीच मदत होईल. तो किंवा ती अशी का वागली याचा कार्यकारणभाव जाणून घेतला तर दूरचित्रवाणीवर चालणार्‍या सिरियल्सचा, त्यामधल्या कौटुंबिक हेव्या दाव्यांचा  प्रभाव कुटुंबातल्या नातेसंबंधावर पडणार नाही. आपली मने थोडी जरी संवेदनक्षम झाली तरी माणुसकी आपल्या आयुष्यात सुखाने नांदेल.  
       --------------------------सविता नाबर


published in Maharashtra Times Kop ed. on 24th Feb  2016

No comments:

Post a Comment